किल्ले आसावा…


महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाची ताठ मानेने साक्ष देणारे गडकोट किल्ल्यांची सफर, श्रावणातला पहिला विकांत, मस्त धो-धो पाऊस आणि दुर्गप्रेमी मित्रांची सोबत, अजुन काय हवं?

नाणेघाटानंतर आम्ही किल्ले अशेरीला जाण्याचा बेत केला होता. रविवार ३१ जुलैला सगळ्यांनी, सकाळी ८ वाजता बोईसर स्टेशनला भेटायचे ठरले. पावसाचा जोर शुक्रवारपासून होता मुंबईत. रविवारी पहाटे उठायचा प्रचंड कंटाळा आला होता. बाहेर जोरदार पाऊस सुरु होता. घरातून बाहेर पडलो आणि तिथेच भिजलो. मनात विचार आला की, कल्टी मारावी आज…पण (एक बार जो कमिटमेंट करदी… असं काही नाही, सगळ्यांच्या शिव्या खाव्या लागल्या असत्या) म्हणून निघालो 😀

दिपक आणि ज्योती पहाटे ४:१५ च्या सुमारास घरातून बाहेर पडले, पनवेल ते दादर असा प्रवास करत ५:३० ला दादरला पोचले. त्यांनी तिथून ६:०० ची गुजरात मेल पकडली. वास्तवात आम्ही सगळे वसई-बोईसर मेमूने जाणार होतो, पण त्यांना ती पकडता आली नसती म्हणून त्यांनी एक्सप्रेस ने यायचं ठरवलं आणि ज्यामुळे ते सगळ्यांच्या आधीच, म्हणजे ७ ला बोईसरला पोचणार होते. आनंदचा फोन आला होता, की मेमू ३०-३५ मिनिटे उशिरा येणार आहे. मग मी मेमूचा प्लान रद्द करून, बोरिवलीला ६:३० वाजता गुजरात एक्सप्रेस पकडली आणि जनरल डब्यात न चढता, रिझर्वेशन असलेल्या डब्यातून आम्हा तिघांचा प्रवास सुरु झाला. 🙂

बसायला मस्त जागा मिळाली होती, एक डोळा टीसीच्या येण्याकडे आणि एक डोळा बाहेर पडणाऱ्या पावसाकडे होता. बाहेर सगळीकडे पाणीचपाणी दिसतं होतं. पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. परत एकदा आळशी मनाला जाग आली आणि ट्रेक रद्द करून, जेवून परत फिरायचं काय असा विचार मनात येऊ लागला. वाटत होत, कोणी एक जण जरी नाही आला, तरी मागे फिरायचं 😉 पण सगळ्यांनी हाच विचार केला वाटत, कारण सगळे थोडेफार उशिरा का होईना हजर झाले 🙂 देवेंद्रच्या NPCIL मधला ट्रेकिंग ग्रुप, आका आणि आकाचे दोन मित्र असे सगळे जमलो. आम्ही बाकी सगळी मंडळी यायच्या आधी मस्त नाश्ता* केला होता. सगळे जमल्यावर त्यांनी नाश्ता केला आणि आम्ही बोईसर एसटी डेपोमध्ये गेलो. डेपो पाण्यातचं होता, सगळीकडे पाणी तुंबले होते. मनाला परत धाकधूक वाटली, कारण पावसाचा जोर थांबायचा नाव घेत नव्हता आणि इतक्या पावसात किल्ले अशेरी करणे थोडे धोक्याचे आहे आणि आपण तिथे गेलोच तर परत यायला खुप उशीर होईल, असे श्यामकाकांनी सांगितले.

मग परत विचारचक्र फिरू लागली. दिपक देवेंद्रला म्हणाला ट्रेक रद्द करून, बोईसरची प्रसिद्ध बिर्याणी खाऊन घरी निघू 😉 सगळ्यांनी त्याला लगेच अनुमोदनही दिले. अजुन एक पर्याय होता की, चिंचणी बीचला भेट देऊन यावी. इतक्यात श्यामकाका म्हणाले, इथे जवळचा एखादा सोप्पा किल्ला करू आणि लगेच येऊ परत. त्यांनी आसावा किल्ला सुचवला. ह्या किल्ल्याचे नाव मी पहिल्यांदाच ऐकत होतो. खुप कंटाळा आला होता, पण किल्ला बघायला आलो आहोत, तर हा किल्ला तरी बघूनचं घरी जायचं असं ठरवून आम्ही निघालो. पाऊस कोसळत होताच, अक्षरशः ढगफुटी झाली होती. (तिथे खरंच ढगफुटी झाली होती, ते आम्हाला घरी आल्यावर कळले – बातमी)

बोईसर पूर्वेला, टाटा आणि ऑसवाल बिल्डर्सचे हाउसिंग प्रोजेक्ट ओलांडून पुढे काही किलोमीटरवर वरांगडे हे गाव आहे. एसटीने उतरल्यावर, उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता आहे. जिथे डाव्या बाजूला विराज इंडस्ट्रीचं एक प्रोजेक्टसुद्धा आहे. ठाण्याहून येताना, गुजरात हायवे ने तारापूर फाटा घेऊन, ७०-७५ किलोमीटर आत यायचे. तिथे वरांगडे गाव आहे. ह्या रस्त्यावर “प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा” बोर्ड आहे, त्यामुळे हा कच्चा रस्ता, साक्षात प्रधानमंत्री आल्याशिवाय पुर्ण होणार नाही याची खात्री पटली.

