ठिणगी…


सध्या देशात एकदम वेगवान घडामोडी घडत आहेत. सरकारविरोधी आणि सरकार असे दोन गट पडून, एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सगळे आपआपली बाजू बळकट करण्यासाठी, वाट्टेल ते मुद्दे उचलून लोकांना आपल्या बाजूने वळवण्याची शक्कल लढवत आहेत. मग तो शेती करमाफी मुद्दा असो, अनेक सवलती असो, की सरकारी गलेलठ्ठ पॅकेजस्, की जातीवाद. आपला स्वार्थ साधण्यासाठी, ही लोकं काहीही करू शकतात. ही लोकं हे करतात ते करतात, पण ह्यात सामान्य लोकं भरडली जातात. ह्यांचे राजकारण होते समाजकारणाच्या नावाखाली आणि देशात अराजकता माजते. आता हे सगळं का बोलतोय, असं झालं तरी काय ह्या विचारात तुम्ही असाल. सांगतो..

परवा रात्री, सचिनच्या लग्नाच्या पार्टीसाठी दादरला सायबिणी गोमंतकला जमलो. मस्त जेवलो, आणि घरी जाताना मी आणि अनु दादर प्लॅटफॉर्म एक वर उभे होतो ट्रेनची वाट बघत. गाड्या उशिराने धावत होत्या. शेवटी एक बांद्रा लोकल आली आणि अनु त्यात बसून निघून गेली. मी बोरिवली ट्रेनची वाट बघत उभा होतो. १० मिनिटांनी ट्रेन आली (९:४४ बोरिवली लोकल) आणि जेमतेम उभं राहता येईल, इतकी जागा मला मिळाली. माझ्या ट्रेनच्या डब्याला लागूनच अपंगांचा छोटा डबा होता. मध्ये फक्त काही लोखंडी बार्स होते.

गाडीने दादर सोडलं आणि त्या डब्यातून शिव्यांचा आवाज ऐकू येवू लागला. एक चाचा त्या डब्यात दरवाज्यात उभे होते, आणि त्यांना एक बंगाली बाबू शिव्या देत होता. काय प्रकरण झालं होत काय माहित, पण दोघांनी एकमेकांच्या आया-बहिणींचा असा उद्धार सुरु केला की, डब्यातील स्त्रीवर्गासमोर उभं राहायला लाज वाटत होती. माझ्या डब्यातील काही जण आणि मी त्यांना ओरडून गप्प राहायला सांगत होतो, पण ते काही ऐकेनाच.

दोन स्टेशन्स गेली, आता बांद्रा येणार होत. त्यांचा शिव्यांचा भडीमार सुरु होताच आणि ते हातघाईवर आले होते. चाचा अपंग होते, त्यांच्या हातात काठी होती आणि त्यांनी त्या काठीने त्या बाबूला दूर ढकलायचा प्रयत्न सुरु केला. मारामारी सुरु झाली, आमच्या डब्यातील एक मराठी तरुण आणि दोन गुजराती गृहस्थ बार्समधून हात घालून, त्यांना दूर ढकलायचा प्रयत्न करत होते आणि दोघांना शांत बसायला सांगत होते, पण ती दोघे ऐकेना. माझ्या एरियामध्ये चल, माझे भाऊ बंधू तुला कापून काढतील अशी त्यांनी भाषा सुरु केली. चाचा म्हणाले उतर बांद्राला तुला बघतो, आणि तो बाबू म्हणाला की मालाडला चल, तुला गायब करतो. एकमेकांना मारत होते ते, आणि इतक्यात स्टेशन आलं आणि चाचांनी एक जोरदार काठी मारली आणि प्लॅटफॉर्म उडी मारली. सामोर बसलेल्या पोलिसांना बोलावलं आणि त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतलं.

त्याचं पुढे काय झालं ते माहित नाही, पण लगेच त्या मराठी तरुणाचा मित्र त्याला म्हणाला, “अरे भो****, काही अक्कल आहे की नाही तुला. कशाला दुसऱ्यांच्या भांडणात पडतोयस्, ही लोकं कोणाचीच नसतात..वगैरे वगैरे..(अजुन जास्त लिहू शकणार नाही इथे)” दुसरा काकुळतीने सांगू लागला, “अरे अस् कसं बोलतोस..काही झालं तरी…” त्याच्या मित्राने त्याला परत मोठ्याने शिवी हासडली आणि म्हणाला, “तुला अक्कल नाही आहे, सोड … स्टेशन आलं उतर आता”

