इम्रानचं ऑफिस सुरु झालं, चाचा आपलं पोरगा मार्गी लागला म्हणून खूप खुश असतात. जग्याकडे इम्रानचं कौतुक करताना, त्यांना शब्द सापडत नव्हते आणि जग्या डोळे भरून ते बघत होता. कितीतरी वर्षांनी स्वतःच्या पोरामुळे, ह्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघितला होता त्याने…
=================================================
होता होता ५ महिने झाले इम्रानचं ऑफिस सुरु होऊन, पण चाचा उदास होते. त्यांचा धंदा खूप कमी झाला होता, गिऱ्हाईक मिळेनासे झाले होते. त्यांना पैश्याची कमी नव्हती, पण पिढीजात धंदा बुडताना त्यांना बघवत नव्हता. काही झालं तरी ते वखार बंद करायच्या विरुद्ध होते. इम्रान गेली दोन वर्ष त्यांच्या मागे लागला होता, विकून टाका ही जागा बिल्डरला आणि इथे मोठा टॉवर बांधूया, पण नाही चाचांना ते मान्य नव्हते. त्यांना इम्रानचे ते शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते. रात्रीची झोप उडाली होती, दिवाळी एका दिवसांवर येऊन ठेपली होती. चाचा रात्रभर जागेच होते. शेवटी वैतागून ३-३:३०च्या सुमारास ते उठले आणि खोलीत फेऱ्या मारू लागले. सहज त्यांनी बाहेर डोकावलं. इम्रानच्या ऑफिसबाहेर खूप गर्दी दिसली. दोन मोठे टेंपो, चार-पाच गाड्या, २०-२५ माणसं असा लवाजमा होता. त्यांना वाटले आपण जाऊन बघुया काय झालं, पण पोरगा रागावेल म्हणून तिथेच खोलीत बघत उभे राहिले. इम्रान आणि प्रथमेश खूप घाईघाईने बोलत होते आणि त्या लोकांना काही तरी देऊन निघायला सांगत होते. चाचा विचार करत होते, इतक्या सकाळी सकाळी ही लोकं काय करतायत? पण कुठल्यातरी जागेवर काम करणारी मंडळी असतील म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, आणि आरामखुर्चीत शरीराला झोकून दिलं.
कळलंच नाही त्यांना की गाढ झोप कधी लागली ते, सकाळी जग्या त्यांना उठवायला आला.
“चाचा आज धनत्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस. आज आणि उद्या धंदा बंद असेल. आईने पणत्या विकायला आणल्या आहेत. तिच्यासोबत जाईन मी मार्केटला. तेव्हढीच तिला मदत होईल माझी. तुमच्यासाठी हे चार दिवे आणले आहेत. संध्याकाळ झाली, की अंगणात लावा. लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी घरात येईल.”
चाचा – “तुझा खरंच विश्वास आहे यावर? मी विचार करतोय ही वखार कोणाला तरी चालवायला देऊ भाड्याने… ”
“विश्वास आहे आणि तुमचा पण बसेल. तुम्ही कोणाचं वाईट नाही नं केलं, तर देव पण तुमचं काही वाईट करणार नाही. वखारीला मागणी कमी आहे मान्य आहे, पण तुम्ही ती दुसऱ्याच्या हवाली करावी हे मला पटत नाही”
“ह्म्म्म्म, तुझा बाप पण हेच बोलायचा मला.. बिचारा लवकर सुटला. असो, जा तू…”
=================================================
संध्याकाळी सहाच्या सुमारास रिझवान चाचांचा एक कारागीर धावत पळत आला…
“मालिक ओ मालिsssक…. किधर हैं आप… मालिक..”
“क्या हुवा? मैं दिये जला रहा था… जग्या आयेगा तो मुझे दाटेगा… आज दीपावली हैं नं. तू बोल, क्या मुसिबत आयी तुझ पें?”
“मालिक, अल्ला का केहर हो गया.. पुरे शहर मैं धमाके हुये हैं..”
“या अल्लाह.. ये कैसे घडी हैं, आज तो त्योहार का दिन और ऐसी आपदा?”
“मालिक, हजारो जाने गयी और उसमें.. उसमें…”
“उसमें उसमें मैं क्या? ठीक सें बोल…. इम्रान ठीक हैं नं?”
