किल्ले पेठ (कोथळीगड)


छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना सह्याद्रीतील गिरीदुर्गांचे महत्व जाणले होते. त्यामुळे त्यांनी असंख्य गिरीदुर्ग लष्करीदृष्ट्या भक्कम केले होते. हे करताना त्यांनी फक्त आपले लक्ष्य बलाढ्य गिरीदुर्गांवर केंद्रित न करता, छोट्या छोट्या गिरीदुर्गांवरही केंद्रित केले. शिवकालात मोक्याच्या ठिकाणी असलेले गिरीदुर्ग, टेहाळणीसाठी उपयोगात आणले जात असे.

कोथळीगड हा देखील असाच टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला. मागे ब्लॉगवर लिहिलेले कामण आणि असावा हे देखील, त्याच प्रकारात मोडणारे किल्ले. पेठला मी २००८ मध्ये प्रसन्न आणि अनिशबरोबर जाऊन आलो होतो, रविवारी खास विक्रांतसाठी पुन्हा पेठवारीला तयार झालो. कर्जतपासून २१-२२ किलोमीटर अंतरावर, आंबिवली नावाचे छोटे गाव आहे. एसटी थांब्याजवळ असलेल्या हॉटेलच्या बाजूने एक पक्का रस्ता पुढे जातो. त्या रस्त्यावरून २-३ मिनिटे चालल्यावर, डाव्या हाताला एक चढणीचा कच्चा रस्ता लागतो. हीच वाट धरून पुढे जायचं. आंबिवली गावापासून पेठ गावापर्यंत असलेलं अंतर अंदाजे ३ किलोमीटर. एक वाईट गोष्ट म्हणजे पुढील काही वर्षात, लोखंडवाला बिल्डर्सचं एक प्रोजेक्ट ह्याच कच्च्या रस्त्याच्या सुरुवातीला बनतंय. बुकिंग सुरु असल्याचा बोर्ड लावला आहे तिथे. 😦  त्या वळवळणाच्या कच्च्या रस्त्याने पुढे गेलो, तर एक तासाभरात आपण पेठ गावाच्या पठारावर पोचतो. पेठवाडीजवळ हा किल्ला असल्याने, ह्याला पेठचा किल्ला असेही म्हणतात… 🙂

हाच तो कच्चा रस्ता...

एकदा पठारावर पोचल्यास तुम्हाला पेठ किल्ला स्पष्ट दिसू लागेल.  दुरून बघितल्यावर एका पाणबुडीच्या आकाराचा हा किल्ला दिसतो आणि पठाराच्या उजव्या बाजूला मस्त दरी आणि शुभ्र कोसळणारे धबधबे दिसतात. एकदम प्रसन्न वाटतं इथे. मस्त जोरदार हवा सुरु असते, आणि समोर मस्त हिरव्या गवताचा गालीचा आपले भान हरखून टाकतो.

समोर आहे तो पेठचा किल्ला..

पेठ गावात पोचल्यावर मस्त गरमागरम चहा मारला. हॉटेल मालकाकडून गडावर जायच्या वाटेची माहिती घेतली. मी मागे जेव्हा आलो होतो, तेव्हा गाव अगदी साधसुधं होत, पण आज गावात मस्त पक्की घरे आहेत.  गावाच्या बाहेरूनच, शेतीच्या बंधाऱ्यावरून गडावर जायला वाट आहे, पण मी जो रस्ता माहित आहे त्याच रस्त्याने जायचे ठरवले. हा ग्रुप पूर्णपणे नवीन होता माझ्यासाठी, मी फक्त विक्रांतला ओळखत होतो. बाकी धुंडीराज आणि ज्यो नेहमीचीच मंडळी. सगळ्यांची मस्त ओळख झाली होती आणि आम्ही धम्माल करत होतो. काही जणांचा हा पहिलाच ट्रेक होता, त्यामुळे त्यांना सांभाळून आम्ही पुढे जात होतो.

Team Trek Along

गावापासून गडाची वाट एकदम सोप्पी आहे. ३५-४५ मिनिटात आपण एका भग्न प्रवेशद्वारातून गडावर पोचतो. तिथून उजवीकडील पायऱ्यांच्या वाटेने आपण एका प्रशस्त गुहेजवळ येऊन पोचतो. ही गुहा पूर्णपणे कातळात खोदून काढली असून, गुहेच्या तोंडाशी भैरोबाचं देऊळ आहे. गुहेतील खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले असून, गुहेत जनाईची मूर्ती आहे. तिथे कोल्हापूरच्या दुर्गमित्र संस्थेने माहितीसाठी एक फ्लेक्स बॅनर लावला आहे. गुहा एकदम अस्वच्छ आहे, प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल्सचा ठिग. त्यातल्यात्यात भिंती स्वच्छ केल्या आहेत. मागे आलो तेव्हा सगळ्या प्रेमी युगुलांची नावे लिहिलेली होती भिंतीवर, हरामखोर साले प्रेम करायला गडावर येतात आणि त्याच्या नोंदी भिंतीवर करतात. x-(

गुहा आणि नक्षीदार खांब (२००८ साली काढलेला फोटु)

