गेल्यावर्षी मराठी ब्लॉगर्स मेळाव्याच्या निमित्ताने सेनापतींची (रोहन चौधरी) प्रत्यक्ष भेट झाली होती. त्या भेटी आधीही रोहनचा ब्लॉग वाचत होतोच, त्याने केलेली सह्यभ्रमंती बघून/वाचून, मला सह्याद्रीची जास्त ओढ लागली. मेळाव्यात असंच गप्पा मारताना, त्याने मराठी ब्लॉगर्स ट्रेकची कल्पना मांडली होती. आपल्या मराठी ब्लॉगर्समध्ये बहुसंख्य ब्लॉगर्संना भटकंती आणि विशेषतः शिवाजीमहारांच्या गड-किल्ल्यांची भटकंती आवडत असल्याने ही कल्पना सगळ्यांनी उचलून धरली होती. त्याप्रमाणे रोहनने १७ जुलै रोजी,विसापूर येथे पहिला मराठी ब्लॉगर्स ट्रेक आयोजित केला होता. त्यावेळी सगळ्यांनी उत्साहात नावनोंदणीदेखील केली होती, पण एक-एक करत सगळे गळू लागले आणि शेवटी आम्ही फक्त ६ जण, विसापूर ट्रेकला गेलो आणि भरपूर धम्माल केली. सांगायचा मुद्दा हा, की तो दिवस माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस होता. एक तर खुद्द सेनापतींच्यासोबत किल्ल्याला भेट देण्याचं भाग्य मिळालं आणि दुसरं कारण म्हणजे, खुप खुप चांगले मित्र मिळाले. 🙂
त्या दिवसानंतर आम्ही सर्वांनी एकत्र किती गड-किल्ले सर केले, त्याची गणतीचं नाही. ह्या वर्षीदेखील १७ तारखेला तसाच ट्रेक जमवता येतंय का, ते बघत होतो. अनायासे रविवार आला. दिपकला आधीच सांगितलं होत, ज्या दिवशी आपण सगळे पहिल्यांदा भेटलो होतो, तो दिवस तसाचं साजरा करायचा, जसा एका वर्षापूर्वी केला होता. खुप पर्याय आमच्यासमोर होते, एकमेकांना ईमेल्स सुरु झाले. इथे जाऊया का, तिथे जाऊया का?, असं करत करत शेवटी नाणेघाट नक्की केला. 🙂
मी, दिपक, सागर, भारत, देवेंद्र, आका आणि प्रतिभा वहिनी, असे सात जण नक्की झालो. सेनापती दुसऱ्या दिवशी दुबईला जाणार होते, त्यामुळे त्यांना यायला जमले नाही. त्यात मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु होता. पावसाच्या गोंधळामुळे मला पोचायला तब्बल ४५ मिनिटे उशीर झाला :(, पण गाडी असल्याने काही काळजी नव्हती. मी येईपर्यंत ठाण्याच्या प्रसिद्ध अशोक हॉटेलमध्ये, सगळ्यांनी नाश्ता उरकून घेतला आणि मला पोहे आणि उपमा पार्सल करून घेतले. बरोब्बर ७ वाजता आम्ही ठाण्याहून निघालो. कल्याणच्या रस्त्याने पार कंबरडेच मोडले, गाडीचे आणि आमचेही. मुरबाडहून पुढे, वैशाखिरे गावातून थोडीपुढेचं नाणेघाटाची वाट सुरु होते. रस्त्यावरचं तुम्हाला नाणेघाट –>असा दिशादर्शक दिसेलचं. तिथे आम्ही गाडी पार्क केली. आधीच ३-४ गाड्या तिथे उभ्या होत्या. त्यामुळे खूप सारी मंडळी, ह्या वाटेवर आहेत हे ताडले. साधारण ९:१५ च्या सुमारास आम्ही तिथून निघालो. वातावरण एकदम प्रसन्न होतं. आकाशात ढगांची दाटीवाटी सुरु होती. हिरवागार निसर्ग त्या मंद हवेत, डौलाने डुलत होता. जोरदार पाऊस पडणार, म्हणून आम्ही खुश होतो.

आमच्या ह्या छोटेखानी ग्रुपला लीड करत होती, प्रतिभा आनंद काळे. ओजसच्या बाळंतपणानंतर वहिनींचा हा पहिलाचं ट्रेक. त्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. त्यांनी आम्हाला चालता चालता थोडीफार माहिती दिली. जीवधन करून नाणेघाट करता येतो असे सांगितले. तेवढ्यात उजव्या बाजूला, नानाचा अंगठा धुक्यातूनवर डोके वर काढू लागला. सगळ्यांचे कॅमेरे ते नयनरम्य दृश्य टिपण्यात मग्न झाले. आम्हाला आमचे ध्येय दिसतं होते. वाट सोप्पी होती, पण लांबलचक होती.
