शिवस्मारक – मुंबई


२००२ साली लोकसभा निवडणुका आधी कोंग्रेस सरकारने शिवाजी महाराजांचे अतिभव्य स्मारक मरीन लाईन्स इथे अरबी समुद्रात बांधायचे, असं पिल्लू सोडलं. शिवाजी महाराजांबद्दल असलेली आत्मीयता, ह्या स्मारकाच्या माध्यमाने जगभर पोचवायची होती. त्याच साली ह्या स्मारकासाठी ३५० कोटींचं बजेट मंजूर झालं देखील होतं (२०१२ चा आकडा नक्कीच हजार कोटींवर असेल, महागाई वाढलीय नं). मरीन लाईन्सला समुद्रात एक किलोमीटर आत समुद्रात भरती टाकून, हे स्मारक बांधायचे नक्की झाले. शिव “स्मारक” प्रेमी आनंदून गेले. सरकारचा उदोउदो झाला आणि त्यानंतर ते सत्तेत आले. मग पुन्हा २००९ मध्ये विधानसभा निवडणुका व्हायच्या बरोबर अगोदर, त्यांनी एकदम धुमधडाक्यात स्मारकाचा आराखडा मंजूर केला आणि व्हायचं तेच झालं. सरकार पुन्हा सत्तेत आलं. चांगली साडेतीन वर्ष सत्ता भोगून झाली, आदर्श घोटाळे करून भागले. जिथे पैसा तिथे “आपला” माणूस आदर्शपणे (हा शब्द आहे की नाही माहित नाही, असावा बहुतेक) पेरावा, हे काँग्रेसी डावपेच कोणाला माहित नाही? (संदर्भ मुंबई क्रिकेट असो.)

असो, आता पुन्हा हा स्मारकाचा विषय ऐरणीवर आलाय. तीन दिवसांपूर्वी दादा पवारांनी सांगितलं, की मरीन लाईन्सला स्मारक बांधायचं तूर्तास रद्द झालंय. त्याला पर्यावरण समितीची परवानगी, मुंबईच्या सुरक्षेची कारणे दिली गेली. वर त्यांनी हेही सांगितलं, की वरळी भागात जागेचा पर्यायी जागेचा शोध सुरु आहे. त्या दिवसभरात शिव “स्मारक प्रेमींनी” प्रचंड गोंधळ घातला, मग संध्याकाळी मुखमंत्री (अरेरेरे स्वारी टायपो झाला) मुख्यमंत्री ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, कोणी परवानगी नाकारली नाही आणि आम्ही स्मारक बांधणार म्हणजे बांधणार. आम्ही केंद्र सरकारकडे याचा नक्की पाठपुरावा करून, लवकरात लवकरात परवानगी मिळवून घेऊ. मिडियाने कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ नाही, ही ब्रेकिंग न्यूज दिली. त्यावर मान्यवरांचे विचार ऐकवले, आणि स्मारकामुळे महाराजांचा आपल्याला किती अभिमान वाटतो हे आपण जगाला दाखवून देऊ, हे कळकळीने सांगितले. (डोळे पाणावल्याचा स्मायली)

शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, आरमार, सह्याद्री, महाराजांची दूरदृष्टी, त्यांनी गाजवलेला पराक्रम आणि आपल्याला त्यांच्याबद्दल असलेला अभिमान, ह्या गोष्टी पुन्हा नव्याने सांगायला नकोत. सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेलं हे किल्ल्यांच वैभव आपण नशीबवान आहोत म्हणून अनुभवायला तरी मिळतंय. महाराजांनी बघितलेलं आरमाराचे स्वप्न आणि त्यासाठी केलेली अफाट परिश्रम, म्हणूनच आपल्याला हे भव्य जलदुर्ग दिमाखात समुद्रात उभे दिसतायत. ह्या किल्ल्यांच्या तटबंदीवर, तो महाकाय समुद्र डोकं आपटून हतबलपणे मागे फिरतो. त्या सह्याद्रीच्या कुशीत उन-वारा-पाऊस ह्याची तमा न बाळगता उभे असलेले ते बुरुज बघून, कोणाची छाती अभिमानाने न फुगली तर नवलचं.

