सरतेशेवटी सत्यसाईबाबा अनंतात विलीन झाले.. (असंच लिहितात ना?) आज सकाळपासून त्यांच्या अत्याविधीचे थेट, आपलं लाईव्ह प्रक्षेपण सुरु होतो. गेले ३ दिवस हा प्रकार सुरु होता म्हणा. कोण रडले, कोण काय बोलले, त्यांची संपत्ती किती, त्यांचे शिष्य किती, तो बाबा खरा होता की खोटा, यावर प्रचंड काथ्याकुट झाला. माझा देवबाप्पा त्या बाबांच्यासमोर देहासमोर बसून शोकाकुल रडला, हे ही किती तरी वेळा बघितलं, नव्हे तेच तेच दाखवलं. सगळ सगळ बघत आलो हे गेले तीन दिवस. त्यांनी आयुष्यभर जमा केलेल्या मायेचा, माफ करा ट्रस्टचा पुढला धनी कोण यावर चिंतन सुरु आहे सध्या. ट्रस्टपण काही छोटी नाही, तब्बल १ लाख ४० हजार कोटीं रुपयाची मालमत्ता आहे. तुम्ही म्हणाल, हे सगळ का सांगतोय?
मी त्यांच्या विषयी बोलणारा कोण? त्यांनी पैसा कमावला, लोकांची सेवा केली आणि आता ते गेले. लोकांनी श्रध्दांजली वाहिली, त्यांना शांती मिळाली. एक बाबा इतकी संपती जगभरातून गोळा करतो, आणि त्याचा काही भाग लोकांसाठी वापरतो आणि त्याचा उदो उदो होतो. आता ती ट्रस्टच्या नावे असल्याने कोणी चौकशी करायचा प्रश्न नाहीच. आता तो सगळा पांढरा पैसा आहे.
असो, माझा बोलायचा मुद्दा हा नाही. आपण भारतात राहतो आणि बडे बडे देशो मैं, ऐसी छोटी छोटी बाते होती रहती हैं. आपल्या देशात पैश्याला काही म्हणजे काहीही कमी नाही हे दाखवायला एक उदाहरण सांगितलं. गेल्या एका वर्षात जितके घोटाळे बाहेर आले आहेत, त्याने आपण काही देशांच्या बजेटचा डोलारा उचलू शकलो असतो. १२ हजार कोटी काय, ७० हजार कोटी काय… किती किती पैसा आहे आपल्या देशात, पण साला आपलंच नशीब पांडू म्हणून रोज ऑफिसला जा, मरमर काम करा. महिन्याच्या शेवटी पोटाला चिमटे काढत जगा, हौसमौज टाळा. आपला जन्म हा केवळ असाच जाणार. ह्याउलट अशी लोक आहेत ज्यांना पैसे ठेवायला जागा नाही. स्विस बँकमध्ये १०-१२ खाती काय, ७०-८० मजल्याची घर ती काय, फिरायला ऊंची गाड्यांचा ताफा तो काय, जीव जपायला केलेली सुरक्षायंत्रणा काय.सगळ कसं स्वप्नवत.
पैसा कमावत असताना ह्यांनी केलेले कष्ट (???) जगजाहीर आहेतच. मोठमोठ्या लोकांकडून चुटकीसरशी कामे करून देणारा पैसा ह्यांच्या हातचा मळ. ह्या लोकांना भीती कशाचीही नाही, कालसुद्धा जेव्हा कलमाडीला कोर्टातून बाहेर आणलं, तेव्हा साहेब असे बाहेर आले की, त्यांनी भारतरत्न मिळवलं आहे. त्यांच्यावर सॉरी त्याच्यावर जेव्हा चप्पल फेकून मारली आणि त्याचा नेम चुकला, तर हे ध्यान दात काढून हसत होत. लाज, शरम, भीती, कायदा ह्या सगळ्या तुच्छ गोष्टी आहेत.
गेल्या दोन तीन दिवसात कानावर आलेल्या बातम्यांमध्ये अजून एक बातमी होती, ती ज्युलिअन असांजेची. टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं की त्याने स्वतः स्विस बँकची माहिती बघितली आहे आणि त्यात अनेक भारतीय नावे आहेत. त्यांच्या नावावर भला मोठा पैसा जमा आहे. जगातला सगळ्यांत जास्त काळा पैसा हा भारतातूनच येतो (बातमी) आणि त्याचे पुरावेदेखील तो लवकरच देणार आहे. त्याने भारतीयांना सांगितलं आहे “Don’t Loose Hopes Completely, We will soon put those names in front of you”
हे तर आपल्या देशातील लोकसुद्धा, कित्येक वर्ष ओरडून सांगत आहेत. विरोधक थोडे दिवस हल्लाबोल करतात पण हे सगळ नावापुरतं. कारण त्यांचीही खाती जोपर्यंत तिथे भरली जात नाही, तोपर्यंत हे इथे गोंधळ घालणार. एकदा का पैसे पोचल्याची पोचपावती आली, की मुग गिळून गप्प राहायचं आणि दुसऱ्या मुद्द्यावर सरकारला धाऱ्यावर धरायचं.
खरंच सांगतो, आता पेशन्स नाही आणि खात्री तर नाहीच नाही. जे आजवर बघितलं आहे त्यानंतर जरी ती नावे बाहेर आली त्या बँकेमधून, तरी काही फरक पडणार नाही असंच दिसतंय. विकीलिक्सला सुरुवातीला अमेरिकेतून जास्त विरोध होता, पण आता तो भारतातून आहे. एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जशी कमीतकमी पैश्यात लोकांना काम करायला लावून जगवते आणि आपण वारेमाप नफा ओढत राहते. 😦
खरंच सांगा कुठे आहे होप? नक्की कुठे जातोय आपण? काय होणार पुढे?
– सुझे