“जे जे” वांछिल ते ते लाहो !!


नाही इथे मी पसायदानावर लिहत नाही आहे. एक स्वानुभव सांगतोय जो, गेले १०-१२ दिवस मी अनुभवतोय. आपल्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात, जे आपल्या भावनांची मर्यादा बघतात.आपल्याला कितीही राग आला, तरी आपले हात दगडाखाली असतात आणि आपण त्या क्षणी नुसतं बघण्याशिवाय काही काही करू शकत नाही.

३० तारखेला मध्यरात्री वडिलांना छातीत दुखत होतं, म्हणून जवळच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तिथे त्यांना योग्यवेळी सगळे उपचार दिले गेले आणि आयसीयुमध्ये चार दिवस ठेवलं. त्यांची तब्येत एकदम चांगली झाली होती आणि ते फिरतसुद्धा होते. काही तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की, हृदयाची प्रक्रिया योग्य रीतीने सुरु नाही आणि त्यासाठी त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन अॅन्जिओग्राफी करून घ्यावी लागेल. त्या टेस्टनंतर आपल्याला कळेल की, नक्की हृदयाच्या रक्त वाहिनीत कुठे अडथळा आहे काय? त्याचवेळी त्यांनी मला सांगितलं की, त्यांना काही धोका नाही आहे, पण आपल्याला ह्या सगळ्या चाचण्या करून घ्याव्या लागतील पुढील धोका टाळण्यासाठी.

मोठ्या हॉस्पिटलात त्यांना घेऊन जायला ओळख आणि पैसा हे लागणारचं होत. मी त्वरित माझ्या मित्रांना फोन केला आणि सुदैवाने दीपकचे काका जेजे मध्ये असल्याचे कळले. त्यांनी माझ्यासाठी खुप धावपळ केली, मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यांच्यामुळेचं वडिलांना लगेच जेजेमध्ये भरती केलं गेलं. माझ्या जीवातजीव आला आणि मी आयसीयुमध्ये केस पेपर्स घेऊन गेलो. त्यांनी लगेच अॅन्जिओग्राफी करू म्हणून सांगितलं आणि मला काही सर्जिकल गोष्टी आणायला सांगितल्या.

मी आयसीयुतून बाहेर पडतो नं पडतो तोच, एक माणूस माझ्यासमोर आला आणि म्हणाला मी देतो तुमची औषधं आणि माझ्या हातात एक पिशवी दिली. त्याच्या म्हणण्यानुसार त्यात सगळी औषधं आणि सर्जिकल वस्तू होत्या. मी डॉक्टरांकडे गेलो, ते बरोबर आहे की नाही विचारायला. तो इसम माझ्यासोबत आला, डॉक्टर म्हणाले ह्याने दिलंय नं, मग बरोबर आहे सगळं. मी त्या माणसाला धन्यवाद म्हटलं आणि डॉक्टरांशी बोलायला लागलो. त्या माणसाला पुढे काय गोष्टी लागणार, इंजेक्शन्स लागणार माहित असावं. तो ती घेऊनचं फिरत होता. डॉक्टर माझ्याजवळ आले, की तो त्याना विचारायचा आणि लगेच हवी ती औषधं हजर करायचा. डॉक्टर जसे जसे मला काही आणायला सांगायचे, तसे हे दोन-तीन लोक माझ्या भोवती गोळा व्हायचे आणि सांगायचे मी देतो आणून स्वस्तात.

मला एकतर काय करावे सुचेना. वडिलांची अॅन्जिओग्राफी झाली आणि त्यांनी लगेच अॅन्जिओप्लास्टी करावी लागेल असे सांगितलं. पैसे असतील तर आज करू नाही तर, शुक्रवारी. मी त्यांना विचारलं,”शुक्रवारी केली तर चालेल का?” तर ते म्हणाले, “चालेल नं, पण रिस्क आहे, काहीही होऊ शकतं.” नाईलाजाने मी त्यांना लगेच अॅन्जिओप्लास्टी करायला सांगितली, पण ते म्हणाले आधी पैसे जमा करा त्याशिवाय आम्ही काही करू शकणार नाही. आम्हाला काही गोष्टी लागतात अॅन्जिओप्लास्टी आणि त्या खुप महाग असतात. तुम्ही पैसे आणा, तोवर आम्ही ते सामान मागवतो. मी त्यांना सांगितलं मी पैसे आणतो, तुम्ही ऑपरेशन करायला घ्या. तरी ते एक तास थांबून राहिले आणि मग त्यांनी ऑपरेशन करायला घेतलं. 😦