आता थोडं अवांतर २००७ साली रायगडावर फिरताना, एक पन्नाशीच्या आसपास दिसणारा माणूस किल्ल्याबद्दल, तिथल्या लोकांना काही माहिती देत होता. मी पण ती माहिती ऐकत उभा होतो, आणि त्यांची माहिती सांगून झाल्यावर आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांना विचारले तुम्ही गाईड आहात काय? तर ते नुसते हसले आणि त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका तरुणाने त्यांची ओळख करून दिली, हे निनादराव बेडेकर. हे मोठे इतिहास तज्ञ आहेत. त्यांच्याशी गप्पा मारत आम्ही २०-३० मिनिटे थांबलो आणि ते एकदम भरभरून बोलत होते. बोलताबोलता त्यांना आम्ही किल्ल्यांच्या ह्या वाईट अवस्थेबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “अरे राजा, गेली १५ वर्ष मी आपल्या सरकारकडे किल्ले पुन:बांधणीचा प्रस्ताव घेऊन फिरतोय आणि त्याला केराची टोपलीशिवाय अजून काही मिळालं नाही. मी पाठपुरावा करणे सोडणार नाही, पण ह्या लोकांची कातडी गेंड्याची आहे. मी त्यांना त्यांचा फायदा कसा होईल हे देखील समजावून सांगितले, पण काही नाही. त्यांना हा इतिहास पुसून टाकायचा आहे” आणि ते परतीच्या वाटेला निघाले. २०११ साठ्ये कॉलेजमध्ये निनादराव पुन्हा भेटले, आणि मला बघताच म्हणाले, ” आपण रायगडावर भेटलो होतो. मस्त गप्पा मारल्या होत्या आणि आता त्या प्रस्तावाचे, माझे आणि रायगडाचे वय चार वर्षांनी वाढलेय, बाकी प्रगती शून्य आहे” हे ऐकून काळजात खोलवर धस्स झाले. त्यानंतर ते पुन्हा एकदा तिथेच जनसेवा समितीच्या कार्यक्रमात भेटले होते, आणि त्यावेळी त्यांनी महाराजांचे दुर्ग आणि त्यांची बांधणी ह्यावर अभ्यासवर्ग घेतला होता. त्यावेळी त्यांनी युरोपातील जुन्या किल्ल्यांचे वैभव, कसे टिकवले आहेत हे कळकळीने सांगत होते. हाच प्रस्ताव त्यांनी आपल्या सरकारकडे दिला होता. तुम्ही किल्ले वाचवा, परत होते तसे बांधून काढा, आम्ही तुम्हाला सगळी माहिती देतो कुठे काय होतं आणि तुम्ही किल्ले बघायाला येणाऱ्या लोकांकडून प्रवेशासाठी पैसे घ्या.

शिवाजी महाराजांबद्दल असलेली आपुलकी दाखवणे म्हणजे, त्यांचे जागोजागी पुतळे उभारायचे, त्यांच्या दोन-दोन जयंत्या साजऱ्या करायच्या, त्यांच्या नावे टपाल तिकीट काढायचं, किंवा त्याचे लॉकेट-अंगठ्या घालणे होत नाही. आपल्या सरकारला अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवीच्या पुतळ्याहून उंच पुतळा बांधून, अमेरिकेपुढे जायचं आहे हे पाहून गंमतच वाटली. चला बांधा तुम्ही स्मारक, मी नक्की भेट देईन, अगदी पहिल्याचं दिवशी. महाराजांच्या अतिभव्य स्मारकासमोर उभं राहण्यात मीसुद्धा धन्यता मानेन. पण त्या स्मारकासाठी भर समुद्रात मोठ्ठं मानवनिर्मित बेट तयार करणे (त्यासाठी लाखो टन ब्राँझ आणि १५०-२०० एकर भराव घालणे), मोठाले निधी उभारणे, निसर्गाला आव्हान देणे, सुरक्षितता (स्मारकाची आणि अनायसे मुंबईची) आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं राजकारण करणे हे कधी थांबणार?

काल सेनापतींनी (रोहन चौधरी) ठरवल्याप्रमाणे खांदेरी-उंदेरी हे दोन्ही सागरी किल्ले बघून आलो. समुद्रात खोल पाण्यात दोन नैसर्गिक बेटांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांधलेले हे दोन किल्ले. उंदेरी किल्ला सिद्दीने बांधला, आणि खांदेरी महाराजांच्या काळात बांधायला घेतला गेला. मुंबई बंदराच्या सुरक्षतेच्यादृष्टीने हे दोन्ही किल्ले बांधण्यात आले. दोन्ही किल्ले एकदम खस्ता हाल आहेत. उंदेरी तर पूर्णपणे दुर्लक्षित आहे आणि खांदेरीवर वेताळदेव मंदिर आणि कान्होजी आंग्रे लाईट हाउस असल्यामुळे लोकांची वर्दळ आहे. उंदेरीच्या तटबंदी खूप ढासळल्या आहेत. गडावर १६ तोफा आहेत, ज्या अतिशय वाईट अवस्थेत आहेत. काही तोफा समुद्रात पडलेल्या (फेकलेल्या) आहेत.

