(एकनाथचं टूर आणि ट्रॅव्हल्स ऑफिस)
“ट्रिंग.. ट्रिंग… हां बोला. गाडी नं…मिळेल नं. (समोरची डायरी घाईघाईने ओढून, त्यात आजच्या तारखेच्या पानावर काहीतरी खरडू लागला) कधी जायचं आहे आणि कुठली गाडी हवीय? कुठे जायचं आहे…?”
समोरून तो माणूस एकनाथला डीटेल्स देत असतो, आणि इथे एकनाथ त्याचं म्हणणं ऐकून हम्म ह्म्म्म दाद देत राहतो. शेवटी तो म्हणतो
“अहो काळजी नको. तुम्हाला एक चांगली पॉश ईनोव्हा गाडी देतो. नागपूर म्हणजे खूप लांबचा रस्ता आहे आणि आज नक्की कधी निघायचं आहे?”
“दोन तासाने …. दुपारी ३ वाजता” (समोरून तो बोलतो)
“क्कक्काय… आता लगेच? गाडीचा रेट खूप महाग मिळेल. एक कोरी करकरीत ईनोव्हा आहे. रस्त्यावर उतरून फक्त एक महिना झालाय.”
“अरे मला अर्जंट काम आहे. पैश्याची चिंता नाही…गाडी नवीन असेल तर उत्तम”
इथे एकनाथ फायद्याचे गणित करू लागला. दिवसाला अशी तीन-चार भाडी आणि परगावी जाणाऱ्या बसेसच्या जागेसाठी बुकिंग करायची. बसल्या जागेवरून काही फोन फिरवून, आपले कमिशन काढायचे हाच त्याचा धंदा. तो समोरच्या व्यक्तीला विचार करून काय सांगायचं, ह्यावर विचार करू लागला. त्याला अनुभवाने माहित होतं की, समोरचा नक्की घासाघीस करणार पैश्यासाठी. त्यामुळे मुद्दाम जास्त किंमत सांगायचे ठरवून, तो बोलतो…
“बघ तू वेळेवर सांगतोयस आणि गाडी पण नवीन असल्याने ड्रायव्हर बदली द्यावा लागेल. गाडीचा रेट किलोमीटर मागे १३ रुपये होईल. सोबत टोल आणि ड्रायव्हरचा रोजचा खर्च वेगळा”
“ठीक आहे..गाडी पाठव” (समोरचा उत्तरतो..)
एकनाथला आश्चर्याचा धक्का बसतो. आयचा घोव… हा तयार झाला. चला आज एकदम मस्त कमाई होणार. तो त्याला ड्रायव्हरला फोन करतो म्हणून सांगतो. फोन ठेवता ठेवता, समोरचा माणूस दटावत म्हणाला, “मला गाडी वेळेवर हवीय आणि ती पण बरोब्बर ३ वाजता नॅशनल पार्कच्या गेटसमोर”
एकनाथ विचार करू लागला, आता ही काय पंचाईत.म्हणे नॅशनल पार्कहून बसणार… मग शेवटी स्वतःलाच समजावत म्हणाला, आपल्या बापाचं काय जातंय आणि त्याने जयेशभाईच्या ड्रायव्हरला फोन लावला. जयेशभाई एकनाथ बरोबर जास्त व्यवहार करत नसत, कारण तो काही झालं तरी स्वतःचा फायदा सोडत नसे. भले गाडी मालकाला कितीही नुकसान होऊ देत. त्याचं ड्रायव्हरशी बरोबर पटायचं, पण नेमका तो फोन उचलत नव्हता. शेवटी न राहवून त्याने जयेशभाईचा नंबर फिरवला. मोबाईल स्क्रीनवर एकनाथचं नाव बघून, जयेशभाईंच्या कपाळाला आठ्या पडल्या. त्यांनी वैतागत फोन उचलला आणि ह्याने नवीन गाडीची मागणी केली. त्याने खोटं सांगितलं की हे मोठ्ठं भाडं हरेश ने दिलंय. हरेश हा नॉर्मली मोठ्या टूर्स वगैरे सांभाळायचा. त्याचं नाव आल्यावर जयेशभाई वरमले.
ते एकनाथला म्हणाले, “गाडी हैं, पर ड्रायव्हर गाव गया हैं. उसका कोई सगेवाला मर गया हैं. कोई भरोसेमंद ड्रायव्हर हैं क्या? बॉबीसें बात करू”
बॉबीचं नावमध्ये आल्यावर एकनाथ भडकला, “अरे ड्रायव्हर मेरे पास हैं. भेजता हुं आधे एक घंटे मैं. तुम चालन कोरा रखना मैं रेट और किलोमीटर लिख दुंगा.
“अरे पर बॉबी कें पास विलास रहेगा….उससें बात…” त्याला मध्येच तोडत एकनाथ म्हणाला
“अरे उसकी क्या जरुरत हैं? माना बॉबीभाई आपके खास हैं, पर गाडी दो घंटे मैं चाहिये.ज्यादा टाईम बरबाद करोगे, तो दुसरे को देता हुं भाडा…” एकनाथ ने निर्वाणीचा डाव टाकला.
