शाळा माझी – शाळा बोकीलांची !!!


बालक विहार विद्यालय..कांदिवली, डहाणूकर वाडीत तीन मजल्याची एक जुनाट इमारत, ज्यास डांबरी रस्ता हक्काचे मैदान म्हणून लाभलेली एक साधारण शाळा. निकालाच्या बाबतीत इतर शाळांपेक्षा अव्वल हेच ह्या शाळेचे वेगळेपण, ज्यास मी तरी कधी जास्त हातभार लावू शकलो नाही 😉 साधारण आठवीच्या सहामाही परीक्षेआधी, किंवा पहिल्या चाचणी परीक्षेनंतरचा काळ. आमच्या आलोक वर्गाची ठरलेली आक्सा सहल. आलोक वर्ग म्हणजे, आमचा एक खाजगी शिकवणी वर्ग, ज्यात ८० टक्के विद्यार्थी शाळेतलेच. तर ह्या वर्गाची वार्षिक सहलीसाठी मुलींचा उत्साह काय वर्णावा, काही ठराविक मुलं सोडली, तर बाकी सगळे हटकून ह्या सहलीला जायला तय्यार असत. शाळेतल्या काही शिक्षकांचे आमच्या ह्या वर्गाबद्दल मत काहीसे चांगले नव्हते, असो…

तर मी कुठे होतो.. हां सहल….तर ह्या सहलीला नेहमीप्रमाणे सगळ्या मुलींनी हजेरी लावली होती. तसंही मुला-मुलीचं जास्त बोलणे होतं नसे, आणि मी मुळात माझ्या लाजाळू स्वभावामुळे कुठल्याही मुलीशी स्वतःहून बोलत नसे. त्यामुळे आपण बरे आणि आपला ग्रुप बरे, असे ठरवून मित्रांच्या हट्टापायी मीसुद्धा या सहलीला गेलो. आमचा ग्रुप म्हणजे प्रत्येक वर्गवारीत बसणारं एक एक पात्र होतं, कोणी अभ्यासात हुशार, कोणी खेळण्यात, कोणी हिरोगिरी करण्यात, कोणी चापलुसी करण्यात, तर कोणी कोणाच्याही अध्यात ना मध्यात करणारे म्हणजे अस्मादिक.

सगळा वर्ग जरी सहलीला एकत्र गेलो असलो, तरी काही अंतर्गत गट होतेच. तिथे पोचलो आणि सगळा वर्ग त्या विविध गटांमध्ये विखुरला गेला. आम्ही समुद्र किनाऱ्यावर भिजण्याचा आनंद लुटत असताना, कोण्या एका त्रयस्थ मुलाने आमच्या वर्गातल्या एका मुलीकडे बघून काही कमेंट्स पास केल्या आणि ती मुलगी रडत रडत जवळ उभ्या असलेल्या माझ्या ग्रुपकडे धावत आली. आमच्या ग्रुप लीडरने त्या पोराला सणसणीत बजावली आणि त्याला समज दिली. 🙂

आता त्यानंतर झालं असं की, त्या मुलीचा ग्रुप आणि ह्या मुलाचा ग्रुप (म्हंजे माझाच ग्रुप हो) ह्यांच्यात घनिष्ठ दोस्ती झाली आणि त्या सहलीनंतर दोन्ही गट एकत्र झाले. दोन मोठ्या राजकीय पक्षांनी अनपेक्षितरित्या युती केल्याने, शाळेत भरपूर चर्चा झाली. मुलींच्या ग्रुपमध्ये शाळेतल्या सुंदर कन्यांचा समावेश होता, त्यामुळे चर्चा जास्तच होती हेवेसांनल…ह्या युतीची पहिली सभा, मिटींग (?) एका मैत्रिणीच्याच बिल्डींगच्या गच्चीवर झाली. शेवपुरी-भेळ-आईस्क्रीम असा काहीसा मेन्यू होता (आता मला नक्की हेच का आठवतंय विचारू नका ;))

दोन्ही गटांची मैत्री वाढू लागली, नाती फुलू लागली. शाळा सुटल्यावर सगळे थांबू लागले, वाढदिवस साजरे होऊ लागले. एकमेकांना भेटवस्तू दिल्या गेल्या. मी मुळात अबोल त्यामुळे कोणाशी बोलत नसे, कोणी काही बोललं की नुसतं ठोंब्यासारखं हसायचो. काही काळाने आमच्या ग्रुप लीडरने मला, एक धक्कादायक बातमी दिली की, त्याचं वर्गातल्या एका मुलीवर प्रेम बसलंय. एकदम खरखुरं प्रेम आणि ती मुलगी त्यावेळी माझ्या घराशेजारीच राहत असल्याने मला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होत. माझं घर एक टेहळणी बुरुज बनला. ह्याने हिम्मत दाखवून तिला विचारलेदेखील, आणि तिने साफ नकार दिला. त्याचवेळी बाकी ग्रुपमध्ये अश्या जोड्या फुलू लागल्या, संपूर्ण ग्रुप भेटल्यावर खास त्यांना बोलण्यासाठी, वेगळी प्रायव्हसी वगैरे दिली जात असे. मी आपला निष्ठावान कार्यकर्त्यासारखा प्रत्येक मिटींगला हजर राहून, सगळं निमुटपणे बघत असे.

