भय इथले संपत नाही….


स्थळ: कांदिवली रेल्वे स्टेशन

वेळ: साधारणतः संध्याकाळचे ५:२५

५:२१ च्या चर्चगेट लोकलची वाट बघत उभा होतो. गाड्या जरा उशिराने धावत होत्या, पण गर्दी नव्हती. मला ६ पर्यंत दादरला पोचायचे होते, आणि बोरिवलीला जाऊन फास्ट लोकल पकडायचा प्रचंड कंटाळा आला होता. शेवटी ट्रेन आली आणि विरुद्ध दिशेची, पण खिडकीची जागा मिळाली. नवीन लोकल असल्यामुळे हवा “खेळती” राहते हे विशेष. ट्रेन रडत रडत सुरु झाली. जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हा हे असं घडतंच. माझ्या बरोब्बर समोर प्रथम दर्ज्याचा (मराठीत फर्स्ट क्लास) डबा होता. त्यात मोजुन १०-१२ लोकं बसली असतील, आणि ती पण एकदम विखुरलेली. कोणी आपला करवंदाचे अपडेट्स बघतोय, कोणी फोनवर, कोणी डोळे मिटून गाणी ऐकतंय तर कोणी इकोनॉमिक टाईम्स वाचत आहेत. नेहमीप्रमाणेचं दृश्य, काही नवीन नाही म्हणा यात. 🙂

जशी ट्रेन सुरु झाली, तसे तीन मित्र हसत-खिदळत जागेवर बसायला आले. माझ्या बरोब्बर समोर असलेल्या प्रथम दर्ज्याचा जागा पूर्णपणे रिकाम्या होत्या. ते तिघे तिथे येऊ लागले, आणि अचानक थांबले. थोडी कुजबुज झाली त्यांच्यात आणि डब्याच्या एकदम मागच्या दरवाज्यात जाऊन उभे राहिले. मी म्हटलं तिथे घाण वगैरे असेल, म्हणून ती लोकं बसली नाहीत. मी त्यांच्याकडे बघत राहिलो, आणि मालाड आल्यावर ते तिघे घाईघाईने उतरले आणि फलाटावर जाऊन उभे राहिले. मालाडमध्ये दोघे जण ट्रेनमध्ये चढले आणि ते दोघे त्याच जागेच्या दिशेने वळले, कारण दोन खिडकीच्या हवेशीर जागा त्यांना सोडवल्या नसाव्यात. दोघेही दोन खिडक्यांना एकदम अवघडून बसले होते, आणि समोर असलेल्या रिकाम्या जागेकडे बघत होते.

हे सगळं मी दुसऱ्या दर्जाच्या डब्यातून (मराठीत सेकंड क्लासमधून) बघत होतो. मला वाटलं कोणी बेवडा वगैरे झोपला असावा तिथे. दोघांपैकी एक जेमतेम माझ्या वयाचा मुलगा होता आणि दुसरा कोणी तरी मारवाडी का भैय्या (पुढे टक्कल आणि मागे थोड्या केसांची वेणी बांधलेली) साधारण चाळीशीच्या आसपास. मी त्या मुलाला खुणेने विचारले, काय झालं? त्याने कसतरी जबरदस्ती हसत खुणेनेच उत्तर दिले, इथे एक बॅग आहे. त्याची एकूणच तंतरली होती, आणि मारवाड्याची पण. तो जरा घाबरत घाबरत दरवाज्याजवळ गेला आणि तिथे लावलेली पोलिसांची नोटीस बघू लागला. कदाचित तो नंबर शोधत असावा. तो मुलगा माझ्याकडे बघत होता, माझ्या बाजूला बसलेल्या दोघांना हा प्रकार कळला. सगळे उठून उठून डोकावू लागले त्या डब्यात. तितक्यात ट्रेन थांबली, साला ३ मिनिटं झाली पण गोरेगाव आलं नव्हतं.

आता त्या डब्यात पण खळबळ उडाली, सगळे मागे सरकू लागले. डब्याच्या विरूध्द बाजूला एकवटू लागले. इथे तो मारवाडी, तो मुलगा आणि एक हौशी गृहस्थ होता. एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी होती, आणि त्यात एक काळ्या रंगाची अजून एक पिशवी होती. मी त्या मुलाला म्हणालो, तुमच्या त्या बाजूला लेडीज डब्बा आहे, तिथे हवालदार असेल. त्याला आवाज दे. तो नुसता जबरदस्ती हसला आणि कपाळावरचा घाम पुसत दरवाज्याकडे त्या मारवाड्याकडे जाऊन उभा राहिला. इथं तो हौशी माणूस पिशवी बघायला पुढे सरसावला, तर त्या मारवाड्याने त्याला हटकलं. बॅग मत छुना, बम हो सकता हैं. तो हौशी माणूस त्या पिशवीसमोर बसून राहिला, आणि आता डोकवायचा प्रयत्न करू लागला.

तो हिमतीने म्हणाला, “फेक देता हुं बाहर”

त्यावर तो मारवाडी म्हणाला, “तू थैली उठाया, और प्रेशर निकल गया तो बम फट गया तो…रेहने दे”

यावर तो हौशी माणूस, “मरेंगे तो सिर्फ तीन जन ना?”

मायला आम्ही त्या पिशवीला खेटून पलीकडच्या बाजूला असलेल्या लाकडी बाकावर बसलो होतो, आमची काही गणतीच नाही का? असा विचार मनात तरळून गेला. असो…!!

