पुस्तक परिचय स्पर्धा २०१२

‘मीमराठी.नेट’(mimarathi.net) वर आंतरजालावरील हौशी लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात. यापूर्वी ‘ललित लेखन स्पर्धा’, ‘लघुकथा स्पर्धा’ तसेच ‘कविता स्पर्धा’ यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना आंतरजालावरील हौशी लेखकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता त्याबद्दल ‘मीमराठी.नेट’ सर्वांचा ऋणी आहे.

या वर्षी पुण्यातील अग्रगण्य पुस्तकांचे वितरक असलेल्या ‘रसिक साहित्य प्रा. लि.’च्या व ‘मीमराठी’यांच्या सहयोगाने “पुस्तक परिचय स्पर्धा २०१२” आयोजित करण्यात येत आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, नवनवीन साहित्याचा परिचय व्हावा हा उद्देश प्रामुख्याने समोर ठेवूनच पुस्तक परिचय स्पर्धेचे आयोजन करीत आहोत.

सदर स्पर्धा अठरा ते पन्नास या वयोगटातील लेखकांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी ‘ललित लेख’, ‘कवितासंग्रह’, ‘कथासंग्रह’, ‘कादंबरी’ या पैकी एका प्रकारातील सन १९९० ते २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी पुस्तकाचा परिचय सादर करावयाचा आहे. प्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (२०००) शब्दांचा असावा. स्पर्धा १ ऑगस्ट २०१२ सकाळी ९ वा. खुली होईल व प्रवेशिका घेण्याची सुरवात होईल. सर्व प्रवेशिका mimarathi.net वरील ‘पुस्तक परिचय स्पर्धा’ विभागात ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने (पोस्टाने/कुरिअरने) द्यायच्या आहेत. (mimarathi.net) येथे सदस्यत्व घेण्यासाठी तसेच लेखन करण्यासंबंधी मदतीसाठी info@mimarathi.net यांच्याशी ई-मेल द्वारे किंवा ९७३००२७७०१ या क्रमांकवर संपर्क साधावा. प्रवेशिका ३१ ऑगस्ट २०१२, रात्री १२ वाजेपर्यंत सादर करता येतील.

नियमावली:

१. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही. दिनांक १ ऑगस्ट २०१२ रोजी अठरा (१८) वर्षांहुन अधिक तसेच पन्नास (५०) वर्षांहुन कमी वय असलेल्या सर्वांसाठी ती खुली आहे.

२. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.

३. लेखनाचा प्रकार हा ‘पुस्तक परिचय’ असा ठेवण्यात आला आहे. परिचय लेखनासाठी मराठी भाषेतील सन १९९० ते २०१० कालखंडामध्ये प्रकाशित झालेले कोणतेही पुस्तक निवडता येईल. परिचयासाठी निवडलेले पुस्तक खालीलपैकी एका साहित्यप्रकारातील असावे.

ललित लेख
कथासंग्रह (लघुकथा/दीर्घकथा)
कादंबरी
काव्यसंग्रह

प्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (२०००) शब्दांचा असावा.

४. या स्पर्धेसाठी प्रवेशिका दोन प्रकारे सादर करता येतील.

अ. पहिल्या प्रकारात प्रवेशिका ऑनलाईन पद्धतीने mimarathi.net येथे थेट सादर करता येतील. टंकलेखन सहाय्यक म्हणून गमभन (www.gamabhana.com) किंवा बराहा / गुगल आयएमई चा अथवा कोणत्याही युनिकोड देवनागरी फॉन्ट्सच्या सहाय्याने टंकलिखित करून mimarathi.net येथे सादर करता येतील.

ब. ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी टंकलिखित (हस्तलिखित प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही) प्रवेशिका खालील पत्त्यावर पोस्टाने/कुरिअरने स्पर्धेच्या अंतिम तारखेपूर्वी पोचतील अश्या प्रकारे पाठवण्यात याव्यात. पोस्ट अथवा कुरियर सेवेतील दिरंगाईमुळे प्रवेशिका उशीरा पोहोचल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच त्याबाबात कोणताही पत्रव्यवहार अथवा खुलासे देण्यास स्पर्धा आयोजक बांधील असणार नाहीत. तसेच सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. सबब सर्व स्पर्धकांना विनंती की त्यांनी प्रवेशिकेची एक प्रत आपल्यापाशी ठेवावी.