त्याचवेळी ती दोन गुजराती माणसं एकमेकांशी बोलत होती, “गांडा साला, ही अशी लोकं देशात कशी राहतात? गपचूप पैसा कमवायचा, बायका पोरं सांभाळायची बस्स, अजुन काय पाहिजे लाईफमध्ये. अशी मवालीगिरी कोण करत बसेल” असं बोलून कामाच्या गप्पा सुरु केल्या. दरवाज्यात चार मारवाडी लोकांचा ग्रुप बसला होता, ते म्हणाले “अपना आदमी नही था, नही तो बराबर करता था उसको”

ट्रेनमध्ये होणारी ही भांडणे मुंबईकरांसाठी नवीन नाही. ऑफिसला जाताना खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये दरवाज्यात हात देऊन गाडीत घेणारी हिचं लोकं, थोडं भांडण झालं की पार एकमेकांच्या जीवावर उठतात. अक्षरशः प्राण्यासारखे… बर् आपण मध्ये पडलो की भांडण अजुन चिघळत, त्यामुळे मुकाट्याने जे होत ते बघत बसायचं 😦

१५ मिनिटात घडलेला हा प्रसंग. मग ट्रेनमधील प्रत्येक चेहऱ्याकडे बघताना, मला त्यांचा धर्म, जात दिसू लागले. म्हटलं, इथे काही झालं, तर हा माणूस ह्याला नक्की मदत करेल, हा दुसरा तर बदडून काढेल, हा तिसरा तर मी बर् माझं काम बर् म्हणून दुर्लक्ष करेल, चौथा माझ्या जातीवाल्याला मारतो म्हणून पहिल्याला मारेल…..

सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता असं धोरण असलेला आपला भारत देश. अश्या वेळेला कुठे जातो कळत नाही. दहशतवादी भारताबाहेरून लपूनछपून स्फोटके आणतात, पण ह्या देशांतर्गत असलेल्या स्फोटकांचे काय? ह्यांना भडकायला एक छोटी ठिणगी सुद्धा पुरेशी आहे. प्रत्येक धर्माचा एक-एक पक्ष आहेचं, त्या आगीला अजुन हवा द्यायला. त्यांना असे मुद्दे मिळायची, वाटचं बघत असतात.

त्या छोट्या भांडणाने जर उग्र रूप धारण केलं असतं, तर काय झालं असतं, ह्या विचारनेचं माझ्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. 😦 😦

– सुझे !!

टिप – काही गोष्टी नमूद करणे खरंच गरजेचे आहे.

१. कृपया मूळ मुद्दा लक्षात घ्या. कुठल्याही एका जाती-धर्माबद्दल मला काही बोलायचे नाही.
२. मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.
३. वाचकांना हा लेख आक्षेपार्ह वाटत असेल, तर वाटून घ्या 🙂

38 thoughts on “ठिणगी…

  1. Gurunath

    क्लासिक लिहिले आहेस मित्रा!!!!!, भारतीय राज्यघटने नुसार नागरिकांच्या मुलभुत कर्तव्यांमधे “राष्ट्रीय एकोप्यास मदत होईल” ते सर्व करण्याची अपील असते, पण…… लक्षात कोण घेतो!!!!!!, तुझा लेख आवडला अतिशय बॅलन्स्ड वाटला अन तारतम्य बाळगलेला… आवडला खुप आवडला…… 🙂 🙂

  2. सुहास…आपल्या देशात मेंदुने विचार करण्यापेक्षाही ह्र्दयाने विचार करणारे जास्त आहेत.इथ फ़क्त भावनेचं राजकारण चालत. आपल्या देशातुन “जात” काही जात नाही. बघ जेव्हा एखाद्या स्त्रीची अब्रु लुटली जाते तेव्हा सर्वात अगोदर तिची जात पाहिले जाते.तिच स्त्री असण महत्वाच नाही.तु जर महिलेवरच्या अत्याचाराची बातमी बघ कशी असते ***** समाजातील स्त्री वर बलात्कार अशीच असते किंवा एखाद हत्याकांड झाल तर ***** समाजातील हत्याकांड अशीच बातमी असते अन त्यानंतर असते ते फ़क्त स्वार्थाचं राजकारण 😦 😦

    1. योगेश,

      हो नं,
      स्वदेस मधला एक संवाद आठवला बघ., “जो कभी नही जाती, उसे जाती केहते हैं” काय होणार आहे पुढे काय माहित 😦 😦 😦

  3. sachin patil

    माणसातली माणुसकी कमी होत चाललीये रे …. बस दुसर काय नाही.

