इमर्जन्सी वॉर्ड

नागपुरामधलं सगळ्यांत मोठ्ठं आणि सर्व सोयींनी उपयुक्त अश्या, इंदिरा गांधी सरकारी हॉस्पिटलामधला नेहमीचाच दिवस. नेहमीप्रमाणेचं खून, अपघात, जाळपोळ, मारामारी, अश्या ढीगभर कॅज्युल्टी केसेस पडून होत्या. लोकांची प्रचंड गर्दी होती. डॉक्टर्स आपापली कामे करत होते. त्यांतच आज पहिल्या पावसाचा तुफान तडाखा बसला होता संपूर्ण शहराला, त्यामुळे गर्दी, गोंधळ आणि हाहाकार असं एकूण चित्र होतं सगळ्या परिसरात. ह्यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या मुलांची एक बँच, इंटर्न म्हणून कॅज्युल्टीमध्ये प्राथमिक तपासण्या करत होती. त्यांना फक्त एका फॉर्मवर रुग्णाची त्यावेळची परिस्थिती कशी आहे याची नोंद घेणे आणि प्राथमिक उपचार करणे, ही जबाबदारी हॉस्पिटलाने दिली होती. त्यात त्यांनी रुग्णाला इंजेक्शन देणे, रक्तदाब तपासणे, टाके घालणे अशी कामे करायची. बाकी काहीही उपचार करण्यासाठी त्यांना सीएमओची (CMO – कॅज्युल्टी मेडिकल ऑफिसर) परवानगी घेणे गरजेचे असते.

नितिका, अतिशय हुशार डॉक्टर. ह्याच वर्षी ज्युपिटर मेडिकल कॉलेजमधून, पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. सगळे सीनिअर्स तिच्या कामावर खूश होते. आयुष्यात कधी बघितली नसतील इतकी प्रेतं, रक्त ती रोज ९ तासाच्या शिफ्टमध्ये, दर ५ मिनिटाला बघायची. तसंही डॉक्टर लोकांसाठी हे काही नवीन नाही, त्यांना ह्या गोष्टींचे प्रशिक्षण दिलेलं असतंच, पण कधी कधी तिला ते सगळं नकोसं वाटायचं. विचार करायची की जनरल वार्डमध्ये बदली करून घ्यावी, पण पुढे निष्णात सर्जन होण्यासाठी हा अनुभव गरजेचा होता. आज तिने डबल शिफ्ट केली होती, काम खूप होतं. लोकांची गर्दी कमी व्हायची, नावंच घेत नव्हती. संध्याकाळचे ६:३० वाजले होते. ती थोडा आराम करावा म्हणून, कोपर्‍यात एका खुर्चीवर डोळे मिटून शांत बसून होती. तितक्यात एक म्हातारे गृहस्थ इमर्जन्सी वॉर्डमध्ये धावत धावत आले, “डॉक्टर…डॉक्टर माझ्या पोरांना खूप मार लागलाय हो, त्यांना बघा नं!” नितिका तातडीने उठली आणि, त्यांनी सांगितलेल्या बेडपाशी पोचली. त्यांच्या तीन मुलांना जबरदस्त मार लागला होता, आणि खूप रक्तस्त्राव सुरु होता. त्यांच्या गाडीला एका भरधाव ट्रकने टक्कर दिली होती आणि ही तीन भावंड त्यात जबर जखमी झाली होती.

