रिझवान चाचा – भाग पहिला


“उठो चाचा, चाय पिलो.. चाssss चा उठो तो, देखो दिन निकल आया. लगता है बहोत शराब हुयी कल रात”

“आssssहह.. क्यूं परेशान कर रहा हैं भडवे… जा अपना धंदा संभाल ना, मुझे सोने दे”

“चाचा, उठो अभी.. कारीगर लोग भी आएंगे थोडी देर में..”

“तू सुधरेगा नही, रख दे चाय वहां मेज पर.. और जा अपनी चाय की टपरी संभाल”

“ठीक है अब्बा.. येतो मग”

“जग्या, तू एका भाषेत बोल रे, मराठी-हिंदी एकत्र बोलू नकोस. जन्मापासून ह्या मुंबईत राबतोय”

जग्या नुसता हसतो आणि चहाच्या टपरीकडे चालायला लागतो. रिझवान चाचा वैतागून खुर्चीतून अडखळत उठतात. त्यांचा तोल जातो आणि ते परत मटकन खुर्चीत पडतात. स्टीलच्या ग्लासला धक्का लागून, दारूचे छोटे छोटे पाट वाहायला लागतात. साठीच्या आसपास झुकलेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला, डोळ्यावर सोडा बॉटल साईझचा चष्मा आणि डोक्यावर पांढरेशुभ्र केस छोट्या टोपीतून डोकावत होते. शरीर थकलं असलं तरी त्यात काम करायचा दम होता, पण तो फक्त वरवरचा…शरीर आतून दारूने पुरतं पोखरून काढलं होत. ह्या माणसाने आयुष्यभर काबाडकष्ट करून बऱ्यापैकी संपत्ती मिळवली. वाडवडिलांपासून सुरु असलेला लाकडाच्या वखारीचा धंदा त्याने चांगला सांभाळला होता आणि तो असाच सुरु राहावा अशी त्यांची इच्छा होती. बायको १५ वर्षापूर्वी गेली आणि मुलगा इम्रानची सगळी जबाबदारी रिझवान चाचांनी आपल्या खांद्यावर घेतली. पोराचे अति लाड केले आणि तो पार हाताबाहेर जाऊ लागला. त्यांना इम्रानला खूप शिकवायचं होत, पण तो जेमतेम १२ वी झाला आणि त्याने शिक्षण सोडून उनाडक्या करण्यात धन्यता मानली. त्याची खूप काळजी वाटायची चाचांना आणि त्याला खूपवेळा समजवायचा प्रयत्नसुद्धा केले, पण तो काही ऐकायचा नाही. सगळ्या निराशेचे सावट, त्यांच्या त्या मलूल चेहऱ्यावर दिसत होते, आणि ते पडल्यापडल्या बायकोच्या फोटोकडे बघून रडू लागले. जगदीशचा आपलेपण त्यांना खूप भावत असे. जग्या एक गरीब घरचा मुलगा, त्याचा बाप रिझवानच्या लाकडाच्या वखारीत काम करत होता, तो गेल्यावर त्यांच्या कुटुंबाला उत्पन्नाचे साधन मिळावे म्हणून, वखारीच्या कोपऱ्यात त्याला चहा टपरी टाकून दिली होती चाचांनी आणि त्याच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च ही त्यांनी केला होता.. तितक्यात जग्या येतो.

“ओ च sss च्चा… आता काय इंग्लिशमध्ये बोलू? उठा आता, तुमची बायको फोटोतून बाहेर येणार नाही चहा द्यायला…”

“गप रे, ती नाही पण तू आहेस नं… परत का आलास इथे, आत्ताच गेला होतास नं? धंदा नाय काय तुला?”

“धंदा चांगला आहे !! मला माहित होत तुम्ही काय एका हाकेत उठणारे नाही, म्हणून परत आलो आणि हे काय दारू स्वतः सोबत जमिनीलाही पाजता होय?”

“मी उचलतो ते.. तू जा…. (थोडं गंभीर होत) अरे ऐक, इम्रानची काही खबर? तीन दिवस दिसला नाही. अब सिर्फ खुदा ही जाने उसके नसीब मैं क्या लिखा हैं, बहोत फिक्र होती है” 😦

“परवा आला होता, त्यानंतर परत इथे फिरकलाच नाही. आतल्या खोलीत त्याच्या मित्रांबरोबर दारू पित बसला होता. खूप वेळा बघितलं आहे त्यांच्यासोबत फिरताना.”

“या अल्लाह, कैसी औलाद मिली हैं मुझें..”

“होईल सर्व ठीक होईल, तुम्ही चहा घ्या आणि तोंडावर जरा पाणी मारा, बरं वाटेल.”

(जग्या जातो. चाचा फोनकडे धाव घेतात, आणि थरथरत्या हाताने इम्रानचा नंबर फिरवतात. फोन वाजतो आणि बंद होतो. चाचा एक उसासा टाकून चहाचा कप तोंडी लावतात आणि हताशपणे खिडकीतून बाहेर बघतात. अचानक सिगरेटच्या धुराने त्यांना एकदम खोकल्याची उबळ येते, ते मागे वळून बघतात)

इम्रान सोफ्यावर बसून मोबाईलवर काही वाचत असतो, त्याचे अब्बा समोर उभे आहेत याचं त्याला भान नसतं. रिझवान चाचा त्याच्याकडे बघून ओरडतात..

