रंग्या आकाशाकडे भिरभिरत्या नजरेने बघत होता, त्याची नजर काही तरी हेरायचा प्रयत्न करत होती. प्रचंड ऊन होतं आणि तो धावून धावून घामाने नखंशिखांत भिजलेला होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं, सारखा वळून वळून आपल्या छोट्या ४ वर्षाच्या बहिणीकडे बघत होता. ती मुकाट्याने त्याच्या मागे दुडूदुडू धावत होती. तो मोठाला बांबू धरून रंग्याचा हात प्रचंड दुखत होता आणि त्या छोट्या जीवाकडे १५-२० पतंगाचा गठ्ठा सांभाळायची जबाबदारी होती.
रंग्या दिवसभर इकडून-तिकडे तो बांबू घेऊन पळत होता. कुठली पंतग बांबूला लावलेल्या तारेमध्ये अलगद फसतेय, याचा विचार करत नुसता तो अनवाणी धावत होता. कुठे बांबू उंच करून पतंग त्यात अडकवायला जाई, तितक्यात कोणी मोठा बांबू घेऊन येई आणि त्याच्या समोर असेलेली पतंग त्याच्यापासून हिरावून घेऊन जाई. हा बिचारा तोंड पाडून बसे, मनातल्यामनात विचार करायचा की अजुन मोठा बांबू घेऊ का?..पण हाच बांबू त्याला धड उचलता येत नव्हता, तर मोठा आणून काय केलं असतं..म्हणून तो विचार सोडून देई, आणि ए गु sss ल, एsss काय पो छे आवाज ऐकून नुसता धावत सुटे…. पण कधी कधी ह्याला मुलांच्या घोळक्यातसुद्धा पंतग मिळून जाई, त्यामुळे त्याने आशा सोडली नव्हती. आज खूप जास्त धावपळ केली होती त्याने.
९ वर्षाचा रंग्या आणि चार वर्षाची निता जोगेश्वरी रेल्वे लाईनलगतच्या झोपडपट्टीत राहायचे. तिला बोलता येत नसे, पण नेहमी तिच्या चेहऱ्यावर एक स्मित असायचे. त्यांचा बाप दारू पिऊन रेल्वेखाली चिरडून मेला, आणि बाप गेल्यावर आईसुद्धा घर सोडून दुसऱ्याकडे निघून गेली. आता दोघेच एकमेकांचे आधार होते. रंग्या सिग्नलवर गाड्या पुसायचा, रिक्षा धुऊन द्यायचा, पेपर विकायचा आणि रात्री शौकत अलीच्या दारू अड्ड्यावर टेबलं साफ करायचा. त्यामुळे रोजचं जेवण सुटायचं, पण शौकत निताला खाऊ घालताना हो-नाही करायचा. त्याला सांगायचा, “क्यों ईस बोझ को लेके घुमता हैं, पता भी नही ये तेरी बेहन हैं या नही…!!” रंग्याला ते अजिबात रुचत नसे, “देखो सेठ जमता हैं तो दो, नही तो मैं कही और नौकरी कर लूंगा…ती माझी बहीण आहे आणि तिची काळजी मी घेईन…” शौकत एक कचकचीत शिवी हासडून बोले,”भोसडीके, तू नही सुधरेगा.. जा अंदर, और काम कर. खाना बाद मैं मिलेगा.”
त्याच्यामागे ही रोजची कटकट असे, रोज त्याला माहित नसे, की आज जेवण मिळेल की नाही… मिळाले तर, त्यासाठी किती शिव्याशाप खावे लागतील. दिवसभरात गाडी पुसून जितके पैसे मिळायचे, त्या पैश्यात तो निताला दोन वेळा उकाडा-पाव खाऊ घालत असे. चार दिवसांपूर्वी त्याच्याच झोपडपट्टीत राहणारा अमित त्याला म्हणाला होता, मकरसंक्रांत जवळ येतेय. नाक्यावर पतंगाचा धंदा टाकतोय, तू काम करणार का म्हणून… आधी हा नाही म्हणाला होता….पण… पण शेवटी न राहवून हो म्हणाला.