तिने लगेच CMO राघवेंद्र ह्यांना फोन केला. ह्या केसची माहिती दिली आणि काय काय करू हे विचारून घेतलं. नितिकाने त्या काकांना एक कॅज्युल्टी फॉर्म दिला, आणि लगेच उपचार करायला सुरुवात केली. ते बाजूला उभे राहून, डोळे पुसत पुसत फॉर्म भरत होते. राघवेंद्र सर एका दुसर्‍या पेशंटला बघत होते, ते धावत इमर्जन्सी वॉर्डमध्ये आले, आणि परिस्थितीचे गांभीर्य बघता, आरएस आणि आरऑर्थोला (RS – Resident Surgeon, R Ortho – Resident Orthopedics) त्वरित बोलवायला सांगून, सगळ्यांची तपासणी केली. मोठ्या मुलाला हाताला आणि तोंडाला मोठी जखम झाली होती, त्यांनी त्याला इंजेक्शन देऊन टाके घालायला सांगितले. मधल्या मुलाला खांद्याला, छातीला आणि पायाला मार बसला होता आणि त्याला पाय देखील हालवता येत नव्हता. छोट्या मुलाला गुडघ्याला आणि कपाळाला मार बसला होता.

राघवेंद्रसरांनी सगळ्यांना एनएस (NS – Normal Saline) लावायला सांगून, सगळ्यांवर लक्ष ठेवायला सांगितले. आरएस पोचणार होतेच, इमर्जन्सी वॉर्डमध्ये. तोपर्यंत नितिका, त्यांच्या जखमा साफ करून त्यांना ड्रेसिंग करत होती. ७:२० पर्यंत हे सगळं सुरू होतं. ते काका सारखे हिला येऊन सांगायचे, माझ्या मुलांना बरं करा, पाया पडतो. ही त्यांना जमेल तितका धीर देण्याचा प्रयत्न करत होती. तरी ते हात जोडून मुलांना वाचवायची आर्जवा करत होते. मोठा आणि छोटा मुलगा काही प्रमाणात स्टेबल होते, पण त्यांचा भाऊ खूप सिरीअस होता. नितिकाने तिला सांगितलेलं काम केलं होतं आणि ती इतर पेशंटना बघत होती. ती मग काकांकडे आली, तिने विचारलं मुलाच्या ड्रेसिंगसाठी काही गोष्टी लागतील, त्या आणून देता का बाहेरच्या मेडिकल स्टोअरमधून. त्यांनी त्या निमुटपणे आणून दिल्या. दुसरे डॉक्टर मोठ्या मुलाला टाके घालणार होते, तरी ते काका रडत होते, वाचवा, माझ्या मुलाला वाचवा म्हणून, तिने त्यांना धीर दिला. मोठे डॉक्टर आहेत तिथे, काळजी करू नका. पण ते ऐकायला तयार नव्हते, शेवटी ही वैतागून म्हणाली, “काका काळजी नका हो करू, मी माझं काम केलंय, अजून मी काही करू शकत नाही. देवावर विश्वास ठेवा!! ”

दोन डॉक्टर त्यांच्या भावाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्याची प्रकृती खालावत होती. खांद्याला आणि छातीला मार बसल्यामुळे, त्याला श्वास घेतांना थोडा त्रास होत होता. ऑक्सिजन मास्क लावून, त्याला कृत्रिम श्वास देण्यात येत होता, तरी काही फरक पडत नव्हता. त्याचा रक्तदाब उतरत चालला होता. शेवटी त्याला ईओटीमध्ये (EOT – Emergency Operation Theater) हलवायचा निर्णय घेतला गेला आणि त्याला ईओटीमध्ये आत घेऊन गेले.

इकडे नितिका आपली शिफ्ट संपवून, कँटिनमध्ये चहा घ्यायला गेली. तिला सीएमओची सही घेतल्याशिवाय शिफ्टवरून घरी जाता येणार नव्हतं. तिने तोंडावर थंडगार पाणी मारलं आणि गरमागरम चहा घेतला. पाऊस अजून सुरूच होता, ढग गडगडत होते. बाहेर वातावरण प्रसन्न होतं, पण खूप काम झाल्यामुळे ती थकलेली होती. झोप येत होती तिला. थोडावेळ तिथे बसून, ती इमर्जन्सी वॉर्डकडे निघाली.