शेवटी जयेशभाई तयार झाले. त्यांनी त्यांच्याच एका दुसऱ्या गाडीवरचा ड्रायव्हर पाठवायचे ठरवले. अरुण त्याचे नाव. त्याला जास्त अनुभव नव्हता, पण कोणी परका जाण्यापेक्षा आपला माणूस गेला तर उत्तम. अरुण हा मुळचा रत्नागिरीचा. एकदा बॉबीकडे नोकरी मागायला आलेला हा तरुण पोरगा, बॉबीने जयेशभाईकडे लोकल गाडी चालवायला म्हणून पाठवून दिला होता. त्याच्या खर्चासाठी जयेशभाईंनी तीन हजार रुपये दिले आणि गाडी पाठवून दिली. गाडीने बरोब्बर तीन वाजता नॅशनल पार्क येथून तीन जणांना उचलले आणि गाडी भरधाव धावू लागली.
बॉबी तसा दिलदार मनुष्य. सगळ्यांना जमेल तितकी मदत करणारा. आपल्या एकुलत्या एका पोरीच्या नावाने सुरु केलेला सायबर कॅफे आणि टूर्सचा धंदा देवखुशालीने जोमात सुरु होता. तशी त्याला हे सगळं करायची गरज नव्हती. केरळमध्ये त्याच्या वडलांनी त्याच्या नावे भरपूर शेती आणि पैसा ठेवला होता. त्याच्या सातपिढ्या आरामात बसून हे खावू शकल्या असत्या. पण स्वत: काही करायचं ही त्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. ह्या धंद्यातून मिळणारे सारे उत्पन्न, स्वतःच्या दोन गाड्यांच्या देखभालीसाठी वापरत असे. त्याच्या ओळखीच्या बळावर, त्याने ह्या धंद्यात खूप सारे मित्र आणि त्याहून जास्त शत्रू कमावले होते. शत्रूपण कसे, रोज त्याला भेटायचे, त्याची खालीखुशाली विचारून, मागच्यामागे त्याचा धंदा तोडायचा. बॉबीला ह्याने काडीचाही फरक पडत नव्हता. जी लोकं आपल्या सोबत आहेत, त्यांना काहीही मदत लागली तर आपण मागे हटता कामा नये हीच त्याची जिद्द.
संध्याकाळी ४:३० वाजता जयेशभाई बॉबीच्या कॅफेवर पोचला. बॉबी बाहेर बसून मस्त सिगारेट पीत बसला होता. जयेशभाई आल्याचे बघताच त्याने छोटूला चहा आणायला सांगितले. जयेशभाईंनी दुपारी झालेला प्रकार बॉबीला सांगितला.
बॉबी एकदम भडकला, “अबे वो च्युतीये को अक्कल नही हैं. उसको सिर्फ पैसा दिखता हैं, पर तुझे तो समझदारी दिखानी चाहिये थी. नई गाडी देदी, वो भी अरुण को? चलो उसें दे दी, वांदा नही. पर पार्टी सें बिना बात किये? पार्टी का पता वगैरा कुछ नही. आजकल कितना पुलिस का लफडा हो रहा हैं. इतना लंबा नही भेजना चाहिये था. चल जल्दी अरुण को फोन लगा.”
अरुण फोन उचलतो. बॉबी त्याला दर एक-दीड तासाने फोन करेन म्हणून सांगतो आणि फोन ठेवायच्या आधी त्याला सांगतो की, अपना खयाल रख. कोई लफडा हो, तो तुरंत दुकान पें फोन कर.
इथे गाडीत बसलेले ते तीन लोकं आणि अरुण, ह्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी सुरु होतात सगळे एकदम मोकळेपणाने गप्पा मारू लागतात. मोठ्याने गाणी वाजवत, एकमेकांना किस्से सांगत त्यांचा प्रवास सुरु असतो. मग त्यातल्या एकाने अरुणला डिझेल भरायला तात्पुरते पैसे मागतो आणि सांगतो की पैसे एटीममधून काढून देतो. अरुण दीड हजाराचे डिझेल भरतो.
मग पुढे साधारण ९ ला एका छोट्या गाडी हॉटेलसमोर थांबवतात आणि रात्रीचे जेवण घेण्यासाठी सगळे उतरतात. मस्त दाबून जेवतात. सगळ्यांना सुस्ती आली असते. एका डेपोजवळ रात्री अरुणला जरा झोप मिळावी, म्हणून गाडी थांबवतात. दोघेजण सिगारेट ओढायला खाली उतरतात आणि अरुण आणि दुसरा गाडीत सिट मागे करून ताणून द्यायची तयारी करतात. झोपायच्या आधी अरुणने एक फोन जयेशभाईंना फिरवला. त्यांनी तो उचलला नाही, झोपले असतील म्हणून त्याने परत फोन केला नाही.
