महाएपिसोड..


इसवीसनपूर्व काळी, हम आपके है कौन सारखा उत्कृष्ट फॅमिली ड्रामा बघितल्याचे स्मरते. त्यानंतर मोठ्या पडद्यावर अश्याच प्रकारच्या सिनेमांची, एक लाट निर्माण झाली. लोकांच्या भावनेला हात घातला की, सिनेमे हातोहात खपतात यावर शिक्कामोर्तब झाले, आणि ते खरं देखील होत. त्यानंतर सुरु झाली एक प्रचंड मोठी स्पर्धा छोट्या पडद्यावर, मराठीत आपण त्यास टीव्ही ह्या नावाने ओळखतो. नव्वदीच्या दशकात जेमतेम तीन-चार वाहीन्या असलेला टीव्ही मोठा झाला आणि त्यावर ३०० + चँनेल्स सुरु झाले.

काळजाला हात घालणाऱ्या मालिका (डेली सोप्स) आठवड्यातून दोन-तीन दिवस दाखवल्या जाऊ लागल्या. हळूहळू मग ह्या लोकांमध्ये स्पर्धा वाढली. खेचाखेची सुरु झाली आणि अश्या मालिका आठवड्याचे ५ दिवस दाखवल्या जाऊ लागल्या. शनिवार आणि रविवार हे दिवस खास चित्रपट दाखवण्यासाठी वापरले जात असे. आता दाखवून दाखवून किती सिनेमे दाखवणार, आणि एका सिनेमाच्या वेळात तीन-चार मालिका घुसवल्यास नफा कैक पटीने वाढणार ही बाब लक्षात घेऊन तिथे, ह्या मालिका तिथे दाखवल्या जाऊ लागल्या. त्या मालिकांना आपण महाएपिसोड किंवा विशेष भाग म्हणतो. हुश्श्श्श..संपली एकदाची महाएपिसोडची व्याख्या 🙂

गेले दोन तीन महिने उन्हामुळे भटकंतीला लगाम बसलाय, बाहेर कुठे गेलोच तर फक्त जेवायला हे एव्हाना संपूर्ण जगाला कळले आहे. त्यामुळे कधी विकांतात चुकून घरी असल्यास, मला हे अगम्य प्रकार बघावे लागतात. गेल्या दोन आठवड्यात तर, ह्या लोकांनी माझा अंत बघितला होता आणि तेंव्हाच ही पोस्ट लिहायला घेतली होती, पण कंटाळा केला आणि मी ती डिलीट केली. शनिवारी माझ्यावर झालेल्या भावनिक अत्याचाराचा बदला म्हणून, ही पोस्ट परत लिहायला घेतली आहे. मला वाटत एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला कळले असेल की ७ मे हा सुनेचा दिवस होता 😉 एक तर मी माझ्या इंटरव्युची तयारी करत होतो आणि मध्येमध्ये मुंबईची मॅच बघत होतो. मातोश्रींनी मला फर्मान सोडलं की, आज “चार दिवस सासूचे”मध्ये “एक सुनेचा दिवस” साजरा करणार आहेत आणि मला ते बघायचं आहे,  तेव्हा तु टीव्हीपासून दूर रहा.

अश्या कितीतरी मालिकांनी माझे विकांत वाया घालवले आहेत. ह्या अश्या मालिकांमधून अनेकांनी खुप नाव कमावलं आहेच, पण गमावलं देखील आहे. तारे जमीन पर मध्ये एकदम छोट्याखानी गोड भूमिकेत असलेली गिरिजा ओक, मला स्मृती ईराणी (का विरानी) नक्की आठवत नाही पण तिच्यासारखी रडूबाई झालीय इतकं नक्की, टी रडायला लागली की मला हसू का येत ते तुम्हीच बघून ठरवा. तसेच, देशमुख कुटुंबीय मुख्यत्वे आशालता देशमुख, ह्या रजनीकांतच्या घराण्याशी संबंधित आहेत, असा दाट संशय आहे. त्यांच्यावर गेली ८-९-१० (??) वर्ष इतकी संकट आली तरी, त्याचं कोणी काही वाईट करू शकले नाही. महागुरू यांच्याबद्दल अवाक्षर काढायची माझी हिम्मत होत नाही आहे. गेल्या रविवारी बघितलेली महा-अंतिम फेरी बघून, मला घेरी यायची बाकी होती. 😀

This slideshow requires JavaScript.