दरवाज्यात ते काका मान खाली पाडून उभे होते. तिने त्यांना काही विचारायच्या आत ते म्हणाले, “मॅडम, पोरगा गेला माझा. ऑपरेशन थिएटरामध्ये नेला तेव्हाच तो गेला 😦 त्याच्या आईला ह्या धक्क्याने चक्कर आली, तिला बाहेर बसवून आलो आहे. ” नितिका एकदम स्तब्ध उभी, काय बोलावे सुचेनासे झाले तिला. ते काका बोलत राहिले, “पोरी तुझे खूप आभार, तुम्ही माझ्या दोन मुलांना वाचवलंत. ह्या तिघांना मी सांगितलं होतं, पाऊस पडतोय कुठे जाऊ नका, पण ह्यांना पावसात गाडी फिरवायची हौस… आता फिटली ह्यांची हौस 😦 ” ते क्षणभर शांत झाले, मग त्यांनी हात जोडले, “माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर माफ करा.. पण… असो” त्यांना बोलताच येईना. अश्रू सावरत ते म्हणाले, “डॉक्टरसाहेब, शिफ्ट संपली का तुमची? आराम करा, खूप काम झालं नं आज? पुन्हा तुमचे खूप खूप आभार, निघतो मी”

नितिका शांत उभी होती, स्वतःला दोष देत होती, की आपण मघाशी ह्यांच्यावर उगाच रागावलो, एक अपराधीपणाची भावना मनाला छेदून गेली. काय वाटत असेल त्या बापाला ह्या क्षणी, याची कल्पना करणे अशक्य होते तिला. इतकं सगळं झालं, तरी हा माणूस आपल्याला धन्यवाद काय म्हणतो, असा नॉर्मल काय वागतो, याचे तिला आश्चर्य वाटत होते. एका मुलाच्या जाण्याचे दु:ख आणि दोन मुले वाचल्याचा आनंद असा संमिश्र भाव त्यांच्या चेहर्‍यावर होता. डोळे तुडुंब भरून वाहत होते. हिला काही बोलणेच सुचत नव्हते, त्यांच्या पाठीवर हलकेच थोपटून, “काळजी घ्या” म्हणून ती निघाली.

पाऊस अजिबात थांबायचे नावं घेत नव्हता. तिने त्या भरलेल्या आभाळाकडे एकदा बघितलं आणि डोळे पुसले. ती देवाला दोष देत होती. देवा, का मला आज एक जीव वाचवायची संधी दिली नाहीस तू? एका बापाला त्याचा मुलगा सुखरूप आहे हे सांगितल्यावर, त्याच्या चेहर्‍यावर येणारा आनंद का नाही बघू दिलास तू मला? देवानंतर लोकं डॉक्टरला पूज्य मानतात, कारण तो एखाद्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवून आणू शकतो.. मग आज हा विश्वास का खोटा ठरवलास तू? मान्य आहे, मी डॉक्टर आहे, पण शेवटी मी पण एक माणूस आहे, मला ही भावना आहेत… मग माझ्या भावना अश्या का दुखावतोयस देवा.. का… सांग ना, का? 😦 😦

तितक्यात प्रचंड ढगांच्या गडगडाटासह, विजा चमकून पाऊस जास्त जोरात बरसू लागला… जणू देवालाही आपले अश्रू थोपवता आले नाही..अश्रू थोपवता आले नाहीत!!


– ही एक सत्यकथा आहे. नितिका माझी बहीण आहे. प्रसंग मांडण्यात थोडाफार बदल केला आहे, पण घटना १००% सत्य आहे.

– ही कथा ह्यावर्षीच्या जालरंग प्रकाशनाच्या ऋतू हिरवा २०११, ह्या अंकात प्रकाशीत झाली होती. आपल्या वाचनासाठी इथे पोस्ट करत आहे.