पत्ता: –

‘पुस्तक परिचय स्पर्धा २०१२’
रसिक साहित्य प्रा. लि.
६८३, बुधवार पेठ,
अप्पा बळवंत चौक,
पुणे – ४११ ००२

५. आंतरजालावर mimarathi.net अथवा अन्यत्र पूर्वप्रकाशित लेखन स्पर्धेसाठी सादर करावयाचे असल्यास स्पर्धा विभागात नव्याने प्रसिद्ध करावे लागेल. मुद्रित माध्यमात आधीच प्रसिद्ध झालेले लिखाण प्रवेशिका म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही.

६. स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक व्यक्तीने खालील तपशील ‘competition2012@mimarathi.net‘ या ईमेल पत्त्यावर ताबडतोब कळवणे आवश्यक आहे.

लेखकाचे मूळ नाव (टोपणनावाने प्रवेशिका सादर केली असली तरी स्पर्धेच्या निकालात मूळ नावाची घोषणा केली जाईल.)
प्रवेशिकेचा mimarathi.net वरील दुवा (लिंक)
संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल)
ब्लॉग पत्ता अथवा वैयक्तिक संकेतस्थळाचा (वेबसाईट) चा पत्ता (असल्यास)
पत्रव्यवहारासाठी पत्ता (अनिवासी भारतीयांनी भारतातील पर्यायी पत्त्ता देणे आवश्यक).

७. एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क स्पर्धेचे आयोजक राखून ठेवत आहेत. तसेच स्पर्धेसाठी सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही कारणास्तव मागे घेता येणार नाही.

८. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखे आधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क स्पर्धा आयोजक राखून ठेवत आहे.

९. प्रवेशिका म्हणून सादर केलेल्या लेखनामध्ये शुद्धलेखनाचा किमान दर्जा राखणे ही स्पर्धकाची जबाबदारी आहे याची कृपया नोंद घ्यावी.

१०. सर्व प्रवेशिकाचे परिक्षण साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती करतील. परिक्षकांची नावे यथावकाश जाहीर केली जातील.

११. स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर सुमारे तीन आठवड्यानंतर जाहीर केला जाईल, जो mimarathi.net या संकेतस्थळावर तसेच निवडक मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.

१२. निकालाबाबत स्पर्धा आयोजकांनी नियुक्त केलेल्या परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास स्पर्धा आयोजक, ‘रसिक साहित्य’ तसेच mimarathi.net बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

१३. स्पर्धेतील प्रत्येक साहित्य प्रकारामधील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय स्पर्धेला मिळणार्‍या प्रतिसादावरून व अन्य लेखनाच्या दर्जानुसार स्पर्धेतील सर्व साहित्य प्रकार मिळून पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.

१४. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम अंदाजे ऑक्टोबर २०१२च्या पहिल्या सप्ताहात आयोजित केला जाईल. कार्यक्रमाचा तपशील यथावकाश जाहीर केला जाईल.

१५. स्पर्धेच्या लेखनाचे संकलन प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजक राखून ठेवत आहेत. स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याचा निर्णय घेतानाच स्पर्धकाने आपली प्रवेशिका अशा संकलनात प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजकांना दिल्याचे मान्य केले आहे असे समजण्यात येईल. सदर प्रवेशिकेबाबत याशिवाय कोणताही अधिकार अथवा जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकाची राहील याची कृपया नोंद घ्यावी.

१६. सदर स्पर्धेची जाहिरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या विविध माध्यमातून प्रसिद्धीदरम्यान सदर माहिती मधे होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी आयोजक सहमत असतीलच असे नाही. mimarathi.net येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.

———————————————————————————————-

———————————————————————————————-

– सुझे !!