कधी कोणी एकमेकांना पत्र लिही, कविता करे, आवडीच्या वस्तू खरेदी करून भेट देई किंवा तासंतास फोन लाईनवर ऑनलाईन असे. फोनची बिलं वाढू लागली, पालकांची कटकट सुरु झाली, त्यावेळी सुहासशी बोलत आहे, ही थाप हमखास पटून जाई. ग्रुप लीडरची लाईन फिसकटल्यावर, त्याला वर्गातल्या एका सुंदर तरुणीने स्वतः “विचारले” आणि बस्स… प्रेमाचे मान्सून वारे जोमाने वाहू लागले. आता इथे कोणाची लाईन कोण सांगण्यात मला काही हौस नाही, पण मला हे सगळं बघून हसू येई. वाटे काय होतंय हे या वयात…आपली शाळा कमनशिबी की, काय अश्या गोष्टी आपल्या शाळेत होत आहेत. याचे परिणाम काय होतील, हा विचार सारखा मनात येत असे, पण मी कोणालाही काही बोलत नसे. माझ्या ह्या स्वभावाचा सगळ्या ग्रुपला झालेला फायदा म्हणजे, मी एक स्टोर रूम होऊन बसलो. त्यांच्या भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे, काही पत्रे ही माझ्याकडे सांभाळून “ठेवण्यासाठी” दिली जात, कारण त्यावेळीसुद्धा विकीलिक्सनामक एक गट होता, ज्यांना ह्या अंतर्गत गोष्टी जाणून घेण्यात रस होता. त्यापासून हमखास बचाव म्हणजे मी…. 🙂

सगळं नीट सुरु होतं (त्यांच्यासाठी) पण …पण १० वीच्या चाचणी परीक्षेनंतर पक्षांतर्गत वाद झाले…संशयाचे भूत आले… प्रेमभंग झाले, रडारड झाली, शिव्याशाप झाले… माझ्या मित्राचा प्रेमभंग झाला, म्हणून तिच्या मैत्रिणीलासुद्धा “सोडून” दिले गेले. सगळे होत्याचे नव्हते झाले… आणि सगळे क्षणार्धात संपले. काही जण त्यातून लगेच सावरले आणि काही अजूनही सावरू शकले नाही. काहींसाठी ते काही क्षणाचं आकर्षण वाटलं, त कोणासाठी ती पहिल्या प्रेमाची थेट दिलसे झालेली ओळख वाटली. काही जण मोठे झाले, आणि काही जण अजूनही त्या गोष्टींना धरून नुसते वयाने मोठे झाले. 🙂

आता तुम्ही म्हणाल….हा सगळा प्रपंच कशासाठी सांगितला? ह्याच्याशी तुमचं काय घेणदेणं? बरोब्बर…. ह्याच्याशी तुमचं काहीच घेणदेणं नाही….पण आहे कदाचित आहे सुद्धा.. कदाचित काय नक्कीच आहे ….

साधारण १०-११ महिन्यांपूर्वी अनघाकडून मिलिंद बोकीलांच्या शाळाबद्दल ऐकले. ती म्हणाली, जर तिला शक्य असेल, तर तिच्या सर्व मित्रांना मिलिंद बोकीलांची शाळा भेट म्हणून देईल. तिने नक्की हे पुस्तक काही करून वाच म्हणून सांगितले. काही दिवसांनी शाळाबद्दल विसरून गेलो, मग एक दिवस अचानक शाळावर आधारित चित्रपट येतोय असे कळले. त्याची झलक बघून, थोडं विचित्र वाटलं. म्हटलं हे काय? आणि तो विषय तिथेच सोडून दिला. काही दिवसांनी आमच्या गुर्जींनी मला सांगितले, की ते मालाडला देवकाकांकडे येत आहेत आणि येताना माझ्यासाठी शाळा पुस्तक आणत आहेत, कारण मला ते वाचायचं होतं. मी त्यांच्याकडून पुस्तक घेतलं. शाळा आयती माझ्याकडे चालून आली होती. पहिल्या पानापासून जी शाळा सुरुवात केली, ते शेवट झाल्यावर काहीसा अस्वस्थ होऊन बंद केली. पत्येक पानाबरोबर एकेक गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहू लागल्या. काय करावं समजत नव्हतं. 😦

