सर्वप्रथम कथेचा हा भाग पोस्ट करण्यास झालेल्या विलंबासाठी दिलगिरी व्यक्त करतो. काही वैयक्तिक कारणांमुळे लिहिणे शक्य झालं नाही आणि उगाच घाईघाईने कथा संपवायची नव्हती. दरम्यानच्या काळात अनेक मित्र-मैत्रिणींनी, वाचकांनी कान उघडणी केल्यावर आज भाग लिहायला घेतोय 🙂
भाग पहिला – MH-02-XX-4XXX – भाग पहिला
भाग दुसरा – MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा
“ओ साहेब मारू नका साहेब, आह !! मी… मी काही नाही केलं. तुम्ही मला का इथे चौकशीला. सा sss हे ss ब …!! ” (कोणी तरी मोठ्याने ओरडले) आवाज इन्स्पेक्टर रावतसाहेबांच्या केबिनमधून येत होता.
बॉबी, जयेश भाई आणि राजू बाहेर बसून होते एका बाकावर. तीन दिवस झाले त्यांना नागपूरला येऊन. इतक्या घडामोडी घडून गेल्या होत्या ह्या तीन दिवसात. बॉबी आपल्या पांढऱ्या दाढीवर हात फिरवत, आपला मोबाईल उगाच न्याहाळत होता. त्याची बायको खूप रागावली होती आणि त्याला परत बोलावत होती, पण इथून त्याला लगेच निघता येणार नव्हते आणि तसेही प्राथमिक चौकशी झाल्याशिवाय पोलीस त्यांना सोडणार नव्हतेच. सिगारेटची तलप त्याला अस्वस्थ करत होती, पण इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांना भेटायला बोलावल्याने तो गप्पा बसून होता. मुंबईत त्याचा धंदा पण बुडत होता. सुहासने एक दिवस त्याला मदत केली, पण नंतर त्याला स्वत:च्या ऑफिसला जायचे होते त्यामुळे सायबर पूर्णवेळ बंद झाला.
राहून राहून त्याला अरुणचे वाईट वाटत होते. कोणाचा शेवट असा कसा होऊ शकतो? त्याच्या अंत्यविधीसाठी घरून कोणीच आले नाही. कोणी कोणावर इतकं रागावू शकतं? आकस ठेवू शकतो? सावत्र आई होती, भाऊ होता, बायकोसुद्धा होती..पण कोणीच नाही आले. त्यांना त्याच्या जाण्याने काहीच फरक पडला नसेल? पडला असता तर ते इथे असते. किमान त्याचे शेवटचे विधी तरी… पण जाऊ देत. तो स्वतः स्वतःला प्रश्न विचारून, त्यांना बगल देत होता. दोन-तीन दिवस झोप नसल्याने त्याचे डोळे लाललाल झाले होते. हाताच्या बाह्या मळकट झालेल्या आणि ह्यावेळी स्वत:कडे लक्ष तरी कसे देणार… त्याच्या हातात पोलिसांच्या एफआयआरची एक प्रत होती.
पोलिसांच्या एफआयआरमध्ये अरुणचा तारेने गळा आवळून खून झाल्याचा रिपोर्ट तयार केला गेला. खून सकाळी ६-७ च्या आसपास झाला होता. मारताना त्याला प्रतिकाराची काही संधी दिली नव्हती, कारण जास्त झटापटीच्या खुणा नव्हत्या. त्याला गुंगी व इतर तत्सम गुंगीचे औषध दिले नव्हते, पण रक्त तपासणीमध्ये दारूचे प्रमाण आढळले. त्यामुळे दारूच्या धुंदीत सकाळी अनावधानाने त्याच्यावर मागून हल्ला करून, चोरीच्या उद्देश्याने त्याचा खून झाल्याचा रिपोर्ट तयार केला आणि तीन अनोळखी लोकांवर एक आरोप पत्र तयार केले गेले. त्याची एक प्रत कोर्टाला देण्यात आली आणि तपासाची प्राथमिक पूर्तता झाल्याशिवाय बॉबी आणि जयेशभाईंना नागपूर सोडण्याची मनाई केली गेली.
तितक्यात हवालदार साळवी रावतांच्या केबिनमधून बाहेर आले, “इथे बॉबी कोण? तुम्हाला साहेबांनी बोलावलं आहे” तो आवाज ऐकताच तिघेही उठून केबिनकडे जायला लागले. ते पाहून साळवी खेकसले, “तीन-तीन बॉबी? फक्त बॉबीने आत जायचं आहे. बाकीच्या दोघांनी इथेच बसून राहायचं” एखाद्या रोबोटप्रमाणे जयेश भाई आणि राजू मागे फिरले आणि परत त्या बाकावर बसले.
