रस्सा – मराठमोळी मेजवानी !!!


आपल्या मुंबई उपनगरात वाढत चालेल्या लोकसंख्येचा मला झालेला एक फायदा म्हणजे एक सो एक अप्रतिम हॉटेल्स सुरू झाली :). तिथे मराठी, थाई, मॅक्सिकन, गुजराती, पंजाबी, चायनीज, मोघलाई प्रकारच जेवण मिळत. मोठे मोठे ब्रँड, लोकांच्या भुका भागवू लागले. जवळपास जिथे जिथे नवीन हॉटेल सुरू होई, तिथे एकदा का होईना चक्कर मारुन त्याच रेटिंग आपणच ठरवायच अशी माझी सवय. मग माझ्या मित्रांना सांगाव की नको रे तिथे जेवण काही खास नाही, अरे त्यापेक्षा इथे जा मस्त जेवण मिळेल, ते पण वाजवी किमतीत वगैरे वगैरे… 🙂

तशी मुंबई उपनगरात मराठी पद्धतीच मासांहारी जेवण मिळणारी हॉटेल्स खूपच कमी, म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच म्हणजे आपल पुरेपूर कोल्हापूर, सायबीण गोमंतक, जय हिंद पण कांदिवली-बोरीवली परिसरात अस एकही हॉटेल नाही, असेल तर अजुन माझ्या माहितीत नाही. हॉटेल्स सुटत नाही तशी माझ्या नजरेतून, हे माझ्या तब्येतीकडे बघून कळल असेलच एव्हाना तुम्हा सगळ्यांना 😉

असो, तर सांगायाच मुद्दा हा की हल्लीच दोन-तीन महिन्यांपुर्वी एक छोटेखानी हॉटेल “रस्सा” आमच्या चारकोपमध्ये सुरू झालय. नावातच रस्सा असल्याने तोंडाला पाणी सुटायला वेळ लागला नाही 🙂 विशेष म्हणजे, तिथे गेल्यावर पहिली आवडलेली गोष्ट म्हणजे आसन व्यवस्था. बाहेर मस्त खाटा आणि त्यावर चादर टाकून एकदम गावाचा फील दिलाय. तिथे जेव्हा दुसर्यांदा गेलो होतो, तेव्हा मला अभिजीत दिसला काउंटरवर. हा माझ्या शाळेत होता, माझ्या वर्ग मैत्रिणीचा भाऊ. त्याने सुद्धा ओळखल मला आणि म्हणाला की तो आणि त्याचे चार मित्र यांनी सगळ्यांनी मिळून हे हॉटेल सुरू केलय. तेव्हाच मला रस्साच्या नावाची रेसीपी मिळाली (RASSA – Ravi – Abhijit – Shree – Swarup – Abhishek) अश्या पाच मराठी तरुण मित्रांनी एकत्र येऊन रस्सा नावाच हे हॉटेल सुरू केलय. ते सगळे स्वत: मोठमोठ्या कंपनीत नोकरी करतात, पण नोकरी सांभाळून हा व्यवसाय त्यांनी सुरू केलाय याच फार कौतुक वाटल मला. (माझ पण असच एक स्वप्न आहे..बघुया) 🙂

This slideshow requires JavaScript.

येथील जेवणाची चव एकदम घरगुती आहे. इथे जेवण थाळी प्रकारात मिळत. वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी इथे उपलब्ध आहेत. चिकन थाळी, मटण थाळी, पापलेट थाळी एकदम प्रसिद्ध. मला इथे आवडलेला विशेष प्रकार म्हणजे कोंबडी वडे, अफलातून असतात. मला आधी वाटल होत, की नावात रस्सा म्हणून इथे खास कोल्हापुरी पांढरा आणि तांबडा रस्सा मिळेल, पण तस नाही. अभिजीत म्हणाला होता, की आधी ते देत होते, पण नंतर काही कारणास्तव त्यांनी ते बंद केल. आशा आहे परत सुरू होईल. नवीन हॉटेल असल्याने मेन्यु लिमीटेड आहे, पण एक थाळी तुम्हाला उदर तृप्तीचा ढेकर देण्यास पुरेशी आहे 🙂 इथे जेवणावर तुटून पडणारे खूप गुजराती लोक पण आहेत. खिश्याचा विचार कराल तर, एकदम परवडण्यासारख. मी अजुन नवीन नवीन मेन्यु येण्याची आतुरतेने वाट बघतोय. इथे पोचायच असेल तर हा घ्या पत्ता – शॉप नंबर १, गणेश चौकाच्या बाजूला चारकोप, कांदिवली (प.). जवळच लॅंडमार्क म्हणाल तर PF ऑफीस लागूनच आहे. इथला फोन नंबर आहे – 28676833 आणि हो ते एफबीवर सुद्धा आहेत – रस्सा. एकदा इथे खाऊन बघाच आणि सुझेची आठवण नाही आली तर सांगा. 🙂

खूप दिवस खादाडीवर लिहल नव्हत म्हणून ही एक छोटी पोस्ट… तिखट, झणझणीत मानून घ्या 🙂

– सुझे

36 thoughts on “रस्सा – मराठमोळी मेजवानी !!!

