न्यूज़ रूम !!!

कृष्णकांत यांचा अब तक न्यूज़ चॅनेलमध्ये पहिला दिवस. आपल्या वरिष्ठ सभासदांशी ओळख आणि चॅनेलचा टीआरपी कसा वाढवावा याबद्दल एक चर्चा करायची असं त्यांनी ठरवलं होतं. सगळेच गडबडीत होते त्यामुळे आजच नवीन बॉस आला आणि लगेच अशी मोठी मीटिंग म्हटल्यावर सगळेच चिंतातुर झाले. बॉसला वॉशरूममध्ये यथेच्छ शिव्या घालून, टाय, इस्त्रीचा शर्ट सावरून सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जमा झाले.

सगळ्यांची ओळख झाली, इतर न्यूज़ चॅनेल्स आणि अब तकची आकडेवारी प्रोजेक्टरवर दाखवली गेली. चॅनेलचे बोर्ड ऑफ डाइरेक्टर्स मोठी बॉस मंडळी टीवी कॉन्फरन्सद्वारे मीटिंगमध्ये सहभागी झाले होते. सगळ्यांचा चेहरा विचारात पडला होता, काय करावं सुचत नव्हतं. इतकी चांगली बातमी गोळा करून, ती सगळ्यात आधी जनतेला देऊन सुद्धा बाकी चॅनेल्स टीआरपीमध्ये अब तकला मात देत होती. त्यांनी आपली ही चिंता आपल्या सहकार्‍यांपुढे बोलून दाखवली . काय करावं की सगळे आपलं चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल? मला तुम्ही काही सूचना सुचवा.

सगळे एकमेकांकडे बघायला लागले. त्यातलाच एक तरुण उभा राहिला आणि म्हणाला, “सर आपण न्यूज़पेक्षा अजून काही वेगळं द्यायला हवं. म्हणजे काही विशेष बातम्या द्यायला हव्या. नवनवीन कार्यक्रम आले की आपल्याला जाहिरातदार मिळतील, तसेच वेगळे कार्यक्रम दाखवले म्हणून प्रेक्षकसुद्धा आकर्षित होतील.

कृष्णकांत – (विचित्र नजरेने) म्हणजे नक्की कुठले कार्यक्रम? आपण बातम्या पोचवतो आणि तेच आपलं काम!

तो – अहो सर, त्याच त्या बातम्या बघून प्रेक्षक हैराण होतात. त्यांना काही बदल लागतो. आपण २४ तास बातम्या देत राहणार तर आपण मागेच राहणार. आपल्याला नवनवीन कार्यक्रम ह्या बातम्यांच्या मध्ये घालायला हवेत. काही तरी चटपटीत बघायला लोकांना नक्कीच आवडतं.

कृष्णकांत – कुठले कार्यक्रम?

तो – सोप्पय! चित्रपटांचे परीक्षण, लोकांचं भविष्य, पेज-थ्रीच्या आतल्या गप्पा, टीवीमधल्या मालिकांचं विश्लेषण, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत, तीर्थक्षेत्राचा महिमा सांगणे, खेळाबद्दल विशेष माहिती, किंवा चार पाच यू-ट्यूबवरचे वीडियो घेऊन परत परत दाखवत राहायचे. तसेच काही पाककृतींचे कार्यक्रमही  अर्ध्या अर्ध्या तासाचे भाग असे आपण दर तासाला दाखवू शकतो.

कृष्णकांत – ह्म्म्म्म, ह्या गोष्टी मला अवांतर वाटतात. अजिबात गरजेच्या नाहीत. लोक बातम्या बघायला आपल्याकडे येणार आणि आपण असा मसाला त्यांना देणार. नाही हे चूक आहे.