केबिनच्या दारावर टक टक करत बॉबी म्हणाला, “Sir, may I come in”
आतून फक्त “या..!!” इतकाच आवाज आला. बॉबी दरवाजा लोटून आत आला, समोर मोठ्ठं टेबल, तीन खुर्च्या, फायलींचा पसारा पडून होता. भिंतीवर भगतसिंग, सावरकर, गांधीचे फोटो त्याच्याकडे टक लावून बघत होते. बॉबीची नजर पूर्ण केबिनभर भिरभिरत होती, तेवढ्यात त्याच्या उजव्या बाजूने शर्टाची बटणे नीट लावत इन्स्पेक्टर भालचंद्र रावत आले.
“बसा..” खुर्चीकडे हात दाखवून रावत आपल्या खुर्चीकडे वळले. सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढून, ती पेटवायला माचीस शोधू लागले. बॉबीने लगेच खिश्यातून माचीस काढून, पेटवली आणि विझू नये म्हणून दुसऱ्या हाताने माचीसची ज्योत सांभाळत रावतांच्या पुढे झुकला. रावत थोडे पुढे झाले आणी सिगारेट शिलगावून मागे झाले.
“Thanks !! बोला, तर तुम्ही बॉबी मुंबईहून इथे आपल्या मित्राच्या ड्रायव्हरच्या खुनाची तक्रार घेऊन आलात. त्यामागे काही विशेष कारण? तुमचा मित्र आणि पोलीस काय बघायचे ते बघून घेतील. तुम्ही इथे का थांबून आहात? जयेशभाई सारखे बॉबीभाई बॉबीभाई करत असतात. खूप फेमस दिसताय.
“सर, मला मराठी जमते नाही. मला समजते तुम्ही काय विचारलेत, पण इतकं क्लिअर बोलता नाही येतो. इंग्रजी किंवा हिंदीत बोलू शकतो”
(सिगारेटच्या धुराचा लोट हवेत सोडत) “कसं आहे नं. तुम्ही भाषा कुठलीही वापरा. मला माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली म्हणजे झालं. आधीच ह्या प्रकरणाला इथल्या पेपरवाल्यांनी खूप मसाला लावून छापलंय. ह्या भिकारचोटांना फक्त आपला धंदा समजतो, इथे पोलिसांची काय हालत होते कोण सांगणार”
बॉबी शांत बसून होता. रावतांचे वर्चस्व त्याला प्रत्येक क्षणाला जाणवत होते. शेवटी धीर करून तो बोलू लागला “Sir, I am running my small business of Cyber Cafe and Tours & Travels is just a side business.”
“Stop… Stop….” रावत एकदम त्याला थांबवत म्हणाले “मला कथाकथन नकोय…Story Telling… Just Keep it short, simple and to the point” सिगारेटचं पाकीट त्याच्यापुढे धरत, “Have one..”
बॉबीने सिगारेट पेटवली आणि सिगारेटचा धूर बाहेर सोडताना, तो स्वत: मोकळा होत गेला. आता तो बराच आत्मविश्वासाने बोलत गेला. झालेला सगळा प्रकार त्याने रावतांना कथन केला. रावत खुर्चीतून उभे राहिले, आणि खोलीत येरझारा घालत म्हणाले, “तुम्ही साला सगळे लोकं पोलीस म्हणजे राक्षस असेच समजता. आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत आणि आम्हीही माणसे आहोत. मला ही मुलगी झाली दोन महिन्यांपूर्वी. बायको आणि पोरगी मुंबईला आहे, खूप दिवस झाले…” विषयांतर होत असलेले बघून रावत थांबले, बॉबीला किती कळले, नाही कळले माहित नाही. त्यांनी बॉबीला बाहेर जायला सांगितले आणि जयेशभाईंना आत पाठवायला सांगितले. बाहेर पडताना त्यांनी बॉबीशी हस्तांदोलन केले. अश्या मर्डर केसेस रावतांना नवीन नाहीत, ६ वर्षाच्या नोकरीमध्ये त्यांनी अश्या अनेक किचकट केसेस सोडवल्या होत्या. ही मर्डर केस एक नवीन आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभी होती.
