किल्ले रोहिडा…


“बस्स्स… ठरलं. हाच ट्रेक फायनल कर…”

“हो…हो…मी सगळ्यांना ईमेल करतो आणि हरिश्चंद्रगड बघुनच ह्या वर्षीचे पावसाळ्यातले ट्रेक सुरु करायचे…”

“व्वा व्वा… इतके कन्फर्म झाले पण?. सही आहे. गडाच्या वाटेची सगळी माहिती काढ, नकाशा घे आणि गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या नामदेवला फोन करून सांग आम्ही येतोय.

(ट्रेकच्या आदल्या दिवशी)

“अरे सुदा, हा नाही रे जमणार ह्याला किमान दोन-अडीच दिवस तरी हवेत”

“…??”

“तू ऑफिसला पोच मी आणि दिप्या दुसरा प्लान करतो आणि तुला कळवतो….”

“…..!!!”

अगदी शेवटच्या क्षणी हरिश्चंद्रगडाला भेट देण्याचा विचार बदलला आणि आम्ही निघालो ऐन मावळात वसलेल्या रोहिड्याकडे. 🙂

किल्ले रोहीडा (विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला). पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर भोर गावी वसलेला हा गडकोट. दुरून बघावा तर लाल-काळ्या मातीचा मोठ्ठा मुरूम ठेवल्यागत हा किल्ला दिसतो. ह्या किल्ल्याचा इतिहास अतिशय रंजक आहे. स्वराज्याच्या इतिहातलं एक रत्नजडित सोनेरी पान म्हणा हवं तर. ह्या किल्ल्यावर घडलेल्या एका प्रसंगाची थोडक्यात माहिती देतो, तेव्हा तुम्हाला कळेल मला काय म्हणायचे आहे ते. सदर माहिती रणजित देसाईंच्या, पावनखिंड ह्या पुस्तकात अगदी विस्ताराने वाचता येईल.

ह्या गडावर कृष्णाजी बांदल ह्यांची जहागिरी होती. भोरच्याजवळ असलेल्या सिंध येथील बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे थोरले बंधू फुलाजी देशपांडे, हे बांदलांकडे सरदार म्हणून कार्यरत होते. दोघेही शूरवीर आणि आपल्या धन्यासाठी काहीही करायची त्यांची सदैव तयारी असे. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांदलांना स्वराज्यात सामील व्हा, म्हणून आमंत्रण धाडले. इकडे बांदलांच्या दरबारात राजेंच्या खलित्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. त्यांच्या मागणीबद्दल काय करावे, म्हणून कृष्णाजींनी बाजींना त्यांचे मत विचारले. बाजी उत्तरले, “राजे, जगायचं, तर मानानं जगावं. आमचं स्पष्ट मत आहे, शिवाजी मोठा होण्याआधीच त्याचा पुंडावा मोडायला हवा. त्याला बांदलांचे एकच उत्तर जाईल…..उद्या चाल करून येणार असाल, तर आजच या. आम्ही वाट बघतो”

छत्रपतींना बांदलांकडून नकाराचा खरमरीत खलिता पाठवला गेला. भर सदरेत खासे लोकांसमोर तो खलिता जेव्हा महाराजांसमोर वाचला गेला, तेव्हा महाराजांनी नाईलाजाने तडक रोहीड्यावर आक्रमण करायचा निर्णय घेतला. त्याच रात्री आबाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने किल्ल्यावर अचानक आक्रमण केले गेले आणि किल्ल्यावर एकच धावपळ सुरु झाली. बघता बघता एक एक चौकी बांदलांच्या हातून जात होत्या. आबाजींच्या पट्ट्याचा मानेवर वार होऊन, गडाचा धनी कृष्णाजी बांदल पडला आणि बांदलांचे बळ सरले. त्याचवेळी धिप्पाड देहाचे बाजी त्वेषाने पुढे आले आणि आबाजींना मैदानात उतरायला ठणकावले.

