(पुन्हा) शाळेला जातो मी…


आठवतो काय आजचा दिवस? काय म्हणता नाही? काय हे कसं विसरू शकता तुम्ही?

एक-दीड महिना मामाच्या गावी मस्त धम्माल, मज्जा करून शाळेच्या पुढल्या वर्गात जाणारे आपणचं.. गावाला जाऊन आलो, की सर्वात आधी धावपळ शाळेच्या खरेदीची – पुस्तके, वह्या, दप्तर, रेनकोट, पावसाळी बूट, गणवेश, नवीन डबा. मज्जा ना एकदम… 🙂 🙂

पहिला दिवस शाळेचा - साभार गुगल

जून महिन्याची १३-१४ तारीख म्हटली, की सगळी छोटी मंडळी शाळेच्या गेटवर आपापली दप्तरं सांभाळत, हातात रंगीबेरंगी वॉटरबॅग घेऊन आणि चेहऱ्यावर काहीश्या त्रासिक आणि काहीश्या आनंदी मुद्रा घेऊन उभे ठाकलेले दिसतात. पावसाला हलकेच सुरुवात झाली असते, आकाशातले ढग कुतूहलाने शाळेच्या भोवती जमा होऊन ह्या चिमुरड्यांना बघत बसतात. पिल्लू एका वर्षाने मोठ्ठं झालं, म्हणून आई-बाबांच्या डोळ्याच्या कडा हळूच पाणावत असतात. दूर लांभ उभे राहून, शाळेतल्या रांगेत उभ्या आपल्या चिमण्या-चिमणीकडे एकटक बघत उभे असतात. त्याने/तिने आपल्याकडे बघितले की, हात उंचावून त्याला प्रतिसाद देतात. सगळं नीट ठेव, मस्ती करू नकोस असे खुणेनेच बजावून सांगतात. 🙂 🙂

इकडे प्रत्येक लहानग्याच्या मनात एक उत्सुकता असते. नवीन वर्गात जायला मिळणार, नवीन जागा मिळणार. माझ्या बाकाला कप्पा मोठा असेल नं, त्यात दप्तर राहील नं, मला खिडकीतून बाहेर बघता येईल नं, पाण्याची बाटली नीट राहील नं, आज डब्यात आईने काय खाऊ दिला असेल, मधल्या सुट्टीत काय खेळायचं, तासानुसार पुस्तकं-वह्या काढून ठेवायची आणि सगळ्यात शेवटी पेन/पेन्सिल ठेवायला बाकाला असलेल्या जागेत, एखादी भडक पेन्सिल काढून Trespassers will be prosecuted अश्या थाटात बसायचं 😀

खरंच तो दिवस आजही आठवतो, आदल्या दिवसापर्यंत चालेलेली तयारी. शाळेच्या गणवेशापासून, जेवणाच्या डब्याची तयारी. आदल्या रात्री बाबांनी नवीन पुस्तकाना घालून दिलेली चापचोप कव्हर्स आणि आपण फक्त स्टिकर लावण्याची घेतलेली मेहनत (भारताच्या पंतप्रधानांसारखं). मग ती कव्हर्स फिट्टं बसावीत म्हणून, गादीखाली ठेवून स्वत: त्यावर चिरनिद्रा घ्यायची 😉

पाण्याची वॉटरबॅग ( 😀 ) आणि कंपासपेटी, हे शालेय जीवनात बघितलेले आणि अनुभवलेले एक प्रकारचे सायफाय फिक्शन. कुठून बटण दाबून, कुठून काय बाहेर येईल, याचा काही नेम नाही. शाळेचे दप्तर म्हणजे Treasure hunt चा एक नकाशा. दप्तराला जमेल तितके जास्त खण हवेत आणि आपण ते कशासाठी वापरायचे ते आणल्याबरोबर ठरवून मोकळं व्हायचं. मग निदान पहिले १०-१५ दिवस नित्यनेमाने ते ठरवून करायचं देखील. मग आहेचं ये रे माझ्या मागल्या. नंतर स्वतःलाचं शिव्या देतो, झक मारायला एवढे खणाचे दप्तर घेतले. एक गोष्ट सापडेल तर शप्पथ 😀