नंतर जयेशभाई काहीसे घाबरत आत आले. रावतांनी त्यांच्यावर एकदम प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. जयेशभाई ह्याने पुरते खचले होते. अडखळत, घाबरत त्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. चौकशीशिवाय कोणाला गाडी देण्याचे दुष्परिणाम त्यांना आज भोगावे लागत होते. ह्या चुकीमुळे एक जीव आणि १५ लाखाची नवी कोरी करकरीत गाडी हातची गमावून बसले. अश्याप्रकारे गाडी भाड्याने देणे, हा कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी गाडीला पिवळी नंबर प्लेट असणे म्हणजे ट्रान्सपोर्ट परवाना असणे गरजेचे असते, पण तीही इथे नव्हती. त्यामुळे जर कोणी पलटून काही बोलले, तर जयेशभाई गोत्यात येणार होते.
“साळवी… बॉबीला आत घेऊन या आणि जरा चहा पाठवा आत तीन” रावत ओरडले. बॉबी आत आला. दोन मिनिटांनी चहा घेऊन एक पोरगा हजर झाला. साळवी केबिनच्या दाराशी उभे राहिले. चहाचा एक घोट घेत रावतांनी सिगारेट पेटवली,”जयेशभाई, जेव्हा तुम्ही तक्रार नोंदवली, त्याच दिवशी आम्ही काही संशयित ताब्यात घेतले आहेत. मगाशी ज्याला प्रसाद देत होतो, तो त्यापैकीच एक. गाड्या पळवून त्याचे भाग सुटे करून विकणे किंवा गाडी चोरून पर राज्यात नेऊन विकणे असे धंदे ह्या लोकांचे. आजवर खून करण्याइतकी मजल त्यांनी मारली नव्हती. ज्यांना ताब्यात घेतले, त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांच्यापैकी कोणाचेही हे काम नाही..”
“ये आप इतने यकीन कें साथ कैसे बता सकते हैं?” जयेशभाई रावतांचे बोलणे तोडत मध्येच म्हणाले…
त्यांना ते फारसे आवडले नाही, ते एकदम खेकसून ओरडले “तपासातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगावी, ह्याचे मला बंधन नाही. आम्ही फोनचे रेकॉर्डस्, टोल नाक्यावरचे टीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करतोय. कोणी संशयित सापडला तर लगेच त्याला अटक करून चौकशी करतोय. अजून तपास सुरु राहील, कारण ह्या सगळ्याला थोडावेळ जाऊ शकतो आणि गाडी बुक करणाऱ्याला फक्त एकनाथने पाहिलं आहे. त्याच्याकडे जरा बघावे लागेल. पोलिसी हिसका दाखवला की, सगळे पोपटावानी बोलू लागतात. तूर्तास आम्ही तपास सुरु केलाय हेच तुम्हाला सांगायचे होते. तुम्ही आता जाऊ शकता मुंबईला. मी ५-६ दिवसांनी येतोय तिथे. अरुणच्या परिवाराची आणि त्या एकनाथची भेट घ्यायची आहे. तेव्हा बाकीच्या गोष्टी तिथेच बोलू… कसं?”
दोघांनी होकारार्थी मान हलवली. बॉबीने रावतांचे मनापासून आभार मानत निरोप घेतला आणि ते लगेच परतीच्या प्रवासाला लागले. त्यांना आता त्या जागेची चीड येऊ लागली होती. तीन-चार दिवस झोप नाही, नीट जेवण नाही. प्रचंड मानसिक आणि शारीरिक दगदग झाल्याने सगळे दमल्यासारखे झाले होते. पोलिसांनी आपले काम चोख सुरु केले, हीच एक समाधानाची गोष्ट. राजू गाडी दामटवत होता, बॉबीने त्याला आरामात चल म्हणून सांगितले. रस्तात एका छोटेखानी हॉटेलासमोर गाडी थांबली. बॉबी हात-पाय ताणत उतरला आणि सोड्याची बाटली घेऊन, त्याचे हबके तोंडावर मारू लागला. जयेश भाई आणि राजू एका टेबलावर बसत, चहा आणि कांदा भजी आणायची ऑर्डर सोडतात.
जयेशभाई, “बॉबी भाई, आपने बहोत मदत की हैं मेरी. मैं अकेला ये नही कर पाता” बॉबी शांत होता. एकही शब्द न बोलता, तो सिगारेट प्यायला बाहेर पडला. जयेशभाई उठून त्याच्या मागे जाणार, इतक्यात त्यांना थांबवून फोन पें बात कर रहा हुं, असे म्हणून बाहेर निघाला.. “Yes Sir..” इतकंच जयेशभाईंना ऐकू आले.