  4. अगदी खरं लिहीलं आहेस. सध्या गटबाजी आणि हा आपला तो परका ह्या संकल्पनाच पुढे आहेत. गुपचुप पैसा कमवावा, पोराबाळांना वाढवावं, खायला घालावं आणि गप बसावं हीच मानसिकता अधिक आहे…..देशाशी त्याच्या एकात्मतेशी लोकांना सध्या काहीही देणं घेणं नाहीये. अगदी मनातील गोष्टी व्यक्त केल्यास…..तुझ्या भाषेत आणि अनुभवांतून. छान!

    1. अल ताई,

      हे सगळीकडेच होतंय. हे असे प्रसंग रोज घडतात मुंबईत. मुंबईच्या एकोप्याची आपण मिजास मिरवतो जगभर, तिथे ह्या शहरातल्या लोकांमध्ये किती असंतोष आहे हे सामोर आल्यवर खुप भीती वाटते….

  5. अश्या घटना सगळीकडे घडतात रे. त्या लोकांनापण बरोबर माहिती आहे की प्रत्येकाचा लाल, निळा, हिरवा असा कुठला ना कुठला तरी झेंडा आहे त्यामुळे ते राडे करू शकतात. इथे बंगलोरला पण कानडी, तेलगु, मल्लू सगळे आपापल्या ग्रूपने रहातात. तमिळ लोकांबद्दल बोलायलाच नको. पण IT Industry असल्यामुळे शिव्या देणे, भांडणे प्रकार होत नाहीत पण आतून कुठेतरी धुसपुस सुरू असते. आपला देश, राष्ट्रध्वज ह्या सगळ्या व्हर्चुअल गोष्टी आहेत.

    1. सिद्ध्या,

      हो यार, अश्या घटना सगळीकडेच घडतात. पण कधी कधी त्याचं गांभीर्य इतकं प्रकर्षाने जाणवतं नं की, अंगावर काटा उभा राहतो…. 😦

  6. आपण सगळे खर तर भेकड आहोत .. मोठमोठ्या गप्पा मारण जमत आपल्याला (भारतीयांना) – पण प्रसंग येतो समोर तेव्हा काय करायचं ते आपल्याला कळत नाही .. ‘बघ्याची’ भूमिका आपल्याला चांगली जमते सवयीने ..आणि दुस-यांनाही त्याच भूमिकेत राहायला भाग पाडतो आपण!

  7. Snehal

    खरच आता ना डोकं भानभ्नायला लागलाय ह्या सगळ्या मुळे विचार करते मुंबई सोडून कुठे तरी जावे पण तिथे हि हीच परिस्थिती असली तर झाल………….. 😦

    1. स्नेहल,

      प्रश्न फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही आहे. हा प्रश्न हा संपूर्ण देशासामोर आहे !!

  8. आपण भेकड तर भेकड… हवे ते नाव द्या… अश्या भांडणात पडूच नये…

    एखाद्या पुरुष – स्त्री वर नाहीतर मुला- मुलीबरोबर काही गैर होत असेल तर मात्र नक्कीच मध्ये पडणे गरजेचे… परिस्थिती बघूनच पावले उचलावीत…

    बाकी ते एकोपा… सर्वधर्म समभाव वगैरे दूरच राहू दे… 🙂 आपल्या पुरते आपण मानायचे प्रकार आहेत ते आता. राज्यघटना म्हणजे काय रे भाऊ??? 🙂

    1. रोहणा,

      हो रे आणि राज्यघटना म्हणेज, राज्यात त्या त्यावेळी घटणाऱ्या घटना असाव्यात. 😉

      कितीही दुर्लक्ष करावे म्हटले, तरी नाही होत रे 😦

  9. Anuja Save

    काही गोष्टी नमूद करणे खरंच गरजेचे आहे.
    या सगळ्यां मुळे येते ती फ़क्त “अस्वस्थता” .