हिंदी मालिकांचा असलेला मराठी प्रेक्षकवर्ग बघून, त्यांनी मराठी अभिनेते किंवा मराठी पात्र ह्या मालिकांमध्ये घुसडायला सुरुवात केली. मग पुर्ण एक तासाच्या भागात, दोन-तीन वाक्य मराठीत बोलून आपण मराठी आहोत याची जाणीव करून द्यायची प्रेक्षकांना. हिंदी मालिकांमध्ये गाजत असलेलं हे फॅड, मराठी मालिकांमध्ये हल्लीच घुसलंय. मराठी मालिकांमध्ये इतर भाषिक कलाकार काम करत आहेत.  सगळीकडे चढाओढ असते ते टीआरपी मिळवण्याची आणि आपला जास्तीतजास्त फायदा करून घ्यायचा. तरी शनिवार आणि रविवार ह्या दिवशी दाखवले जाणारे जास्तीत जास्त विशेष भाग हे, हम आपके कौन वरून ढापलेले असतात ह्यात काडीमात्र शंका नाही. वर सगळ्या मालिकांमध्ये स्त्री पात्र हेचं मध्यवर्ती असते. समस्त स्त्री वर्गाने भडकू नये, कारण हे खुप अति होतंय अस् नाही का वाटत तुम्हाला?

कोणी संस्कारी सुन साडी घालून क्रिकेट काय खेळते, कोणाचा वाढदिवस काय तो साजरा होतो जल्लोषात.  मग अंताक्षरी काय , नाच गाणी काय. कोणाचे लग्न काय होते, कोणाला मारतायत काय.  कोणाची हरवेलेली स्मृती (ईराणी नव्हे) परत येते काय, तर कुणाचे हरवलेले आई-बाबा सापडतात काय. कुणाला अपघात होतो, तर कुणाच्या प्रेमाचे तीन तेरा वाजतात काय.

एक मराठी मालिका आहे मन उधाण वाऱ्याचे (माझ्या ब्लॉगचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही), ह्यात मुख्य पात्राचा काही वर्षांपर्यंतचं स्मृतीभ्रंश होतो आणि त्याला त्या आधीच सगळ आठवत असतं, हे बघून मला इतकं हसायला आलं सांगू. अनेक मालिकांमध्ये दुसऱ्या मालिकेतील लोकांना पाहुण्यासारखं बोलावून सण साजरे करतात. कसला शॉट लागतो डोक्याला सांगू आणि ही लोक अभिनय करताना इतकं गोडीगुलाबीने बोलतात की, साखरेची पण शुगर वाढावी इतका तो पदोपदी खोटा भासतो.  आणि हे सगळ करताना, त्यात इतक्या चुका असतात की काय सांगायच्या.

एका मालिकेत एका अभिनेत्याला हॉस्पिटलात नेतात, आयसीयुमध्ये. तिथे सगळा सेटअप असतो. त्याच्या शरीराला जोडलेली उपकरणे, ही दिवाळीला दारावर लावलेल्या विविधरंगी बल्बच्या तोरणासारखी बंदचालू होत असतात (अक्षरशः हिरवे, पिवळे, लाल, निळे दिवे होते त्या उपकरणाला). कोणाला अपघात झाला असेल आणि त्याचा चेहरा छिन्नविच्छिन्न झाला असेल, तर प्लास्टिक सर्जरी करून, त्याचा चेहऱ्यासकट त्याची ऊंची बदलतात, त्याचा रंग बदलतात. एकदा तर एक अभिनेत्री तब्बल ११ महिने गरोदर म्हणून दाखवली होती (ही बातमी स्टार न्यूजच्या सौजन्याने, ह्यावर अर्ध्या तासाचा विशेष भाग दाखवला गेला होता). झाशीची राणी ही मालिका सुरुवातीला बघायचो, खुप आवडायची, पण आता त्याला ही असं लांबट लावलंय की स्वर्गात झाशीची राणी स्वतः तडफडत असेल.

