युद्धातील पराक्रमाच्या कथा नेहमीच रंजक असतात. त्या ऐकताना, वाचताना आपण एकदम हरवून जातो. कधी भीतीने अंगावर काटा येतो, तर कधी पराक्रमाच्या गोष्टी ऐकून अभिमानाने छाती फुलून जाते आणि कधी कधी काही गोष्टी काळाच्या पडद्याआड कायमच्या हरवून जातात. अश्याच एका युद्धाची गाथा किंवा कथा म्हणूया हवं तर, एका ब्रिटीश लेखकाने मायकल मोर्पुर्गो (Michael Morpurgo) ने १९८२मध्ये लिहिली. पहिल्या महायुद्धाच्या काळात घडलेली एक सामान्य घटना, ज्या घटनेचा शेवट अतिशय असामान्य झाला. मायकल ने एका वेगळ्या दृष्टिकोनातून ह्या युद्धाचा अभ्यास केला. त्या महायुद्धात खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. सैनिकांबरोबर हजारो-लाखो मुक्या जनावरांना, विशेषतः घोड्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्या युद्धातील एका घोड्याची गोष्ट मायकलने पुस्तकरूपी आपल्यासमोर सादर केली. ही कादंबरी खास लहान मुलांसाठी लिहिली गेली होती. मायकल स्वत: खूप संवेदनशील आहे. आजच्या शहरीकरणाच्या काळात, फार्म्स फॉर सिटी चिल्ड्रन म्हणून एक प्रकल्प युरोपात राबवतोय आणि त्याला खूप खूप यश देखील मिळतंय. असो, अजून मी ही कादंबरी वाचली नाही (मागवली आहे फ्लिपकार्टवरून :)), पण ह्या कादंबरीवर बेतलेला एक सिनेमा गेल्यावर्षी प्रदर्शित झाला, जो ऑस्करच्या उत्कृष्ट चित्रपटांच्या शर्यतीतसुद्धा होता….स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शिक – वॉर हॉर्स !!
सिनेमाची सुरुवात इंग्लंडमधील डेवन नावाच्या एका छोटेखानी पण निसर्गसमृद्ध गावातून होते. अल्बर्ट त्या लहानश्या गावात आपल्या आई-वडीलांसोबत राहत असे. त्यांची परिस्थिती अगदी बेताची असते. कर्ज काढून थोडीफार शेती करून पोटापाण्याची व्यवस्था करत असे. त्याचं गावातील एका शेतकऱ्याकडे असलेल्या घोड्याचा अल्बर्टला लळा लागतो. ह्याचं घोड्याचा जन्म सिनेमाच्या सुरुवातीला दाखवला आहे. कालांतराने तो घोडा मोठा होऊ लागतो, आपल्या आईसोबत तो माळरानात यथेच्छ घौडदौड करत असे. अल्बर्ट खूप वेळा त्याच्याशी मैत्री करायचा, जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, पण तो आईची साथ सोडून कुठेही जायला तयार होत नसे. तो दुरूनच त्याच्याकडे बघत बसायचा.
दरम्यान अल्बर्टच्या वडिलांना शेतीसाठी नांगरणी करण्यासाठी घोडा हवा असतो. जेव्हा ते घोडे बाजारात जातात, तिथे तोच घोडा त्याच्या मालकाने विकायला आणलेला असतो. अल्बर्टच्या वडिलांना तो घोडा बघता क्षणी आवडलेला असतो, पण तो शेत नांगरणी करणारा घोडा नसतो. तो एक राजबिंडा घोडा असतो, जो शेतीकामासाठी अजिबात लायक नसतो. त्यांचे मित्र देखील त्यांना समजावतात, पण ते काही ऐकत नाही. एका सावकाराच्या नाकावर टिच्चून, जास्त बोली लावून ते त्याला घरी घेऊन येतात. अपेक्षेप्रमाणे घरी आल्यावर अल्बर्टच्या आईला हे आवडत नाही, ती त्याला तत्काळ परत नेऊन द्यायला सांगते. शेवटी अल्बर्ट दोघांच्या भांडणामध्ये पडतो आणि वचन देतो की, मी ह्या घोड्याला शिकवेन, त्याची पूर्ण काळजी घेईन आणि त्याला शेतीसाठी तयार करेन. त्याचे आई-बाबा त्याच्या हट्टापुढे नमतं घेतात आणि त्याला घोडा ठेवायची परवानगी देतात.
