मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा – मुंबई २०११

गेल्यावर्षी आजच्याच दिवशी एक पोस्ट टाकली होती, माझं बिन भिंतीचे घर म्हणून.  त्यावेळी सगळ्यांची एकदा भेट घेता यावी, म्हणून कांचन ताई, महेंद्र काका आणि रोहनने अथक प्रयत्न करून मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा (दासावा) इथे आयोजित केला होता. त्याला उत्कृष्ट प्रतिसाद सुद्धा मिळाला.

आपण ज्या ब्लॉग धारकाशी कमेंट्स, पोस्ट या माध्यमातून बोलतो. सूचना देतो, मनमुराद तारीफ करतो, त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायला कोणाला नाही आवडणार? गेल्यावर्षी याच उद्देशाने भरवलेला ब्लॉगर मेळावा आजपर्यंत विसरू शकलो नाही. अगदी काल परवाचं झाला असं वाटणारा, हा सोहळा अनेक आठवणी मनात कायमच्या घर करून गेल्या. सगळ्यांची भेट सुखावून गेली.  होता होता १ वर्ष संपून गेलं, कळलं सुद्धा नाही. पुन्हा एकदा, असाच एक सोहळा करायचे ठरत आहे आणि आशा आहे आपण त्याला भरभरून प्रतिसाद द्याल.

गेल्या वर्षीच्या मेळाव्याची काही क्षणचित्रे –

 

यावर्षी होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित राहण्याची इच्छा असलेल्या ब्लॉगर्स आणि वाचकांनी नाव नोंदणी इथे करावी  –    मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी

 

– सुझे   🙂

आणि सचिन नाचू लागला…

आज त्याला खुप आनंदाने नाचताना बघितलं. सगळ्यांनी त्याला खांद्यावर घेऊन मैदानाच्या चकरा मारल्या. त्याची पाठ थोपटली. मानाने भारतीय तिरंगा, त्याच्या हातात सोपवला. तो क्रिकेट विश्वचषक कप त्याच्या हाती देऊन, त्याला अक्षरशः सलाम केला…ज्याच्यासाठी हे केलं, त्या सचिन रमेश तेंडूलकरचे डोळे आज आनंदाश्रूंनी डबडबलेले होते.

खुप खडतर प्रयत्नानंतर हे अद्भुत यश, भारतीय संघाला मिळाले आहे ते सुद्धा तब्बल २८ वर्षांनी. भले कोणी काही म्हणो, काही पर्वा नाही मला. आज खुप आनंद झालाय. दिवसभर जो खेळाचा रोमांच अनुभवला तो शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. एकावेळी अशी हालत होती की, सामना आपल्या हातून निसटतोय की काय. सगळे टीव्ही बंद करून, आपापल्या कामाला लागले. पण मन सांगत होत नाय रे जिंकू, आरामात खेळल तर मॅच आपलीच आहे आणि तेच झालं.

जेव्हा आपण सामना जिंकला तेव्हा, सगळे आनंदाने नाचत होते, पण सचिन काही दिसत नव्हता. काही मिनिटानंतर, ड्रेसिंग रूम मधून सचिन धावत बाहेर आला, चेहऱ्यावर निरागस हास्य, अप्रतिम आनंद आणि उंचावलेले हात. एखादा लहान मुलगा मी परीक्षेत यशस्वी झालो, असं सांगत धावत येतो ना आई-बाबांकडे तसा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. खुप भरून आलं. त्याने एवढ केलं आपल्या देशासाठी, पण कारकीर्दीत विश्वचषक जिंकून दिला नाही हा कलंक (????) {आयचा घो, आधी हे कोण बोलले त्याला शोधा रे} त्याच्या माथी मारला, पण त्याच्याकडे याचे सुद्धा उत्तर होत आज.

 

जिंकलो रे जिंकलो....

 

 

सssचिsssन .... सsssचिsssन...

आजचा विजय संपूर्ण भारत देशासाठी आणि खास आपल्या लाडक्या तेंडल्यासाठी..

स्पर्धेत सगळ्यांनी केलेल्या कष्टाचे आज चीज झालं आणि भारत क्रिकेट विश्वविजेता झाला. सर्वांचे खुप खुप अभिनंदन !!!

 

विशेष सूचना – इथे येऊन फिक्सिंग किंवा तत्सम कमेंट्स टाकून माझ्या आनंदावर विरजण घालू नये. अशी लोक जगाच्या वेगळ्या कोपऱ्यात असतात जिथे, क्रिकेट हा फक्त चेंडू-फळी म्हणून ओळखला जातो. आमचा आनंद तुम्हाला नाही कळणार.. धन्यवाद !!

– सुझे 🙂