तो अमितकडे गेला. अमितने त्याला एक तार लावेलेला बांबू दिला. म्हणाला उचलून बघ, झेपत असेल तर घे नाही तर दुसरा बघ. आता रंग्याला कळेना, हा बांबू कशाला? मग त्याला अमित ने समजावलं, आपण स्वतः पंतगा विकत घ्यायच्या नाहीत, आपण लोकं उडवतात त्या गुल झाल्या, की नीट जमा करायच्या आणि स्वस्तात विकायच्या. तरी त्याच्या मनाचे समाधान झाले नाही, “अरे अमित अश्या पतंगा घेणार तरी कोण?” मग अमित समजुतीच्या सुरात म्हणाला,”१० रुपयाची पतंग ३-४ रुपयात विकू किंवा १० ला तीन अश्या विकू. त्या फक्त नीट अलगद वरच्यावर धरायच्या ह्या बांबूने बस्स…बाकी फायदा आपलाच आहे आणि तुला प्रत्येक पाच पतंगांच्या मोबदल्यात ३ रुपये देईन. बोल आहे कबुल?”
रंग्याच्या शेजारीच चिमुरडी निता मातीत बसून दगडांशी खेळत होती. मनात विचार करत होता, काय करावं म्हणून. शौकतच्या कटकटीला तो खूप वैतागला होता. अमित ने त्याला आज एक वेगळा पर्याय दिला होता. त्याने आधी असं कधी केलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला जमेल की नाही ही मनात धाकधूक होतीच. तो अमितला म्हणाला, “पैसे नक्की देणार नं? मला फसवणार तर नाही?” अमित त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला, “जबान दी हैं दोस्त, भरोसा रख.” त्याचे हे शब्द ऐकून त्याला धीर आला, त्याने निताला उठवलं. तिचे कपडे झटकले आणि तिचा एक हात धरून झोपडीकडे चालू लागला. चिमुरडी निता रंग्याच्या दुसऱ्या हातात असलेल्या उंच गोष्टीकडे कुतूहलाने बघत चालू लागली.
“ए भरदोल… पकड पकड…” ह्या शब्दांनी रंग्या भानावर आला आणि आवाजाच्या दिशेने धावत सुटला. आकाशाकडे बघत त्या पतंगाचा अंदाज तो घेत होता, अचानक तो पतंग घ्यायला ५-६ पोरांची झुंबड उडाली, सगळे हात उंच करून तो पतंग आपल्या काट्यात अडकवायला बघत होते, एकमेकांना शिव्या देत होते. शेवटी सगळी पोरं पांगली, ती पतंग रंग्याला मिळाली होती. त्याने हलकेच बांबू खाली केला आणि पतंग तारेतून सोडवला. त्याची नजर निताला शोधू लागली. “ए निते, ये इथे… बघ कसली मस्त पतंग मिळालीय.” निता कौतुकाने त्या लालधम्मक पतंगीकडे बघत होती, त्याने पतंगीचा मांजा कणी पासून तोडला आणि काडीपेटीला गुंडाळायला सुरुवात केली. बाजूला असलेल्या दुकानाच्या घड्याळात वेळ बघितली, दीड वाजला होता. निताला काही तरी खायला द्यायला हवं आणि त्याला ही सपाटून भुक लागली होती. त्याने पतंग निताकडे दिली, तिने हलक्या हाताने ती पकडली आणि रंग्यासोबत चालू लागली.
रंग्याला स्वतःच्या मेहनतीचं खूप कौतुक वाटत होतं. गेल्या दोन दिवसात त्याला २०-२२ रुपये मिळाले होते आणि आजचे ७-८ रुपये सहज मिळतील, ह्या विचारात तो चहाच्या टपरीवर गेला. नितासाठी गरम दुध आणि खारी घेतली. तिला बाकड्यावर बसवलं. स्वतः दोन-तीन ग्लास घटाघटा पाणी प्यायला, आणि एक कटिंग मागवली. खूप दमला होता तो, चेहरा काळवंडला होता. निता एकदम निर्धास्त बसली होती. ती रंग्याच्या अवताराकडे बघून हसत होती. रंग्या पण गालातल्या गालात हसला. चहा पिता-पिता तो किती पंतगा जमा झाल्या हे मोजू लागला. निता त्याला एक एक पतंग देई, आणि तो एक-दोन-तीन असे मोजत पतंग बाजूला ठेवत होता. शेवटची पंतग निता देईना. तिला ती लालभडक पतंग खूप आवडली होती आणि तिला ती हवी होती.