आता हे सगळ का सांगतोय? सांगून काही फरक पडणार नाही आहे. ह्या मालिकांना उत्तम प्रेक्षकवर्ग असतो. माझी गोची ही की, साक्षात माझ्या मातोश्री ह्यांच्या बाजूने आहेत. स्त्री व्यक्ती रेखेभोवती फिरणाऱ्या मालिकांची मला अॅलर्जी नाही. अनेक अश्या मालिका आहेत ज्या खरंच स्तुत्य आहेत आणि एक आदर्श (चांगल्या अर्थाने) म्हणून लोकांसमोर आहेत. माझ्या त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा आहेच, पण काही मालिका जाणूनबुजून सुरु ठेवल्या आहेत आणि त्यांचे महाएपिसोड करून अजून टीआरपी गोळा करत आहेत.  पुढे त्याचं काय करायचं, ते आपण माय बाप प्रेक्षकांनीच ठरवायचं आहे. तूर्तास मी फक्त आईशी वाद घालून सपशेल माघार घेणार, ह्याचं निर्णयाप्रत पोचलोय  🙂 🙂

– सुझे   🙂

46 thoughts on “महाएपिसोड..

  1. >> गेल्या रविवारी बघितलेली महा-अंतिम फेरी बघून, मला घेरी यायची बाकी होती.

    मी चुकून महा घेरी वाचलं…:D
    बघ हजारो मैल लांब असल्याचा हा एकमेव फायदा की या मालिका आमच्या आयुष्यात येताच नाहीत…आई आली की धाकधूक असते पण यावेळी तिला फक्त खुपते तिथे गुप्ते पहायचं त्यामुळे वाचलो…
    रच्याक तुझ्या ब्लॉगच्या नावामुळे मला वाटायचं की तू एकंदरीत मालिकाबाज असशील असं वाटलं होतं…नशीब तू लिहिलस ते…:)

    1. ऍप्स,

      बस काय? मला टीव्ही प्रकरण अजिबात आवडतं नाही आणि ह्या मालिका तर अजिबातच नाही. हे फक्त विकांतात घरी असल्याचे परिणाम. अजून काय बोलू? 🙂

      महा घेरी… लै भारी 😀

  2. महा घेरी ! 🙂

    आईमुळे ‘लज्जा, कुंकू’ ह्या दोन मालिका आयुष्यात आल्यात ! त्यातील कपट कारस्थाने बघून मला नेहेमी वाटते, लिहिणाऱ्याची आणि दिग्दर्शकाची, कपट कारस्थाने करण्याची हौस ते दोघे इथे फिटवून घेतात !

    आपण बघताना त्यातील विनोद ओळखून हसावे…. 😀 बाकी काय करू शकतो ?

    नाव व लेख झक्कास ! पटणारा !

    1. अनघा,

      हो ते ही खरंय म्हणा. पण मला सगळ्या प्रकारचे टॉरच्चर सहन करायची ताकद देण्यात परमेश्वर कामी पडलाय हेच खरं 😉

  3. रामायण-महाभारत सोडले तर कुठली ही मालिका मी पाहिली नाही याचा मला गर्व आहे 😀
    टिव्ही बघणे सोडून (मॅच / डिस्कव्हरी /नॅ.जी. वगळून) एक तप झाले…
    हिंदी चित्रपट तर बघतच नाही… पाहिलाच तर लॅपटॉपवर.

    1. राजे,

      अहो मला तरी कुठे आवडतात ह्या मालिका बघायला. हे भोग आहेत, जे बघितले आहे इथे उतरवले बस्स. आता तर मी टीव्हीपासून चार हात लांब असणार आहे 😀

      धन्यवाद रे !!

  4. Gurunath

    अये महाराजा माझ्या फ़्लॅटवर दुरदर्शन संचच नाही!!!!!!!!, मी तर जगातला सर्वाधिक आनंदी प्राणी आहे!!!!……. बाकी एक आहे सिरियल्स मधुन काही काही फ़ोटोजेनिक चेहरे मात्र नक्की मिळाले आहेत, जसे पवित्र रिश्ता मधली रडी सुन अर्चना (अंकिता लोखंडे) लै सही दिसते यार !!!!!.

    जाऊच द्या ते, पण सिरियल डोक्याला शॉट असतात हे नक्की!!!!!, एखाद्याचा भावनिक उद्रेक झाल्यावर किंवा ते पात्र भावनिक दृष्टीकोणातुन कोलमडल्यावर विजाच का कडकडवतात हे मला न उलगडलेलं कोडं आहे, च्यायला उगाच विजेचे नाव बदनाम!!!!!