किल्ले आसावा…

१० मिनिटे चालल्यावर उजवीकडे एका पक्क्या घराच्या समोरून, थोड्या अंतरावरून पाण्याचा प्रवाह ओलांडून गडावर जायची सरळ वाट आहे. पण त्यावेळी पाण्याचा प्रवाह खुपचं जोरदार होता आणि कमरेइतकं पाणी त्यावेळी तिथे होतं. त्यामुळे आम्ही ती वाट सोडून, थोडं पुढून जाण्याचा निर्णय घेतला. ही वाट म्हणजे, आमची वाट लावणारी वाट होती. आम्हाला गुडघाभर चिखलातून वाट काढून जावं लागणार होत. जिथे वाटायचं की चिखल असेल, तिथे दगड असायचा आणि जिथे दगड म्हणून पाय ठेवावा, तर गुडघाभर चिखलात तुम्ही हसत हसत उभे असता. 🙂

किल्ल्याची वाट सोप्पी आहे, दोन तास रेंगाळत, कंटाळा करत शेवटी गडावर पोचलो. ह्या गडाचा उल्लेख इतिहासात इतका नाही, पण हा टेहळणीसाठी वापरात असावा. गडावर पोचताच, दोन पाण्याची स्वच्छ टाकी आहेत. श्यामकाकांच्या मते, त्यांना नैसर्गिक झरे देखील आहेत आणि तिथे बारमाही पाणी उपलब्ध असते. तिथून थोडे पुढे, एक पाण्याचे मोठे जलाशय आहे, ज्यात खालपर्यंत उतरायला दगडी पायऱ्या कोरलेल्या आहेत. इथलं पाणी, अजिबात पिण्यायोग्य नाही. गडावर अजुन एक ग्रुप त्यावेळी होता. त्यांचा ट्रेक लीडर (कल्पेश म्हात्रे) जेव्हा भेटला, तेव्हा तो म्हणाला ई-वाडवळचा ग्रुप घेऊन आलो आहे. कल्पेश हा वॅकचा सदस्य आहे (Vasai Adventure Club). थोड्या गप्पा मारल्यानंतर, आका आणि बाकी मंडळी खाली असलेली गुहा बघायला निघाले. मी, श्यामकाका आणि दीपक यांनी पाण्याच्या टाक्याजवळचं थांबायचा निर्णय घेतला. आम्ही मस्त गप्पा मारत, ट्रेक रुटची देवाणघेवाण करत बसलो होतो. श्यामकाका, त्याचे ट्रेकचे अनुभव सांगण्यात एकदम मग्न झाले होते.

सुरुवात…
चिखलदरा ओलांडून जमिनीवर पोचलो… 😉
पाण्याचे टाके..
जलाशय..
मी, दीपक आणि श्यामकाका 🙂 🙂

ही मंडळी पुढे गुहेकडे गेली आणि मस्त जेवण उरकून निवांत बसली होती. आम्ही वर ह्यांची वाट बघतोय, पण दीड तास झाला ही मंडळी वर आली नाहीच. शेवटी त्यांना फोन केला, तेव्हा ते म्हणाले, की ते सगळे त्याचं वाटेने खाली उतरायचा बेत करत होते. इथे आम्हा तिघांची पंचाईत झाली. कारण, आम्ही तिघेजण वरती वाट बघतोय हे ह्यांना माहित असायला हवं होत. जर त्यांनी आधीच सांगितलं असतं हा प्लान, तर आम्हीपण तेंव्हाच खाली उतरलो असतो. मग आम्ही तिघे घाई घाईत खाली जायला निघालो आणि रस्ता चुकलो 🙂 🙂 (हा माझा सगळ्यात आवडता भाग ;-))

गुहेत असलेलं पाण्याचं छोटं तळं..