तो – हं, बरोब्बर. पण आपण धंदा करतोय. आपल्याला स्पर्धेत राहायला असं काही तरी करायलाच हवं. आपण एक एक तासाचे विशेष भाग दाखवू. इतके दहशतवादी हल्ले झालेत आपल्या देशात. आठवड्याला एक असा एक हल्ला आणि त्याचं विश्लेषण करून घेऊ किंवा देवांवर आधारित कार्यक्रम दाखवू, स्वर्गाच्या पायर्‍या, सीताहरण कस झालं हे सांगू, किंवा एखाद्या सुपरस्टारचं लग्न होऊन सहा महिने झाले तरी ते तसे जवळ आले नाही.. अशी बातमी दाखवू. त्यात त्या सुपरस्टारला पब्लिसिटी मिळते आणि आपल्याला धंदा, किंवा राजकारणातला भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा विषय, जो आपल्याला पैसे देईल त्याच्या विरोधकांवर तुटून पडायचं.

कृष्णकांत – (मोठ्याने ओरडत) What Rubbish, डोकं ठिकाणावर आहे का तुमचं, काय बोलताय तुम्ही? आपण पत्रकारिता करतो. असं काही केलं तर लोक शेण घालतील तोंडात.  मला नाही आवडली ही कल्पना.

तो – सर, विश्वास ठेवा. लोकांना हेच बघायला आवडतं आजकाल. एक प्रिन्स खड्ड्यात पडतो आणि ती चार दिवस ब्रेकिंग न्यूज़ होऊ शकते. वाराणसीमध्ये जेव्हा बॉम्बब्लास्ट होतो ती ब्रेकिंग न्यूज़, भारताने मॅच जिंकली ह्या ब्रेकिंग न्यूज़च्या मागे दडून जाऊ शकते. सर, आपण काही करू शकतो. आपण मीडिया आहोत. आपण खर्‍याचं खोट आणि खोट्याचं खरं करू शकतो. एका छोट्यात छोट्या बातमीला कसं मोठं करायचं ते आपल्या हातात असतं. आणि कितीही मोठी बातमी असेल ती आपण ब्रेक न करता त्या बातमी मधून हवा काढू शकतो. आपल्याला बातमी मोठी आणि छोटी दोन्ही करायला पैसे मिळतील सर. Trust me, Sir.

कृष्णकांत – हे सगळं नवीनच ऐकतोय. मला नाही वाटत हे ठीक आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा पाया आहे. आपल्याला असे वर्तन शोभा देणार नाही.

तो – सर, चिक्कार पैसा मिळेल आपल्याला. लोकांना बातम्या काय न्यूज़ पेपर्सपण देतात, मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक असायला नको?

कृष्णकांत – (चिडून ओरडत) नाही हे मला, अजिबात आवडलं नाही. This is nonsense. I will not let this happen here.

सगळे शांत झाले. कोणालाच काही बोलायचा धीर होत नव्हता. तेवढ्यात स्पीकरमधून मोठ्या साहेबाचा आवाज आला. सगळ्यांनी बाहेर जा. मला कृष्णकांतशी बोलायचे आहे. सगळे बाहेर निघून गेले. कोणालाच कळले नाही आत काय होतंय.

अब तकमध्ये दुसरा दिवस –

सकाळी ७ ला बातम्या.. ७:२० ला गणपतीची आरती….७:३० ला भविष्य कथन… ८ ला ठळक बातम्या…८:१० ला चुलबुली राखीची मुलाखत…८:३० ला काही गमतीदार यू ट्यूब वीडियोज….९ ला विशेष व्यक्तीची मुलाखत… ९:३० ला क्रिकेट… १० ला ब्रेकिंग न्यूज़.. अमिताभला ताप आला… ११ कसाबला मराठी कसं यायला लागलं यावर विशेष एक तासाचा भाग….१२ ला ठळक बातम्या…१२:३० ला टीवी मालिकांचे भाग आणि चर्चा..१ ला कुकिंग शो…२ ला कोणाची तरी मुलाखत…३ ला घोटाळा…३:३० ला सिनेमाची गाणी.. मग थोड्यावेळाने सकाळपासूनच सगळं पुन:प्रक्षेपण.

आजच्या घडीला, अब-तक भारतातील नंबर एक न्यूज़ चॅनेल आहे. चॅनेलचे मालक आता निवांत आहेत ही प्रगती बघून. सगळे आता त्यांच्या कल्पना वापरून, आपलं स्पर्धेतील अस्तित्व टिकवू पाहत आहेत. लोकांना मनोरंजनाचं एक उपयुक्त साधन मिळालंय.