    जिथे आपण पाश्चात्य जगाचे बाकी अनुकरण करतो, तिथे चांगले का करत नाही हेच कळत नाही, सद्ध्या फ़ॉक्स टी.व्ही वरचे एक सिरियल “हाऊस एम.डी” बघतो आहे फ़ार म्हणजे फ़ार भारी आहे “मेडीकल डायग्नोसिस” ही मुळ फ़्रेम असणारी ही सिरियल तुफ़ान आहे, बरे इतकी असुन ही लांबवलेली नाही तर त्याचे “सिझन्स” आहेत, तसेच “प्रिझन ब्रेक” “फ़्रेंड्स” “डेक्स्टर” ह्या पण काही उत्तम सिरियली आहेत, ही मॅच्युरीटी आपल्या टी.आर.पी वाहिन्यांमधे कधी येणार देव जाणे यार.

    1. गुरुनाथा,

      नशीबवान आहेस रे, ज्या अश्या गोष्टींच्या फंदात पडला नाहीस ते 😀

      त्या नायिका सुंदर असतात ह्यात वाद नाही, पण तोच मोठा शॉट ठरतो पुढे काही दिवसांनी आणि तिचा चेहरा नावडेसा होतो ह्यात देखील वाद नाही. आपल्या इथे टी.आर.पी मॅच्युरीटी प्रेक्षकांची मॅच्युरीटी वाढल्यास नक्की वाढेल हे नक्की !! 🙂

  5. आणि महत्वाचं म्हणजे महेश कोठारे सारखे दिग्दर्शक मराठी फिल्म्स करण्याएवजी हे असले प्रकार करत असतात.

    1. शुभम,

      मला वाटत ती मन उधाण… त्याचीच सिरिअल आहे हो ना? कसला शॉट प्रकार आहे तो…

      असो, ब्लॉगवर स्वागत, अशीच भेट देत रहा !!

  6. हायला…मलाही यातले बरेच काही असेच्याअसे सुचले होते…
    आणि मराठी मालिकावाले या महाएपिसोड ला ‘महाभाग’ असे का लिहीत नाहीत…?
    या विषयावर लवकरच लिहीणे होईल…

    1. सागरा,

      लवकर लिह रे आणि पोस्टचं शीर्षक “महाभाग” असंच ठेव. नक्की वाचायला आवडेल 🙂 🙂

  7. Tanvi

    पटली रे बाबा पोस्ट अगदी शब्द न शब्द पटला…. अरे मी तर मधे त्या ’रोहिणी निनावे’ ला निनावी पत्र लिहावे की काय असा विचार करत होते…. म्हणजे बघ हिंदीत एखाद्याचा स्मृतीभ्रंश होतो, मग मराठीत तेच… मग सगळं पुढचं आपण सहज सांगू शकतो की काय काय होणार ते…. मग दोन्हीकडे चेक करायचे की लेखिकाबाई त्याच आहेत….. अरे कल्पनाशक्ती खुंटलीये लोकांची…. पुन्हा ’एकता’ माता आहेच जळी स्थळी…..

    ’स्वप्नांच्या पलीकडले’ नामक प्रकारात तुषार दळवी निगेटिव रोलमधे … तेच ते सगळे सिन्स एकदा हिंदीत एकदा मराठीत, मग एकदा झी मराठीवर, एकदा स्टार प्रवाहवर चाललेले असतात… मेक अपचे थर लावलेल्या बाया बदलतात ईतकेच….. 🙂

    असो, त्यापेक्षा भांडा सौख्यभरे बघ… कालच्या भागात ’सिंधूताई’ होत्या… सुंदर अनूभव होता त्यांना ऐकणं हा!!!