जलदुर्ग - उंदेरी
जलदुर्ग - खांदेरी

तटबंदीचे महाकाय दगड समुद्रात वाळूत रुतून पडले आहेत. त्यातल्या एका दगडावर शांत बसून होतो. वाईट वाटतं होतं. ह्या दोन किल्ल्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे, निखळलेल्या दगडाचे सांत्वन मी तरी काय करणार आणि अश्या किती दगडांचे पर्यायाने किल्ल्यांचे सांत्वन मी करणार. आपलं नशीब की, आपल्याला ह्या तुटलेल्या तटबंदी का होईना बघायला मिळाल्या. तो इतिहास थोडाफार अनुभवता आला, पण… पुढे? 😦

जर अश्या बेटावर पर्यायाने किल्ल्यावर शिवस्मारक झाले, तर किल्ला पण सुरक्षित राहिलं आणि स्मारकाचे स्मारक देखील होऊन जाईल. मुंबई गेट वेपासून, फक्त ४०-४५ मिनिटे बोटीचा प्रवास बस्स…

पण हे होईल का? 😦 😦

– सुझे !!

(दोन्ही फोटो साभार रोहन चौधरी)

27 thoughts on “शिवस्मारक – मुंबई

 1. Milind Devarshi

  If you search on google earth you will able to locate a large aircraft lying at the bottom of the sea north of Khanderi fort, please can you give some information about it…..

  1. prashant mandpe

   अगदी बरोबर, श्री. शिवरायांचे इतके किल्ले आहेत तेच जपले तर तेच मोठे काम होईल.

  1. नागेश,

   खरं तर स्माराकापेक्षा किल्ले मजबूत करणे हेच केलं तर बरं होईल, पण आपल्या सरकारला खायला मिळायला हवं नं 😦 😦

   1. Umesh Padte

    सुझे …

    अगदी माझ्या मनात हेच आहे रे मित्रा .. आपल्या शिवरायांचे गड किल्ले छान दुरुस्त करून घेतले तर महाराष्ट्राची आणि देशाची शान वर्षांनो वर्ष टिकून राहील ..

 2. लेख उत्तम लिहिला आहे.
  खरं तर आपण ही स्मारके, पुतळे उभे करून एका दृष्टीने त्या महान व्यक्तींचा अपमानच करतो. कारण पुण्यतिथी आणि जयंती व्यतिरिक्त त्यांच्यावर फुले कमी आणि पक्षांची हगवण जास्त असते. आणि रात्री गर्दुल्ले धूर सोडत बसतात. आणि अश्या महापुरुषांच्या नावाचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेणे हा तर राजकारणी लोकांचा आवडता धंदा आहे. जो पर्यंत “छत्रपती शिवाजी महाराज की” या आरोळी ला “जय” असा प्रतिसाद आणि “जय भवानी” ला “जय शिवाजी” असा प्रतिसाद येतोय तो पर्यंत प्रत्येकाचा मनात महाराजांचे तेजोमय जाज्वल्य स्थान अबाधित राहील.

  1. अनुविना,

   अगदी अगदी… पुतळे, स्मारक बांधून काय आदर व्यक्त होतो ते सगळ्यांना माहित आहे. ह्यांना मताचे राजकारण जमते, अजून काही नाही !!

   ब्लॉगवर स्वागत…. 🙂

 3. मानवनिर्मित बेट बनवणे, भराव घालणे अश्या कामांसाठी मजबूत खर्च मंजूर करून घ्यायचा आणि त्यातून आपले खिसे भरायचे. ह्या सगळ्यासाठी स्मारकाचा खटाटोप. तुला काय वाटले स्मारके थोर व्यक्तिंची आठवण म्हणून बांधली जातात?

  1. सिद्ध्य,

   ते आहेच रे, पण माझ्यापरीने हा विरोध कायम करत राहणार…. कोणाला काय वाटायचे ते वाटो !!

