MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा


भाग पहिलाMH-02-XX-4XXX – भाग पहिला

काहीतरी गडबड झालीय, हे लक्षात यायला जयेशभाईंना वेळ लागला नाही. बॉबीला इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. इतका मोठ्ठा सेटअप, कोणाच्या भरोश्यावर सोडून जायचा? उद्या बँकेच्या लोकांना काही तांत्रिक मदत लागली तर कोण करणार? मग अचानक काही आठवून त्याने एक फोन केला..

“हॅलो सुहास, बेटा एक काम था रे. बिजी हैं क्या?”

“नही बॉबी, बोलो क्या हुआ? सिफी कैसा चल रहा हैं? बहोत महिने हो गया वहां आना ही नही हुआ. बच्ची कैसी हैं? स्कूल जाती होगी नं अब”

“सिमरन ठीक हैं. एक अर्जंट काम था रे. प्लिज जरा ऑफिस आ जा”

“क्या हुआ? कुछ टेन्शन?”

“हम्म्म्म… हैं रे. तू आजा जल्दी. टाईम नही हैं ज्यादा”

“ठीक हैं.. आता हुं १०-१५ मिनिट मैं”

बॉबीने जयेशभाईकडे हताशपणे बघितले, आणि अरुणचा कोणी नातेवाईक आहे का मुंबईत असे विचारले. जयेशभाईंना काय झालंय ते कळायला वेळ लागत नाही. अरुणचा निर्घुण खून झाला असतो. बॉबीला आलेला फोन हा पोलिसांचा असतो आणि तेच त्याला ही बातमी देतात. जयेशभाई कपाळावर हात मारून मटकन खाली बसतात, “यें क्या हो गया यार… मार डाला उसको. क्या किया था उसने?”

“वहां जा कें देखना पडेगा, तुम उसके घर जा कें उनको ये बता देना, और किसीको साथ लेके आना”

त्याची बायको, आई आणि एक भाऊ राहतो जवळच्या एका खोलीत राहतात ही माहिती त्याने बॉबीला पुरवली. पण तो हेही म्हणाला, की अरुण घरी जात नसे. घरी कोणाशी त्याचं पटत नसे. सारखे वाद आणि भांडणं व्हायची. तरीसुद्धा बॉबी त्याला त्याच्या घरी जायला सागंतो आणि दुकानात निघून जातो.

साधारण २०-२५ मिनिटांनी सुहास तिथे पोचतो. तिथे एकनाथ आणि बॉबी एकमेकांशी वाद घालत उभे असतात. दोघेही हमरीतुमरीवर आले असतात. हा दोघांना सावरायला पुढे होतो. बॉबीला ओढत दुकानात घेऊन जातो आणि एकनाथला बाहेर थांबायला सांगतो. सिफीमध्ये काम करताना बॉबीचं ऑफिस, म्हणजे इंटरनेट बँडविड्थसाठी एकदम प्राईम लोकेशन. त्याचं इमारतीच्या गच्चीवर सिफीचा एक हब होता, जिथून सिफी इंटरनेट आपली सर्व्हिस बॉबीच्या कॅफेला आणि पर्यायाने त्याच्या ग्राहकांना देत होते. सुहास सिफीमध्ये नवीन नवीन कामाला लागला, तेव्हा सगळ्यात जास्त तक्रार बॉबीकडून येत असे. जरा काही प्रॉब्लेम झाला की, बॉबीचा फोन आलाच. कंपनीला त्याच्या तक्रारींकडे विशेष लक्ष द्यावे लागायचे, नाही तर हा डायरेक्ट हेडऑफिसला फोन फिरवायचा. 🙂