तितक्यात राजे आपल्या धारकऱ्यांसह तिथे आले आणि त्यांनी आबाजीला मागे होण्याचा हुकुम दिला. आता साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी समोरासमोर ठाकले होते. ही बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट. महाराजांनी त्यांना समजावले, की गड आमच्या ताब्यात आहे. त्यावर बाजी म्हणाले, “असं तुम्ही समजता, राजे. जोवर हा बाजी उभा आहे, तोवर गड तुमच्या ताब्यात आलाय असे समजू नका.” बाजींनी महाराजांना युद्धाला पुढे व्हा असे ठणकावले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. एक हातात तलवार आणि एका हातात पट्टा घेऊन ते राजासमोर उभे होते,”मी निष्ठेने माझ्या धन्याची सेवा केली आणि तो गेल्यावरसुद्धा आमच्या निष्ठेत काडीमात्र बदल होणार नाही.” महाराजांनी आपली तलवार म्यान केली आणि बाजींना सांगितलं, “झालं ते विसरून जा. ही भवानी तलवार फक्त अन्यायाविरुद्ध बाहेर पडते. आम्हाला तुमच्यासारख्या अनुभवी लोकांची गरज आहे, आम्हाला योग्यवेळी सल्ला देण्यासाठी, ह्या आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी, इतल्या माणसात इभ्रत मिळवण्यासाठी. आपल्या आयाबहिणींची अब्रू रक्षण करण्यासाठी, आपले देव आणि देवळं सुरक्षित राखण्यासाठी…कृष्णाजी आम्हाला सामोपचाराने मिळाले असते तर बरं झालं असतं. आम्हाला राजेपणाची हौस नाही. ना जुलूम-जबरदस्तीची, पण बांदलांनी वैर पत्करलं” राजेंच्या ह्या उत्तराने बाजींच्या हातातला पट्टा गळून पडला आणि ते राजांच्या मिठीत बद्ध झाले. महाराजांनी बांदलांची वतनदारी कायम राहील असे सांगितले आणि त्यांच्या वतनाला काहीही धक्का लागणार नाही असे वचन दिले.

किल्लाची चढाई सोप्पी आहे. एका तासात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोचतो. गडाचे प्रवेशद्वार गोमुखी आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या उजवीकडे एक पाण्याचे खोल टाकं आहे. असं म्हणतात की ते पाणी पिण्यायोग्य आहे, पण आत उतरून बघितल्यावर असं वाटलं नाही. तिसऱ्या प्रवेशद्वारावर दोन राजमुखे आहेत. तिथे एक देवनागरी शिलालेखदेखील आहे. गडावर अनेक भग्न अवशेष पडून आहेत, त्यातल्यात्यात दुर्ग संवर्धन समितीने गडावर स्वच्छतेचे बऱ्यापैकी काम केले आहे. गडावर असलेले रोहीडमल्ला मंदिर बंद होते. मंदिराची डागडुजी करून ते भक्कम बांधलेलं आहे. गडावर पाण्याच्या मुबलक टाक्या आहेत. तटबंदी ढासळलेली आहे, पण काही बुरुज ताठ मानेने उभे आहेत.

फत्ते बुरुजावरून लांब नजर टाकल्यावर एक मंदिर दिसले. दोन डोंगरांच्या बरोब्बरमध्ये हे छोटेखानी मंदिर होते. एका पायवाटेने त्या मंदिराकडे जाता येत होते. किल्ल्यावर असलेल्या नकाशाचा योग्य अंदाज न आल्याने, आम्ही त्या मंदिराला रायरेश्वर समजून तिकडे तडक निघालो. वाटेत मोदक, सागर PDY, किसन देव, श्री व सौ राज जैन आणि दूरन येणाऱ्या गणेशाला हात दाखवून त्या मंदिराकडे निघालो. पाऊस नव्हता आणि पायवाट अतिशय भुसभुशीत होती. जरा पाऊल चुकीचे पडलं, तर कपाळमोक्षच. तरी तिथे घाईघाईत पोचलो आणि नंतर समजले हे ते मंदिर नव्हे. पण त्या मंदिराच्या ओढीने आम्ही तो लांबलचक खडतर प्रवास २०-२५ मिनिटात पूर्ण केला होता. कारण आम्हाला जमल्यास किल्ले पुरंदरला सुद्धा भेट द्यायची होती.