    1. तन्वी ताई,

      नक्की लिह बघू पत्र. ही लोक मराठी आणि हिंदीत दोन्हीमध्ये फक्त टीआरपीची भाषा बोलतात. प्रश्न पडतो गंगाधर टिपरे, ४०५ आनंदवन, हम लोग, सुरभी अशी मेजवानी देणारी लोक कुठे लुप्त झाली ह्या खेळात 😦

  8. तुझा सत्कार करायला हवा. दिवसभर या सिरियल्स पाहिल्याबद्दल. आमच्या घरी संध्याकाळी सगळ्या बिनडोक सिरियल पाहिल्या जातात. पहिली आहे गोपी बऊ ( बहू कधीच म्हणत नाही तिला) दुसरी आहे सुहाना नावाच्या एका तद्दन निर्बुध्द मुलीची आणि तिच्या मुर्ख सासुरवाडिची.. अक्षरशः अंगावर येतात या सग्ळ्या सिरियल्स. हे सगळं पाहून झालं, की चेरी ऑन द टॉपिंग म्हणजे एक अक्षरा नावाची सिरियल आहे , त्या मधे पण बथ्थड चेहेऱ्याची एक मुर्ख मुलगी आणि तिचा मुर्ख परीवार दाखवला आहे.
    मी सरळ एखादं पुस्तक वाचायला बसतो, मध्यंतरी स्टार वर्ड वर बोन्स, नंतर फ्रेंड्स, हाऊ आय मीट युवर मदर,बर्न नोटीस वगैरे मॉडर्न फॅमिली वगैरे बरे प्रोग्राम पहायला पहायला मिळायचे, हल्लीसगळे बंद झाले आहेत.

    1. काका, सत्कार कसला, मी फक्त काही विकांत डिस्कवरी आणि ह्या चँनेलमध्ये टोगल करताना बघितलेल्या मालिका आहेत 😀 बाकी तुम्ही इतर मालिकांची दिलेली माहिती बघून जास्त टीव्ही बघत नसल्याचा गर्व वाटतो 🙂

  9. हा हा एकदम मनातलं… आम्ही तर आईमुळे वगैरे पाहायला लागल्या तर या सर्व मालिका “विनोदी” म्हणूनच पाहतो… छान लिहिलंय

  10. या मालिकेतील पहिल्या भागात असलेली पात्रे नंतरच्या तिसरया पिढी तील तरुण पात्रा पेक्षा ही तरुण कसे दिसतात याचे कोड़े कोणीतरी उलगडून दाखवावे. पाहुणे जास्त आल्यावर लग्नात जसे वरणात पाणी टाकतात तसे या मालीका लांबवण्या करता पाणी टाकत प्रसंग वाढवत जातात. पहिल्यांदा घरगुती पाणी, नंतर विहारीतील पाणी. नंतर ओढ्या नाल्याचे पाणी आणि शेवटी तर गंदया गटार चे घाण वासाचे पाणी टाकून प्रसंग मालीका लांबवत जातात. १७-२५ भागा पेक्षा जास्त एपिसोड च्या मालीका तय्यार करता येणार नाही असे कायद्याने बंधन घालावे. तसेच रहस्यकथा मालीका तर एकच एपिसोड मध्ये एक कथा अश्या असाव्यात. सारक्या लोssss खटीया १२ बजे म्हणणाऱ्या ७-८ वर्षाच्या मुलांची मुलींची त्या ही पेक्षा त्यांच्या मायबापाची कीव करावी तेव्हढी कमी

    1. ठणठणपालजी,

      एकदम मनातलं बोललात. पात्रांची वये वाढत जातात, एक आजी तिच्या पुढच्या ४ पिढ्या बघते हा दैवी चमत्कार आपल्या इथेच होतात. ह्यावर बंधने यायला हवीत. मालिकांच्या लांबीला लिमिटेशन्स असायलाच हवीत !!

  11. सुहास! अगदी अगदी १००% तेच मत आहे.मालिकालेखन क्षेत्रात थोडीफार मुशाफिरी केल्यावर तर सगळं जास्तीच पटलं! इतरांचे प्रतिसादही पटतात आणि तोच प्रश्न पडतो एकमेव, की हे सगळे, या सगळ्या मालिका कुणासाठी बरे तयार करतात?:(

    1. पंडित काका,

      आपण हे विश्व काही प्रमाणात जवळून अनुभवलं आहे. हा सगळा पैश्याचा खेळ आहे बस्स !!

  12. >> मुख्यत्वे आशालता देशमुख, ह्या रजनीकांतच्या घराण्याशी संबंधित आहेत, असा दाट संशय आहे.

    प्रचंड !!!

    महाघेरी.. !! लोल्झ अपर्णा..