त्यामुळे सुहासची दिवसातून त्याच्याकडे एक चक्कर ठरली असतेच. बॉबी वयाने जवळपास पंचेचाळीशीच्या आसपास होता, पण त्याला अंकल म्हटलेलं आवडत नसे. त्याला बॉबी अशी एकेरी हाक मारली, की तो एकदम दिलखुलासपणे बोलतो. त्याच्या ऑफिसला गेलं की चहा, गप्पा, त्याच्या धंद्याच्या गप्पा मारत कामाव्यतिरिक्त दोन-तीन तास आरामात निघून जायचे. बॉबी स्वत: नेटवर्किंगमध्ये हुशार होता, त्यामुळे त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं होतं सुहासला. त्यामुळे बॉबीची चिडचिड त्याला माहित होतीच आणि त्याची सवयही झाली होती. तो विनाकारण कोणावर चिडत अथवा ओरडत नसे. त्याच्या बोलण्यातून ह्या धंद्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सुहासला समजत होत्या, एकनाथ, जयेशभाई, हरेशभाई ह्या सगळ्यांना तो ओळखत होता. पण ह्या माणसांशी अंतर ठेवून वागणे चांगले, हे त्याला कधीच कळून चुकले होते…. पण.. पण आज लक्षण ठीक नव्हते. काय झाले ते कळायला मार्ग नव्हता. बॉबीचा पारा पार चढला होता.

“बॉबी..बॉबी…शांत हो जाओ. क्या किया अब एकनाथने… कोई भाडा घुमाया क्या आपका? क्यों इतना भडक रहे हो”

“अबे वो च्युतीया..मा$^%$^$%^…भाडा छोड…उससें भी बडी चीज. एक बंदे की जान लेली साले ने. अरुण का खून हो गया”

“क्याss?”

“हां बें…सिर्फ पैसा…बाकी कुछ नही दिखता साले हरामी कों…”

“कहां मुंबई मैं हुवा यें सब? जयेशभाई कें पास काम करता था नं वो?”

“हां…नागपूर गया थां भाडा लेके, मैं नागपूर निकल रहां हुं थोडी देर मैं. पर मुझे तेरी एक मदत चाहिये थी.” (मग त्याने सगळी हकीकत त्याला सांगितली)

“नागपूर?? मैं इतना दूर नही आ सकता यार. ऑफिस हैं मेरा. आपको तो पता ही होगा, अडोबी सपोर्ट जॉईन किया था मैंने”

“अरे वो नही. बताता हुं. पहेले दो चाय बोलके आ”

सुहास बाहेर येतो. एकनाथ फोनवर बोलत असतो कोणाशी तरी. बहुतेक जयेशभाई असावेत. तो तावातावाने बोलत होता. सुहासला बघताच त्याने फोन नंतर बोलतो, म्हणून कट केला.

“सुहास त्या येडझव्या बॉबीला समजाव. भेंन्चोद मला कसं कळणार ती पार्टी कोण आणि त्यांनी अरुणला का मारला? ह्याने आधी काही लफडा केला असेल, म्हणून त्यांनी मारला असेल त्याला. माझी काय चूक?

“अरे पण तू चालान कोरं कसं दिलंस आणि शक्यतो बॉबी पार्टीच्या घरून पिक अप ठेवतो ते तुला माहित नाही का?

“अरे पण गाडी बॉबीची नव्हती.. जयेशभाईची होती”

“हो माहित आहे, पण ती गाडी चालते बॉबीच्या टूर ट्रॅव्हल्सच्या नावाखाली नं?”

“ह्म्म्म… हो पण जयेशभाई हो म्हणाले म्हणूनच गाडी दिली. मी काही जबरदस्ती केली नाही”

“हे बघ एकनाथ, मला ते काही माहित नाही. तू बॉबीशी बोलायला मनाई केलीस जयेशभाईंना, त्यातचं सगळं आलं. कारण बॉबी विचारपूस केल्याशिवाय गाडी देत नाही कोणाला”

“सोड नं, मी बघतो. अरुणचं काहीतरी लफडं असणार हे. मी काय ह्या धंद्यात नवीन नाही”

तितक्यात बॉबी बाहेर येतो आणि एकनाथला ओरडतो.