– सुझे !! 🙂

ठिणगी…

सध्या देशात एकदम वेगवान घडामोडी घडत आहेत. सरकारविरोधी आणि सरकार असे दोन गट पडून, एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सगळे आपआपली बाजू बळकट करण्यासाठी, वाट्टेल ते मुद्दे उचलून लोकांना आपल्या बाजूने वळवण्याची शक्कल लढवत आहेत. मग तो शेती करमाफी मुद्दा असो, अनेक सवलती असो, की सरकारी गलेलठ्ठ पॅकेजस्, की जातीवाद. आपला स्वार्थ साधण्यासाठी, ही लोकं काहीही करू शकतात. ही लोकं हे करतात ते करतात, पण ह्यात सामान्य लोकं भरडली जातात. ह्यांचे राजकारण होते समाजकारणाच्या नावाखाली आणि देशात अराजकता माजते. आता हे सगळं का बोलतोय, असं झालं तरी काय ह्या विचारात तुम्ही असाल. सांगतो..

परवा रात्री, सचिनच्या लग्नाच्या पार्टीसाठी दादरला सायबिणी गोमंतकला जमलो. मस्त जेवलो, आणि घरी जाताना मी आणि अनु दादर प्लॅटफॉर्म एक वर उभे होतो ट्रेनची वाट बघत. गाड्या उशिराने धावत होत्या. शेवटी एक बांद्रा लोकल आली आणि अनु त्यात बसून निघून गेली. मी बोरिवली ट्रेनची वाट बघत उभा होतो. १० मिनिटांनी ट्रेन आली (९:४४ बोरिवली लोकल) आणि जेमतेम उभं राहता येईल, इतकी जागा मला मिळाली. माझ्या ट्रेनच्या डब्याला लागूनच अपंगांचा छोटा डबा होता. मध्ये फक्त काही लोखंडी बार्स होते.

गाडीने दादर सोडलं आणि त्या डब्यातून शिव्यांचा आवाज ऐकू येवू लागला. एक चाचा त्या डब्यात दरवाज्यात उभे होते, आणि त्यांना एक बंगाली बाबू शिव्या देत होता. काय प्रकरण झालं होत काय माहित, पण दोघांनी एकमेकांच्या आया-बहिणींचा असा उद्धार सुरु केला की, डब्यातील स्त्रीवर्गासमोर उभं राहायला लाज वाटत होती. माझ्या डब्यातील काही जण आणि मी त्यांना ओरडून गप्प राहायला सांगत होतो, पण ते काही ऐकेनाच.

दोन स्टेशन्स गेली, आता बांद्रा येणार होत. त्यांचा शिव्यांचा भडीमार सुरु होताच आणि ते हातघाईवर आले होते. चाचा अपंग होते, त्यांच्या हातात काठी होती आणि त्यांनी त्या काठीने त्या बाबूला दूर ढकलायचा प्रयत्न सुरु केला. मारामारी सुरु झाली, आमच्या डब्यातील एक मराठी तरुण आणि दोन गुजराती गृहस्थ बार्समधून हात घालून, त्यांना दूर ढकलायचा प्रयत्न करत होते आणि दोघांना शांत बसायला सांगत होते, पण ती दोघे ऐकेना. माझ्या एरियामध्ये चल, माझे भाऊ बंधू तुला कापून काढतील अशी त्यांनी भाषा सुरु केली. चाचा म्हणाले उतर बांद्राला तुला बघतो, आणि तो बाबू म्हणाला की मालाडला चल, तुला गायब करतो. एकमेकांना मारत होते ते, आणि इतक्यात स्टेशन आलं आणि चाचांनी एक जोरदार काठी मारली आणि प्लॅटफॉर्म उडी मारली. सामोर बसलेल्या पोलिसांना बोलावलं आणि त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतलं.