ट्रेन अजून थांबली होती, मी आपला मोबाईल हातात फिरवत तिथे काय होतंय ते बघत होतो. शेवटी तो हौशी माणूस चवताळून उठला आणि त्याने ती बॅग बाहेर भिरकावून दिली. काही झालं नाही, तो हसत जागेवर जाऊन बसला. मारवाडी आणि तो तरुण मुलगा आत्मविश्वासाने पुन्हा जागेवर येऊन बसले. त्या मुलाने परत माझ्याकडे बघितले आणि हुश्श्श करत हसला. 🙂 🙂

मला आधी वाटलं काय लोकं घाबरतात यार, साधी पिशवी ती. कोणी तरी विसरलं असेल…. पण क्षणात जाणवलं की माझ्या हातापायांना सुद्धा घाम आलाय. कपाळावरून घाम ठिबकत आहे. ११ जुलै २००६ साली मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. एकदम सुन्न झालो. मुंबईकरांच्या धकाधकीच्या आयुष्यात, हे असे क्षण येणं क्रमपात्र आहे (संदर्भ – बडे बडे शहरो मैं, छोटी छोटी बातें होती रेहती है) आणि मुंबईकरांकडे पेश्शल स्पिरीट आहे हे वेगळे सांगणे न लगे. 😦

मी त्या हौशी माणसाचे आणि देवाचे मनोमन आभार मानले. गोरेगाव आलं, लोकांच्या झुंडी डब्यात शिरल्या आणि एका क्षणात डबा भरून गेला. ते शांत वातावरण मोबाईल, गप्पा ह्यांनी भरून निघालं आणि दिलाला बरं वाटलं. दादरला उतरलो आणि दीपक म्हणाला कबुतर खान्याला ये. तिथे पोचलो, आणि आपसूक पावले जड होत गेली. मनात ट्रेन बॉम्बस्फोटाचे विचार सुरु होतेच आणि कबुतर खान्याला गेल्यावर्षी १३ जुलैला इथे बॉम्बस्फोट झाला होता, पण आज त्याच्या काही खुणा शिल्लक नव्हत्या. मी त्या पूर्ण चौकाला एक फेरी मारली, आणि तितक्यात दीपकने आला…अनघाच्या घरी पोचेपर्यंत मनात विचारांचा कल्लोळ सुरु होता, म्हटलं काय साला आयुष्य आहे आपलं. आज वाचलो म्हणून देवाचे आभार मानायचे आणि आहे तो दिवस ढकलायचा? कधीपर्यंत? 😦 😦

जाता जाता एका स्टुपिड कॉमन मॅनची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही…

– सुझे !!!

20 thoughts on “भय इथले संपत नाही….

  1. Shantisudha

    मस्तच रे सुहास. खरंय, मुंबईत काय सगळ्याच मोठ्या शहरांत माणसं आला दिवस वाचलो जगलो हुश्श असं म्हणत जगताहेत. या अतिरेक्यांचं काही सांगता येत नाही. शेवटी सामान्य माणसांची कोणालाच पडलेली नाही. फक्त भ्रष्ट राजकारण्यांना सुरक्षा पुरवण्यासाठीच विचार होतो.

  2. anandpatre

    सध्या प्रवास करत नाही लोकल ट्रेनचा म्हणून पण आधी इथं हैदराबादलाही तेच व्हायचं.. लोकं आधी घाबरायचे मग त्यांनी ह्याचीही सवय करून घेतली 😦 .. हातात आपल्या काहीच नाही…

  3. छ्या.. साला कशातच अर्थ राहिलेला नाही !! असे पन्नास स्टुपिड कॉमन मेन हवेत आपल्याला !!

  4. सगळ्यांचा दत्ताजी शिंदे झालाय रे फक्त ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ म्हणायच्या ऐवजी “आज बचेंगे तो फिर कभी मरेंगे” असे म्हणायचे… भारतीय नागरिकाला लढायचा अधिकार नाही…

  5. Trupti

    लोकल चा प्रवास आता सुटलाय पण जेव्हा करायला लागतो ना..तेव्हा हा विचार आला च आहे डोक्यात
    superb writing ! 🙂

  6. सुहास तू मेट्रो पाहिलंस नं….त्या तो ट्रेनमध्ये प्रवासपण करत नाही बघ तुझं तसं झालंय…मला म्हणशील तर खरंच नाही घाबरत मी…हे एकच सत्य आहे जीवनातलं ज्याला कधी न कधी तरी सामोरं तर जावंच लागणार आहे…….असो….
    जेव्हा गोद्रामधुन “ती” गाडी आली नं होती त्यानंतर काही दिवसांनी मी आणि आई-बाबा एकत्र(पहिल्यांदी) दक्षिणेला जाणार होतो…सगळ्यांनी रिझर्व्हेशन रद्द करायला सांगितलं होतं आणि मी मात्र ठाम होते…
    माझ्या आयुष्यातली आई-बाबांबरोबरची ती अविस्मरणीय सहल होती…..:)

    So chill my friend…take it easy…..Take a deep breath and relax all I wanna say…

  7. KAUSTUBH

    NICE ONE …………
    ITS EVERY MUMBAI KAR’S FEELING TODAY ,BUT WE NEED SUCH EXPERIENCE TO MAINTAIN COLOURS OF OUR LIFE

  8. मुंबईकर आणि त्याचे स्पिरीट ह्या बद्दल प्रसारमाध्यमे गवगवा करतात. पण त्यामागील मुंबईकरांची हतबलता व भय कोणीच जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.