भय इथले संपत नाही….

स्थळ: कांदिवली रेल्वे स्टेशन

वेळ: साधारणतः संध्याकाळचे ५:२५

५:२१ च्या चर्चगेट लोकलची वाट बघत उभा होतो. गाड्या जरा उशिराने धावत होत्या, पण गर्दी नव्हती. मला ६ पर्यंत दादरला पोचायचे होते, आणि बोरिवलीला जाऊन फास्ट लोकल पकडायचा प्रचंड कंटाळा आला होता. शेवटी ट्रेन आली आणि विरुद्ध दिशेची, पण खिडकीची जागा मिळाली. नवीन लोकल असल्यामुळे हवा “खेळती” राहते हे विशेष. ट्रेन रडत रडत सुरु झाली. जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हा हे असं घडतंच. माझ्या बरोब्बर समोर प्रथम दर्ज्याचा (मराठीत फर्स्ट क्लास) डबा होता. त्यात मोजुन १०-१२ लोकं बसली असतील, आणि ती पण एकदम विखुरलेली. कोणी आपला करवंदाचे अपडेट्स बघतोय, कोणी फोनवर, कोणी डोळे मिटून गाणी ऐकतंय तर कोणी इकोनॉमिक टाईम्स वाचत आहेत. नेहमीप्रमाणेचं दृश्य, काही नवीन नाही म्हणा यात. 🙂

जशी ट्रेन सुरु झाली, तसे तीन मित्र हसत-खिदळत जागेवर बसायला आले. माझ्या बरोब्बर समोर असलेल्या प्रथम दर्ज्याचा जागा पूर्णपणे रिकाम्या होत्या. ते तिघे तिथे येऊ लागले, आणि अचानक थांबले. थोडी कुजबुज झाली त्यांच्यात आणि डब्याच्या एकदम मागच्या दरवाज्यात जाऊन उभे राहिले. मी म्हटलं तिथे घाण वगैरे असेल, म्हणून ती लोकं बसली नाहीत. मी त्यांच्याकडे बघत राहिलो, आणि मालाड आल्यावर ते तिघे घाईघाईने उतरले आणि फलाटावर जाऊन उभे राहिले. मालाडमध्ये दोघे जण ट्रेनमध्ये चढले आणि ते दोघे त्याच जागेच्या दिशेने वळले, कारण दोन खिडकीच्या हवेशीर जागा त्यांना सोडवल्या नसाव्यात. दोघेही दोन खिडक्यांना एकदम अवघडून बसले होते, आणि समोर असलेल्या रिकाम्या जागेकडे बघत होते.

हे सगळं मी दुसऱ्या दर्जाच्या डब्यातून (मराठीत सेकंड क्लासमधून) बघत होतो. मला वाटलं कोणी बेवडा वगैरे झोपला असावा तिथे. दोघांपैकी एक जेमतेम माझ्या वयाचा मुलगा होता आणि दुसरा कोणी तरी मारवाडी का भैय्या (पुढे टक्कल आणि मागे थोड्या केसांची वेणी बांधलेली) साधारण चाळीशीच्या आसपास. मी त्या मुलाला खुणेने विचारले, काय झालं? त्याने कसतरी जबरदस्ती हसत खुणेनेच उत्तर दिले, इथे एक बॅग आहे. त्याची एकूणच तंतरली होती, आणि मारवाड्याची पण. तो जरा घाबरत घाबरत दरवाज्याजवळ गेला आणि तिथे लावलेली पोलिसांची नोटीस बघू लागला. कदाचित तो नंबर शोधत असावा. तो मुलगा माझ्याकडे बघत होता, माझ्या बाजूला बसलेल्या दोघांना हा प्रकार कळला. सगळे उठून उठून डोकावू लागले त्या डब्यात. तितक्यात ट्रेन थांबली, साला ३ मिनिटं झाली पण गोरेगाव आलं नव्हतं.

आता त्या डब्यात पण खळबळ उडाली, सगळे मागे सरकू लागले. डब्याच्या विरूध्द बाजूला एकवटू लागले. इथे तो मारवाडी, तो मुलगा आणि एक हौशी गृहस्थ होता. एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी होती, आणि त्यात एक काळ्या रंगाची अजून एक पिशवी होती. मी त्या मुलाला म्हणालो, तुमच्या त्या बाजूला लेडीज डब्बा आहे, तिथे हवालदार असेल. त्याला आवाज दे. तो नुसता जबरदस्ती हसला आणि कपाळावरचा घाम पुसत दरवाज्याकडे त्या मारवाड्याकडे जाऊन उभा राहिला. इथं तो हौशी माणूस पिशवी बघायला पुढे सरसावला, तर त्या मारवाड्याने त्याला हटकलं. बॅग मत छुना, बम हो सकता हैं. तो हौशी माणूस त्या पिशवीसमोर बसून राहिला, आणि आता डोकवायचा प्रयत्न करू लागला.