पहाटे ४:३०ला ते उठले. नागपूर अजून १००-९० किलोमीटर होतं. फक्कड चहा घेऊन, ते निघाले. निघताना अरुणने न चुकता जयेशभाईंना फोन केला आणि सगळं ठीक आहे सांगितल्यावर, जयेशभाईंचा जीव भांड्यात पडला. चला पोचला एकदाचा. हा बॉबी उगाच डोक्याला शॉट देतो, असं बोलून परत ताणून दिली. गाडीने ८:३०च्या सुमारास नागपूरचा टोलनाका पार केला. इथे जयेश भाई बॉबीच्या कॅफेवर आला. १० वाजले असतील. बॉबीने नुकतेच दुकान उघडल्याने, तो येशूच्या क्रॉससमोर प्रार्थना करत होता. प्रार्थना झाल्यावर, सिगारेटचं पाकीट हातात घेऊन तो बाहेर आला. माचीसने सिगारेट पेटवली आणि हलकेच नाका-तोंडातून धूर सोडू लागला. खुर्चीवर बसता बसता, दो स्पेशल लेके आ रे…असं ओरडलो.
“तो जयेशभाई, कहां हैं अरुण? फोन किया था?”
“हा बॉबीभाई, सब ठीक हैं. आठ-साडे आठ बजे पहोच गया. आप भी नं मुझे डरा देते हो.”
“ह्म्म्म… बहोत सालों सें यें धंदा कर रहा हुं. रिस्क लेते लेते, कब अपना गला कट जाये पता नही चलेगा. कब निकल रहा हैं वहां सें?”
“कल शाम को ५ बजे कें करीब. सोमवार सवेरे गाडी मुंबई मैं होगा”
“ठीक…लो चाय पिलो.”
(रात्रीचे ९ वाजतात)
बॉबी स्वतः अरुणला फोन करतो, पण फोन बंद. पुन्हा एक तासाने करतो, तरी बंद. बॉबी जयेशभाईला फोन करतो. तो म्हणतो नेटवर्क नही होगा भाई. सो जाओ. बॉबी दुसऱ्या दिवशी सकाळी फोन करतो, पण फोन लागत नाही. अस्वस्थ मनाने तो कॅफेवर पोचतो. रविवार पूर्णवेळ कॅफे एका खाजगी बँकेच्या परीक्षेसाठी आरक्षित केलेला असतो. तो त्या अधिकारी लोकांशी फोनवर गप्पा मारण्यात गर्क होतो. शनिवारची दुपार ह्या धावपळीत गेली. अचानक संध्याकाळी त्याच्या फोनवर एक निनावी नंबर वाजू लागतो. तो फोन उचलत नाही. तरी फोन वाजायचा बंद होत नाही, शेवटी वैतागून तो फोन उचलतो. समोरून एक व्यक्ती त्याच्या नावाची चौकशी करत असते आणि बॉबी स्वतः फोनवर आहे समजताच धडाधडा बोलू लागते. बॉबीला दरदरून घाम फुटतो. तो फोन ठेवतो आणि तडक जयेशभाईंना फोन करतो. कॅफेमध्ये बँकेची लोकं, त्यांची सॉफ्टवेअर इंस्टॉल करत असतात, बॉबीला काय करावे सुचत नव्हते. बँकेशी आगाऊ व्यवहार झाल्याने, तो आता आयत्यावेळी मागे हटू शकणार नव्हता आणि तो फोन आल्यावर तो एक क्षण बसू शकत नव्हता.
तो आपल्या बायकोला फोन लावतो, “बिंदू, विलास को भेज रहा हुं. गाडी का चाबी देना उसको. साथ मैं कुछ कॅश भी देना मेरे लिये. अर्जंट हैं. मैं दोन-तीन दिन बाहर जा रहा हुं. फिकर मत करना”
त्याच्या बायकोला ह्या अश्या विचित्र वागण्याची एव्हाना सवय झाली होती. ती निमुटपणे हो म्हणते आणि फोन ठेवते.
जयेशभाई दुकानावर येतात,”क्या हुवा बॉबीभाई?”
बॉबी निराशपणे म्हणतो, “हमें नागपूर जाना पडेगा. वों भी अभी निकलना होगा.”
काहीतरी गडबड झालीय, हे लक्षात यायला जयेशभाईंना वेळ लागला नाही. बॉबीला इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. इतका मोठ्ठा सेटअप, कोणाच्या भरोश्यावर सोडून जायचा? उद्या बँकेच्या लोकांना काही तांत्रिक मदत लागली तर कोण करणार? मग अचानक काही आठवून त्याने एक फोन केला…
“हॅलो सुहास, बेटा एक काम था रे. बिजी हैं क्या?”
(क्रमशः)
– सुझे !!
भाग दुसरा – MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा
भाग तिसरा – MH-02-XA-4XX2 – भाग तिसरा
भाग अंतिम – MH-02-XA-40X2 – भाग अंतिम