न्यूज़ रूम !!!


कृष्णकांत यांचा अब तक न्यूज़ चॅनेलमध्ये पहिला दिवस. आपल्या वरिष्ठ सभासदांशी ओळख आणि चॅनेलचा टीआरपी कसा वाढवावा याबद्दल एक चर्चा करायची असं त्यांनी ठरवलं होतं. सगळेच गडबडीत होते त्यामुळे आजच नवीन बॉस आला आणि लगेच अशी मोठी मीटिंग म्हटल्यावर सगळेच चिंतातुर झाले. बॉसला वॉशरूममध्ये यथेच्छ शिव्या घालून, टाय, इस्त्रीचा शर्ट सावरून सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जमा झाले.

सगळ्यांची ओळख झाली, इतर न्यूज़ चॅनेल्स आणि अब तकची आकडेवारी प्रोजेक्टरवर दाखवली गेली. चॅनेलचे बोर्ड ऑफ डाइरेक्टर्स मोठी बॉस मंडळी टीवी कॉन्फरन्सद्वारे मीटिंगमध्ये सहभागी झाले होते. सगळ्यांचा चेहरा विचारात पडला होता, काय करावं सुचत नव्हतं. इतकी चांगली बातमी गोळा करून, ती सगळ्यात आधी जनतेला देऊन सुद्धा बाकी चॅनेल्स टीआरपीमध्ये अब तकला मात देत होती. त्यांनी आपली ही चिंता आपल्या सहकार्‍यांपुढे बोलून दाखवली . काय करावं की सगळे आपलं चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल? मला तुम्ही काही सूचना सुचवा.

सगळे एकमेकांकडे बघायला लागले. त्यातलाच एक तरुण उभा राहिला आणि म्हणाला, “सर आपण न्यूज़पेक्षा अजून काही वेगळं द्यायला हवं. म्हणजे काही विशेष बातम्या द्यायला हव्या. नवनवीन कार्यक्रम आले की आपल्याला जाहिरातदार मिळतील, तसेच वेगळे कार्यक्रम दाखवले म्हणून प्रेक्षकसुद्धा आकर्षित होतील.

कृष्णकांत – (विचित्र नजरेने) म्हणजे नक्की कुठले कार्यक्रम? आपण बातम्या पोचवतो आणि तेच आपलं काम!

तो – अहो सर, त्याच त्या बातम्या बघून प्रेक्षक हैराण होतात. त्यांना काही बदल लागतो. आपण २४ तास बातम्या देत राहणार तर आपण मागेच राहणार. आपल्याला नवनवीन कार्यक्रम ह्या बातम्यांच्या मध्ये घालायला हवेत. काही तरी चटपटीत बघायला लोकांना नक्कीच आवडतं.

कृष्णकांत – कुठले कार्यक्रम?

तो – सोप्पय! चित्रपटांचे परीक्षण, लोकांचं भविष्य, पेज-थ्रीच्या आतल्या गप्पा, टीवीमधल्या मालिकांचं विश्लेषण, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत, तीर्थक्षेत्राचा महिमा सांगणे, खेळाबद्दल विशेष माहिती, किंवा चार पाच यू-ट्यूबवरचे वीडियो घेऊन परत परत दाखवत राहायचे. तसेच काही पाककृतींचे कार्यक्रमही  अर्ध्या अर्ध्या तासाचे भाग असे आपण दर तासाला दाखवू शकतो.

कृष्णकांत – ह्म्म्म्म, ह्या गोष्टी मला अवांतर वाटतात. अजिबात गरजेच्या नाहीत. लोक बातम्या बघायला आपल्याकडे येणार आणि आपण असा मसाला त्यांना देणार. नाही हे चूक आहे.