कृष्णकांतच्या मीटिंगमध्ये न्यूज़ चॅनेलच्या नवीन संकल्पना सांगणारा तो तरुण, आज अब-तकच्या ऑफिसमध्ये न्यूज़ रूममध्ये मीटिंग घेऊन लोकांना ऑर्डर देतोय आणि हो कृष्णकांत यांची, तीच पहिली आणि शेवटचीच मीटिंग होती त्या ऑफिसात.

– जालरंग प्रकाशनाच्या हास्यगाऽऽरवा २०११ या होळी विशेषांकात हा लेख आधी प्रकाशीत झाला होता, आपणास वाचण्यासाठी इथे पुन्हा देत आहे.

– सुझे

दुनोळी…

आज मी आनंद काळेच्या बझ्झवर केलेला एक प्रताप (दुनोळी) ब्लॉगवर टाकतोय. दुनोळी हा आम्हीच तय्यार केलेला एक काव्य (?) प्रकार आहे. एखादा विषय घेऊन सुरु करायची दोन दोन ओळींची मारामारी. आमच्या ह्या चर्चेचा विषय पण तसा उत्तमच होता – “माझ्यासाठी कोण आहेस तू..??”

मग केलेला एक प्रयत्न हा असा… 🙂

गर्द धुक्यात हरवलेली वाट तू..
माझ्या आयुष्यात झालेली सुंदर पहाट तू…

पहिल्या पावसाने दरवळलेला मातीचा सुगंध तू..
आजवर बघितलेलं सुंदर स्वप्न तू…

हिरव्या नवलाईने नटलेल माळरान तू..
पावसा पाठोपाठ कोकिळेने धरलेली तान तू..

वाळवंटात मृगजळाने भागलेली तहान तू..
हळूच खुदकन हसणारे मुल लहान तू…

मनाचे बांधकाम पक्क करणारी तू…
तुझ्या प्रेमाने थक्क करणारी तू..

स्वच्छंदी उंच भरारी घेणारा पक्षी तू…
रांगोळीच्या रंगात नटलेली नक्षी तू….

उकडीच्या मोदकातला गोड मसाला तु..
गरम गरम वरणभातावर सोडलेली तुपाची धार तु…

प्रेमात उत्स्फूर्त केलेलं मुक्तछंद तू..
मसाला पानातला गोड गुलकंद तू…

भविष्याच्या विचारात अथांग रमणारी तू
माझेच विश्व होऊन माझ्यातच हरवणारी तू..

काटेरी फणसातले गोड गोड गरे तू..
डोंगरकपाऱ्यातून वाहणारे शुभ्र झरे तू..

उफाळत्या तेलात मस्त पोहणारे वडे तू..
अशक्य अश्या चढणीचे सह्याद्रीचे कडे तू..

शुभ्र चंदन लेवून नभी आलेला चंद्र तू..
रात्रीचा दरवळणारा तो निशिगंध तू…

माऊताई ने बनवलेल्या केकवरच आयसिंग तू..
सचिनच्या बॅटमधून निघालेल्या स्ट्रेट शॉटचं टायमिंग तू…

मनात घोळत असलेले अविरत विचार तू..
शाळेतल्या फळ्यावर लिहिलेला सुविचार तू…

माझ्या मनाचे अंतरंग तू…
प्रीतीचे उठलेले स्वरतरंग तू…

माझ्या जखमेवर मारलेली हळुवार फुक तू…
वेड लावणारी वार्‍याची झुळूक आहेस तू..

लाजतेस किती गोड तू…
जसा तळहातावर जपलेला फोड तू…

बागेत हळुवार उमलणारी कळी तू.
हळूच गालावर फुलणारी खळी तू..

रात्र जागून केलेला देवीचा जागर तू..
दगडालाही फुटलेला प्रेमाचा पाझर तू… .

