MH-02-XA-40X2 – भाग अंतिम


भाग पहिला – MH-02-XX-4XXX – भाग पहिला

भाग दुसरा – MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा

भाग तिसरा – MH-02-XA-4XX2 – भाग तिसरा

अरुणने रात्री उशिरा केलेले आणि पहाटे केलेले फोन त्यांच्यासाठी एक महत्वाचा दुवा होता. अचानक काहीसे आठवून त्यांनी ऑपरेटरला फोन लावला आणि तपासाला काही तरी दिशा मिळाल्याचे एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तराळले…

इन्स्पेक्टर भालचंद्र रावत जातीने ह्या प्रकरणात लक्ष घालत होते. त्यांच्यावर इतर जबाबदाऱ्यादेखील होत्या, पण ही केस त्यांनी अगदी प्रतिष्ठेची करून घेतली होती. जमेल तितके पुरावे आणि माणसांची जबानी ह्यात घेतली गेली. दोन दिवसांनी मुंबईला जाऊन एकनाथची साक्ष घेण्याचे मनसुबे उद्ध्वस्त झाले. कारण चार दिवसांनी भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील एका खाजगी कार्यक्रमासाठी नागपुरात येणार होत्या. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी आणि त्या जिथे जिथे कार्यक्रमाला जातील, त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आली. अचानक आलेल्या या जबाबदारीमुळे त्यांच्या तपासातली एकसूत्रता भंग पावली. रस्त्याची गस्ती, संशयित लोकांची धरपकड आणि हॉटेल्सची झडती हीच कामे त्यांच्या मागे लागली.

इकडे मुंबईत बॉबी आणि जयेशभाई आपल्या धंद्यात गुंतले. रोजची गाडीभाडी, बस तिकीट बुकिंग आणि सोबतीला सायबर हे वेळापत्रक सुरु झाले. मध्यंतरी दोन-तीनदा बॉबीने रावतांना फोन केला, पण तो त्यांनी कामात असल्यामुळे कट केला. गाडी जाऊन आता १४-१५ दिवस झाले होते. इतक्या दिवसात गाडी पूर्ण सुटी करून किंवा जशीच्यातशी कोणाला तरी विकली असेल. त्यामुळे पोलिसांचा तपास पुढे जाणार नाही याची त्यांना खात्री पटली. रोज सकाळ-संध्याकाळ जयेशभाई बॉबीच्या ऑफिसात मेरा नुकसान हो गया, कर्जे मैं डूब गया म्हणून रडगाणं गात असे. बॉबीला ते निमुटपणे ऐकून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. असे दिवस जात राहिले.

होता होता महिना झाला. सकाळी सकाळी रावतांनी जयेशभाईंना फोन केला. “रावत बोलतोय… दाढी खूप वाढलीय. चारकोपला येतोय दाढी करायला. ” जयेशभाई काही म्हणेपर्यंत समोरून फोन कट झाला होता. जयेशभाईंना काय कळावे सुचले नाही. ते तडक बॉबीकडे निघाले. त्याचं ऑफिस त्याच्या घरापासून अगदी दोन इमारती सोडून होतं. बॉबी ऑफिसमध्ये सिगारेट पीत बसला होता. जयेशभाईंचा असा प्रश्नार्थक चेहरा बघून तो तडक बाहेर आला आणि हातातली सिगारेट फेकून दिली. “क्या हुआ जयेशभाई??”

त्यांनी झालेला प्रकार बॉबीला सांगितला. आता बॉबीदेखील विचारात पडला. बॉबीचा सायबर जिथे होता, त्या इमारतीत एक दुधवाला, एक ब्युटीपार्लर, एक दातांचा दवाखाना, एक किराणामाल दुकान, एक दागिन्यांचे दुकान आणि एक हेअर कटींग सलून होते. सगळे तसे बॉबीला चांगले ओळखायचे आणि त्याला मानायचेसुद्धा. बॉबीने तातडीने रावतांना फोन करायचा प्रयत्न केला, पण फोन बिजी आला. त्याने वैतागून फोन कट केला आणि सिगारेट पेटवली.