तो – हं, बरोब्बर. पण आपण धंदा करतोय. आपल्याला स्पर्धेत राहायला असं काही तरी करायलाच हवं. आपण एक एक तासाचे विशेष भाग दाखवू. इतके दहशतवादी हल्ले झालेत आपल्या देशात. आठवड्याला एक असा एक हल्ला आणि त्याचं विश्लेषण करून घेऊ किंवा देवांवर आधारित कार्यक्रम दाखवू, स्वर्गाच्या पायर्‍या, सीताहरण कस झालं हे सांगू, किंवा एखाद्या सुपरस्टारचं लग्न होऊन सहा महिने झाले तरी ते तसे जवळ आले नाही.. अशी बातमी दाखवू. त्यात त्या सुपरस्टारला पब्लिसिटी मिळते आणि आपल्याला धंदा, किंवा राजकारणातला भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा विषय, जो आपल्याला पैसे देईल त्याच्या विरोधकांवर तुटून पडायचं.

कृष्णकांत – (मोठ्याने ओरडत) What Rubbish, डोकं ठिकाणावर आहे का तुमचं, काय बोलताय तुम्ही? आपण पत्रकारिता करतो. असं काही केलं तर लोक शेण घालतील तोंडात.  मला नाही आवडली ही कल्पना.

तो – सर, विश्वास ठेवा. लोकांना हेच बघायला आवडतं आजकाल. एक प्रिन्स खड्ड्यात पडतो आणि ती चार दिवस ब्रेकिंग न्यूज़ होऊ शकते. वाराणसीमध्ये जेव्हा बॉम्बब्लास्ट होतो ती ब्रेकिंग न्यूज़, भारताने मॅच जिंकली ह्या ब्रेकिंग न्यूज़च्या मागे दडून जाऊ शकते. सर, आपण काही करू शकतो. आपण मीडिया आहोत. आपण खर्‍याचं खोट आणि खोट्याचं खरं करू शकतो. एका छोट्यात छोट्या बातमीला कसं मोठं करायचं ते आपल्या हातात असतं. आणि कितीही मोठी बातमी असेल ती आपण ब्रेक न करता त्या बातमी मधून हवा काढू शकतो. आपल्याला बातमी मोठी आणि छोटी दोन्ही करायला पैसे मिळतील सर. Trust me, Sir.

कृष्णकांत – हे सगळं नवीनच ऐकतोय. मला नाही वाटत हे ठीक आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा पाया आहे. आपल्याला असे वर्तन शोभा देणार नाही.

तो – सर, चिक्कार पैसा मिळेल आपल्याला. लोकांना बातम्या काय न्यूज़ पेपर्सपण देतात, मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक असायला नको?

कृष्णकांत – (चिडून ओरडत) नाही हे मला, अजिबात आवडलं नाही. This is nonsense. I will not let this happen here.

सगळे शांत झाले. कोणालाच काही बोलायचा धीर होत नव्हता. तेवढ्यात स्पीकरमधून मोठ्या साहेबाचा आवाज आला. सगळ्यांनी बाहेर जा. मला कृष्णकांतशी बोलायचे आहे. सगळे बाहेर निघून गेले. कोणालाच कळले नाही आत काय होतंय.

अब तकमध्ये दुसरा दिवस –

सकाळी ७ ला बातम्या.. ७:२० ला गणपतीची आरती….७:३० ला भविष्य कथन… ८ ला ठळक बातम्या…८:१० ला चुलबुली राखीची मुलाखत…८:३० ला काही गमतीदार यू ट्यूब वीडियोज….९ ला विशेष व्यक्तीची मुलाखत… ९:३० ला क्रिकेट… १० ला ब्रेकिंग न्यूज़.. अमिताभला ताप आला… ११ कसाबला मराठी कसं यायला लागलं यावर विशेष एक तासाचा भाग….१२ ला ठळक बातम्या…१२:३० ला टीवी मालिकांचे भाग आणि चर्चा..१ ला कुकिंग शो…२ ला कोणाची तरी मुलाखत…३ ला घोटाळा…३:३० ला सिनेमाची गाणी.. मग थोड्यावेळाने सकाळपासूनच सगळं पुन:प्रक्षेपण.