डॉक्टरांना लागणारी सगळी औषधं ती लोकं आणून देत होती आणि मी फक्त त्या लोकांना पैसे देत (वाटत) होतो. नंतर मला कळलं की हॉस्पिटलबाहेर असणाऱ्या औषधाच्या दुकानातली ही एजंट मंडळी आहेत ही. तसेच तिथे मोठ्या मोठ्या औषधांच्या कंपनीचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसुद्धा तिथे होते. कॅथ लॅबमध्ये ऑपरेशनच्यावेळी लागणारी अनेक उपकरणे असतात, जी शरीरात बसवली जातात. जसे पेसमेकर, स्टेंटस्. ती उपकरणे ही लोकं घेऊन उभी असतात.

एकतर परिस्थिती अशी बिकट की, आपण आपल्या माणसाच्या काळजी पोटी हातोहात पैसे खर्च करायला तयार असतो. मागेपुढे बघत नाही त्या क्षणी आणि अशी लोकं, आपल्या ह्या मजबुरीचा फायदा उचलतात. तरी तिथे मोठ्या अक्षरात नोटीस लिहिली होती की, कुठल्याही औषधाच्या विक्रेत्याला आणि मेडिकल कंपनी रिप्रेझेंटेटिव्हला इथे येण्यास सक्त मनाई आहे. पण ते बघतंय कोण? इथे तर पुर्ण फौज होती अश्या लोकांची. 😦

दोन दिवसांनी जेव्हा वडिलांना जनरल वार्डमध्ये शिफ्ट केलं, तर तिथे वेगळाच प्रकार बघायला मिळाला. काही जण हृदयाच्या रक्तवाहिनेत ४-४ ब्लॉक असून देखील तिथे पडून होते, कारण त्यांच्याकडे अॅन्जिओप्लास्टी करायला पैसे नव्हते. काही लोकांकडे थोडेफार पैसे होते, त्यात डॉक्टर म्हणाले हृदयातला एक ब्लॉक काढून देतो आणि बाकी ब्लॉक नंतर काढू अशी उत्तर मिळायची. अतिशय विचित्र वागणं होत डॉक्टर लोकांच. रोज यादी केली जायची, कोणी पैसे आणले आणि कोणी नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांची अॅन्जिओप्लास्टी लगेच करून द्यायचे आणि ज्यांच्याकडे पैसे नाही, ते तिथेच जनरल वार्डमध्ये पडून राहायचे. 😦

एकतर जेजे सरकारी रुग्णालय, त्यामुळे स्वस्त उपचार होतील म्हणून रुग्णांची मोठी रीघ असते इथे. मुंबईतील नावाजलेल्या हॉस्पिटल्सपैकी एक अश्या हॉस्पिटलमध्ये एक सो एक हुशार डॉक्टर्स आहेत. सगळ्या अद्यावत सुविधा आहेत, पण ह्या सुविधा तुमच्याकडे पुर्ण पैसे असल्याशिवाय मिळवता येत नाही. लोकं अश्यावेळी अनेक ट्रस्टकडे धाव घेतात, पण त्या येण्याजाण्यात आणि पैसे मंजूर होण्यात वेळ हा जाणारचं. अश्या एकाही लोकोपयोगी ट्रस्टच ऑफिस हॉस्पिटलच्या परिसरात नाही. सगळे सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा ट्रस्टकडे धावत होते, कारण ह्याच ट्रस्ट त्यातल्यात्यात जवळ होत्या.

खरंतर सरकारने सगळ्या सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून द्यायला हव्यात, पण सरकार ह्या बाबतीतही कमालीचं उदासीन आहे. इथल्या ऑपरेशनचा खर्च, हा इतर कुठल्याही खाजगी हॉस्पिटलच्या खर्चा इतकंच खर्चिक आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल सामान्य लोकांसाठी उरलेलं नाहीचं. मी त्याक्षणी पैसे भरून सगळे इलाज करून घेऊ शकलो वडिलांवर, पण..पण बाकीच्यांच काय?