कधीही न सुटलेलं गणित तू..
माझ्या आयुष्याचे झालेलं फलित तू…

ब्लॉग सुरु करून दीड वर्ष झाले. महेंद्र काका आणि हेरंब ह्यांच्यामुळेच माझा हा ब्लॉगप्रपंच सुरु झाला आणि तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच लिहिण्याचा उत्साह (किडा) आजपर्यंत कमी झालेला नाही. हां आळशीपणा करतो कधी कधी, पण नियमित काही ना काही खरडणे हा केलेला निश्चय आहे. आज नेमकी शंभरावी पोस्ट, काय लिहावं सुचत नव्हत, त्यामुळे काही निवडक दुनोळ्या इथे पोस्ट करतोय. मान्य आहे असह्य आहे पण… चालवून घ्या प्लीज 🙂

तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार…असाच लोभ असू द्या 🙂

तुम्हाला सगळ्यांच्या दुनोळ्या वाचायच्या असतील तर इथे क्लिक करून दीपकचा ब्लॉग वाचा…

– सुझे 🙂

IPv 6.0

गेल्या काही वर्षात आपल्या रोजच्या वापरातलं इंटरनेट असं काही लोकप्रिय झालंय, की आजच्या घडीला ज्याला इंटरनेट माहित नाही तो अडाणीचं ग्राह्य धरला जातो. मी जेव्हा अकरावीत होतो तेव्हा, सायबर कॅफेमध्ये जाऊन पहिल्यांदा माझा ईमेल एड्रेस बनवला होता याहूवर. तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात आता पार जमीन आसमानाचा फरक झालाय. अतीव संशोधन करून विकसीत केल्या गेलेल्या प्रणाली, नवीन तंत्रज्ञान यामुळे वाढलेली स्पर्धा यामुळे इंटरनेट सहजतेने उपलब्ध होऊ लागलं. जेव्हढ्या प्रचंड प्रमाणावर याचा वापर सुरु झाला, तसच काही गोष्टीवर निर्बंध येऊ घातलेत लवकरच, जे आपल्याला जगभर पाहायला मिळतील ह्या वर्ष अखेरीस.

आपल्या पीसीचा वर्ल्ड वाईड वेबवर असलेला पत्ता (आयपी एड्रेस) आता नवीन रुपात दिसणार आहे. नवीन रुपात म्हणजे सांगतो ना, प्रश्न आणि उत्तर अश्या पद्धतीने.

आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) एड्रेस म्हणजे नक्की काय?

आपण १९८२ पासून जगभर ही अंक ओळख वापरतोय. आयपी एड्रेसची साधी सरळ सोपी व्याख्या म्हणजे – वर्ल्ड वाईड वेब (इंटरनेट) वर तुमच्या संगणकाची असलेली सांकेतिक ओळख अंकांच्या स्वरुपात. हे अंक तुमच्या संगणकाला जागतिक नेटवर्कशी (डिजीटल स्वरुपात) जोडण्यास आणि माहिती आदानप्रदान करण्यात उपयुक्त ठरतात.

आयपी एड्रेस ४.० नक्की कसा असतो?

आपण सध्या जे आयपी एड्रेस व्हर्जन वापरतो ते आहेत IPv4. ह्या आयपी एड्रेसमध्ये चार क्रमांक असतात, जे प्रत्येकी तीन अंकी असतात. हा साधारणपणे XXX.XXX.XXX.XXX असा असतो (उदारणार्थ १७२.८.९.०). ह्यात “X” च्या जागी ० ते २५५ ह्या मधले कुठलेही अंक असू शकतात. ह्यामध्ये प्रत्येक तीन अंकी क्रमांक ८ बीट्सचे असतात. बीट्स हे एक मापक आहे संगणक गणिती प्रणालीचे, ज्यात प्रत्येक अंक त्या उपकरणात डीजीटली किती माहिती साठवलेली आहे त्याची जागा दर्शवितो. त्यानुसार आयपी व्हर्जन ४.० मध्ये ८+८+८+८=३२ बीट्स आहेत.

आयपी एड्रेस व्हर्जन ६.० ची गरज ती काय?

वर दिलेल्या माहितीनुसार ३२ बीट्सचा असलेला आयपी एड्रेस व्हर्जन ४.० आपल्याला ४,२९४,९६७,२९६ इतके युनिक पब्लिक एड्रेस देऊ शकणार होता. आता इतक्या प्रमाणात इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे साहजिकच जितके कॉम्बिनेशन्स आपण वापरू शकत होतो ते संपू लागलेत आणि तेव्हाच इंटरनेटच्या पुढच्या पिढीची म्हणजेच आयपी एड्रेस व्हर्जन ६.० ची सन १९९५ मध्ये निर्मीती करण्यात आली.