आजच्या घडीला, अब-तक भारतातील नंबर एक न्यूज़ चॅनेल आहे. चॅनेलचे मालक आता निवांत आहेत ही प्रगती बघून. सगळे आता त्यांच्या कल्पना वापरून, आपलं स्पर्धेतील अस्तित्व टिकवू पाहत आहेत. लोकांना मनोरंजनाचं एक उपयुक्त साधन मिळालंय.

कृष्णकांतच्या मीटिंगमध्ये न्यूज़ चॅनेलच्या नवीन संकल्पना सांगणारा तो तरुण, आज अब-तकच्या ऑफिसमध्ये न्यूज़ रूममध्ये मीटिंग घेऊन लोकांना ऑर्डर देतोय आणि हो कृष्णकांत यांची, तीच पहिली आणि शेवटचीच मीटिंग होती त्या ऑफिसात.

– जालरंग प्रकाशनाच्या हास्यगाऽऽरवा २०११ या होळी विशेषांकात हा लेख आधी प्रकाशीत झाला होता, आपणास वाचण्यासाठी इथे पुन्हा देत आहे.

– सुझे

12 thoughts on “न्यूज़ रूम !!!

  1. हास्यगारवा मधे वाचलं होतं…पुन्हा एकदा वाचुन पुन्हा एकदा आवडलं…

  2. “१० ला ब्रेकिंग न्यूज़…” हे आवडलं.
    “लोकांना बातम्या काय न्यूज़ पेपर्सपण देतात, मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक असायला नको?”.. “त्या”ला वर्तमानपत्र जे देतात त्या बातम्या आहेत असं वाटतंय, अजून. सहीच 🙂

    1. अनिश,
      हा हा हा … तो पण गैरसमज आहे रे अजून आपल्या इथे. असो वर्तमानपत्र कामी तरी येतात 😛

  3. न्यूज रूम !!! झक्कास आज काल वाहिन्यांनी जो बातम्यांचा बाजार मांडला आहे त्याची आपण चांगलीच खिल्ली उडविली आहे. जेथे राखी ची मुलाखत रात्री लेट नाईट ला ठेवावी असे सामाजिक संस्था ची मागणी असताना ती चक्क सकाळी ८:१० ला चुलबुली राखीची मुलाखत … TRP वाढणारच…..१०१% धंदा .… त्याच बरोबर धर्म आणि मंदिर संस्थानांचे वाढते प्रस्थ पाहता बातम्या पेक्षा त्यांना जास्त महत्व आले आहे हे नक्कीच सकाळी सगळीकडे राशीफळ, धर्म , मंदिर दर्शनाच चालू असते. यामुळे आयतीच मंदिराची जाहिरात होवून भक्त वाढतात. ब्रेकिग न्यूज ने तर उच्छाद मांडला . भिक नको पण कुत्रे आवर अशी ब्रेकिग न्यूज पाहणाऱ्यांची अवस्था होते. दुपारी तर फक्त स्त्रियाच TV पाहत असतात असा या वाहिन्यांचा समज कोणी करून दिला देव जाणे ज्याने हा शोध लावला त्यास ब्रेकिंग न्यूज देवून जाहीर फाशी दिली पाहिजे. या वेळी फक्त सासू सून, कुटुंब कलह मेजवानी पाक यात्रा याच्या पलीकडे विषय जात नाही. अजित पवारांनी म्हटल्या प्रमाणे या वाहिन्यांवर अंकुश लावलाच पाहिजे हे मात्र खरे आहे.

    1. हो ना, सकाळी ७ ची सुरुवात ब्रेकिग न्यूज ने होते. आता ह्या शब्दाला काही अर्थच उरला नाही. उद्या अमिताभला जुलाब लागले तर ती सगळ्यांत मोठी ब्रेकिंग न्यूज होऊ शकते यावर ठाम विश्वास आहे माझा.

  4. Gurunath

    सुहास ,मी हा लेख होळी स्पेशल इश्यु मधे वाचला आहे, लै भारी लिहिला आहे बे!!!! बोहोत खास…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.