आता वडिलांची तब्येत चांगली आहे. त्यांना डिस्चार्जदेखील मिळाला आहे, पण तिथे २२ नंबर वार्डमध्ये एका २१ वर्षीय तरुणाला मेंदूमध्ये रक्ताची गाठ आणि हृदयाच्या रक्तनलिकेत ३ ब्लॉक आहेत. त्याची परिस्थिती अतिशय गरीब. त्याचा पुर्ण परिवार, पेशंटला हॉस्पिटलने दिलेल्या जेवणातचं जेवतो. ज्याचा ऑपरेशनचा खर्च ५-६ लाखाहून अधिक आहे… हा मुलगा पैसे भरू शकेल काय आपल्या उपचाराचे? ह्याचीच काळजी मला राहून राहून वाटतेय. 😦 😦

खरंच सरकारने ह्या परिस्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, पण मला माहित आहे ते देणार नाही. सामान्य माणसाची किंमत काय असते सरकारदृष्ट्या, हे वेगळं सांगायला नको. 😦 😦

– सुझे

50 thoughts on ““जे जे” वांछिल ते ते लाहो !!

  1. सुहास ! काय बोलू ?? म्हटलं होतं ना रे सांग काही लागलं तर म्हणून ! मला माहितेय काहीही सुचत नाही अशा वेळेला ! ते पैसे वाटायला लागले तिथे तरी काही तरी करता आलं असतं ना रे ! काय बोलू ?!

    1. अनघा,

      ती परिस्थिती अशी होती, की काही सुचत नाही. जे सुरु आहे ते होऊ द्यायचं त्यांच्या मर्जीनुसार बस्स …. 😦

  2. Suhas first of all take care of you dad…….hya saglya goshticha chadda lavla pahije re….pahuya aplya kadhun kahi karta aal tar….pan Dada hya baddal kahich bolala navhta kadhi….arthat tohi JJ chach student aahe…..arthat tyalahi 6 varshe zali….let see thoda prayant karun kahi hati yetay ka….

    1. अश्विनी,

      हो काळजी घेतोय. आता ते एकदम व्यवस्थित आहेत. 🙂

      आपण कितीही अश्या गोष्टी थांबवायचा प्रयत्न केला तरी, ते लगेच शक्य होणार नाही. सगळेचं जण ह्यात गुंतलेले आहेत. 😦

  3. सगळ्या शासकीय रुग्णालयांमधुन थोड्याफार फरकाने असंच चालत असतं.. हरामखोर आहेत सगळे…!!!

    बाबांची काळजी घे….

    1. सारिका,

      हो हे चालणार हे गृहीत होतचं, पण इतकं सुरु असेल हे वाटलं नव्हतं 😦

  4. सुहास! फार भयानक आहे हे चित्र! 😦 मेडिकल प्रोफेशन म्हणजे माफियासारखी शक्ती होते आहे असंच वाटायला लावणार! काळजी घे!

  5. आका

    मेडिकल, शिक्षण या महत्वाच्या क्षेत्रात तर अश्या हरामखोरांनी धुमकूळ घातला आहे आणि माझ्या माहीतीप्रमाणे महाराष्ट्र शासनसारखं निकृश्ट सरकार नसेल या भारत वर्षात…
    जाल वाटू लागली आहे ईथे रहाण्याची…

    1. आका,

      सरकारी कामात असा धुमाकूळ नसता, तर मला आश्चर्य वाटलं असतं. पण भीती वाटली त्या वातावरणाची, कारण आपल्या माणसाच्या जीवाची काळजी आपल्याला आधी घायची असते…!!

  6. काय फालतुगिरी आहे यार !! भयंकर संताप झालाय.. साले सगळ्याच गोष्टींचा धंदा करून टाकलाय या लोकांनी !! लाल दिवे लावून खिडक्यात बसा म्हणावं !!

    1. हेरंब,

      खरंच..फालतुगिरीचा कळस आहे. मला आजही त्या गोष्टी आठवल्या की, संताप आणि हतबलता दोन्ही येतात. काय करणार, आपले हात दगडाखाली असतात…. 😦

  7. अरे धंदा आहे हा सगळा.. संताप येतो हे पाहिलं की.
    शेवटचं वाक्य , खूप लागलं मनाला. पैसा असेल तरच तुम्हाला जगायचा अधिकार आहे, नाही तर तुम्ही कुत्र्याच्या मौतिने मरायचे हेच तुमचे प्राक्तन!

    1. महेंद्रकाका,

      हो धंदा..हाचं योग्य शब्द आहे… पैश्याशिवाय तुमच्या जगण्याला किंमत मिळत नाही हेच खरं..!!

  8. काय बोलू ?लाज वाटते रे….खरच…आणि कधी काळी मला पण डॉक्टर व्ह्यायचं होतं..:(याचा छडा लावता येईल का??