पाच मिनिटांनी जे दृश्य बॉबी आणि जयेशभाईंना दिसले, त्यावर त्यांचा स्वत: विश्वास बसत नव्हता. डोळे फाडून ते एकटक तिथे बघत राहिले. इन्स्पेक्टर भालचंद्र रावतसमोर एका गाडीत बसलेले आणि ही तीच गाडी जी चोरीला गेली होती. जयेशभाईंच्या उत्साहाला पारावर उरला नाही. ते धावत गाडीपाशी गेले आणि गाडी न्याहाळू लागले. रावत त्यांच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, “हो हो तुझीच गाडी आहे.” आणि ते बॉबीच्या दिशेने निघाले. बॉबीशी हात मिळवत, बाजूला असलेल्या खुर्चीवर बसले. मागून एक पोलिसांची जीप आली आणि ती थोडं अंतर ठेवून उभी राहिली. पोलिसांच्या गाडीतून कोणी उतरले नाही, सगळे होते तसेच बसून राहिले. नंतर दोन मिनिटांनी रिक्षातून एकनाथ उतरताना दिसला. तो पूर्णपणे घामाने थिजलेला होता. त्याचा एक गाल लालसर सुजला होता. हाताने गाल दाबत तो बॉबीच्या ऑफिससमोर आला. बॉबीला त्याच्या सुजलेल्या गालाची कहाणी न सांगता कळली होती.

रावत एकदम गडबडीत उठले आणि बाजूला असलेल्या हेअर कटींग सलूनमध्ये घुसले. जीपमधून एक हवालदार उतरून त्या सलूनच्या बाहेर उभा राहिला. रावतांनी बॉबी, जयेशभाई आणि एकनाथला आवाज दिला आणि सलूनमध्ये यायला सांगितले. एअर कंडीशन वातावरणामध्ये ते एका खुर्चीवर जाऊन बसले. सलूनवाल्याने न सांगता स्पेशल दाढीची तयारी सुरु केली. रावतांनी हातातले घड्याळ आणि अंगठी समोर काढून ठेवली. युनिफॉर्मच्या शर्टाची दोन बटणे काढून, त्या खुर्चीत निवांत बसले. सलूनमध्ये अजून दोन कारागीर होते, जे टीव्ही बघण्यात मग्न होते. रावतांना समोरच्या आरश्यात मागे उभ्या असलेल्या तिघांचे चेहरे साफ दिसत होते. दाढीचा एक हात मारून झाला.रावत काहीच बोलले नाही. एव्हाना मागे उभ्या असलेल्या ह्या तिघांची चुळबूळ सुरु झाली. एकनाथने धीर एकवटून विचारले, “साहेब, मी बाहेर थांबू का? मला एसी चालत नाही. लगेच सर्दी होते” रावतांनी समोरच्या आरश्यात काहीसे नाराजीने बघितले, आणि त्यांची आणि एकनाथची नजरानजर झाली. एकनाथ काय समजायचं ते समजला.

दाढी करणाऱ्या पोरालामध्येच थांबवून, रावत मागे वळले, “मग जयेशभाई, तुमची गाडी मिळाली. एकदम सुखरूप. गाडीवर एक साधा ओरखडादेखील नाही. खुश नं?” जयेशभाई तडक पुढे झाले आणि रावतांशी हात मिळवत म्हणाले, ” खूप उपकार झाले, बहोत बहोत शुक्रिया. पर गाडी मिली कहां पें. खुनी पकडे गयें?” रावत नुसते हसले, “मानेने होकार देत, परत दाढी करायला बसले” त्या पोराने तोंडाला फेस लावला आणि वस्तरा घेऊन दाढी सुरु केली. दाढीनंतर आपल्या तुळतुळीत चेहऱ्यावर हात फिरवत त्यांनी पोराला दाढीचे पैसे दिले. आता ते जयेशभाईकडे वळले आणि बोलू लागले..

“मी मुंबईला कालच आलो. जेव्हा आलो तेव्हा तडक एकनाथचं ऑफिस गाठलं. निव्वळ पैश्यासाठी धंदा करणारा हा मनुष्य, त्यामुळे त्याला जिथून फोन आला, त्या नंबर व्यतिरिक्त मला काही सापडले नाही. पण एकनाथने गुन्हा केला होता आणि त्याची त्याला काहीतरी शिक्षा मिळायला हवी म्हणून त्याला पोलिसी हिसका दिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, दोन दिवसांपूर्वी अशीच एक गाडी गोराईइथून मिसिंग आहे. हंपीला जातो म्हणून ती गाडी भाड्याने घेतली गेली, पण ती निर्वाचित स्थळी कधी पोचलीच नाही. गाडीची अजून काही माहिती नाही, आणि ड्रायव्हरशी काही संपर्क होत नाही. परवा रात्री त्याने शेवटचा फोन केला… बस्स्स !!! शेवटच्या फोनवरून आठवलं की अरुणने रात्री झोपताना आणि सकाळी निघताना जयेशभाईंना फोन केला होता. त्या फोन रेकोर्डच्या आधारे, जवळ असलेल्या मोबाईल टॉवरमधून कनेक्ट झालेले सगळे फोन आम्ही तपासले. जवळजवळ ७४० फोन नंबर्स आम्हाला मिळाले. सर्वांचा अभ्यास सुरु झाला. प्रत्येक नंबरचा मालक कोण, मालकाची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही ते तपासले. ७४० फोन्स मधून आम्ही ५ संशयित नंबर बाजूला काढले. ४ फोन्स मध्यप्रदेशातले आणि एक मुंबई इथला. फोन रेकॉर्डिंग मिळणे अशक्य असल्याने, आम्ही परस्पर त्या मोबाईलच्या पुढच्या हालचालींवर काही दिवस नजर ठेवून राहिलो.”