त्याचं पुढे काय झालं ते माहित नाही, पण लगेच त्या मराठी तरुणाचा मित्र त्याला म्हणाला, “अरे भो****, काही अक्कल आहे की नाही तुला. कशाला दुसऱ्यांच्या भांडणात पडतोयस्, ही लोकं कोणाचीच नसतात..वगैरे वगैरे..(अजुन जास्त लिहू शकणार नाही इथे)” दुसरा काकुळतीने सांगू लागला, “अरे अस् कसं बोलतोस..काही झालं तरी…” त्याच्या मित्राने त्याला परत मोठ्याने शिवी हासडली आणि म्हणाला, “तुला अक्कल नाही आहे, सोड … स्टेशन आलं उतर आता”

त्याचवेळी ती दोन गुजराती माणसं एकमेकांशी बोलत होती, “गांडा साला, ही अशी लोकं देशात कशी राहतात? गपचूप पैसा कमवायचा, बायका पोरं सांभाळायची बस्स, अजुन काय पाहिजे लाईफमध्ये. अशी मवालीगिरी कोण करत बसेल” असं बोलून कामाच्या गप्पा सुरु केल्या. दरवाज्यात चार मारवाडी लोकांचा ग्रुप बसला होता, ते म्हणाले “अपना आदमी नही था, नही तो बराबर करता था उसको”

ट्रेनमध्ये होणारी ही भांडणे मुंबईकरांसाठी नवीन नाही. ऑफिसला जाताना खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये दरवाज्यात हात देऊन गाडीत घेणारी हिचं लोकं, थोडं भांडण झालं की पार एकमेकांच्या जीवावर उठतात. अक्षरशः प्राण्यासारखे… बर् आपण मध्ये पडलो की भांडण अजुन चिघळत, त्यामुळे मुकाट्याने जे होत ते बघत बसायचं 😦

१५ मिनिटात घडलेला हा प्रसंग. मग ट्रेनमधील प्रत्येक चेहऱ्याकडे बघताना, मला त्यांचा धर्म, जात दिसू लागले. म्हटलं, इथे काही झालं, तर हा माणूस ह्याला नक्की मदत करेल, हा दुसरा तर बदडून काढेल, हा तिसरा तर मी बर् माझं काम बर् म्हणून दुर्लक्ष करेल, चौथा माझ्या जातीवाल्याला मारतो म्हणून पहिल्याला मारेल…..

सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता असं धोरण असलेला आपला भारत देश. अश्या वेळेला कुठे जातो कळत नाही. दहशतवादी भारताबाहेरून लपूनछपून स्फोटके आणतात, पण ह्या देशांतर्गत असलेल्या स्फोटकांचे काय? ह्यांना भडकायला एक छोटी ठिणगी सुद्धा पुरेशी आहे. प्रत्येक धर्माचा एक-एक पक्ष आहेचं, त्या आगीला अजुन हवा द्यायला. त्यांना असे मुद्दे मिळायची, वाटचं बघत असतात.

त्या छोट्या भांडणाने जर उग्र रूप धारण केलं असतं, तर काय झालं असतं, ह्या विचारनेचं माझ्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. 😦 😦

– सुझे !!

टिप – काही गोष्टी नमूद करणे खरंच गरजेचे आहे.

१. कृपया मूळ मुद्दा लक्षात घ्या. कुठल्याही एका जाती-धर्माबद्दल मला काही बोलायचे नाही.
२. मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.
३. वाचकांना हा लेख आक्षेपार्ह वाटत असेल, तर वाटून घ्या 🙂