  10. भारत कधी कधी माझा देश आहे अशी रामदास फुटाणे यांची एक कविता आहे. असे म्हणतात जे न देखे रवी ते देखे कवी या प्रमाणे रामदासजी ने भारतीयांची मानसिकता दर्शवली आहे. मोठेपणा करता अनेकता मे एकता असा नारा दिला जातो. पण तो फक्त देखाव्यां पुरताच . बाकी आपणस राष्ट्र भावना अशी ती नाहीच . प्रत्येक जण जात ,धर्म, प्रांत, राज्य आणि भाषा यात विभागलेला आहे . हे कटू सत्य आपण मान्य करत नाही. आज भारतातील १२५ कोटी लोकसंख्या १२५ कोटी राष्ट्र भावनेत विभागलेली आहे. प्रत्येकाची स्वार्थी भावना वेगळी म्हणूनच मुंबईत नव्हे तर भारतभर असली छोटी-मोठी भांडणे होत असतात. पण तिसरा त्यात पडत नाही. कारण ते दोघे कधी एक होतील आणि यालाच मारतील याचा भरवसा नसतो. तसेच आपली पोलीस यंत्रणा अश्या वेळी चोर सोडून संन्याश्यालाच बळी देण्यात बदनाम झालेली आहे. हे सर्व बदलून एक राष्ट्र भावना निर्माण करायची असेल तर मुळा पासून हे सर्व शैक्षणिक व्यवस्थ्ये पासून बदलणे आवश्यक आहे. मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे । हे खर आहे. गांव वालो गब्बर सिंह से अगर कोई तुम्हें बचा सकता है तो सिर्फ गब्बर असा प्रकार आहे.

    1. ठणठणपालजी,

      मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे ।

      अगदी मनातलं बोललात. सगळीकडेच अराजकता माजत जातेय, आणि कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. 😦

  11. सुहास,
    तुम्ही लोकं मुंबईत रहाता नि ह्या नि फक्त अशा मोठ्या शहरां मध्ये आपण म्हणता त्या प्रकारची समस्या गंभीरतेने लक्षात येते. मुळात मुंबईच्या एकूण ४३७ चौ.कि.मी.क्षेत्रफळा पैकी जेमतेम २०० चौ.कि.मी.क्षेत्रफळ हे निदान कागदावर जरी रहाण्यायोग्य मानले,नि ज्यातील १० टक्के क्षेत्रफळ हे झोपडपट्टीने ग्रासलेले आहे तरी मुंबईच्या सव्वा कोटी लोकसंख्येच्या दृष्टीने ते खूपच व्यस्त आहे..
    मुंबई व अनेक मजली इमारती हे समीकरण फार जुने आहे. सर्वसाधारण निवासी इमारतीला तळमजला धरून पाच मजले असतात , त्यातील सर्व माणसे 50 चौ. मी. ( 538 चौ. फूट) क्षेत्रफळाच्या सदनिकांमध्ये , प्रत्येकी पाच माणसे या हिशेबाने राहतात. पण, मुंबईत 100 चौ. मी. च्या छपराखाली पाच माणसे राहात नाहीत , तर मुंबईच्या वास्तवाप्रमाणे 50 माणसे राहतात.त्या मुळे मुंबईतील एकूण लोकसंख्येच्या दृष्टीने खूपच कमी असलेला वरचा वर्ग वगळता,बाकीचे मुंबईकर हे,मानसिक दृष्ट्या सदैव अशांत नि असंतुलित असणे हे आश्चर्य नाही.त्या मुळे हरवलेली मनःशांती हे ह्या रोगाचे मूळ आहे.हीच परिस्तिथी थोड्या फार फरकाने हळू हळू महाराष्ट्रातील इतर प्रमुख मोठ्या शहरां मध्ये हि होऊ लागली आहे त्या मुळे लेखात वर्णन केलेली माणसांच्या रूपातील भुते जेथे जेथे नि ज्या ज्या मुंबई सारख्या महानगरात बहुसंख्येने आजच्या काळात असतात तेथे तेथे,वरील प्रसंग हा केवळ रोजचाच नव्हे तर अगदी प्रत्येक क्षणाला जरी अनुभवायला येत असेल तरी त्यात आश्चर्य नाही,नि म्हणूनच ज्यांना ज्यांना शक्य आहे असे सुशिक्षित लोकं अशी बकाल शहरे सोडून छोट्या शहरां कडे १९९२ च्या बोंब स्फोटा नंतर पूर्वीच निघावयास सुरुवात झाली आहे.ह्या पुढच्या काळात सुद्धा जरी अगदी कोणतेही सरकार तेथे आले तरी ह्या परिस्तिथी मध्ये यत्किंचित हि फरक होऊ शकणार नाही.त्या मुळे सुशिक्षित मुंबैकरांनी वेळीच काय तो योग्य निर्णय घ्यावा हि गेल्या काही वर्षा पासूनची काळाची गरज बनली आहे.
    बरेचसे,नव्हे बहुसंख्य मुंबईकर ही धडधडीत वास्तवता त्यांच्या मुंबई प्रेमामुळे नाकारतात .त्यांना असे सांगितल्या वर ह्याचा खूप राग येतो.एक पुणेकर म्हणून आम्हाला सुद्धा ह्याची कल्पना आहे कि ह्या वरचा हा तोडगा सर्वमान्य नसणार आहे तसेच तो
    प्रत्येकास शक्य हि नसतो /नसेल पण ह्यातून बोध घेऊन त्यांच्या पुढच्या …त्याच्या पुढच्या पिढ्यांनी जरी तो अमलात आणावयाच्या दृष्टीने आज पासून जरी सुरुवात केली तरी राहिलेले काम येणारा काळ करण्यास समर्थ असेल.
    मुंबईच्या सोई, सुविधा, रहाणीमान,तेथील गतिमान जीवन,कदाचित पैसा नि इतर गोष्टी तेथे नसतील पण,माणसाचे आयुष्य,माणसा प्रमाणे जगण्याची संधी जास्त असेल.