तो हिमतीने म्हणाला, “फेक देता हुं बाहर”

त्यावर तो मारवाडी म्हणाला, “तू थैली उठाया, और प्रेशर निकल गया तो बम फट गया तो…रेहने दे”

यावर तो हौशी माणूस, “मरेंगे तो सिर्फ तीन जन ना?”

मायला आम्ही त्या पिशवीला खेटून पलीकडच्या बाजूला असलेल्या लाकडी बाकावर बसलो होतो, आमची काही गणतीच नाही का? असा विचार मनात तरळून गेला. असो…!!

ट्रेन अजून थांबली होती, मी आपला मोबाईल हातात फिरवत तिथे काय होतंय ते बघत होतो. शेवटी तो हौशी माणूस चवताळून उठला आणि त्याने ती बॅग बाहेर भिरकावून दिली. काही झालं नाही, तो हसत जागेवर जाऊन बसला. मारवाडी आणि तो तरुण मुलगा आत्मविश्वासाने पुन्हा जागेवर येऊन बसले. त्या मुलाने परत माझ्याकडे बघितले आणि हुश्श्श करत हसला. 🙂 🙂

मला आधी वाटलं काय लोकं घाबरतात यार, साधी पिशवी ती. कोणी तरी विसरलं असेल…. पण क्षणात जाणवलं की माझ्या हातापायांना सुद्धा घाम आलाय. कपाळावरून घाम ठिबकत आहे. ११ जुलै २००६ साली मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. एकदम सुन्न झालो. मुंबईकरांच्या धकाधकीच्या आयुष्यात, हे असे क्षण येणं क्रमपात्र आहे (संदर्भ – बडे बडे शहरो मैं, छोटी छोटी बातें होती रेहती है) आणि मुंबईकरांकडे पेश्शल स्पिरीट आहे हे वेगळे सांगणे न लगे. 😦

मी त्या हौशी माणसाचे आणि देवाचे मनोमन आभार मानले. गोरेगाव आलं, लोकांच्या झुंडी डब्यात शिरल्या आणि एका क्षणात डबा भरून गेला. ते शांत वातावरण मोबाईल, गप्पा ह्यांनी भरून निघालं आणि दिलाला बरं वाटलं. दादरला उतरलो आणि दीपक म्हणाला कबुतर खान्याला ये. तिथे पोचलो, आणि आपसूक पावले जड होत गेली. मनात ट्रेन बॉम्बस्फोटाचे विचार सुरु होतेच आणि कबुतर खान्याला गेल्यावर्षी १३ जुलैला इथे बॉम्बस्फोट झाला होता, पण आज त्याच्या काही खुणा शिल्लक नव्हत्या. मी त्या पूर्ण चौकाला एक फेरी मारली, आणि तितक्यात दीपकने आला…अनघाच्या घरी पोचेपर्यंत मनात विचारांचा कल्लोळ सुरु होता, म्हटलं काय साला आयुष्य आहे आपलं. आज वाचलो म्हणून देवाचे आभार मानायचे आणि आहे तो दिवस ढकलायचा? कधीपर्यंत? 😦 😦

जाता जाता एका स्टुपिड कॉमन मॅनची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही…

– सुझे !!!

शिवस्मारक – मुंबई

२००२ साली लोकसभा निवडणुका आधी कोंग्रेस सरकारने शिवाजी महाराजांचे अतिभव्य स्मारक मरीन लाईन्स इथे अरबी समुद्रात बांधायचे, असं पिल्लू सोडलं. शिवाजी महाराजांबद्दल असलेली आत्मीयता, ह्या स्मारकाच्या माध्यमाने जगभर पोचवायची होती. त्याच साली ह्या स्मारकासाठी ३५० कोटींचं बजेट मंजूर झालं देखील होतं (२०१२ चा आकडा नक्कीच हजार कोटींवर असेल, महागाई वाढलीय नं). मरीन लाईन्सला समुद्रात एक किलोमीटर आत समुद्रात भरती टाकून, हे स्मारक बांधायचे नक्की झाले. शिव “स्मारक” प्रेमी आनंदून गेले. सरकारचा उदोउदो झाला आणि त्यानंतर ते सत्तेत आले. मग पुन्हा २००९ मध्ये विधानसभा निवडणुका व्हायच्या बरोबर अगोदर, त्यांनी एकदम धुमधडाक्यात स्मारकाचा आराखडा मंजूर केला आणि व्हायचं तेच झालं. सरकार पुन्हा सत्तेत आलं. चांगली साडेतीन वर्ष सत्ता भोगून झाली, आदर्श घोटाळे करून भागले. जिथे पैसा तिथे “आपला” माणूस आदर्शपणे (हा शब्द आहे की नाही माहित नाही, असावा बहुतेक) पेरावा, हे काँग्रेसी डावपेच कोणाला माहित नाही? (संदर्भ मुंबई क्रिकेट असो.)