अल्बर्ट त्या घोड्याचे नाव जोई (Joey) ठेवतो. जोईला खाऊ-पिऊ घालणे, त्याची स्वच्छता करणे आणि थोडंफार प्रशिक्षण ही सगळी कामे अल्बर्ट इमानेइतबारे करत असतो. हळूहळू काळ पुढे सरकतो. अल्बर्टच्या बाबांकडे सावकार लवकरात लवकर कर्जाची परतफेड करायची मागणी करतो, नाहीतर तो घरावर कब्जा करेल अशी धमकी देतो. आता अल्बर्टच्या बाबांना राहवत नाही, आणि ते जोईला जबरदस्ती नांगरणीसाठी जुंपायची तयारी करतात, पण जोई काही केल्या तयार होत नाही. शेवटी रागात ते जोईला गोळी मारायला बंदूक घेऊन येतात. पुन्हा एकदा अल्बर्टमध्ये पडतो आणि तो बाबांना सांगतो, की मी जोईला तयार करतो. तो जोईसमोर जातो आणि नांगरणीसाठी असलेला फाळ आपल्या गळ्यात अडकवून जोईला दाखवतो आणि मग तो फाळ जोईच्या गळ्यात अडकवतो. संपूर्ण डेवन उत्सुकतेने बघत असतं की, काय होणार म्हणून. सावकार तिथे असतोच. मोठ्या अथक प्रयत्नाने अल्बर्ट आणि जोई शेतीची नांगरणी करण्यात यशस्वी होतात. दोघांनी रक्ताचे पाणी करून जखमांची पर्वा न करता संपूर्ण शेत नांगरून ठेवतात. सगळे त्यांची स्तुती करतात आणि तो सावकार चिडून निघून जातो.
ह्या प्रसंगानंतर अल्बर्टची आई त्याला सांगते, की अल्बर्टचे बाबा हे एकेकाळी युद्धात पराक्रम गाजवलेला एक वीर योद्धा आहे, पण युद्धात पायाने अधू झाल्यावर तो प्रचंड निराशावादी आणि चिडचिडा झाला आहे. ती त्याला युद्धात पराक्रमासाठी मिळालेलं पदक सुद्धा दाखवते. आता सगळंच सुरळीत होईल तर कसं, दैव देतं आणि कर्म नेतं. त्याचं उभं पिक पावसाच्या तडाख्यात वाहून जाते आणि त्यांची इतक्या दिवसांची मेहनत वाया जाते. सगळे एकदम निराश होतात.
त्याचवेळी पहिल्या महायुद्धाची घोषणा होते. सरकारकडून युद्ध भरतीची आणि जनावरे खरेदी करायला सुरुवात होते. शेती वाहून गेल्याने निराश झालेले अल्बर्टचे बाबा, अल्बर्टला न सांगता जोईला एका ब्रिटीश अधिकाऱ्याला विकायला घेऊन जातात. अल्बर्टला ते कळते आणि तो सैनिकी छावणीकडे धावत सुटतो, पण तो पोचायच्या आधीच जोईचा सौदा कॅप्टन जेम्स निकोलसशी झालेला असतो. तो प्रचंड चिडतो, सगळ्यांना विनवण्या करतो, पण कोणी ऐकत नाही. अल्बर्टचे बाबा मान खाली घालून अपराधी पणे हे बघत उभे असतात. अल्बर्टची ही तळमळ कॅप्टन जेम्सला जाणवते आणि तो अल्बर्टला वचन देतो की, तो जोईची पूर्ण काळजी घेईल आणि जमल्यास युद्ध संपल्यावर त्याला परत हवाली करेल. अल्बर्ट जड अंत:करणाने त्याला कॅप्टनच्या हाती सोपवतो आणि जोईच्या गळ्यात त्याच्या बाबांना पदकासोबत मिळालेला छोटा तिरंगी झेंडा बांधतो.