रुबाबदार हरिश्चंद्रगड…

१७ जुलै हा दिवस माझ्यासाठी एकदम खास. आज विविध मराठी संस्थळावर लिहिणारा, मुक्त वावरणारा मी मुळात एक ब्लॉगर होतो, आहे आणि राहीन. ब्लॉग सुरु केल्यावर साधारण ८ महिन्यांनी पहिला मराठी ब्लॉगर मेळावा दादर, मुंबई येथे पार पडला. विविध ब्लॉगच्या नावा मागे दडलेले चेहरे सर्वप्रथम एकमेकांसमोर आले आणि आयुष्यात असंख्य जिवाभावाची माणसे जोडल्याचे समाधान मनोमन मिळाले. ह्याच वेळी मराठी ब्लॉगर्स आणि ट्रेकर्स असलेले, आम्ही काही तरुण मंडळी एकत्र आलो. सेनापतींच्या (“माबो”कर आणि “मीम”कर) सुपीक डोक्यातून आलेल्या कल्पनेने मराठी ब्लॉगर्स ट्रेकचे आयोजन केले, आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून, ऐनवेळी बहुतेक जणांची गळती झाल्याने आम्ही मोजके ६ जण विसापूरला गेलो. तरीसुद्धा एक अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी. त्याचवेळी आम्ही ठरवले होते, की किमान हा ट्रेक तरी दरवर्षी करायचा. पुढल्यावर्षी त्याच तारखेची आठवण ठेवत, एक आठवणीतला ट्रेक नाणेघाट मारला. अत्यंत मुसळधार पावसात केलेला तो ट्रेक, कधीच विसरू शकत नाही. तसंही प्रत्येक ट्रेक, भटकंती आपल्याला काहीनाकाही नवीन शिकवून जातेच. सह्याद्री सारखा शिक्षक आपल्याला मिळणे हे मोठे भाग्याचं.

१.

२.

ह्यावर्षी १७ जुलै एकदम आठवड्याच्या मध्ये आल्याने, काय करावे असा संभ्रम होता. मग दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवार-रविवारी काही जमतंय का असं बघु लागलो. मेलामेली सुरु झाली. पण राहून राहून एकच नाव समोर येत होते, कोकणकड्याचा रुबाब बाळगणारा हरिश्चंद्रगड. ह्या किल्ल्याने जवळपास चारवेळा चकवा दिला होता. आता हा करायचा म्हणून ठरले आणि ईमेल्स पाठवले. सुरुवातीला एकदम १४-१५ जण तयार झाले, आणि नेहमीप्रमाणे आदल्या दिवसापर्यंत मोजून ६ जण उरले. ह्यावेळी काही झालं तरी मी जाणार होतोच, एक हट्ट होता म्हणा हवं तर. मंडळी कमी झाल्याने खर्चाचा बोजा वाढू नये म्हणून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (आयला लई भारी वाटतंय वाचताना :D) वापरण्याचे ठरवले. आम्ही दादरहून इगतपुरी, मग तिथून राजूर आणि मग तिथून पाचनई हा मार्ग निवडला होता. पाचनईची वाट त्यामानाने सोपी आहे. परत येताना तोलार खिंडीतून येण्याचे ठरले.

ट्रेकला निघायच्या आधी दुपारी ट्रेनमध्ये जागा मिळतेय का, म्हणून आयआरसीटीसीला साकडे घातले आणि सायटीने नेहमीप्रमाणे असंबंध एरर देऊन माझा पाणउतारा केला. दीपकला फोन केला, तर त्याच्याकडे साईट ब्लॉक. मग शेवटी आनंदला फोन केला आणि सांगितले, की बघ तिकीट मिळतंय का ते. आमच्या सुदैवाने पाच जागा मिळाल्या आणि रात्री निदान तीन तास तरी पाठ टेकायला मिळेल म्हणून खुश झालो. वाराणसीला जाणारी, महानगरी एक्सप्रेसमध्ये जागा मिळाली. पावसाचे अजिबात लक्षण नव्हते. आम्ही घामाने पार बेजार झालो होतो. ट्रेनमध्ये चढताच, टिपिकल मुंबईकरांना पडणारे यक्षप्रश्न आणि त्यावर उत्तरे शोधली. सर्वप्रथम पायातले बूट बोगीतल्या पंख्यावर विराजमान झाले. आपापले बर्थ पकडून सगळे आडवे झालो आणि डोळे मिटले.

३.