    मला वाटतं मी कित्येक वर्षात एकही मालिका बघितलेली नाही. असंभव अधूनमधून बघायचो.. पण इथे फ्रेंड्स, रेमंड, किंग ऑफ क्विन्स, यस डिअर सारख्या एकसेएक भन्नाट मालिका बघून आपल्या निर्मात्यांची कीव येते रे !! कधी सुधारणार $%^%

    मनमोहन देसाईंचा एक डायलॉग आठवला. ते म्हणाले होते “प्रेक्षकाचं सरासरी मानसिक वय १३ आहे असं धरून आम्ही चित्रपट बनवतो !!!”

    1. हेरंब,

      हो रे ही लोक सुधारणार नाहीतच. बरय, तू हे बघत नाहीस. म्या पण आता सगळ्या विंग्रजी सिरीज डालो करून घेतो 😀

      धन्स रे !!

  13. Maithili

    हाहा…
    एक सुनेचा दिवस… हा काय प्रकार होता…? 😀
    आणि तो तू सहन केलास…? सहीये… 😀
    बाकी सगळ्यांना अनुमोदन… 🙂

    1. बच्चु,

      होता तो एक महाएपिसोड, सोड नाही ना बघितलास वाचलीस 😀 मी हे फक्त विकांतात सहन करतोय, बाकी काही मंडळी रोज करत आहेत त्याचं काय :p

      धन्स गं !!

  14. Deepak Parulekar

    हे असले भयंकर आणि अघोरी प्रकार ! कल्पना नाही करवत रे बाबा!
    बाकी आमच्या घरात मी असताना असलं काही सुरु नसतं!! हां ती सोनी वर एक नवीन सिरिअल आहे ना सास बिना ससुराल त्यातली ती टोस्टी काय सुंदर दिसते ना! या एका माझ्या एका वाक्यावर आमच्या मातोश्रीनी ती सिरिअल मलाही आवडते म्हणून गॄहित धरलं होतं !
    असो. हे महाएपिसोड आणि त्यांचे न संपणारे किस्से जगबुडी येईपर्यंत सुरूच राहतिल…

    1. दिप्या,

      हो रे जगबुडी व्हायला ही लोक कारणीभूत न ठरो ही अपेक्षा 😉
      टोस्टी बघितली नाही, पण इच्छा नाही बघायची काही. अजून किती स्वतःलं त्रास देऊ 🙂

      धन्स रे !!

  15. Dhundiraj Sakpal

    हा एवढा मोठा review लिहिण्यासाठी तू कधीपासून सीरिअल बघत होतास?……हा एक मोठा प्रश्न आहे ….असो
    चालायचंच हे ……. पण जेंव्हा,…कोणी सिरीअसली बोलत असेल …आणि आपण लक्ष्य देवून ऐकायला गेल्यावर कळते कि ते सीरिअल मधील कुटुंबावर बोलतायत….तेंव्हा खूप डोक्यात जातात…

    1. धुंडी,
      बस क्या.. मी एक दोन विकांत बघितले हे महाएपिसोड. बाकी टीव्ही बघत नाही. निदान अश्या सिरिअल्ससाठी तरी नक्कीच नाही 🙂

  16. प्रचंड भारी सुहास…
    मलाही सद्ध्या ह्या टॉर्चर मधुन जावं लागत आहे..
    पण चॅनल आणि निर्मात्यांची मजबूरी आहेच रे… घरून किती सपोर्ट आहे ते आपण जाणतोच की.. त्यामुळं प्रेक्षकांची आधी मानसिकता बदलली पाहिजे…

    1. अप्पा,
      हो रे निव्वळ मानसिकता जबाबदार आहे ह्याला. जोपर्यंत आपण हे बघण बंद करत नाही, तो पर्यंत हे सगळ बंद होणे अशक्य.

      धन्स रे भावा !!

  17. घरोघरी मातीच्या चुली…. मी तर ही लढाई केंव्हाच हरलो आणि टीवी बघण बहुतांशी सोडून दिल आहे…रच्याक अनेक मराठी मालिकांची शीर्षकगीत मला आवडतात…. 🙂

    1. देवा,

      हो रे, कहानी घरघर की आहे. आपण काय बोलणार, टीवी बघणं मी पण सोडलं आहे रे, हे शनिवार आणि रविवारी घरी असल्याचे परिणाम आहेत 😉

Leave a Reply to Tanvi Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.