जोईला युद्धाचे प्रशिक्षण दिले जाते, तिथे त्याची एका दुसऱ्या राजबिंड्या घोड्यासोबत दोस्ती होते. त्याचं नावं टॉपथॉर्न (Topthorn). कॅप्टन जेम्सला जोईचा खूप लळा लागतो, फावल्यावेळात जोईची विविध चित्र आपल्या स्केचबुकमध्ये काढत असे. जोईच्या पाठीवरून हात फिरवताना, त्याच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास जाणवत असे. शेवटी ते जर्मन सैनिकांच्या छावणीवर छुपा हल्ला करायची योजना करतात आणि तिकडे हळूहळू कूच करतात. पण युद्धातील एका अनपेक्षित क्षणी जर्मन मशीनगन्सच्या माऱ्यासमोर ,कॅप्टन जेम्स निकोलस धारातीर्थी पडतो. जर्मन सैनिकांच्या गराड्यात जोई आणि टॉपथॉर्न सापडतात.
जर्मन सैनिकांमध्ये असलेला मायकल बघता क्षणी ह्या दोन्ही घोड्यांच्या प्रेमात पडतो, त्याला ते आवडतात. तो आपल्या मोठ्या अधिकाऱ्यांना कळवळून सांगतो की, हे दोन्ही घोडे युद्धातील जखमींची ने-आण करायला रुग्णवाहिकेला जुंपता येतील, त्यांना मारू नका. तो अधिकारी त्याला ती परवानगी देतो. मायकलसोबत गंटर (Gunther) हा त्याचा भाऊदेखील जर्मन सैनिकांमध्ये असतो. ती दोघे त्या घोड्यांना घेऊन छावणीत येतात. तिथे लष्करी अधिकारी पुढल्या फ्रंटला जाण्यासाठी निघतात आणि ते मायकलला सोबत येण्याचा आदेश देतात. मायकलच्या भावाची निवड होत नाही आणि त्याला मागेच थांबायला सांगतात. त्याला त्याच्या भावाच्या जीवाची काळजी असते आणि आता तो एकटाच पुढे जाणार म्हटल्यावर तो विचारात पडतो. तो अधिकाऱ्यांना सारख्या विनवण्या करतो की, मला पण घेऊन चला, पण त्याची मागणी धुडकावली जाते आणि त्याला मागेच थांबायचा आदेश दिला जातो आणि ते अधिकारी पुढल्या फ्रंटकडे कूच करतात. गंटर हा आदेश धुडकावून लावतो आणि मायकल, जोई आणि टॉपथॉर्नला घेऊन युद्ध भूमीवरून पळ काढतो. ते घोडदौड करत खूप लांबवर जातात. रात्री आसऱ्यासाठी एका घराशेजारी असलेल्या पवनचक्कीमध्ये ते थांबतात, पण तिथे जर्मन सैनिक येऊन दोघांना गोळ्या घालतात आणि निघून जातात. दोन्ही घोडे आत असल्याने जिवानिशी वाचतात.
सकाळी जेव्हा त्या घरात राहणारी फ्रेंच मुलगी, एमिली (Emilie) तिथे येते आणि आपल्या आजोबांना झालेली हकीकत सांगते. ती त्यांना सांगते मला हे दोन्ही घोडे ठेवून घ्यायचे आहे. आपल्या नातीच्या प्रेमापोटी तिला घोडे ठेवून घेण्याची परवानगी देतात, पण त्यांना कल्पना असते की, युद्ध काळात जास्त वेळ त्यांना ह्या घोड्यांना ठेवता येणार नाही. एमिलीचे आजोबा एक छोटे शेतकरी होते आणि ते विविध फळांचे उत्पादन करून, त्या पासून जॅम बनवत असतं. एमिलीच्या पालनपोषणाची जबाबदारी ते उत्तमरीतीने पार पाडत असतात. तिचे ते खूप लाड करतात आणि तिच्यासाठी काही करायची त्यांची तयारी असते. एमिलीच्या वाढदिवसाला भेट म्हणून, तिला ते जोईची सवारी करायची परवानगी देतात. एमिलीला हाडाच्या ठिसूळपणाचा आजार असतो, पण तिचा त्या घोड्यावर असलेला जीव बघून आजोबा तिला एकदाच ती परवानगी देतात. ती खूप आनंदून जाते आणि जोईच्या पाठीवर बसून रपेट मारायला निघते.