नवीन पुस्तकांचा वास तो काय वर्णावा…एका हातात पुस्तक घट्ट धरून, डोळे बंद करून, नाकाजवळून त्याची पानं सळसळत फिरवायची… स्वर्गसुख !!! मग एक एक तास सुरु होतात. प्रत्येक विषयाला नवीन कोरी वही आणि वहीच्या पहिल्या पानावर सुबक हस्ताक्षरात आपले नाव आणि नंतर पुढली सगळी पानं डॉक्टरी लिपीत :p

मग एक-एक तास संपल्याची घंटा वाजते, एक-एक दिवस पुढे जातो आणि सगळी बच्चेकंपनी एक-एक दिवसाने मोठी होऊ लागतात. एक मंद पण सुखावणारा प्रवास. निदान अश्या गोष्टींसाठी तरी कधीच मोठ होऊ नये.. काय म्हणता? 🙂

–सुझे 🙂

(जुनी पोस्ट पुन्हा नव्याने :D)

30 thoughts on “(पुन्हा) शाळेला जातो मी…

 1. Shardul

  जाड कव्हरच्या १०० पानी वहीची सगळी पानं एका टोकाशी विशिष्ट पद्धतीनं धरून दुसर्‍या हाताने कव्हर उघडझाप केलं तर पेटीच्या भात्यासारखं दिसतं ते..
  मग कधी कधी मधल्या सुट्टीत एकानं \’पेटी\’ घ्यायची, एकानं बाकावर शार्पनर (\’गिरमिट\’ ! टु बी एग्झॅक्ट…) वाजवायचं आणि जी डोक्यात सापडतील ती गाणी –
  मैफिलीत मुकेश पासून रेहमान पर्यंत सगळे.

  असं.

  लेख आवडला आहेच..

  1. शार्दुल,

   अगदी अगदी….. पेटीचा भाता, गिरमिट, कंपासपेटीवर वाजवलेली गाणी. मस्त मस्त.

   धन्स आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

 2. मस्तच रे. आत्ता हाफिसातल्या कोंडलेल्या क्युबिकलमध्ये बसून तुझी पोस्ट वाचली आणि लहानपणीचे ते शाळेतले मुक्त दिवस आठवले. खास करून शाळेच्या पहिल्या दिवसाचे आणि त्याचबरोबर पहिल्या पावसाचेदेखील.

  जियो!!!

 3. मस्तच मित्र सारे बालपण डोळ्यासमोर आणले.
  नव्या वहीत शेजारच्या मोठ्या ताई कडून सुव्वाच्च अक्षरात नाव घालून घ्यायचो.
  शाळा सहक्यतो पावसाळ्यात सुरु व्हायच्या.
  नवीन रेनकोट वैगैरे धमाल.

 4. >>एक मंद पण सुखावणारा प्रवास. +10000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000

  मस्त मस्त मस्त पोस्ट
  Can read it every Monsoon…;)

 5. कालच लेकीच्या शाळेची खरेदी पूर्ण केली. प्रचंड nostalgic व्हायला झालं होतं मला. मस्तच रे……..

  1. श्राधक,

   अरे व्वा… मस्त मस्त. म्हणजे एकदम नव्याने तोच अनुभव. ब्लॉगवर स्वागत 🙂

 6. I swear….mazi potti 3ri i mean 3rd la geley…..Chaila English cha papad…teacher mhante kashi…teacher “Wh is 3rd D class may I know that?”….jorat hasle mi tithe….Gammat re solid

 7. Vishal

  तेच दिवस पुन्हा repeat होत आहेत फरक एवढाच की आपली जागा आता मुलांनी घेतली आहे आणि आपण मोठ्यांची

  1. विशालजी,

   अगदी अगदी…. लाईफ ईज अ सर्कल 🙂

   ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा….

 8. Anand Patre

  अप्रतिम भावा… ओळ न ओळ आवडली अन माझ्या परभणीच्या शाळेची आठवण करून दिली..

Leave a Reply to सुहास Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.