“साले, यें सुहास सब जानता हैं तू कैसा है और क्या कर सकता हैं पैसे कें लिये. तू जल्दी सें सामान वगैरे लेके आ. तू भी नागपूर चलेगा”

“बॉबी, तुझी सटकली काय? शनिवार-रविवार धंद्याचे दिवस. मैं नही आने वाला”

“चलेगा तो तेरा बाप भी. नही तो पुलिस को खबर करता हुं. वो तुझे लेके आयेंगे”

“येतो रे बाबा. अजून डोक्याला शॉट देऊ नकोस. येतो अर्ध्या तासात सामान घेऊन” आणि तिथून निघून जातो.

बॉबी चहाचे एक-एक घोट घेत, सुहासला सगळं समजावून सांगत असतो. IIBF (Indian Institute of Banking and Finance) च्या संलग्न बँकाची रिक्त पदांची भरती करण्यासाठी ही परीक्षा सिफीच्या सगळ्या सेंटरवर होणार होती. तो सगळे लॉगिन-पासवर्ड सुहासला देतो. सिस्टीमच्या सगळ्या ऍडमिन राईट्स सुहासच्या नावे करतो आणि थोडं फ्रेश होण्यासाठी बाहेर जाऊन सिगारेट पितो. प्रवासात जास्त सिगारेट लागेल म्हणून, तो पानपट्टीवर जातोय असं सुहासला ओरडून सांगतो.

सुहास सगळं समजावून घेत असतो. जास्त वेळ लागला नसता म्हणा, पण तरी हे बँकेचे काम होते आणि त्यात गोपनीयता पाळणे साहजिकच होते. तितक्यात जयेशभाई एक छोटी बॅग घेऊन येतात, त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड निराशा असते. सुहासकडे बघून ते कसेनुसे हसतात आणि जॉबची वगैरे चौकशी करतात. त्यांच्या सोबत त्यांचा नेहमीचा ड्रायव्हर राजू असतो. हा राजू बॉबीचा गाववाला. दोघे भेटले, की स्वतःच्या भाषेत त्याचं काहीतरी सुरु असायचं. बॉबी सिगारेट पीत ऑफिसला येतो. ते बॉबीला अरुणच्या घरून कोणी येणार नाही असं सांगतात. त्यांच्यासाठी तो कधीच मेला होता असे ते म्हणाले होते जयेशभाईंना. बॉबी नुसता हम्म्म्म करत स्वतःच्या गालावरून एकवार हात फिरवतो, स्वतःची वाढलेली पांढरी दाढी त्याला जाणवते. तो सिगारेट टेबलवर ठेवून, येशूसमोर एक मेणबत्ती लावून दुकानाच्या किल्ल्या घेऊन बाहेर येतो. सुहासकडे त्या देत म्हणतो. “सिर्फ एक दिन खयाल रखना, फिर कभी परेशान नही करूंगा. कुछ भी चाहिये रहेगा, तो कॅश पडा हैं ड्रॉव्हर मैं. निकाल लेना”

“बस क्या बॉबी…”म्हणून सुहास हसतो. बॉबी पण हसतो, सुहासच्या पाठीवर हलकेच हात ठेवतो आणि सिगारेट तोंडात ठेवून बाय म्हणून पुटपुटतो. तडक टव्हेराच्या ड्रायव्हर सिटवर जाऊन बसतो. स्पीडोमीटर वर येशू आणि माउंटमेरीच्या फोटोला हात लावून नमस्कार करतो. बाजूलाच राजू बसतो आणि मागे जयेशभाई बसतात. तिथून ते तडक एकनाथच्या ऑफिसकडे निघतात. एकनाथला गाडीत बसवून ते नागपूरच्या दिशेने भरदाव निघू लागतात.जयेशभाईंनी बॉबीने सांगितल्याप्रमाणे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आधीच तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी त्यांच्यापरीने चौकशीला सुरुवात देखील केली होती. ते नागपूर पोलिसांच्या सतत संपर्कात होते. इथे गाडीत आलटूनपालटून बॉबी आणि राजू अशी गाडी चालवत न थांबता गाडी दामटवत होते.