“बाकी जरावेळाने सांगतो, पण आधी गाडी कशी मिळाली ते सांगतो. मध्यप्रदेश कोर्टात जेव्हा तपासाची एक कॉपी द्यायला गेलो. तेव्हा कोर्टाच्या आवारात गाडीतच बसून मी आणि माझे सहकारी चहा पीत बसलो. इतक्यात माझ्या गाडीसमोर एक कोरी करकरीत ईनोव्हा येऊन थांबली. नेहमीप्रमाणे माझी संशयी नजर गाडीवरून फिरली. गाडीला MP ची पिवळी नंबर प्लेट होती, त्यामुळे ही ती गाडी नाही म्हणून मी चहा पिऊ लागलो. अचानक काही तरी ओळखीचं बघितल्यासारखं मी गाडीकडे बघितलं. गाडीच्या मागच्या काचेवर एका कोपऱ्यात हनुमानाचा फोटो होता आणि फोटोखाली गुजरातीत लिहिलं होतं जय बजरंग बली !!”

“गाडीच्या ड्रायव्हरकडे चौकशी केल्यावर कळले, की मध्यप्रदेशातले नावाजलेले वकील रामप्रकाश गुप्ता यांची ती गाडी आहे आणि दहा दिवसांपूर्वीच विकत घेतली आहे. रावतांनी गाडीचे पेपर बघितले आणि ते बरोबर होते. हे पेपर बनवणे किती सोप्पं आहे, हेही ते ओळखून होते. गाडीचा मालक वकील असल्याने मी तिथे जास्त चौकशी केली नाही” कोर्टाचे काम संपल्यावर वकील आपल्या गाडीत बसून निघाले आणि मागोमाग आम्ही निघालो. एका निर्जन रस्त्यात त्यांना गाठून वकिलांची पोलिसीतऱ्हेने चौकशी केली आणि त्यात तो वकील भडाभडा ओकला. त्याला स्वतःची बदनामी करायची नव्हती, त्यामुळे त्याने ती गाडी कुठून घेतली वगैरे सांगितले आणि एका तासात आम्ही त्या तिघांपैकी एकाला पकडला आणि बाकी दोघे पळून जाण्यात यशस्वी ठवले. त्या तिघांनी ही गाडी ७ लाखांना विकली होती. गाडी चोरल्यावर पाच दिवसात गाडीचे पेपर बनवून तिचे MP पासिंग करून, ट्रान्सपोर्ट परमिट घेतले होते. वकील साहेबांचे जितके चांगले संबध चांगल्या लोकांशी तितकेच चांगले संबंध गुन्हेगार लोकांशी होते. त्या वकिलाकडून कोऱ्या कागदावर सही आणि शिक्का घेऊन त्याला गाडी हवाली करायला सांगितली. वकिलाच्या माहितीनुसार ज्याला पकडला तो याक्षणी बाहेर गाडीत बसून आहे.”

एकनाथ मध्येच त्यांना तोडत म्हणाला, “मग तो फोन त्यानेच केलेला का?”

रावते गालात हसले, “ज्याने फोन केला, त्या माणसाला गाडीची आणि आजूबाजूला असणाऱ्या लोकांची माहिती होती. कुठल्या गाफीलक्षणी आपण ती गाडी पळवून नेऊ शकू याचे त्यांनी विशेष प्लान्निंग केले होते. तुला ज्या नंबरवरून फोन आला गाडीसाठी, त्याचं नंबरवर रात्री आणि पहाटे असे एक एक फोन गाडीतून आले. ते फोन चारकोपमध्येच उचलले गेले अशी माहिती आम्हाला मोबाईल कंपनीने दिली. नंतर काही काळाने तो फोन बंद झाला आणि त्याच लोकेशनवर दुसरा फोन डिटेक्ट झाला तोच तो संशयित नंबर मुंबईचा. त्या टॉवरवर तो नंबर लोकेट झाला आणि गाडीतून त्या नंबरवर एक फोन केला गेला. सकाळी ८:३०ल देखील मध्यप्रदेशमधून त्या नंबरवर फोन केला गेला”

“मग तो नंबर कोणाचा??” एकनाथ उत्सुकतेने विचारू लागला..