असो, आता पुन्हा हा स्मारकाचा विषय ऐरणीवर आलाय. तीन दिवसांपूर्वी दादा पवारांनी सांगितलं, की मरीन लाईन्सला स्मारक बांधायचं तूर्तास रद्द झालंय. त्याला पर्यावरण समितीची परवानगी, मुंबईच्या सुरक्षेची कारणे दिली गेली. वर त्यांनी हेही सांगितलं, की वरळी भागात जागेचा पर्यायी जागेचा शोध सुरु आहे. त्या दिवसभरात शिव “स्मारक प्रेमींनी” प्रचंड गोंधळ घातला, मग संध्याकाळी मुखमंत्री (अरेरेरे स्वारी टायपो झाला) मुख्यमंत्री ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, कोणी परवानगी नाकारली नाही आणि आम्ही स्मारक बांधणार म्हणजे बांधणार. आम्ही केंद्र सरकारकडे याचा नक्की पाठपुरावा करून, लवकरात लवकरात परवानगी मिळवून घेऊ. मिडियाने कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ नाही, ही ब्रेकिंग न्यूज दिली. त्यावर मान्यवरांचे विचार ऐकवले, आणि स्मारकामुळे महाराजांचा आपल्याला किती अभिमान वाटतो हे आपण जगाला दाखवून देऊ, हे कळकळीने सांगितले. (डोळे पाणावल्याचा स्मायली)

शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, आरमार, सह्याद्री, महाराजांची दूरदृष्टी, त्यांनी गाजवलेला पराक्रम आणि आपल्याला त्यांच्याबद्दल असलेला अभिमान, ह्या गोष्टी पुन्हा नव्याने सांगायला नकोत. सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेलं हे किल्ल्यांच वैभव आपण नशीबवान आहोत म्हणून अनुभवायला तरी मिळतंय. महाराजांनी बघितलेलं आरमाराचे स्वप्न आणि त्यासाठी केलेली अफाट परिश्रम, म्हणूनच आपल्याला हे भव्य जलदुर्ग दिमाखात समुद्रात उभे दिसतायत. ह्या किल्ल्यांच्या तटबंदीवर, तो महाकाय समुद्र डोकं आपटून हतबलपणे मागे फिरतो. त्या सह्याद्रीच्या कुशीत उन-वारा-पाऊस ह्याची तमा न बाळगता उभे असलेले ते बुरुज बघून, कोणाची छाती अभिमानाने न फुगली तर नवलचं.

आता थोडं अवांतर २००७ साली रायगडावर फिरताना, एक पन्नाशीच्या आसपास दिसणारा माणूस किल्ल्याबद्दल, तिथल्या लोकांना काही माहिती देत होता. मी पण ती माहिती ऐकत उभा होतो, आणि त्यांची माहिती सांगून झाल्यावर आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांना विचारले तुम्ही गाईड आहात काय? तर ते नुसते हसले आणि त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका तरुणाने त्यांची ओळख करून दिली, हे निनादराव बेडेकर. हे मोठे इतिहास तज्ञ आहेत. त्यांच्याशी गप्पा मारत आम्ही २०-३० मिनिटे थांबलो आणि ते एकदम भरभरून बोलत होते. बोलताबोलता त्यांना आम्ही किल्ल्यांच्या ह्या वाईट अवस्थेबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “अरे राजा, गेली १५ वर्ष मी आपल्या सरकारकडे किल्ले पुन:बांधणीचा प्रस्ताव घेऊन फिरतोय आणि त्याला केराची टोपलीशिवाय अजून काही मिळालं नाही. मी पाठपुरावा करणे सोडणार नाही, पण ह्या लोकांची कातडी गेंड्याची आहे. मी त्यांना त्यांचा फायदा कसा होईल हे देखील समजावून सांगितले, पण काही नाही. त्यांना हा इतिहास पुसून टाकायचा आहे” आणि ते परतीच्या वाटेला निघाले. २०११ साठ्ये कॉलेजमध्ये निनादराव पुन्हा भेटले, आणि मला बघताच म्हणाले, ” आपण रायगडावर भेटलो होतो. मस्त गप्पा मारल्या होत्या आणि आता त्या प्रस्तावाचे, माझे आणि रायगडाचे वय चार वर्षांनी वाढलेय, बाकी प्रगती शून्य आहे” हे ऐकून काळजात खोलवर धस्स झाले. त्यानंतर ते पुन्हा एकदा तिथेच जनसेवा समितीच्या कार्यक्रमात भेटले होते, आणि त्यावेळी त्यांनी महाराजांचे दुर्ग आणि त्यांची बांधणी ह्यावर अभ्यासवर्ग घेतला होता. त्यावेळी त्यांनी युरोपातील जुन्या किल्ल्यांचे वैभव, कसे टिकवले आहेत हे कळकळीने सांगत होते. हाच प्रस्ताव त्यांनी आपल्या सरकारकडे दिला होता. तुम्ही किल्ले वाचवा, परत होते तसे बांधून काढा, आम्ही तुम्हाला सगळी माहिती देतो कुठे काय होतं आणि तुम्ही किल्ले बघायाला येणाऱ्या लोकांकडून प्रवेशासाठी पैसे घ्या.