 1. sahajach

  सुहास तू लिहीलेल्या थाळीयादीतली एकही मी खाऊ शकत नसले तरी काही मराठी तरूणांनी एकत्र येऊन केलेला हा उपक्रम निश्चितच कौतूकास्पद 🙂

  तुझे स्वप्न लवकर पुर्ण होऊ दे ही तूला शुभेच्छा 🙂 (जरा घासफूसवाल्यांचा विचार कर मात्र नक्की 🙂 )

  1. अग शाकाहारी पण मिळेल ग, कौतुक आहेच म्हणून ही छोटी पोस्ट टाकली घाई घाईत…

   माझे प्लॅन्स वेळ आहे, अजुन खूप गोष्टी व्हायच्या आहेत 🙂

 2. आज एकादशी दिवशी तूझी पोस्ट वाचली…उपवास असल्यामुळे जरा जास्तच पाणी सुटलंय तोंडाला…

 3. deepak parulekar

  आवय माजे !
  छ्या! कित रे तू !
  तोंडाक पानी सुटला रे!
  सध्या पथ्यार पडलयं म्हणान, नायतर आजच पावलयं असतयं थयसर !*

  * वरची कमेंट ( गोन) कोंकणी मध्ये लिहायच प्रयत्न केलाय ! 🙂
  पथ्य संपू दे रे ! मग रस्स्याचा फडशा पाडूच !!

 4. सुहास
  इथे जाईनच एक दिवस, पण बरेच दिवस झाले इथे सावजी खाल्लेलं नाही.. तूला माहीती आहे का सावजी कुठे मिळते ?? थोडा झणझणीत सावजी रस्सा आणि रम खेचायची इच्छा होते आहे बघ.. 🙂
  तांबडया रश्श्यात ती सावजीची मजा नाही राव.. 🙂

  1. सावजी रस्सा काय असतो ते मला पण नाही माहिती. बांद्रा येथे मिळतो अस ऐकून होतो. विचारून बघतो कोणाला तरी…

   सावजी रस्सा आणि रम… ग्रेट 🙂

 5. अरे रच्याक. पोस्ट, हॉटेल, मेनु आणि हो हॉटेलवाले पण एकदम जबरी.
  साला मला पण आत्ता हॉटेल काढावं वाटू लागलं आहे. रस्साच्या धर्तीवर आपण पण काढू रे. जापनीज सुशी सारखं मराठी सुसि (शुशी नव्हे)

 6. माउ

  सुहास,
  छ्या! कित रे तू !
  तोंडाक पानी सुटला रे!
  अश कर नाका रे!!!कित्या पिडतां रे तु????
  माका भुक लागलेह…
  आता मी नेक्स्ट मंथ मधे एक दौरा करणारच आहे..तेंव्हा जाउन येते…

  1. माऊताई, नक्की जाउन ये आणि कस वाटल ते पण सांग..
   आणि हो तिथेच शेजारी ५ मिनिटावर माझ घर पण आहे, तिथे पण यावे 🙂

 7. रस्सा पुढच्या वेळी नक्की तेही खास आपलं स्वप्न जगणार्‍या मराठी मित्रांच्या कौतुकासाठी तर नक्कीच नक्की….
  आणि ऑब्जेक्शन सुझे…तू ही पोस्ट वाचली नाहीस का??(कमेन्टला नाहीएस म्हणजे बहुधा नसेलच…वाच आता) चक्क बो आणि कांदिवलीत मराठी खाणं मिळत नाही म्हणतो…चल तुला हाच सगळा मेन्यु इथेही वाजवी दरात मिळेल….

  http://majhiyamana.blogspot.com/2010/08/blog-post.html

  1. अरे ही पोस्ट मी वाचली होती आणि कॉम्मेंट पण दिली होती…असो

   पंगत माहीत आहे ग पण आता त्याचा दर्जा खास राहिला नाही असे मित्र म्हणतात. माझा जायचा योग आला होता, पण तेव्हा मी शाकाहारी होतो आता कोंबड्या खायला लागलोय परत 😉

   जाईन नक्कीच आता 🙂

   1. <<<कांदिवली-बोरीवली परिसरात अस एकही हॉटेल नाही, असेल तर अजुन माझ्या माहितीत नाही
    असं लिहिलंस न वर म्हणून लिंक दिली रे….:)

 8. देसाई अभिजीत

  धन्यवाद मित्रा…
  मज्जा आली. रस्सा बद्दल प्रथमच कोणी तरी “स्वतःच्या” साइट वर अभिप्राय लिहिला आहे.

  मी आणि आमची रस्सा टीम खूप खूष झाली … 🙂

  रस्सा टीम चा एक मेंबर या नात्याने मी सर्व येणार्‍या खवैयांचे स्वागत करतो .

  1. अभिजीत, आता अपेक्षा वाढल्या आहेत तुम्हा सगळ्यांकडून….
   तुम्हाला खुप खुप शुभेच्छा… 🙂

 9. छान झालीय पोस्ट….एकदा धाड टाकणार आहे रस्स्यावर….
  बांगूर नगर , मालाड लिंक रोड …कोप-यावर “कोकण स्वाद” म्हणून एक छोटस हॉटेल आहे…जरूर जा तिकडे….
  वाजवी दरात फ़क्कड नॉनवेज जेवण मिळेल…

  1. स्वागत तृप्ती,
   कोकण स्वाद माहीत आहे, गेलोय तिथे एकदा. छान होत.
   लवकरच रस्सावर धाड टाकणे 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.