इतक्यात ठाणे का कल्याण आलं आणि “ए बबूआ….ए तनिक इधर आ….सठीया गये क्या, इलाह्बाद को बहोत टाईम हैं !!!” वगैरे चर्चा कानी पडल्या किंवा फेकल्या म्हणूया आणि माझी १० मिनिटाची सुखद झोप पार तुटली ती अगदी शेवटपर्यंत. मग मी धैर्य एकवटून खाली उतरलो आणी एका खिडकीशेजारी जाऊन अवघडून बसलो. समोर असलेल्या भैय्याचे प्रश्न बाऊन्सर जात असल्याने दोनदा हो, एकदा नाही आणि मध्येमध्ये हसून वेळ मारायचे ठरवले. बाकी मंडळी निवांत झोपली होती, आणि मला ३ वाजता सगळ्यांना उठवायची जबाबदारी दिली होती, त्याचं टेन्शन ते वेगळंच. झोप येत होती, पण येऊ दिली नाही. बाहेर प्रचंड पाऊस पडत होता. मुंबईत अजिबात पाऊस नाही, ह्या विषयवार एक चर्चासत्र त्या भैयाबरोबर पार पडल्यावर एक स्टेशन आले. बघतो तर इगतपुरी…. सगळ्यांना चट-चट चापट्या मारून उठवले आणि बॅगा घेऊन खाली उतरलो. निवांत झोपेत मिठाचा खडा टाकल्याने, नेहमीच्या पठडीतल्या पाच-सहा-दहा शिव्या पडल्या हे वेगळे सांगणे न लगे 😀

तिथून गेलो जवळचं असलेल्या एसटीडेपोमध्ये, तिथे थोडा नाश्ता करून पहिल्या बसची वाट बघत बसलो.बघता बघता तिथे मुलांची गर्दी वाढली. २०-३० मिनिटात जवळपास १००-११० मुले तिथे आली. म्हटलं झालं कल्याण… काळजीपोटी सगळ्यांशी गप्पा मारत, ही लोकं कुठे जात आहेत त्याचा कानोसा घेतला. बहुतेक सगळे रतनगड (गटारीसाठी.. सोबत जेवणाचे टोप) आणि काही ५-६ जण कळसूबाईला निघाले होते. पाच वाजता पहिली एसटी आली आणि सगळेच त्यात घुसले. राजूर तिथून ४० किलोमीटर अंतरावर होते. आजवर केलेला सगळ्यात सुंदर एसटी प्रवास असं मी म्हणेन. रस्त्याच्या दुतर्फा शेती आणि मध्ये वळणावळणाचा चकचकीत डांबरी रस्ता. राजूरला पोचल्यावर तिथली मिसळ खाऊन अगदी तृप्त झालो आणि पाचनई बस उशिरा असल्याने ५०० रुपये देऊन एक गाडी केली. राजूरपासून पाचनई ३० किलोमीटर अंतर आहे. पाचनई गावातूनच समोर डोंगरांच्या कड्यांवरून कोसळणारे धबधबे आमचे स्वागत करायला तयार होते. गावात वाट विचारून सरळ गडाकडे निघालो आणि प्रचंड पाऊस सुरु झाला. गडाची वाट एकदम सोपी आहे, दीड-दोन तासात आपण गडावर पोचतो.

४.

५.