शिवाजी महाराजांबद्दल असलेली आपुलकी दाखवणे म्हणजे, त्यांचे जागोजागी पुतळे उभारायचे, त्यांच्या दोन-दोन जयंत्या साजऱ्या करायच्या, त्यांच्या नावे टपाल तिकीट काढायचं, किंवा त्याचे लॉकेट-अंगठ्या घालणे होत नाही. आपल्या सरकारला अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवीच्या पुतळ्याहून उंच पुतळा बांधून, अमेरिकेपुढे जायचं आहे हे पाहून गंमतच वाटली. चला बांधा तुम्ही स्मारक, मी नक्की भेट देईन, अगदी पहिल्याचं दिवशी. महाराजांच्या अतिभव्य स्मारकासमोर उभं राहण्यात मीसुद्धा धन्यता मानेन. पण त्या स्मारकासाठी भर समुद्रात मोठ्ठं मानवनिर्मित बेट तयार करणे (त्यासाठी लाखो टन ब्राँझ आणि १५०-२०० एकर भराव घालणे), मोठाले निधी उभारणे, निसर्गाला आव्हान देणे, सुरक्षितता (स्मारकाची आणि अनायसे मुंबईची) आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं राजकारण करणे हे कधी थांबणार?

काल सेनापतींनी (रोहन चौधरी) ठरवल्याप्रमाणे खांदेरी-उंदेरी हे दोन्ही सागरी किल्ले बघून आलो. समुद्रात खोल पाण्यात दोन नैसर्गिक बेटांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांधलेले हे दोन किल्ले. उंदेरी किल्ला सिद्दीने बांधला, आणि खांदेरी महाराजांच्या काळात बांधायला घेतला गेला. मुंबई बंदराच्या सुरक्षतेच्यादृष्टीने हे दोन्ही किल्ले बांधण्यात आले. दोन्ही किल्ले एकदम खस्ता हाल आहेत. उंदेरी तर पूर्णपणे दुर्लक्षित आहे आणि खांदेरीवर वेताळदेव मंदिर आणि कान्होजी आंग्रे लाईट हाउस असल्यामुळे लोकांची वर्दळ आहे. उंदेरीच्या तटबंदी खूप ढासळल्या आहेत. गडावर १६ तोफा आहेत, ज्या अतिशय वाईट अवस्थेत आहेत. काही तोफा समुद्रात पडलेल्या (फेकलेल्या) आहेत.

जलदुर्ग - उंदेरी
जलदुर्ग - खांदेरी

तटबंदीचे महाकाय दगड समुद्रात वाळूत रुतून पडले आहेत. त्यातल्या एका दगडावर शांत बसून होतो. वाईट वाटतं होतं. ह्या दोन किल्ल्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे, निखळलेल्या दगडाचे सांत्वन मी तरी काय करणार आणि अश्या किती दगडांचे पर्यायाने किल्ल्यांचे सांत्वन मी करणार. आपलं नशीब की, आपल्याला ह्या तुटलेल्या तटबंदी का होईना बघायला मिळाल्या. तो इतिहास थोडाफार अनुभवता आला, पण… पुढे? 😦

जर अश्या बेटावर पर्यायाने किल्ल्यावर शिवस्मारक झाले, तर किल्ला पण सुरक्षित राहिलं आणि स्मारकाचे स्मारक देखील होऊन जाईल. मुंबई गेट वेपासून, फक्त ४०-४५ मिनिटे बोटीचा प्रवास बस्स…

पण हे होईल का? 😦 😦

– सुझे !!

(दोन्ही फोटो साभार रोहन चौधरी)