“मालिक, इम्रान की तो कोई खबर नही, पर जगदीश अल्लाह को प्यारा हो गया.. उसने उसकी अम्मी को घर भेज दिया, आपको प्रशाद देने कें लिये.. और मार्केट मैं…:(”
(चाचा एकदम थंडगार पडतात) ” या अल्लाह… उस नन्ही जान का क्या कसूर था, मुझे उठा लिया होता” (रडत रडत छाती बडवायला लागतात..)
“मालिक.. मालिक संभालो अपने आप को… आपको खुदा का वास्ता”
“किस खुदा का वास्ता दे रहे हो, जो मेरे बेटे जैसे जग्या को मुझसे दूर ले गया…नफरत हैं उसासे मुझे, नफरत हैं..”
=================================================
त्यादिवशी रात्री रिझवान चाचांचा डोळ्याला डोळा लागला नाही, इम्रान मित्राकडे थांबतोय म्हणून फोन आला होता बस्स. चाचा एकटेच आपल्या खोलीत आरामखुर्चीत बसून, छताकडे टक लावून बघत होते. त्यांची नजर शून्यात हरवली होती. त्यांना वाटलं एक मस्त ग्लास दारू पिऊन नशेत हरवून जाऊ, पण जग्याला ते आवडतं नसे म्हणून त्यांनी बाटली तशीच ठेवून दिली. काय करावे त्यांना सुचत नव्हते. रोज तो पोरगा सकाळ-संध्याकाळ त्यांच्या घरात हक्काने फिरत असे, काय हवं काय नको ते बघत असे. आज तो आपल्यात नाही, कसं पचवणार हे. त्याच्या आईने कोणाकडे बघावं. तिचं तर कोणीच नाही या जगात. विचार करून करून त्याचं डोकं भणभणायला लागलं. त्यांनी झोपेची गोळी घेतली आणि खुर्चीत पडून राहिले. सकाळी ९ च्या आसपास त्यांना जाग आली. इम्रान कोणाशी तरी फोनवर बोलत होता. चाचांनी इम्रानला आपल्याकडे बोलावले…
“बेटा, तुला माहित आहे का, आपलं जग्या आता ह्या जगात नाही. कालपरवापर्यंत घरभर फिरणारी ती पावलं परत दिसणार नाहीत”
“पता हैं अब्बा, मोहसीन ने बताया. बहोत बुरा हुआ..”
“त्याच्या मर्जीसमोर कोणाचं काही चालत नाही… अच्छा हुआ तुने फोन कर दिया. मुझे बहोत फिक्र हो रही थी, पर तू कहां था इतने देर?”
“अब्बा, मित्राकडे होतो माहीमला, नवीन जागेच काम बघायला गेलो होतो आणि मग हे असं झालं, मित्राकडेच थांबलो रात्री”
“अच्छा…”
“खूप लोकं गेली, अल्लाह उन्हे जन्नत बक्शे, चलो अब्बा बहोत काम पडा हैं”
“अरे आज तो जग्या के घर चल…”
“अब्बा, तुम्हाला जायचं तर जा, मी नाही येणार. एक तर आता कुठे धंद्यात जोम बसतोय आणि तुम्ही…”
“ठीक आहे…ठीक आहे… जा तू”
=================================================
रिझवान चाचा जग्याच्या आईचे सांत्वन करून घरी येत असताना, ५-६ लोकं आपल्या घरात शिरताना दिसतात. ते लगबगीने घरात जातात. इम्रानच्या ऑफिसमधून जोरजोरात हसण्याचा आवाज येत असतो. दोन जाडसर लोकं साहेब लोकं, इम्रानची पाठ थोपटत असतात. रिझवान चाचांना आपल्या मुलाचा गर्व वाटतो, लेकाने नक्कीच मोठं काम केलंय. म्हणून तर ही साहेब मंडळी घरी आली आहेत त्याचं कौतुक करायला. ते त्याचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करतात.
तो साहेब म्हणत असतो,”इम्रान तुने बहोत बेखुबी सें अपना काम किया हैं. अल्लाह ताला तुम्हे बहोत तरक्की दे.”
“क्यों शरमिंदा कर रहे हो साब, सब आपकी वजह से तो हुआ हैं.”
“खुश रहो… मैने सुना तुम्हारा कोई नजदिकी रिश्तेदार गुजर गया इस ब्लास्ट मैं..”