खूप वेळ आरडाओरडा करून प्रत्युतर मिळाले नाही, वेळ जात होता. २:३० वाजून गेले होते. आम्हाला ५:३० शटल चुकवायची नव्हती. थोडावेळ वाट बघून त्यांना एसएमएस करून, आम्ही आलो त्याचं वाटेने गड उतरतोय असं सांगितलं. त्याचवेळी शेवटच्या हे ssss ओला उत्तर मिळाले, आणि आनंद आम्हाला शोधत वर आला. पाठोपाठ सगळा ग्रुप वर आला. थोडी शाब्दिक चकमक घडली आणि आम्ही उतरायच्या वाटेला लागलो 😉

आम्ही सारे….
आका… ( सगळे फोटो ह्यानेचं काढले आहेत) 🙂

एका तासात खाली पोचलो, मस्त फ्रेश झालो. एव्हाना पावसाचं पाणी उतरलं होत, आम्ही बूट वगैरे धुवून घेतले आणि चहा घेऊन ४:४५ला बोईसर स्टेशनला पोचलो. आनंद आणि त्याचे मित्र ठाण्याला बसने गेले आणि मी, दीपक, ज्यो आणि बाळा आम्ही चौघे डहाणू-विरार शटलने परत आलो. आश्चर्याचा धक्का म्हणजे आम्हाला शटलमध्ये बसायला जागा मिळाली, नाही तर तो प्रवास खूप खडतर असतो गर्दीच्यावेळी. 🙂

असो दिवस संपला, आम्ही एका नवीन गडाला भेट देऊन आलो होतो. खूप छान वाटत होतं. देवेंद्र, ही बिर्याणी उधार तुझ्यावर, पुढच्यावेळी कसलीही हयगय केली जाणार नाही 😉

सर्व फोटो आनंद काळेकडून साभार..!!

*नाश्ता – अळूवडी, मुगडाळ भजी, फाफडा, जिलेबी, डोसा, मेदूवडा आणि चहा फक्त (हे सांगायचं राहिलं होतं 😉 )

– सुझे !!

22 thoughts on “किल्ले आसावा…

 1. सुझे ,बिर्याणीसाठी एक महिना थांबाव लागेल तुम्हाला ….मला सोडून खाणार का रे तुम्ही… 🙂
  बाकी पोस्ट ट्रेकसारखीच छान… 🙂

  1. देवेन,

   एक महिना? न ssssss ही 😉

   आज खाल्ली बघ बिर्याणी तुझी आठवण काढत. धन्स रे भावा !!

 2. फक्कड ट्रेक आणि पोस्टही.. एवढ्या पावसात न कंटाळता ट्रेक केलात हेच खूप रे :))

 3. यावेळी मी मिस केला ..हा ट्रेक ………पण आता नाही ………या महिन्यात रविवारला जोडून सुट्ट्या येतायत …..बाकी, पोस्ट नेहमीप्रमाणेच ………मस्त

  1. धुंडी,

   हो यार, मिसलो तुला. आता भेटू परत लवकरचं. तुझी वाढदिवसाची पार्टी पण बाकी आहे 😉

 4. भ न्न्न्ना ट ….

  चालू दे तुमचे सामाजिक उपक्रम… असे लेख लिहा अन टुकटुक करा बाकीच्यांना…बघा आम्ही काय मज्जा केली 😛

  1. भक्ती,

   सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत. आम्ही कोणालाही टुकटुक करत नाही आहोत, तू पण जॉईन होऊ शकतेस ट्रेकला. प्रतिक्रियेसाठी धन्स !!

   अशीच भेट देत रहा !!

 5. पराग घरत

  झक्कास गड्या….. मस्तच धम्माल केलेली दिसते तुम्ही….!!! :))

  1. परागदा,

   धन्यवाद रे. तुझ्यासोबत भन्नाट ट्रेक करायचे आहेत रे 🙂

   ब्लॉगवर स्वागत, अशीच भेट देत रहा!! 🙂

 6. धमाल केलेली दिसते. आमचा शनीवार रवीवार तर घरीच जातो . कारण इतर दिवस सारखे टुरला जावे लागते.. पण शक्य आहे तो पर्यंत नियमित पणे जायला हरकत नाही.

  1. महेंद्रकाका,

   हो शक्य आहे तितके किल्ले भटकायचे आहेत. मित्रही तसेच मिळाल्याने मस्त सोबत असतेच 🙂

 7. अजून एक ट्रेक.. अजून एक किल्ला… मस्त रे.

  शेवटी नाश्याचा मेन्यू टाकला नसतास तर अजून तोंड भरून कौतुक केलं असतं पोस्टच, पण तुम्ही लोकं नां… सुदरनार नाय… 🙂

  1. सिद्ध्या,

   सुधरणार तर नाही आम्ही, तू येत नाहीस नं इथे, म्हणून तुला ही शिक्षा. लवकर ये परत 🙂 🙂

 8. shilpa badve

  are nice tour yar…
  Actully m new to mumbai..mala hi ghya na tumachya roamer group madhye…malahi prachand hous aahe bhatakantichi..
  Shilpa

  1. शिल्पा,

   सर्वप्रथम ब्लॉगवर तुझं स्वागत…
   पुढल्यावेळी मी नक्की सांगेन ट्रेक असेल तेव्हा. अशीच भेट देत रहा… 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.