थोड्यावेळाने बॉबी परत आला आणि मग त्याने आपल्या बायकोला फोन केला आणि सकाळी घरी पोचतो म्हणून सांगितलं आणि मग त्याच्या मुलीशी सिमूशी बोलू लागला. तिच्यासाठी तो ट्रीपसाठी गेला होता, त्यामुळे तिला हव्या असलेल्या गोष्टी ती त्याला सांगू लागली. बॉबी एकदम हळवेपणाने ते ऐकून घेत होता. त्याला त्याच्या मुलीची खूप आठवण येत होती, पण ती त्याला उद्या शिवाय दिसणार नव्हती. कितीही मानसिक त्रास झाला तरी, त्याची मुलगी त्याच्यावर उतारा असायची. ती समोर आली की बॉबी एकदम हरवून जात असे. तिला कडेवर घेऊन मिरवणे त्याला खूप आवडत असे, पण आज त्याच्या खांद्यावर एक विलक्षण ओझे होते. तिचा पाकिटात असलेला फोटो बघून तो एकदम हलकेच हसला. जयेशभाई राजूशी बोलताना सारखे निव्वळ पैश्याच्या बाता करू लागले. अरुण गेला याचे त्यांना आता काही वाटत नव्हते आणि का वाटावे म्हणा. त्यांची १५ लाखांची गाडी गेली होती. अरुण त्यांचा कोणी सगेवाला नव्हता. तो फक्त होता एक बदली ड्रायव्हर… बस्स !!
रात्रीचे १० वाजले इन्स्पेक्टर रावत फायलींचा पसारा घेऊन केबिनमध्ये बसून होते. हवालदार साळवी त्यांना फोनचे रेकॉर्डस् फाईल करून देत होते. टोल नाक्यावरच्या व्हिडीओ फुटेजमध्ये अरुणशिवाय एक अंगाने शिडशिडीत असलेली व्यक्ती दिसत होती, पण तिचा चेहरा सुस्पष्ट नव्हता. नेहमी त्याचा एक हात खिडकीबाहेर सिगारेट हातात घेऊन असायचा. हातात एक दोन अंगठ्या असाव्यात, पण अजून काही कळत नव्हते. मागे बसलेल्या दोन व्यक्ती नेहमीच गूढ राहिल्या. गाडीचे फोटो, त्यावर काय काय ओळखीच्या खुणा होत्या त्या नोंदवून घेऊ लागले. सोबत त्यांनी चेसी नंबर घेऊन ती गाडी जयेशभाईंची आहे याचीदेखील खात्री करून घेतली होती. गाडीचे इन्शुरन्स पेपर, पासिंग पेपर आणि गाडीचे लोन हे सगळे पेपर ते नजरेखालून घालू लागले. असेन शंका त्यांच्या मनात येत होत्या, पण एका ठाम निष्कर्षापर्यंत ते पोचत नव्हते. शेवटी परत ते फोन रेकॉर्डस् असलेल्या फायली बघू लागले.
अरुणने रात्री उशिरा केलेले आणि पहाटे केलेले फोन त्यांच्यासाठी एक महत्वाचा दुवा होता. अचानक काहीसे आठवून त्यांनी ऑपरेटरला फोन लावला आणि तपासाला काही तरी दिशा मिळाल्याचे एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तराळले…
क्रमश:
(हा शेवटचा क्रमश: आहे… उगा चवताळून जाऊ नये. पुढचा भाग दोन दिवसात नक्की टाकतो. 🙂 🙂 )
– सुझे !! !
भाग पहिला – MH-02-XX-4XXX – भाग पहिला
भाग दुसरा – MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा
भाग अंतिम – MH-02-XA-40X2 – भाग अंतिम
मायला….लै थरारक होत चाललंय !!
पण दोन दिवस म्हणजे नक्की किती दिवस ?
स्वामी,
दोन दिवस म्हणजे दोन दिवस 🙂 🙂
आधीच्या २ भागांत पण नंतरच्या भागाची link टाक ना… बरं पडतं…
अनिश,
लिंक टाकली आहे …. धन्स रे 🙂
दोन दिवस म्हणजे नक्की किती दिवस ?
पंक्या,
उत्तर दिलेलं आहे 🙂
“उगा चवताळून जाऊ नये” अशी पाटी लावली असल्यामुळे काही बोलता येत नाही राव…
सिद्धू,
करना पडता हैं यार 😉
Solid Story……..
वृषाली,
मनापासून आभार 🙂