“नही नही..कोई नही.. अब्बा का एक नौकर मर गया इसमें”
“अच्छा… ठीक हैं. जनरल तुम्हारे काम सें बहोत खुश हैं. तुम्हे इनाम मैं ये दस करोड रुपये भेजे हैं.” (एक मोठी बॅग इम्रानकडे सरकवतो, इम्रान हात मिळवतो)
इकडे रिझवान चाचांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, आपल्या पोराने इतक्या लोकांचे जीव घेतले आणि त्याला त्याचे काहीही वाटत नाही. तो बेशरमपणे फिरतोय जगभर. स्वतःची कीव वाटली त्यांना. काय करावं सुचत नव्हते. कोणा एका माणसाचे आयुष्य संपवण्याचा अधिकार देवाने आपल्याला कधी दिला? धर्माच्या नावाखाली लोकं राजकारण करून मोकळे होतात, पण त्याचे परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागतात. काय करायचं अश्या धर्माचं? आपल्या खोलीत डोक्याला हात लावून बसले होते. डोकं बधीर झालं होत, आपल्या संस्कारात काय कमी पडलं आणि अशी औलाद निपजली आपल्या पोटी असा अल्लाहला वास्ता देत होते. राहून राहून त्यांना जग्याच्या प्रेताजवळ धायमोकलून रडणारी ती आई दिसतं होती. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा थांबायचं नावं घेत नव्हत्या. मध्यरात्री उशिरा गपचूप ते जग्याच्या घराजवळ गेले आणि तिथे एका बॅगेत आपली आजवरची मिळकत ठेवली. माहित होत त्यांना ह्याने जग्या परत येणार नाही, पण… पण त्या मातेला कोणासमोर हात पसरायला लागू नये म्हणून त्यांनी …. तिथे ओसरीवर शांत बसले थोडावेळ, तिथून जग्याची चहाची टपरी दिसत होती. एकदम गिऱ्हाइकांची गर्दी सांभाळणारा जग्या डोळ्यासमोर आला. त्यांनी डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि घराकडे चालू लागले. इम्रानच्या ऑफिसमध्ये जोरजोरात गाणी सुरु असल्याचा आवाज आला.
चाचा आत डोकावून बघतात, इम्रान नशेत एकदम टून् झालेला असतो. बोलता येत नव्हती, पण गाणी बोलायचा प्रयत्न करत होता. त्याचं असं हे रूप बघून चाचांना राहावलं नाही, त्यांच्या डोळ्यात रागाने रक्त साकळलं होतं. क्षणात त्यांनी बाजूला पडलेली लोखंडाची शीग उचलली आणि त्याच्या डोक्यात मारली.
“मर साल्या मर… तुला ह्या दिवसासाठी नव्हता मोठ्ठा केला… तुझी अम्मी वर रडत असेल. का केलंस तू असं? काय मिळालं तुला हकनाक लोकांना मारून?”
(इम्रान वेदनेने कळवळत होता) “अब्बा, मुझे अस्पताल ले चलो. आप की कुछ गलतफैमी हुयी है. हमें बहोत पैसा मिलेगा. हम अमीर होंगे.. मैं आप को सब बताता हुं.. मुझे ले चलो.. अ ssss ब्बा”
“या अल्लाह, क्या करुं इस पापी का. अब भी इसे अपने गलती का एहसास नही हो रहा”
असं बोलून त्यांनी जोरदार घाव घातला आणि इम्रानचा देह शांत झाला. ते लहान मुलासारखे रडत बाहेर आले. आपल्या वखारीवर नजर फिरवली, आजवर बापदाद्यांनी केलेली मेहनत त्यांच्या समोर होती.. त्यांनी किचनमधून एक कॅनभरून रॉकेल आणलं आणि वखारीच्या लाकडाच्या ढिगांवर रितं केलं. काडीपेटी पेटवून, त्या ढिगावर फेकली. संपूर्ण वखार सुं सुं सुं करत पेटली, त्या आगीच्या प्रकाशात चाचांचा चेहरा शांत भासत होता. ते शांतपणे आपल्या खोलीत गेले, आणि स्वतःला गळफास लावून आपले जीवन संपवले…
एका आईच्या मुलाच्या हत्तेचं त्यांनी प्रायश्चित्त घेतलं होतं…एका आईच्या मुलाच्या हत्तेचं त्यांनी प्रायश्चित्त घेतलं होतं !! 😦 😦
=================================================
– समाप्त –
पूर्वप्रकाशित – मोगरा फुलला दिवाळी अंक २०११
– सुझे !!!