सेनापतींच्या ब्लॉगवर याबद्दल वाचले होतेचं. नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पुर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. व्यापारास सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला, तर दुसरे खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे. ह्या घाटाचा वापर करण्यासाठी व्यापारांकडून जकात वसूल केली जायची. त्यासाठी घाटाच्या सुरुवातीला एक मोठ्ठे दगडाचे रांजण ठेवले आहे. त्यात नाणी/पैसे गोळा केले जायचे, म्हणून ह्याला नाणेघाट असं म्हणतात. ह्या जकातीच्या बदल्यात व्यापारांच्या सामानाला, सैन्याद्वारे सुरक्षा पुरवली जायची. त्या सैन्यासाठी घाट मार्गात अनेक लहान-मोठ्या गुहा आणि पाण्याची टाकी खोदलेली आहेत. घाटाच्या वरच्या बाजूला गावातून पक्का रस्ता आहे, जिथून तुम्ही गाडीने नाणेघाटात येऊ शकता.



आम्हाला नाणेघाटात पोचायला पावणे तीन तास लागले. रमत गमत, फोटोसेशन करत आम्ही वर पोचलो. तिथून खाली नजर टाकली आणि दूर कुठे तरी लांब, गावाचं एक छोटं अस्तित्व आणि हिरवीगार निसर्गाची दुलई इतकंच दिसतं होत. आम्हाला जग जिंकल्यासारखा आनंद झाला होता. आम्हाला वाटलं वर चढताना पाऊस पडेल, पण वरुणराजा नाराज दिसतं होता. आम्ही घामाने पुरते भिजलो होतो, पाऊस पडला नाहीचं. नाणेघाटाच्या मुख्य व्यापारी मार्गाने आम्ही वर निघालो, तेव्हा हळू हळू पाऊस सुरु झाला. तिथे ट्रेकर्सची (??) भरपूर गर्दी होती, जत्रा भरली होती असे म्हणा हवंतर. काही उत्साही वयस्कर मंडळीदेखील तिथे होती. आम्ही गणेशाचे दर्शन घेऊन, खादाडी करायला बसलो. ब्रेड-श्रीखंड-जाम आणि मक्याचा चिवडा-लेमन भेळ एकत्र करून, मस्त पोटभर जेवलो. एव्हाना पाऊस जोरात पडायला सुरुवात झाली होती. सगळीकडे दाट धुके दाटले होते. थोडी भटकंती केली, मस्त गरमागरम चहा घेतला. २ वाजले आम्हाला परतीच्या वाटेवर निघायचं होतं, तिथून निघावं असं वाटत नव्हतं…..पण 😦











घाटाचे ते दृश्य डोळ्यात सामावून घेत, गप्पागोष्टी करत आम्ही लगबगीने खाली उतरू लागलो. पावसाचा जोर प्रचंड होता. शुभ्र पाण्याचे लोटच्या लोट डोंगरावरून खाली कोसळत होते. आम्ही २ वाजता खाली उतरायला सुरुवात केली आणि अडीच तासात खाली पायथ्याशी पोचलो. नानाचा अंगठा धुक्यात हरवून गेला होता. तिथे खूप पाऊस पडत होता. बाजूला जीवधन पठारावर असलेला खडा पारसी सुळका आम्हाला खुणवत होता. त्याला लवकरचं येतो भेटीला, असं सांगून मुंबईच्या दिशेने सुसाट निघालो.
संपूर्ण दिवस सार्थकी लागला होता. अजिबात थकवा जाणवत नव्हता. याचवेळी आम्ही ठरवले, की जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी असाचं एक ट्रेक आयोजित करायचा आणि त्यात जमेल तितक्या ब्लॉगर मित्रांना घेऊन जायचं. सेनापतींनी सुरु केलेली ही प्रथा, आम्ही सुरु ठेवायचा नक्की प्रयत्न करू. !!