    1. अपर्णा,

      स्टारमाझाच्या जेजे बद्दल असलेल्या एका पेजवर कमेंटमध्ये ही लिंक दिली होती, पण ती कमेंट प्रकाशीत झाली नाहीच… 😦

  9. काही नाही. बोलून काही उपयोग नाही. शासकीय हॉस्पिटल काय आणि खासगी काय. पैसे नसतील तर तुम्हाला कोणी कुत्रदेखील विचारत नाही. जनसेवा तर दूरच पण जे जनसेवेचा वसा घेणारे असतात त्यांना पण त्यापासून इथे जबरदस्तीने परावृत्त केले जाते.

    मुळात १ ते २ टक्के शासकीय अधिकारी जबाबदारी ओळखून वागतात. बाकी सगळे असेच नालायक विचारसरणीचे..

  10. सुहास …… अशा वेळी इतका संताप संताप होतो……….. सगळ्याच गोष्टींचा बाजार मांडला गेलाय …. समोरचा ज्यावेळी अगतिक असेल त्याचवेळी यांच्या स्वार्थाला अगदी पूर येतो…. संस्कार , माणुसकी नावाचे शब्द यांच्या कधी कानावरून तरी गेले असतील किंवा नाही कुणास ठाऊक…. !

    तुझ्या बाबांना जपशीलच….! त्यांना शुभेच्छा !

    1. समीर,

      त्यावेळी आपल्याला संतापापेक्षा आपल्या माणसाच्या जीवाची काळजी जास्त असते… काय करणार… हतबलता हेच कारण 😦

  11. भयानक आहे हे सगळं…..
    याच विषयाशी संबंधित माझी पोस्ट वाचून पहा , या लिंकवर http://jeevantarang.wordpress.com/2010/07
    पेशंटच्या जिवाची काही किंमत आहे की नाही? हॉस्पिटलचा खर्च परवडत असेल तर उपचार केले जातील नाहीतर मरा….. 😦

    1. प्रज्ञाजी,

      तुमची पोस्ट वाचली…धंदा मांडलाय ह्या लोकांनी आणि ह्यांच्यावर वचक कोणाचाही नाही, त्यामुळे ह्याचं जास्त फावतं 😦 😦

  12. सुहास, बाबांच्या तब्येतीची काळजी घे…घेत असशीलच म्हणूनच हे प्रसंग समोर येतात. जमल्यास त्या हॉस्पिटलच्या नावासकट लिही. हे वाचल्यावर फक्त चीड आणि चीडच येतेय. कशावरून ऍन्जोप्लास्टीची तरी खरी गरज असणार ? पण आपण असा अविश्वास दाखवायला धजावत नाही. तू म्हणतोस ते खरे आहे…दगडाखालचा हात असतो आपला.

    तीन वर्षापूर्वी माझ्या सासूबाईंना देखील असेच ऍडमिट केले होते….अत्यावस्थ असतानाच..डॉक्टरांनी त्यांना तुम्हाला इतर ठिकाणी हलवायचे असल्याचे हलवू शकता असे सांगितले. पण एक तर माणूस अत्यावस्थ..दुसर्‍या इस्पितळात पोचेल की नाही याची खात्री नाही….अरे दुसरं म्हणजे…तुम्ही कशाला आहात मग…..एवढे पैसे आणि डिपॉझिट घेतात….तर उपचार धड करता येत नाहीत ? आम्ही इतर ठिकाणी न जाण्याचा निर्णय घेतला जो योग्य ठरला.

    1. श्रेयाताई,

      काय बोलू अविश्वास नाही दाखवू शकत आपण. त्यांनी दिलेला शब्द, हाच आपल्याला त्यावेळी शेवटचा असतो…. 😦 😦

  13. Prashant Jadhav

    majhya vadilanchya babatit hi 16-17 varsha purvi asecha jhale hote, Gharatil lok hi tyaveli kalajit hote tyacha gairphayada he lok ghetat.

    1. प्रशांतजी,

      हे होणारंच. काय करणार?
      आपण त्याक्षणी अजुन काही करू शकत नाही. काळजी घ्या.

  14. खरोखरच धंदाच आहे हा. 😦 जीवाची किंमत राहिलेलीच नाही. आपल्या डोळ्यांना दिसत असले तरी ती वेळ फार फार वाईट असते आपली…. सगळ्या बाजूने कोंडी होऊन जाते. :(:(

Leave a Reply to देवेंद्र चुरी Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.