सकाळी ७ ला ते नागपूर सिटीमध्ये पोचलो. तिथल्या पोलीस स्टेशनला पोचल्यावर, त्यांना तिथे फक्त रिपोर्ट करायला बोलावले आहे असे कळले. अस्सल घटना नागपूरमध्ये घडलीच नव्हती. अरुणचा खून मध्य प्रदेशमध्ये झालाय, असे कळले. त्याच्या गाडीने शेवटचा टोल जिथे भरला त्या महाराष्ट् पोलिसांच्या स्टेशनमध्ये मध्य प्रदेश पोलिसांनी चौकशी केली होती. आता बॉबीच्या डोक्याला पार मुंग्या आल्या, मायला हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे असे दिसतंय. पोलिसांनी बॉबी, एकनाथ, जयेशभाई सर्वांची ओळख पटवून, एका कागदावर त्यांची नोंद केली. नंतर पोलिसांची एक व्हॅन आणि बॉबीची गाडी एमपीच्या दिशेने धावू लागल्या.

तिथे पोचल्यावर ते परस्पर एका शवागारात जातात आणि मृतदेहाची ओळख पटवून घेतात. तिथल्या पोलिसांच्या रिपोर्ट नुसार एका तारेच्या वायरीने ह्याचा गळा आवळला होता. त्याने जखम होऊन मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव होऊन अरुणचा मृत्यू झाला होता. त्याचं शव एका नाल्यात मिळालं होतं आणि रस्त्याच्या बाजूला तुकडे करून फेकलेलं टूर आणि ट्रॅव्हल्सचं चालान पोलिसांना मिळालं. बाकी त्यांना काही कळलं नाही. चालान फाटलं होतं, त्यामुळे त्यांना गाडीची माहिती मिळू शकली नाही. जयेशभाई त्यांना गाडीच्या पेपर्सची एक कॉपी देतात. गाडीचा चेसी नंबर आणि गाडीचे वर्णन तत्काळ वायरलेसवर सगळ्यांना दिले जातात. सगळे एकदम तपासाला लागतात. त्यांना खुनाचे कारण कळले होते. गाडी चोरणारी ही टोळीच असणार असा त्यांना पक्का संशय होता.

“बॉबी गयी गाडी हात सें…१४ लाख की गाडी, एक ५ हजार कें भाडे कें चक्कर मैं चली गयी” जयेशभाई निराशपणे बोलतात

बॉबी खुणेनेच जयेशभाईला गप्प करतो. हातातल्या सिगारेट ने मी फोनवर आहे म्हणून सांगतो, तो सुहासला फोन करून विचारत असतो की सगळं सुरळीत सुरु आहे की नाही. सुहास सांगतो सगळं सुरळीत सुरु आहे आणि काही प्रॉब्लेम नाही. त्याच्या जीवात जीव येतो आणि मग तो जयेशभाईकडे वळतो.

“जो हो गया, वो हो गया. अब बाकी का काम पुलिस करेगी. पर हमें एक करना होगा”

“अब क्या?”

“अरुण की बॉडी पुलिस सें लेके, इसका दाहसंस्कार करना पडेगा. सगे वाले नही आये, पर हम इसें, ऐसे तो नही छोड सकते”

जयेशभाई एकदम आश्चर्यचकित होऊन बॉबीकडे बघतात आणि निमुटपणे होकारार्थी मान हलवतात……

(क्रमश:)

– सुझे !!

भाग पहिला – MH-02-XX-4XXX – भाग पहिला

भाग तिसरा – MH-02-XA-4XX2 – भाग तिसरा

भाग अंतिम – MH-02-XA-40X2 – भाग अंतिम

26 thoughts on “MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा

  1. Tanvi

    पुन्हा त्येच ’न्येक्ष्ट भाग कधी ?? ’ 🙂

    मस्त पकड घेतेय रे कथा….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.