तिथेच जर्मन सैनिक येऊन दोन्ही घोडे हिसकावून नेतात. जर्मन सैनिकांना युद्धातील महाकाय तोफा ओढायला घोड्यांची गरज असते. जर्मन सैंन्यामध्ये घोड्यांची देखरेख करणारा अधिकारी दोन्ही घोड्यांची देखभाल करत असतो. पण टॉपथॉर्न ऐवजी जोईला तोफेला जुंपायला सांगतो, कारण त्याचा टॉपथॉर्नवर जास्त जीव असतो. त्याचं हे कृत्य बघून, त्याचा अधिकारी त्याला सुनावतो, “You have given them names? You should never give the names to anything that you certain to loose. Hook him up !!” आणि तो टॉपथॉर्नलाच तोफा ओढायला लाव म्हणून सांगतो, पण जोई स्वत:हून पुढे धावत येतो आणि मग तो अधिकारी जोईला तोफा ओढण्यासाठी जुंपतो.
हळूहळू युद्धकाळ पुढे सरकतो. सातत्याने ३-४ वर्ष जर्मन सैनिकांच्या सेवेत, ही दोन्ही जनावरं हाल सोसत असतात. त्याचवेळी दुसऱ्या फ्रंटवर अल्बर्ट सैनिक म्हणून जर्मन सैन्यासमोर उभा ठाकलेला असतो. इंग्लंड सैन्य जर्मन तोफखान्यासमोर हतबल झालेले असतात. तरी पराक्रमाची शर्थ लावून अल्बर्ट आणि त्याचे साथीदार एक जर्मन बंकर काबीज करतात, पण तिथे एक मोठ्ठा स्फोट होतो आणि त्या धुरामुळे अल्बर्ट आणि त्याच्या साथीदारांना तात्पुरते अंधत्व येते. त्यांना युद्धभूमीवरून परत बोलावतात आणि त्याच्यावर उपचार सुरु होतात. इकडे टॉपथॉर्न मान टाकतो आणि जोई एकटाच युद्धभूमीवर सुसाट धावत सुटतो. तारांच्या कुंपणाची पर्वा न करता, तो नुसता धावत सुटतो आणि खूप जखमी होऊन युद्धभूमीवर पडतो…
पुढे काय होते?? आता सगळं मीच थोडी नं सांगणार, तूम्ही स्वत: चित्रपट बघा की 😉
जोईवर चित्रित केलेली सगळी दृश्ये निव्वळ निव्वळ अप्रतिम आहेत, डिटेलिंगच्या बाबतीत स्पीलबर्गचा हात कोणी धरू शकणार नाही. अल्बर्टचं काम ठीक झालंय, कारण जोईने पूर्ण सिनेमा खाऊन टाकलाय. एमिली अतिशय गोड दिसते. (शाळा बघितल्यावर केतकीला बघून वाटले, तसंचं काहीसं वाटलं तिला बघून 🙂 ). स्पीलबर्गच्या इतर चित्रपटांसारखा हा चित्रपट इतका सुपर ग्रेट नाही (स्पीलबर्गने स्वतःचा दर्जा इतका उंचावून ठेवलाय की, अपेक्षा वाढणं स्वाभाविक आहे.), पण एक अप्रतिम कलाकृती बघायची संधी सोडू नका. वॉर हॉर्स नक्की बघा 🙂 🙂
– सुझे !!!