सरतेशेवटी काही कारणास्तव ती भेट हुकली, पण ट्रेक पर्वाची अतिशय सुंदर सुरुवात झाली. वडिलांच्या आजारपणामुळे आणि हापिसच्या कटकटीतून सुटका न झाल्याने, वर्षभर काहीच ट्रेक झाले नाहीत. यावर्षी त्याची यथेच्छ भरपाई करायचे वचन देऊनच माघारी फिरलोय.

अरे हो फोटो राहिले….. 🙂 🙂

१.

२.

किल्ले रोहिडा….

३.

सूर्योदय….

४.

५.

६.

किल्ल्याचे प्रवेशद्वार….

७.

८.

प्रवेशद्वाराच्या उजवीकडे असलेले पिण्याचे पाण्याचे टाकं.

९.

तिसरे प्रवेशद्वार. इथे देवनागरी शिलालेख आहे.

१०.

देवनागरी शिलालेख..

११.

राजमुख….

१२.

१३.

१४.

फत्ते बुरुज…

१५.

१६.

तीन जोड टाक्या…

१७.

१८.

मंदिराकडे ताठ मानेने उभा असलेला फत्ते बुरुज …

१९.

हेच ते मंदिर…

२०.

आम्ही सगळे फत्ते बुरुजावर …. (फोटो साभार धुंडीराज)

२१.

परतीच्या वाटेला… (फोटो साभार धुंडीराज)

– सुझे !!! 🙂

42 thoughts on “किल्ले रोहिडा…

  1. किल्ल्याचे दुसरे प्रचलित नाव लिहायचे राहिले की रे… “विचित्रगड”.
    बाकी आमास्नी बराबर टांग दिली आकाने.

    1. पंक्या,

      अरे लिवलंय की ते नाव…. अरे टांग वगैरे नाही रे. घाईत होतो आम्ही सगळे. गाडीचा प्रॉब्लेम होता म्हणून. स्वारी 🙂 🙂

    1. भक्ती,

      हो पावसाळा सुरु झाल्यावर बेडकं कशी बाहेर येतात, तसंचं काहीसं. धन्स गं 🙂 🙂

    1. काका,

      धन्स…नाही साबा एकदम वेळेवर तयार झाला आणि मग त्याने वेळेवर येण्याचे रद्द देखील केले. 🙂 🙂

    1. अविनाशजी,

      ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार. अशीच भेट देत रहा 🙂 🙂

    1. अनामिक,

      आपण आपलं नावं दिलं असतं तर बरं वाटलं असतं. असो प्रतिक्रियेसाठी आभार 🙂 🙂

  2. सगळ्यांचे धन्यवाद….
    बाकी, अण्णा पोस्ट मस्त जमलेय………..आणि एकदम फास्ट आली पोस्ट यावेळी…..ट्रेक सुरु करायच्या आधीच लिहिली होती वाटत??……..:D

  3. >>त्याची यथेच्छ भरपाई करायचे वचन देऊनच माघारी फिरलोय.

    म्हंजे जळाऊ पोस्टांना सुरूवात तर……:)
    फ़ोटॊ आणि पोस्ट दोन्ही पण मस्त्त्च….. 😉

    1. प्रसाद,

      नक्की जाऊन ये. पावसाचं म्हणशील तर जास्त नको. पूर्ण रस्ता भुसभुशीत मातीचा आहे. ब्लॉगवर स्वागत आणि अशीच भेट देत रहा 🙂

  4. सुहास राजे ,चला मोहिमेला सुरुवात झाली एकदाची….
    बाकी, अण्णा पोस्ट मस्त जमलेय………..आणि एकदम फास्ट आली पोस्ट यावेळी…..ट्रेक सुरु करायच्या आधीच लिहिली होती वाटत??……..:D +१

    1. देवेंद्रराजे,

      खूप खूप आभार. पोस्ट काय लिवली घाईघाईने. आपण ट्रेकोपवास सोडलात हे बरे केलंत 🙂

Leave a Reply to mahesh sawant Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.