“आईये जनाब, कहां सें तशरिफ ला रहे हो… और वो सिगारेट फेक पेहले, शरम नही आती बाप कें सामने… (त्यांना खोकल्याची उबळ येते)

(इम्रान मोठा कश घेऊन, सिगारेट फेकतो आणि हळूहळू नाकातोंडातून धूर सोडत म्हणतो) “अब्बा, दोस्तों कें साथ था मैं. जल्द हम लोग अपना धंदा शुरू करनेकी सोच रहे हैं..”

“क्यांssss.. और ये अपना धंदा? उसका क्या होगा…? अरे अख्खं आयुष्य वेचलं ह्यासाठी. सगळं तुझ्या हवाली करून अल्लाच्या बुलाव्याची वाट बघणार होतो रे या वयात…”

“अब्बा, तुमच्या जग्याला द्या हे. नाही तरी तुमचा जीव आहे त्याच्यावर माझ्यापेक्षा. मी रिअल इस्टेटचा धंदा सुरु करतोय आणि लवकरचं ऑफिस सुरु करेन जवळपास…. ”

“लेकिन…. लेकिन बेटा..”

“अब्बा, मैने फैसला कर लिया हैं..”

(पोराच्या हट्टापुढे बापाला झुकावे लागले..) “अच्छा, तुझे ऑफिस कें लिये जगह चाहिये नं, अपने घर के पीछे जो जगह हैं वहां पें तू अपना काम शुरू कर” (तेव्हढंच पोर नजरेत राहील)

“पार्टनर को पुछता हुं, मुझे मेरे काम मैं किसीकी दखलंदाजी नही चाहिये…(आवाज चढवत..) आपकी भी नही अब्बा !!

(दीर्घ उसासा सोडत) “तुझे जो करना हैं वो कर, पर मेरे नजरों के सामने रेह्कर..”

(इम्रान निघून जातो..चाचा खिडकीतून लाकडाच्या वखारीकडे बघत उभे राहतात)

=================================================

(जग्या येतो) “चाचा, जेवून घ्या.. जेवण आणलंय. आज संकष्टी, आईने तुमच्यासाठी उकडीचे मोदक पाठवले आहेत… चाचा, कहां हो आप?”

“क्यों शोर मचा रहा हैं बे, यहां हुं मैं…”

“का? आणि तुमची वखार.. त्याचं काय?”

“त्याला तो धंदा कमीपणाचा वाटत असेल, इम्रान अपना खुद का धंदा शुरू कर रहा हैं. घर कें पिछले हिस्से मैं”

“अहो, पण त्याची संगत ठीक नाही आहे… ती सगळी पोरं मवाली आहेत”

“अरे मला का नाही माहित ते, पण तो इथे राहील हेच समाधानाचं नाही का?”

“ह्म्म्म्म.. खरंय !! तुम्ही जेवून घ्या, आज मी संध्याकाळी नसेन इथे, सिद्धिविनायक मंदिरात जाईन”

“अच्छा.. इम्रान कें लिये थोडी अकल मांग लेना… और सुन दो-तीन मोदक और ले आं, बहोत अच्छे बने हैं.. हा हा हा !! ”

“ठीक हैं, चलो.. खुदा हाफिज, और खुदा के लिये दारू मत पिना..”

“हां हां मेरे बाप… जा तू”

=================================================

(इम्रान घाईघाईने घरात शिरतो…)

“अब्बा, मला तुमची सही हवीय ह्या कागदांवर.”

“अरे हो हो..कसले कागद आहेत हे? कोर्टाचे दिसतायत..”

“हो अब्बा, आम्ही तुम्हाला वापरायला दिलेल्या जागेचं भाडं देणार, त्याचं हे अॅग्रीमेंट आहे. आम्हाला सगळं सरळ मार्गांनी करायचे आहे…”

“अरे त्याची काही गरज नाही.. घर तुझंच आहे…”

“नाही अब्बा, माझ्या पार्टनरला ते मंजूर नाही. सगळं कसं कायदेशीर व्हावं अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही सही करा बरं पटकन…”

“ठीक आहे, तुचं घे भाडं आणि तुचं वापर खर्चाला, मला नको देऊस. तुझा पार्टनर तो कोण?”

“अहो, पवार बिल्डर्सच्या मालकाचा मुलगा आहे हो प्रथमेश. मोठी लोकं आहेत. परदेशात पण त्यांचे प्रोजेक्ट्स सुरु आहेत.”

“अच्छा, बोल कुठे सही करायची आहे?”

“हं जिथे फुल्या मारल्या आहेत, तिथे सही करा..”

“इम्रान, पेपर नीट बघितले आहेस नं बाबा?”

“हो अब्बा, तुम्ही सही करा फक्त”

“ठीक आहे, करतो”

(इम्रानचं ऑफिस सुरु झालं, चाचा आपलं पोरगा मार्गी लागला म्हणून खूप खुश असतात. जग्याकडे इम्रानचं कौतुक करताना, त्यांना शब्द सापडत नव्हते आणि जग्या डोळे भरून ते बघत होता. कितीतरी वर्षांनी स्वतःच्या पोरामुळे, ह्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघितला होता त्याने.)

=================================================

क्रमशः

12 thoughts on “रिझवान चाचा – भाग पहिला

  1. aruna

    सुरवात तर मस्त झालीये. पुढचे भाग लवकर येऊ द्या.
    दिवाळीच्या शुभेच्छा.

      1. Aakash

        नाद्या बाद रे!!
        नागपूर मध्ये असतांना वाचली होती, कॉमेंट टाकायची राहिली होती.

  2. Pingback: रिझवान चाचा – भाग अंतिम « मन उधाण वार्‍याचे…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.