काही गोष्टी इतक्या तंतोतंत जुळत होत्या, की काय सांगू…. अगदी नावंदेखील जुळत होती. मला वाटायचं जे मी शाळेत अनुभवलं, ते कुठल्याच शाळेत घडलं नसेल..पण… मिलिंद बोकीलांनी ते चुकीचं ठरवलं. पुस्तक वाचल्यावर एक प्रकारची अस्वस्थता मनात दाटून गेली. पुस्तकातली प्रतेय्क पात्र मी अनुभवली आहेत, माझ्या सभोवताली त्याचं अस्तित्व मला जाणवतंय. काही जण माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले, डोळे पाणावले. काय करावं सुचत नव्हतं. शाळेतले जे मित्र-मैत्रिणी “त्या” परिस्थितीतून गेले, त्यांना फोन केला. खूपवेळ गप्पा मारल्या आणि एकदा त्यांना प्रत्यक्ष भेटून शाळा कादंबरी वाचायला दिली, जी अजून मित्रांमध्ये फिरतेय 🙂

“त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.”

पुस्तकाचे परीक्षण लिहायची माझी लायकी नाही, पुस्तकाची चांगली ओळख करून द्यायची झाल्यास, हेरंबच्या ह्या पोस्टची लिंक नक्की देऊ इच्छितो. एकदा वाचून बघा. आधी ठरवलं होतं, की शाळा चित्रपटाविषयी लिहावं, पण मी पुस्तकाबाहेर पडू इच्छित नाही. खरंच नाही… मलाही कळत नव्हते, की प्रत्येक शाळेत गेलेल्या मुलाची/मुलीची ही कथा असू शकेल. शाळेल गेलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक लिहिले असेल…

चित्रपट चांगला आहेच, केतकी आणि अंशुमनने कोवळ्या वयातील प्रेमकथा यशस्वीपणे साकारली आहे…. पण पुस्तकाने जे तरल भावविश्व मनात कोरलंय, त्याला तोड नाही. चित्रपट बघताना इतकाच विचार मनात होता, की शेवटच्या दृश्यात बाकावर शिरोडकर नाही…हे बघून होणारी काळजाची घालमेल कशी थांबवावी… बस्स !! 😦

असंच शाळेबद्दल काही तरी खरडावं म्हणून….

सुझे !!

22 thoughts on “शाळा माझी – शाळा बोकीलांची !!!

  1. >> मला वाटायचं जे मी शाळेत अनुभवलं, ते कुठल्याच शाळेत घडलं नसेल..पण… मिलिंद बोकीलांनी ते चुकीचं ठरवलं.

    अगदी अगदी.

    मस्त झाली आहे रे पोस्ट. तुझं हळवेपण व्यक्त झाले आहे. आत्ता पुण्याला आलो की लवकरात लवकर शाळा पाहणार.

    1. सिद्ध्या,

      धन्स रे भावा…. शाळा नक्की बघण्यासारखा आहे. पण पुस्तक ऑल टाईम बेष्ट 🙂 🙂

  2. Suvarna Navghane

    khupach chan……………..
    nakalatpane anubhavlelya athavani anek goshtina ujala detat janu ha lekh vachlyavr ase vatate
    Manapasun dhanyawad

    1. सुवर्णाजी,

      अनेक अनेक आभार. अनुभव ही सगळ्यांत मोठी गोष्ट, आणि प्रत्येक अनुभव आपल्याला काहीनाकाही शिकवून जातोच. 🙂

  3. प्रत्येकाच्या शाळेत या पुस्तकात दिलेल्या बर्याचश्या गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत ………
    एकदम पटलं…!!

  4. सहीच लिहिलंयस.. खरंच सुंदर !!

    कधी एकदा चित्रपट पाहीन असं झालंय. अर्थात पुस्तकाची सर येणं अशक्य आहे पण तरीही पाटी कोरी ठेवून बघणार आहे.

  5. Gurunath

    “शाळा कधीच संपली होती आता उरले ते फ़क्त दहावी चे भयाण वर्ष”…… हे शेवटच्या पानावरचे वाक्य वाचुन मी अक्षरशः हमसुन हमसुन रडलो होतो महाराजा……… तुझी पोस्ट फ़ारच स्पर्शुन गेली रे!!!!!!!!

    1. गुरु,

      हो नं यार… तो शेवट म्हणजे काळजाला चिरा पाडणारा होता. लेखकाचे यश त्यातंच आले. धन्स रे 🙂

  6. सुहास, खरेच शाळेचे विश्व वेगळेच होते. बेगडी दुनियेचा गंध नसलेले. छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाच्या आणि अप्रुपाच्या होत्या तेव्हां. लेख मस्त झालाय. मन मागे… शाळेत गेले वाचून.

    ’ शाळा ’ पाहायचा आहेच. पुस्तक चारपाच वेळा वाचून झालेय. पुस्तकाला न्याय दिलाय का सिनेमात… अशी धाकधूक आहे मनात तरीही पाहायचा आहेच. 🙂

    1. श्रीताई,

      पुस्तक वाचल्यावर शाळा सिनेमा आवडणे दुरापास्त. पण एक प्रयत्न म्हणून नक्की बघ. 🙂 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.