एका लग्नाची गोष्ट…

पिल्लू, दागिने, शालू सावरत बेडवर काहीशी अवघडून बसली होती. बाकी सगळीकडे निरव शांतता होती. तिच्या हालचालीमुळे वाजणाऱ्या बांगड्या, त्या शांततेचा भंग करत होती. ती खुप दमली होती दिवसभराच्या समारंभामुळे, पण तिला झोप येत नव्हती. ती स्वतःच्या विचारात गुंग झाली होती. गेल्या काही वर्षात घडलेल्या घडामोडी, आणि अचानक १५ दिवसात आलेल्या एका वेगवान वळणाने, तिचे आयुष्य पूर्णतः बदलून टाकले होते. तशी ती या बदलला खुप आधीपासून तयार होती, पण आज प्रत्यक्ष त्याला सामोरे जाताना तिला प्रचंड भीती वाटत होती. इतक्या वर्षांपासून असलेले तिच्या आई-बाबांचे स्वप्न आज साकार झाले होते. त्यांनी खुप थाटामाटाने आपल्या एकुलत्या एका मुलीचे लग्न लावून दिले. आपल्या मुलीची जड अंत:करणाने, तिच्या सासरी पाठवणी केली होती. सगळं खुप खुप छान पार पाडलं होत. तिला किती तरी प्रसंगांना धीराने तोंड द्यावे लागले होत गेल्या काही दिवसात, ते सगळं-सगळं आठवत होत तिला.

आई-बाबांनी जेव्हा दिल्लीस्थित मंदार चे स्थळ पिल्लूला सुचवलं, तेव्हा त्यांना तिच्याकडून होकाराचीच अपेक्षा होती. कारण पिल्लूने खुप वेळ घेतला होता आधीच आणि आता त्यांना अजुन जास्त थांबता आलं नसतं. तिने ही जास्त आढेवेढे न घेता, दोन भेटीत होकार कळवला होता. दोघेही खुप खुप आनंदी झाले होते. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचे लग्न होणार, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता आणि त्यांना आनंदी बघून पिल्लूला खुप समाधान वाटत होत. तिला काळजी होती ती फक्त त्याची. त्याला हे कसं सांगायचे, या विचारात तिने अख्खी रात्र जागून काढली आणि सकाळी त्याला मोठ्या धीराने फोन करून सांगितलं, की मला तुला भेटायचं आहे. त्यांनी बोलणे खुप कमी केल्यामुळे, अचानक पिल्लूला भेटता येणार या खुशीने तो धावतच त्यांच्या नेहमी भेटायच्या ठिकाणी निघाला. तो पोचायच्या आधीच, ती तिथे हजर होती. एका कोपऱ्यातील टेबलावर बसलेली होती. थोडीशी अस्वस्थ, नाराज, हरवलेली वाटत होती ती. हा तिच्यासमोर जाऊन बसला, आणि म्हणाला “काय झालं बाळा, तब्येत ठीक नाही आहे का? चेहरा का असा पडलाय? आज तुला तब्बल दीड महिन्यांनी बघतोय पिल्लू, किती बारीक झालीयेस…बोल ना गप्प का?” तिने मानेनेच नकार देत वेटरला ऑर्डर दिली, त्याच्यासाठी कॉफ्फी आणि तिच्यासाठी ज्यूस. त्याने तिला घरून आणलेला चिवड्याचा डब्बा दिला, तिला चिवडा खुप आवडायचा म्हणून, त्याने घरी न सांगता लपवून तो तिच्यासाठी आणला होता.

ती शांतच होती. एक मोठा सुस्कारा सोडून, तिने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली. “शोना, एक चांगली बातमी आहे.” तो काहीसा सावध झाला, त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मान खाली करून कॉफीकडे एकटक बघू लागला आणि चढत्या सुरात म्हणाला, “कधी ठरलं, कोण आहे मुलगा? इतकी घाई गरजेची होती का?” ती काहीशी बावरली, आणि त्याला सगळं सांगू लागली, पण तो प्रचंड चिडला होता. त्याला माहित होत हे होणार आहे, तरी त्याला राग आला होता आणि तो तडक उठायला निघाला तिथून. तिने हलकेच त्याचा हात धरला आणि म्हणाली, “सॉरी, पण हे होणारंच होत आणि तुला हे माहित होत नं शोन्या? मला तुझी साथ हवी आहे आयुष्यभरासाठी, पण एक मित्र म्हणून….” तिला पुढे काही बोलता येत नव्हते, त्याने तिचा हात धरून रिक्षात बसवलं आणि तिच्या ऑफिसपर्यंत सोडायला निघाला. वाटेत तो तिच्याशी काहीच नाही बोलला, काहीसा घुश्यातच होता. तिने त्याची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण तो काही बोलला नाही. तिला ऑफिसच्या गेटवर सोडून, तिच्या पाठीवर एक धीराची थाप मारली आणि डोळ्यांच्या कडा पुसत तो मागे फिरला.