 4. खांदेरी बेट नौदलाच्या ताब्यात आहे. नौदल काही ते सोडणार नाही. तिथे एक दीपस्तंभ आहे. तिथे नौदलाचे कोणितरी अधिकारी येतो दिवसातून १-२ वेळा. तिथून दृश्यता (visibility) किती आहे वगैरे महिती ते मुंबई बंदराला पाठवतात असं त्याने संगितलं होतं.
  उंदेरी बेट तर खासगी मालकीचं आहे. ते एका पंचतारांकित हॉटेलला विकलंही होतं पण त्याला वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळाली आणि गोंधळ झाला. मग रायगड जिल्हाधिका‍र्‍यांनी तो व्यवहार रद्द केला. असं वाचलं आणि ऐकलं होतं.
  सरकार कदचित स्मारक बांधेलही. पण सरकारने बांधलेल्या इतर गोष्टींप्रमाणे पुढे दूर्लक्ष होईल. देखभालीसाठी पुरेशी तरतूदही करीत नाहित आणि केलीच तर ती कधी योग्य ठिकाणी पोचत नाही.
  पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाची काय दयनीय अवस्था झाली आहे ती मी हल्लीच बघून आलोय. 😉

  1. अनिश,

   हो खांदेरीवर कान्होजी आंग्रे दीपस्तंभ आहे. उंदेरी बेट खाजगी मालमत्ता? हे मला नवीनच कळतंय. स्मारक होणार रे, ही मंडळी बांधून राहणार आणि स्मारकाच्या पैश्याखाली आदर्शपणे मजा मारत राहणार. 😦

 5. अगदी अगदी सहमत. मी सुरुवातीला बऱ्यापैकी कन्फ्युज होतो की स्मारक असावं की नसावं.. कारण दोन्हीकडचे मुद्दे मला बरोबर वाटले होते. पण काही दिवसांनी पटलंच की या स्मारकात काही अर्थ नाही. एवढे गडकिल्ले आहेत त्यांचं संवर्धन करणं हे असल्या छप्पन्न स्मारकांपेक्षा महत्वाचं आहे !

  1. हेरंब,

   हो रे, किल्ले हे खरं स्मारक. चला त्यांना बांधायचं आहे स्मारक, समुद्रात बांधायचं आहे, मग अश्या नैसर्गिक बेटावर बांधा नं, समुद्रात भराव कशाला? ह्या निम्मिताने एक किल्ला तरी वाचेल ही भोळी अपेक्षा !!

 6. जरा उशीरा कमेंट देतेय पण ही पोस्ट मला नीट वाचायची होती माझं स्वतःचं याबाबतीत मत बनवायला..म्हणून थांबले होते.
  सर्वप्रथम अतिशय सयंतपणे लिहिलंस त्याकरता अभिनंदन…
  मी प्रचंड इतिहासप्रेमी आहे अशातला भाग नाही पण इतिहास पुसला जातो तेव्हा ज्यांना दुःख होतो त्यात माझं नाव नक्कीच आहे त्यामुळे तुझं मत पटतंय..त्यातही तो निनादरावांचा अनुभव लिहिला आहेस त्याने मनाला यातनाच होताहेत…
  कसं नं? आपल्याकडे आदर्श सोसायट्या उभारायला वेळ लागत नाही आणि ज्या महान व्यक्तीने आपले ठसे अख्ख्या महाराष्ट्रात गड किल्ले आणि अशा प्रकारे ठेवलेत ते जतन करायला किति शासन दिरंगाई…आपण काय करू शकतो हा एक प्रश्न जाम छळतोय?? तुला काही माहीत असल्यास सांग…
  आणि हो नव्या स्मारकाची खरंच गरज नाहीये निदान आहे ते सर्व सुस्थितीत येईपर्यंततरी….नाहीतर यात आणखी एक नवा घोटाळा फ़क्त समोर येईल …

  1. अपर्णा,

   भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार, हेच मूळ आहे ह्या सगळ्या गोष्टीचं. राजकारण केल्याशिवाय काही गोष्टी घडतील तर शप्पथ.

  1. कांचन,

   धन्स… कल्पना चांगली असून काहीच होत नाही गं… ह्या राजकारण्यांची इच्छाशक्ती शक्ती असणे गरजेचे आहे आणि ते होणार नाही हे ही नक्की 😦 😦

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.