रंग्या तिच्या हातून ती पतंग हलकेच ओढू लागला, त्याला भीती वाटत होती की पतंग फाटेल आणि आपली सगळी मेहनत वाया जाईल. निता ती पतंग सोडायला तयार नव्हती. ती स्वतःकडे पतंग ओढू लागली. रंग्या तिला लाडाने समजावू लागला, “निते, अजुन एक खारी खाणार का, मला पतंग दे मी तुला खारी देतो” निताने मानेनेच नकार दिला. तो परत समजावू लागला,”तुला आज मऊ मऊ भात-डाळ जेवायला देईन रात्री” निता कुठल्याच गोष्टीला बधत नव्हती, तो आता वैतागला होता,”निते, मार खाशील आता…सोड तो पतंग” निताने मानेने नकार देत, तो पतंग जोरात तिच्याकडे ओढला आणि पतंग फाटला आणि ती चिमुरडी रडायला लागली.
पण ते बघून रंग्या भडकला, आपली मेहनत अशी वाया गेली हे बघून त्याला राग अनावर झाला आणि त्याने मागेपुढे न बघता, निताला कानाखाली मारली. ती चिमुरडी अजुन भोकाड पसरून रडू लागली. आकाशात उडणारे पतंग बघत, तिला तो फरफटत झोपडीकडे घेऊन निघाला..”रड रड..मला काही नाही फरक पडत..एक तर मी इथे इतकी मेहनत घेतोय आपल्या जेवणासाठी आणि तू नको ते हट्ट करतेस?” तिला झोपडीत शांत बसवलं, तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतंच. रंग्या बांबू आणि पतंगा घेऊन अमितच्या दुकानाकडे निघाला.
त्याची पावले संथगतीने पडत होती, त्याला अपराधी वाटत होतं. उगाच मारलं निताला, पण तिनेसुद्धा तसं नव्हतं करायला पाहिजे. तिला कळायला हवं, की तिचा मोठा भाऊ किती मेहनत घेतोय तिच्यासाठी…आणि ती… आणि तो मेहनत अशी वाया घालवायची? तो अमितच्या दुकानात पोचला. त्याला बांबू आणि पतंगा दिल्या. अमित इतक्या पतंगा बघून खुश झाला होता. त्याने रंग्याला दोन रुपये जास्तीचे दिले. रंग्या त्याचे आभार मानून झोपडीकडे निघाला. तो अडखळत चालत होता. पाय खूप दमले होते, त्याला झोप हवी होती..पण रिकाम्यापोटी झोपसुद्धा येत नसे. तितक्यात तो थबकला, थोडा विचार करून मागे फिरला.
संध्याकाळी तो झोपडीकडे आला, “निते…ए निते…. कुठे आहेस गं. मी तुझ्यासाठी गंमत आणलीय” ती झोपडीत नव्हती, शेजारी एका मुलीबरोबर खेळत होती. तो तिला खेळातून उठवत म्हणाला, चल झोपडीत तुझ्यासाठी एक गंमत आणलीय. ती उठायला तयार नव्हती, त्याच्यावर रागावली होती. तिचे डोळे सुजून लाललाल झाले होते. त्याने तिला उचलून झोपडीत आणले, ती खाली उतरायचा, स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिला घट्ट धरले होते. त्याने तिला झोपडीत आणले आणि तिचे डोळे एकदम चमकले. तिने रंग्याकडे आनंदाने बघितले. रंग्याने तिला खाली उतरवलं. ती चिमुरडी प्लास्टिकचं बॅनर अडकवून बनवलेल्या झोपडीच्या भिंतीकडे कौतुकाने बघत होती. तिचे डोळे चमकले. ती एकदम आनंदाने उड्या मरू लागली…कारण..
कारण…रंग्याने तिच्यासाठी तशीच एक मोठ्ठी लालधम्मक पतंग विकत आणली होती…..!!!

जोगेश्वरीला ट्रेनमध्ये असताना मला ही दोन भावंड रेल्वे ट्रॅकवर दिसली होती. त्यावरून सुचलेलं काहीबाही खरडलंय. कथा हा माझा प्रांत नाही, त्यामुळे हा छोटासा प्रयत्न गोड मानून घ्यावा. काही चुकले असेल, आवडले नसेल तर बिनधास्तपणे सांगा. ही कथा मीमराठी.नेट आयोजित “लेखन स्पर्धा २०१२” मध्ये प्रवेशिका म्हणून समाविष्ट केलेली आहे. ब्लॉग वाचकांसाठी इथे पुनःप्रकाशित करत आहे. स्पर्धेचा निकाल ह्या महिन्याअखेरपर्यंत अपेक्षित आहे. मूळ कथेची लिंक – ए ssss ए… काय पो छे !!!
– फोटो साभार गुगल…
– सुझे !!! 🙂 🙂