तिने त्याला भेटायचा, बोलायचा खुप प्रयत्न केला. पण तो खुप रागावला होता, खुप चीड चीड करत होता, सारखा तिच्याशी भांडत होता. तिला हे काहीसे अपेक्षित होते म्हणा, पण ती भांडणे इतकी वाढली की दोघांनी एकमेकांशी बोलणे कायमचे बंद केले. ती लग्नाच्या तयारीत गुंतून गेली आणि हा नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाला. दोघांनाही राहवत नव्हते एकमेकांशी बोलल्याशिवाय, पण भांडणे टाळण्यासाठी मन मारत होते दोघेही. त्याने तिला साफ सांगितलं होत, की तिच्या लग्नाच्या एकाही कार्यक्रमाला तो जाणार नव्हता. ती पार कोलमडून गेली होती, त्याचे ते शब्द ऐकून. ती स्वतःला विचारायची की, हा असं का वागतोय. त्याला त्रास होतोय हे माहितेय, पण मला ही हे सगळं करणे कठीण आहे. तो मला का नाही समजून घेत आहे. तिला त्याचा खुप राग आला होता, पण मनोमन तिला वाटतं होत, राग उतरला की शांत होईल. तिचा थोडा भ्रमनिरास झाला जेव्हा तो साखरपुड्याला आला नाही, तिने त्याला फोनकरून जाब विचारला तर तो रागात म्हणाला मी तुला परत कधीच भेटणार नाही आणि फोन ठेवून दिला. ती तिकडे रडायला लागली आणि हा इथे. त्याला माहित होतं, की आपण चुकीचं वागतोय, पण तिच्यासमोर गेल्यावर स्वतःला सावरणे खुप कठीण आहे, हे ही त्याला माहित होते. म्हणूनच तो असा उद्धटपणे वागत होता. ती सुद्धा वर-वर राग दाखवून, सारखं त्याला लग्नाला यायची गळ घालत होती. पण तो काही ऐकेना, आणि शेवटी तिनेपण त्याला रागात सांगितलं नको येउस लग्नाला, आणि त्याला लग्नाची पत्रिका ही पाठवणार नाही असे सांगितले.

काही दिवस लग्नाच्या तयारीत सगळे मश्गुल झाले होते. होता होता लग्नाचा दिवस उजाडला. तिने आदल्यादिवशी रात्री २ वाजता, हळद झाल्यावर न राहवून त्याला लग्नाची पत्रिका पाठवली, आणि लिहिले नाही आलास तरी चालेल, पण तुला बोलावणे माझ कर्तव्य आहे. त्यामुळे तू न वाचताच, डिलीट करू शकतोस हा इमेल. ती लॅपटॉप तसाच सुरु ठेवून झोपली. लग्न दुपारचं असल्याने, सकाळी आरामात उठले तरी तिला चालणार होते. थकव्यामुळे तिला प्रचंड सुस्ती आली होती. ती सकाळी उठली तेव्हा इनबॉक्समध्ये एक अनरीड मेसेज होता, आणि तो त्याचाच होता.