आता थोडं ह्या किल्ल्याविषयी, हरिश्चंद्र म्हटलं की आठवतो महाकाय कोकणकडा. हा किल्ला पुणे, नगर आणि ठाणे हे तिन्ही जिल्हे जिथे एकत्र मिळतात, त्यातल्या सर्वात उंचावर असलेल्या डोंगरावर वसलेला आहे. किल्ल्याचे बांधकाम साधारण पाचव्या-सहाव्या शतकातील आहे. गडावर पोचाताक्षणी हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर दिसते. नवव्या शतकातील हे मंदिर म्हणजे, मानवी कलाकृतीचा उत्तम नमुना. साधारण १६ मीटर उंची असलेले हे मंदिर, काळ्या कातळात असलेले ही मंदिर आपला श्रमपरिहार करते. गडावर अनेक भग्नावशेष पडून आहेत, त्यावरून जाणवते की तिथे खूप सारी मंदिरे आणि छोटेखानी महाल वगैरे होते. गावकऱ्यांच्यानुसार गडावर ५००-५५० शंकराच्या पिंड्या होत्या, त्या लोकांनी चोरून नेल्या आणि आता गडावर मोजून ३०-४० पिंड्या आहेत. लहान लहान मंदिरावर केलेली कलाकुसर निव्वळ अप्रतिम आहे. गणेश आणि महादेव ह्या दोन्ही देवांच्या अनेक लहान मोठ्या प्रतिकृती आपल्याला बघायला मिळतात. दानवरूपी असलेली काही शिल्पं ही गडावर आहेत. शंकराची खूप लहान-मोठी मंदिरे गडावर आहेत. हरिश्चंद्रेश्वर मंदिरासमोर १४ कोनाडे असलेली, विष्णूतीर्थ नमक पुष्करणी आहे. मंदिराच्या बाजूला ओढ्याच्या रुपाने वाहणारी मंगळगंगा नदी आहे. तिच्या प्रवाहाला लागून उजव्या बाजूला केदारेश्वराचे लेणं लागतं. साधारण ५ फुट थंडगार पाण्यात असेलेले ते शिवलिंग बघू आपसूक हर हर महादेव अशी आरोळी निघाली.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

21.

22.

23.

24.

25.

पावसाचा जोर प्रचंड होता, त्यामुळे जास्त मज्जा घेता आली नाही. ज्या कोकणकड्यासाठी आम्ही आलो होतो, तो पार धुक्यात हरवून गेला होता. तरी तो सू…सू… हवा वर फेकत होता. काही यझ मंडळी दगड, नाणी खाली फेकून ते कसे वरती येतात ते बघा होते. त्यांची कीव आल्याखेरीज, मी अजून काही करू शकलो नाही. सांगून काही फायदा नव्हता. वाळीबा भारमल (याचे कुटुंब गडावर खाण्याची व्यवस्था बघतात), म्हणाला पावसात इथे किल्ला बघायला येऊ नये. काही दिसत नाही. ह्या पोरामुळेचं आम्हाला मुक्कामाला थांबायला गुहा मिळाली. गावाच्या पायथ्यावर हा मुलगा देवासारखा भेटला होता, त्याने सांगितलं तुमच्यासाठी एक गुहा ठेवतो आणि त्याने ते वचन पूर्ण केलं. बाकी अजून गड फिरायची इच्छा नव्हती. हा किल्ला प्रचंड मोठा आहे. गणेश गुहेपासून तारामती शिखर गाठायला तीन तास लागतात. गुहेपासून कोकणकडा अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. पावसाळा संपल्यावर, हा किल्ला विकांत सोडून कुठल्याही इतर दिवशी करायचा आहे.

आता खादाडी … 😉

२६. गडावर पोचल्यावर गरमागरम पिठलं-भाकरी..

२७. रात्री जेवणाला भात-वरण आणि बटाट्याची भाजी …

२८. दुसऱ्या दिवशी सकाळी कांदे पोहे 🙂 🙂

आता तुम्ही पावसात इथे जायचं म्हणत असाल तर जाऊ नका… पावसाळा संपल्यावर एक महिना जो असतो तेव्हा जा. तेव्हा तुम्हाला किल्ल्याशी बोलता/बघता येईल, तिथला इतिहास अनुभवता येईल, त्या तटबंदी तुमच्या मायेच्या स्पर्शाने सुखावून जातील, अजस्त्र कडे-कपारी तुम्हाला खंबीरपणाने कसे उभे राहायचे ते शिकवतील, त्या कोकणकड्याच्या मोठेपणाची जाणीव होईल, आपण निसर्गापुढे किती खुजे आहोत ते पटेल…. तेव्हा भेटूच परत….

(ह्या किल्ल्याचे वर्णन सांगणाऱ्या तत्वसार ग्रंथातील ह्या चार ओळी, किल्ल्याचे अपार महत्त्व सांगून जातात…)

हरिश्चंद्रनाम पर्वतु | तेथ महादेओ भक्तु
सुरसिद्धागणी विख्यातु | सेविजे जो ||
हरिश्चंद्र देवता | मंगळगंगा सरीता
सर्वतीर्थ पुरविते |सप्त स्थान ||

सुझे !! 🙂

(प्रचि क्रमांक ८, २३, २५ आनंद काळेकडून साभार… )