“तो नंबर इथलाच, ह्या सलूनमधला. हाच तो पोरगा जो त्या टोळीला गाड्यांची माहिती देत होता. धंद्यात नवीन आहेत साले, कळत नाही कोणाशी पंगा घेतलाय त्यांनी.. थोड्याश्या पैश्याच्या मोबदल्यात नवीन गाड्यांची माहिती काढायची आणि मग ती त्या टोळीला कळवायची” हे ऐकताच बॉबीला धक्का मारून तो मुलगा पळून जाऊ लागला, पण बाहेर हवालदाराच्या काठीचा एक फटका बसल्यावर जागच्याजागी विव्हळत बसला.त्याने सगळा गुन्हा कबूल केला आणि २० हजाराच्या मोबदल्यात हे काम केल्याचे सांगितले. लवकर श्रीमंत व्हायची इच्छा हेच गुन्हा करण्यामागे मुख्य कारण होते.

इन्स्पेक्टर भालचंद्र रावत आणि तिघेजण बाहेर आले. बाहेर बेड्या घातलेला तो तरुण हमसून रडत होता, आणि हात जोडून माफी मागत होता. रावतांनी त्याच्याकडे तुच्छतेने बघितले आणि शिवी हासडून म्हणाले, “भेट भडव्या पोलीस कोठडीत, नागवा करून ह्या बेल्ट ने फोडतो तुला” एव्हाना रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाल्याने, रावतांनी हवालदाराला इशारा केला आणि हवालदार पोराला जीपमध्ये कोंबून चारकोप पोलीस स्टेशनकडे भरधाव निघाले. रावतांनी बॉबी, जयेशभाईंचे आभार मानले. एकनाथच्या सुजलेल्या गालावर हलकेच चापटी मारत म्हणाले, “मी कधीतरी गाडी हवी म्हणून खोटा फोन करेन आणि जर तू आता केलेला प्रकार पुन्हा केलास, तर माझा हात आहे आणि तुझे गाल आहेत… समजल??” एकनाथने शरमेने होकारार्थी मान हलवली.

रावत पोलीस स्टेशनकडे निघता निघता मागे फिरले, “Bobee, Can I have one smoke?” बॉबीने संपूर्ण पाकीट त्यांना देऊ केले, “नको नको, एक पुरेशी आहे. नवीन बाबा झालोय. बायकोला कळलं तर माझ्या बाळाला मला जवळ घेऊ द्यायची नाही. सिगारेट सोडायची आहे. तू पण सोड…. चल Byeee”

!! समाप्त !!

तळटीप – ह्या सर्व प्रकारानंतर जयेशभाईंनी पनवती गाडी विकायची ठरवली आणि ती गाडी बॉबीने विकत घेतली. गाडी पळवणाऱ्या टोळ्यांना ही गाडी म्हणजे एक चपराक होती आणि त्याचा बदला म्हणून ह्या गाडीवर आजही विशेष पाळत असते. पण गाडी बॉबीच्या ताब्यात आहे आणि तो ती कुठल्याही अनोळखी लोकांना देत नाही. हल्लीच नाशिकला जाताना बॉबीकडे गाडी मागितल्यावर त्याने विश्वासाने ही गाडी मला दिली. तेव्हा मला भाग तीन आणि चारचा सविस्तर वृत्तांत राजूकडून कळला. तरी भाग तीन आणि चार हे बऱ्यापैकी काल्पनिक आहेत. आजही राजू दिमाखात आणि निर्धास्तपणे ती गाडी चालवतोय आणि चालवत राहील ह्यात शंका नाही….!!

— सुझे !! 🙂 🙂

28 thoughts on “MH-02-XA-40X2 – भाग अंतिम

  1. जबराट कथेने एकदम वळण घेतले .. शेवट होण्या पूर्वी संशयाची सुई सर्वांपर्यंत जाऊन पोहोचली होती.. बाकी नाशिक ला तू ज्या इंनोव्हा मध्ये आला होतास ती हीच का ..???

  2. सुझे ……. सुंदर रंगलं कथानक. अजूनही विश्वास बसत नाही की याला सत्यघटनेचा आधार असेल इतकी सुंदर झाली कथा.

    1. अनुविना,

      एक प्रयत्न केला… तुम्ही तो गोड मानून घेतलात त्यातंच सगळं आलं. अनेक आभार 🙂

  3. मराठी ब्लोगर्स साठी सुवर्ण संधी..
    आपला मराठी ब्लॉग … http://www.marathiblogs.in/ वर जोडा
    आणि 4 जीबी चा पेनड्राइव जिंकण्याची संधी मिळवा.
    जगातील सर्वात मोठ्या मराठी ब्लॉग्स च्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हा..

  4. Tanvi

    अरे म्हणजे हीच गाडी मला भेटायला आली होती की काय 🙂 🙂

    इनोव्हा की सवारी भन्नाट जमलीये सुहास ……

Leave a Reply to Vrushali Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.