त्याने लिहलं होत, “पिल्लू, सर्वप्रथम तुझे खुप खुप अभिनंदन. आज आयुष्याच्या एका महत्त्वाच्या प्रसंगाला तू सामोरी जात आहेस. माझ्या तुला खुप खुप शुभेच्छा आणि अनेक अनेक आशीर्वाद. मी तुला का भेटलो नाही किंवा तुझ्या लग्नाला का आलो नाही, याचं स्पष्टीकरण मागू नकोस प्लीज. मी नाही देऊ शकणार. तुला फक्त एक सांगायचं आहे, मंदारमध्ये कधी मला शोधू नकोस, नाही तर त्याला तू कधीच आपलंस करू शकणार नाहीस. काळजी घे. आणि पुनश्च अभिनंदन. सुखी रहा!!”

तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, का कोण जाणे आपण चूक करतो का असं वाटायला लागलं. तितक्यात आई आली आणि तिला लवकर लवकर तयारी करायला सांगून निघून गेली. तिने डोळे पुसले, हातावर काढलेल्या मेंदीच्या नक्षीकडे बघत स्वतःला समजवायला लागली, हेच होत नशिबात आणि आता मागे हटणे नाही आणि क्षणात तयारीत गुंग झाली. तिला हे सगळं लवकर संपवायचं होत.

लग्नघटिका समीप आली. ऊंची लग्नाचा शालू, दागिन्यांनी सजून ती लग्न मंडपात आली. एखाद्या राजकान्येसारखी दिसत होती ती. तिने सगळीकडे नजर फिरवली, तो आला नव्हता. तिला वाईट वाटलं, राग आला, पण शेवटी तो नाही आला हे बरंच झालं. कारण त्याला इथे तुटताना, कोसळताना बघून, तिला त्याला सावरायला जमलं नसतं. ती अग्निकुंडा समोर शांत बसली आणि हलकेच मंदारकडे बघितले. तो हसला, आणि मुंडावळ्या सावरू लागला. मंत्रघोषाने वातावरण भरून गेलं होत. एक एक विधि पार पडत होते. एकदम प्रसन्न वातावरण होत. त्याचं शुभमंगल सुंदररीत्या पार पडलं. आई-बाबांनी एकदम साश्रुनयनांनी पोरीचे कन्यादान केलं आणि त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तिचे सगळे मित्र-नातेवाईक दूर दुरून आले होते, पण तो…तोच फक्त काय तो आला नव्हता…. 😦

इतक्यात थोडी कुजबुज होऊन दार बंद केल्याचा आवाज झाला, ती थोडी बावरली. अजुन जास्त अवघडून बसली. खुप सुंदर दिसत होती ती, मंदार तिच्या सौंदर्याकडे एकटक बघत राहिला होता. तो हलकेच तिच्या जवळ आला. तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला, “काळजी नको करूस, तुला काय वाटत असेल, ते मी समजू शकतो. आपण एकमेकांना अजुन खुप वेळ देऊ. आपल्या दोघांना मिळून हा संसार सुखाचा करू. तुला मी सगळी सगळी सुख देण्याचा प्रयत्न करेन, मला फक्त तुझी साथ हवी आहे. खुप जपायचं आहे तुला, आनंदी बघायचं आहे तुला. माझी साथ देशील नं?”

तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागली. का माहित पण, त्याच्या नजरेला नजर देण्याची तिची हिम्मत होत नव्हती, पण एका क्षणात, आपल्या शरीरातील बळ एकवटून आणि मनातील घालमेल दूर सारून त्याला घट्ट मिठी मारत ती म्हणाली, “हो मंदार नक्की, नक्की साथ देईन तुझी, अगदी काही झालं तरी. मी वचन देते..”

– या आधीची स्वैरलिखाणे इथे वाचायला मिळतील.
– ही पोस्ट एका अनामिक ब्लॉग वाचकाला समर्पित, फक्त या वाचकाच्या आग्रहाखातर ही पोस्ट लिहायचं धाडस केलंय. धन्स !!

– सुझे 🙂