– सुझे 🙂
मस्त ! फोटो पण सही ! 🙂
अनघा,
धन्स गं… आमच्यासोबत चल एखाद्या ट्रेकला 🙂 🙂
mala sudha yaycha he nane ghatat maz gao sudha junnarcha he pan mala kadhi yogch ala nahi jaycha
मी नाही येऊ शकलो 😦
सागरा,
चालायचंच.. पुढल्यावेळी जमव 🙂
Manatale chaan kharadales aahe.. Manatale kagadavar umtavayala kahich jana na jamate… mala kadhich nahi yet.. Anyways Awesome……. 🙂
वहिनीसाहेब,
आपल्या नेतृत्वाखाली हा नाणेघाट सर केला आणि जे अनुभवले ते लिहून काढले… बस्स !! 🙂 🙂
मस्तच रे सुहास, इतिहासाचा विद्यार्थी म्हणुन एक “ट्रिव्हिया” सांगायचा मोह आवरत नाही , प्राचीन काळी म्हणजे तु बोलला त्यावेळी सातवाहन काळी भारताचा रोम सोबत प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे “सुप्पारक” म्हणजे आपले नालासोपारा व भृगुकच्छ म्हणजे भरोच ही महत्वाची बंदरे होती, “पेरीपेलस ऑफ़ एरिथ्रीयन सी” नावाचे एक पुस्तक एका रोमन खलाश्याने लिहिले होते त्यात ही माहीती व भारतीय मोसमी वा~यांची माहीती कळते, सांगायचा मुद्दा हा की ह्या व्यापारात वापरली जाणारी जहाजे इतकी प्रचंड असत की एका जहाजात एकेवेळी १५-२० युद्धासाठी ट्रेन केलेले हत्ती सुद्धा आपण एक्स्पोर्ट करत असु, नाणे घाटातले जे जकातीचे रांजण आहेत ते एका दिवसात म्हणजे २४ तासांत ६ वेळा रिकामे करावे लागत असते इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात हा व्यापार व अनुषंघाने होणारी जकात वसुली असे.
सॉरी आगाऊपणा करुन बोर केले तुला 😀
गुरु,
खुप महत्त्वाची आणि आश्चर्यकारक माहिती दिलीस. धन्स रे !!
पुढच्या वेळी मला सांगा रे प्लिज जर जाणार असलात तर, शक्य झाले तर येईन मी!!!!
नक्की रे… 🙂 🙂
मस्त झाला ना ट्रेक.. 🙂 मी हुकवला बघ नेमका.. 😦 नाणेघाट म्हणजे खूप आठवणी आहेत… 🙂
सेनापती,
सांगा की मग त्या आठवणी आणि हो लवकर या परत, एखादा मस्त ट्रेक जमवू या 🙂 🙂
सुंदर फोटो आणि वर्णनही.. मला तर कधी एकदा सगळ्यांबरोबर ट्रेकला जातोय असं झालंय !!!
हेरंब,
धन्स रे भावा… तू ये लवकर इथे, मी प्लान करतो ट्रेक 🙂 🙂
mast. tumachya sagalya prakalpaanaa shubhechha
अरुणाजी,
खुप खुप धन्यवाद !!
प्रचंड प्रचंड प्रचंड भारी… मस्त लिहिलं आहेस अन फोटू जबराट आलेत… सह्हीच रे…
आप्पा,
धन्स रे !! : )
>>मी येईपर्यंत ठाण्याच्या प्रसिद्ध अशोक हॉटेलमध्ये, सगळ्यांनी नाश्ता उरकून घेतला आणि मला पोहे आणि उपमा पार्सल करून घेतले
आयला एकदम गुणाची बाळं की रे …
मस्त रे सुहास..तुझ्या जुलैमध्ये ट्रेक करायच्या काल्पेनेला अनुमोदन फकस्त कधी जॉईन करता येईल ते माहित नाहीये…पु ट्रे शु (पुढील ट्रेकसाठी शुभेच्छा…)
अपर्णा,
आहेतच गुणाची बाळं :p
तू ये परत लवकर, आपण करू सगळे ट्रेकला. हवं तर सागरगड करू परत, तुझा आवडता किल्ला 🙂 🙂
आयला, आम्ही अजून किती ट्रेक मिस करायचे रे ? 😦 फोटू कुल, वर्णन कुल, पण आम्ही फक्त वर्णन वाचून समाधान मानतोय हे मात्र नॉट कुल ! 😉
स्वामी,
आता आला आहात पुण्यात, तर एखाद्या ट्रेक मोहिमेत व्हा सामील लवकर 🙂 🙂
मस्तच लिहलय रे … परत अनुभवला ट्रेक …उतरताना काय मजा आली त्या पाण्यातून … ही प्रथा नक्कीच अशी चालू ठेवायची आहे आपल्याला …
देवेंद्र,
यप्प… असे अनुभव परत परत जगायला फार मज्जा येते 🙂 🙂
आपण करत राहू ट्रेक, काळजी नसावी 🙂 🙂
मस्त मज्जा केलात रे. मला महाराष्ट्रात परत कधी यायला मिळणार काय माहीत? तो पर्यंत ट्रेकची तहान फोटो आणि पोस्ट वर…
सिद्ध्या,
लवकरात लवकर घरी येणे, हाच उपाय आहे हे तहान-भुक भागवायचा 🙂
वाट बघतोय !!! 🙂
Pingback: किल्ले असावा… | मन उधाण वार्याचे…
हे सुहास.., मस्त ब्लॉग आहे मित्रा..! एका दिवसात निवांत होतो का ट्रेक? राहण्याची सोय आहे का जवळपास?
Nane ghat funicular railway he kay project hota bare