आयपी एड्रेस व्हर्जन ६.० कसा असतो आणि याचे फायदे काय?

इंटरनेटची पुढची पिढी व्हर्जन ६.० खुप संशोधनातून तयार केली गेली आहे. व्हर्जन ४.० च्या तुलनेत व्हर्जन ६.० मध्ये १२८ बीट्सची क्षमता आहे. हे तयार करताना मागील व्हर्जनमधल्या तीन अंक स्वरुपात बदल करून तो चार अंकी करण्यात आला आणि चार क्रमांक वाढवून ८ करण्यात आले. म्हणजेच चारपट जास्त आयपी एड्रेस आपल्याला मिळतील. हा साधारपणे XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX:XXXX अश्या फॉर्ममध्ये दिसेल (उदाहरणार्थ – 3ffe:1900:4545:3:200:f8ff:fe21:67cf). आपणास फरक जाणवेल की जुन्या व्हर्जनमध्ये दोन अंकांच्यामध्ये डॉट (.) होता आणि इथे कोलन् ( : ) आहे. ह्यामध्ये अजून एक महत्वपूर्ण केलेला बदल म्हणजे, ह्या आयपी एड्रेसमध्ये अक्षरसुद्धा असतील अंकांबरोबर A to F पर्यंत. ह्यामध्ये एक चार अंकी क्रमांक हा १६ बिट्सचा असणार (अंक आणि अक्षर असल्याने) आहे. त्यामुळे १६+१६+१६+१६+१६+१६+१६+१६=१२८ बिट्स. ह्या प्रकारच्या आयपी एड्रेस व्हर्जनमुळे जगभर नवीन ३४०,२८२, ३६६,९२०, ९३८,४६३,४६३,३७४,६०७,४३१,७६८,२२१,४५६ इतके युनिक आयपी उपलब्ध होतील. 🙂

आयपी एड्रेस व्हर्जन ६.० कधी पासून उपलब्ध होईल?

ह्या वर्ष अखेरीस जगभर व्हर्जन ६.० वापरायला सुरुवात होईल. अमेरिकेत मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोन शहरात आमच्या कंपनीने व्हर्जन ६.० देण्यास प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली होती. सुरुवातीला थोडा गोंधळ उडाला होता, पण मग सगळ सुरळीत झालं. आपल्या भारतातसुद्धा फेब्रुवारीपासून हे काम सुरु झालंय.

हे वापरण्यासाठी आपल्याला बदल करावे लागतील का?

हे व्हर्जन वापरण्यासाठी आपल्याला हार्डवेअरमध्ये काहीही बदल करावे लागणार नाहीत एक मोडेम रिसेट सोडून (काही ठिकाणी राऊटर रि-कॉन्फिगर करावे लागतील इतकंच). जर तुम्ही डायनामिक आयपी एड्रेस वापरत असाल तर तो आपोआप बदलला जाईल, आणि जर स्टॅटिक आयपी असेल तर आपल्याला मॅन्यूअली बदलावा लागेल.

ह्याचे फायदे ते काय?

१. खुप मोठ्या प्रमाणावर युनिक एड्रेस मिळणे.
२. नेटवर्क अजून जास्त सुरक्षित होईल.
३. डीएनएस (DNS – Domain Name System) जी संकेतस्थळ उघडण्यासाठी वापरली जाते ती प्रक्रिया जलद होईल.

काही तोटे –

१. हा आयपी लक्षात ठेवायाला कठीण आहे.
२. लगेच मोठ्या प्रमाणावर होणारा हा बदल काहीसा त्रासदायक ठरू शकतो इनस्टॉल करताना सर्वीस ऑपरेटर्सना.

चलो लेट्स होप फॉर द बेस्ट…बघुया काय होतंय ते 🙂

अधिक टेक्नीकल माहिती हवी असल्यास इथे भेट देऊ शकता – http://en.wikipedia.org/wiki/IPv6

– सुझे