गडाच्या कातळाच्या पोटातून नागमोडी ७५ पायऱ्या खोदलेल्या आहेत,  ज्या आपल्याला गडमाथ्यावर घेऊन जातात. वर एक छोटेखानी दगडी प्रवेशद्वार आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला हत्तीचे आणि सिंहाचे दगडात कोरलेले शिल्प आहे. गडमाथ्यावर एक पाण्याचे टाकं आणि एका पडीक मंदिराचे अवशेष आहेत. तिथून परत खाली उतरून गुहेत आल्यास, डाव्या बाजूला पुढे गेल्यास एक विस्तृत पठार आहे. तिथे एक तोफ चांगल्या अवस्थेत आहे. संपूर्ण गडाला फेरी मारता येते, पण ह्यावेळी पावसामुळे प्रचंड काटेरी झुडपं वाढली आहेत त्यामुळे तो बेत रद्द केला. तरी ज्योसाठी अर्ध्यापर्यंत एक फेरी मारून आलो. तिथे दोन पाण्याची टाकी आहेत, ज्यातलं पाणी पिण्याच्या लायकीच नाही. तिथून थोडं पुढे गेलं की एकदम छोटीशी पायवाट आहे, ज्याच्या एका बाजूला दरी आणि एका बाजूला सरळ उभं कातळ (गेल्यावेळी काढलेला फोटो). गडमाथ्यावरून आजूबाजूचा प्रदेश, भीमाशंकरची डोंगररांग आणि पदरगड दिसतो.

गडमाथ्यावरून...अरेच्चा मी खालीच राहिलो 😉

मराठ्यांच्या काळात ह्या किल्ल्याचा वापर शस्त्रांचा साठा करायला करत असे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीमध्ये, ह्या गडाचे किल्लेदार होते माणकोजी पांढरे. एकदा गफलतीने मोघल सरदाराला आणि त्याच्या सैन्याला मराठ्यांचे सैन्य समजून प्रवेश दिला आणि हा किल्ला मराठ्यांनी गमावला. औरंगजेबाने त्या मुघल सरदाराचा सत्कार करून, त्याला गडाच्या दरवाज्याची सोन्याची किल्ली भेट म्हणून दिली.  तेव्हापासून ह्या किल्ल्याचे नामकरण “मिफ्ताहुलफतह” म्हणजेच “विजयाची किल्ली” झाले.

कातळात खोदलेल्या पायऱ्या...

थोडावेळ भटकून, आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पाऊस अधूनमधून सुरु होताच. नेहमीप्रमाणे घरी परतायचा कंटाळा आला होता, पण पोटात कावळे ओरडायला लागले होते. आम्ही आंबिवली गावात जेवणाची व्यवस्था सकाळीच केली होती, आम्हाला फक्त तिथे जायचा कंटाळा आला होता 🙂 विक्रांत आणि माझ्या गप्पा सुरु होत्या. ह्या पठ्ठ्याला सगळ्या झाडांची आणि फुलांची माहिती होती. मी फक्त ऐकायचं काम करत होतो.  परत आम्ही पठाराच्या टोकाला आलो, इथे मात्र मी दरीत डोकावणाऱ्या दगडावर उतरायचा मोह टाळू शकलो नाही. 🙂

आत्महत्या नाही, आत्मा शांत करतोय 🙂 🙂
Glory Lily (Gloriosa Superba) (मराठीत - कळलावी)

शेवटी आंबिवली गावात उतरलो, मस्त गरमागरम पिठलं, मटकीची उसळ, पोळी, भात, डाळ, पापड आणि लोणचं असा फडशा पाडला. जेवल्यावर एकदम सुस्तावलो होतो, घरी जायचा कंटाळा आला होता (तसा कंटाळा प्रत्येक ट्रेकला गेल्यावर, घरी परतताना येतोच म्हणा 😀 ). परतीच्या प्रवासासाठी आम्ही टमटम आधीच सांगून ठेवली होती, त्यातून आम्ही निघालो. स्टेशनला जायचा रस्ता प्रचंड वाईट आहे, कर्जतला आम्ही पोचायला आणि गाडी सुटायला एकंच गाठ पडली. मग ४० मिनिटे वाट बघून पुढल्या ट्रेनने घरी परतलो.

एका मस्त किल्ल्याला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला, आणि या प्रवासात अनेक नवीन मित्र देखील मिळाले. Cheers !!

– ही पोस्ट खास विक्रांत आणि ट्रेक अलॉंग ग्रुपसाठी. सगळे फोटो विक्रांत पुराणिककडून साभार. गेल्यावेळी काढलेले फोटो इथे बघता येतील.  🙂

– सुझे !! 🙂

15 thoughts on “किल्ले पेठ (कोथळीगड)

 1. मजा आली ट्रेकला …..बरेच दिवस (२ महिने साधारण 😉 ) झाले होते ट्रेकला गेलो नव्हतो.. …योग जुळून आला यावेळी ..काही नवीन चेहेरे आणि नवीन Location…..:)

  1. देवा,

   पुढल्यावेळी नक्की येणे 🙂

   आत्मा कधी कधीच शांत होतो रे, करना पडता है ये सब 🙂 🙂

 2. सही.. मस्त फोटू.. आत्मा शांत झाला की नाही अखेर? 😉

  पेठला खुपदा गेलोय. तिकडचा पाउस वाईट असतो फार फार. तुला माहितीच असेल. पण धम्माल येते ट्रेकला. सोपा आहे त्यामुळे गडावर बराच वेळ मिळतो..

  1. हेरंब,

   हो रे हो आत्मा शांत झालाय 😉

   हो किल्ला सोप्पा असल्याने फिरायला मज्जा येते आणि हो तिथला पाऊस भयंकर असतो. रायगडावर पडतो तसाच 🙂

 3. पेठला मी टळटळीत उन्हात गेलेय…ऑक्टोबर हीटमध्ये त्यामुळे काय हाल झाले ते विचारु नकोस…तिथे वर खवा मिळतो नं रे?? (की मी दुसर्‍या कुठल्या गडाशी गल्लत करतेय??) असो…
  तुझे फ़ोटो पाहुन पावसात जायला हवं असं वाटतं….मस्त पोस्ट…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.