    1. मायनॅक भावा,

      मुंबईचं हे वास्तव सगळ्यांना माहित आहे. इथे वाढत चाललेला लोंढा, लोकांच्या वाढत्या गरजा. सगळं सगळं मान्य. हे सगळं करताना देशाबद्दल असलेली भावना फक्त पासपोर्टवर न ठेवून, प्रत्यक्षात उतरवायला हवी, नाही तर पुढे काळ खुप कठीण जाईल… 😦

  12. भारत हा खरंतर USI आहे. नावापुरता एक देश बाकी प्रत्येक राज्याची भाषा, लिपी, संस्कृती, खाद्यसंस्कृती, चालीरीती, इव्हन देवही वेगवेगळे.. त्यामुळे हे असं होणं सर्वस्वी चुकीचं असलं तरी स्वाभाविक आहे.

  13. हे असं नेहेमीच सुरु असतं, पण पांढरपेशी मंडळी याकडे दुर्लक्ष करतात. ही गोष्ट खरं तर इतक्या सहजतेने घ्यायची नाही. गेल्याच आठवड्यात मालाडला एका क्षुल्लक बाबी वरून चार तरूणांना दुसऱ्या सात तरूणांनी मारून टाकले. रोखून पाहिले इतकाच काय तो दोष होता. झोपडपट्टी मुळे नोकरी धंदा नसलेली मंडळी असे काहीतरी उद्योग करून भाई बनायचा प्रयत्न करतात.

    1. झोपडपट्टी मुळे नोकरी धंदा नसलेली मंडळी असे काहीतरी उद्योग करून भाई बनायचा प्रयत्न करतात…….मला वाटते आपण चुकीचा सामाजिक विचार करत आहोत. झोपडपट्टी हे शहरीकरणाचे अविभाज्य अंग आहे. जर झोपडपट्टी नसेल तर शहराच्या अनेक सामाजिक कौटुंबिक लहान सहन सामाजिक दृष्ट्या हलकी समजली जाणारी कामे पूर्ण करणारे मनुष्य बळ आपणास कोठून उपलब्ध होईल . तसेच आपण स्वतः शहरातील जागेच्या भावांचे चांगले जाणकार आहात. चांगल्या उत्पनांच्या मध्यमवर्गीय नागरिकांना सुद्धा मुंबई सारख्या मोठ्या शहरात फ्लट घेणे जमत नाही. आणि राहीला गुन्हेगारीचा विषय . गुन्हेगार हा झोपडपट्टीच असतात हा सुद्धा गैरसमज आहे. गुन्हा ही कोण्या सामाजिक वर्गाची मक्तेदारी नाही एव्हढेच माझे म्हणणे आहे.

    2. महेंद्रकाका,
      हो, हे नेहमीच सुरु असते, पण ह्यात पांढरपेशा म्हणून मिरवणारा समाजवर्ग देखील असतो.. !!

  14. माणुसकी कमी होत चालली आहे. जोपर्यंत आपल्या अंगाशी येत नाही तोपर्यंत कोणी काही करत नाही आणि त्यावेळी मात्र मदतीची अपेक्शा करतात.

    1. अरुणाजी,

      माणुसकी संपतेय, आता देश ही संकल्पना मागे जाऊन स्वतःच्या गरजा, धर्म ह्या गोष्टी प्रामुख्याने लोकं जपतात,…. 😐

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.