घराला घरघर…


महावीर नगर (कांदिवली) येथे एक फ्लॅट १ कोटी रुपयाला विकला गेला, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सला एका कोपर्‍यात आलेली ही बातमी. म्हणाल तर खास नाही तर एकदम बकवास. जेव्हा आम्ही डहाणूकरवाडीत राहायचो, तेव्हा महावीर नगर इथे गर्द झाडीच जंगल होत. तिथे छोट्या मोकळ्या जागेवर आम्ही क्रिकेटसुद्धा खेळायचो. आता तिथली परिस्थिती पूर्णपणे बदललीय. उंच उंच टॉवर, प्रशस्त लिंक रोड, शॉपिंग कॉंप्लेक्स…आपल्या मुंबईच्या प्रगतीच हे स्वरूप नक्कीच छान आहे, पण मी स्वत: नक्कीच म्हणेन की परिस्थिती खूप वाईट होत जातेय दिवसेंदिवस 😦

सुरुवातीला, म्हणजे १०-१२ वर्षापुर्वी मरीन लाइन्स, चर्चगेट, दादर ही महागडी आणि सगळ्या सुविधा असलेली उपनगर् होती. पण..पण आता लोवर परेल, बांद्रा, सांताकृज, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली बोरीवली आणि विरारसुद्धा. हो, विरारसुद्धा त्यात समाविष्ट झालय. कांदिवली पश्चिम एक बीएचके फ्लॅट ४०-५० लाख, विरारला २०-५२ लाख. आजच्या तारखेला विरारला ६ ते ८ तास लोडशेडिंग असत. तुम्हाला बिल्डर घरा सोबत दोन जेनरेटर्स पण देतात..ते पण मोफत…मोफत.. मोफत… तरी तिथे जागेचा हा असा चढता भाव सुरू आहे.

साडेतीन वर्ष नोकरी केली, थोडा फार पैसा जमवून आता घर शोधायला बाहेर पडतो, तर माझ्या बजेट मध्ये विरारपर्यंत पण घर घेण शक्य नाही अस दिसतय.. पार हतबल झालोय जागेचे वाढते भाव बघून…लोकांचे ऑफीसला एकाच बाजूने जाणारे लोंढे बघून….खरच त्रास होतो. थोड लांब घर घ्यायच म्हटल तर प्रवासातच दोन-तीन तास जायचे… 😦 लांब घर घेण्यासाठी दिलेली काही आश्वासन् भारी असतात म्हणा उदाहरणार्थ… भविष्यात सरकारकडून इथे नवीन रेलवे स्टेशन बांधणार आहेत, लोड शेडिंग फक्त ४ च तास होईल, मेट्रो येणार, विमानतळ येणार, मॉल येणार, कमी ट्रॅफिक, मुबलक पाणी, हिरवागार निसर्ग, मोठ्ठे एक्सप्रेस रस्ते… हे सगळ माझ्या कांदिवलीत पण होत, १५ वर्षापूर्वी. तेव्हा वडिलांनी ७ लाखात आमच राहत घर घेतल होत. ज्याचा आता भाव आहे तब्बल ५०-५५ लाख.. त्यामुळे आता इथे घर घेण हे मला तरी अजिबात शक्य नाही… खरच 😦

सगळीकडे चाळी, जुन्या बिल्डिंग्स पाडून मोठ्ठे मोठ्ठे टॉवर बांधत सुटले आहेत सगळे. ह्यात मोठ्ठे बिल्डर तर सरकारकडून कुठले ही प्रॉजेक्ट मंजूर करून घेऊ शकते ह्याची अनेक उदाहरणे आहेत आपल्यापुढे. जेव्हा सिफीमध्ये होतो तेव्हा चारकोप (कांदिवली) जिथे मी राहतो, तिथे दोन नवीन सेक्टर्स (८-९) बांधणार अशी बातमी उडाली. त्यावेळी तिथे वन प्लस वन अश्या घरांची फाईल निव्वळ ७ लाखात मिळत होती. तेव्हा सुद्धा ही रक्कम खूप जास्त होती म्हणा माझ्यासाठी, तरी घरी बोलून बघितल होत. पण मग त्या प्रॉजेक्टवर न्यायालयाने आक्षेप घेतला आणि ते थांबल. सगळ्यांनी आपल्याजवळ असलेल्या जागेच्या फाइल्स भीतीपोटी परत विकल्या स्वस्तात (कशाला पैसे अडकवून ठेवा उगाच म्हणून). मग जादू झाली, ते प्रॉजेक्ट दिमाखात आणि एकदम युद्ध पातळीवर सुरू झाल. ज्यांनी जागा विकल्या नाहीत आणि ज्यांनी स्वस्तात मिळतेय जागा म्हणून दोन-तीन जागा घेऊन ठेवल्या. ती लोक आज करोडपती आहेत. ह्या विकासाला राज्यसरकारने मंजुरी दिली होती. कधी चारकोपला आलात तर सेक्टर ८ ला एक चक्कर मारा. ह्या सेक्टरमध्ये शेवटच्या बिल्डिंगच्या बाजूला गोराई खाडीच पात्र आहे. भले गाळ का असेना, पण भरती आली की काही प्रमाणात पाणी येत तिथे.

हे चारकोप, इमेजवर क्लिक केल्यावर तुम्हाला जी एकसंध लहान लहान घर दिसतील ती आता तोडून टॉवर्स बांधणार आहेत...एकदम डाव्याबाजूला कोपर्‍यात आहे ती गोराई खाडी...

आता अजुन एक मोठी गोष्ट इथे होतेय..कदाचित ह्याला अजुन तरी पुरावा नाही आहे, पण एका मोठ्या बिल्डरने इथल्या म्हाडा सोसायटी पाडून इथे टॉवर बांधून देतो अस वचन दिल. खूप आकर्षक स्कीम दिल्या. चारकोप परिसरात असलेल्या प्रत्येक उत्सवाला जोरदार मदत केली पैश्याने. आता त्याने परस्पर ती जागा तिसर्‍या बिल्डरला विकली आहे. खरच काय होईल ते माहीत नाही पुढे पण.. मेट्रोच एक मुख्य स्थानक म्हणून चारकोपचे वाढलेले भाव, बिल्डर लोकांची हाव आणि सामान्य माणसाच अस्तित्व इथून लवकरच संपणार अस दिसतय.

हे झाल एक उदाहरण, संपूर्ण मुंबईत हेच सुरू आहे. ग्रँट रोडचा रेड लाइट भाग, मुंबईतला भविष्यातला महाग असा भुखंड आहे. उत्तन जे गोराई गावाच्याच्या पलीकडे असलेला निर्जन डोंगरांचा भाग आयटी हब होणार म्हणून तयारी सुरू झाली आहे. (इथे गूगलच एक ऑफीस सुद्धा होणार आहे, माहीत नाही अफवा खरी आहे की नाही). पालघर, बोईसर इथे आजपर्यंत मुंबईच्या इतिहासात कधी बांधले गेले नाहीत एवढे मोठे गृहनिर्माण प्रॉजेक्ट्स सुरू आहेत. बोईसरला टाटाच्या प्रॉजेक्टमध्ये असलेले ९५० फ्लॅट्स १६-२२-२८ लाखाला विकले गेलेत आणि प्रॉजेक्ट पूर्णपणे सोल्ड आउट झालसुद्धा एका वर्षापूर्वी. पनवेलला विमानतळ नक्की येणार, हे जेव्हा लोकांना कळल तेव्हा, इथे जागेचा भाव अडीच हजारावरून पार ६ ते ७ हजारावर पोचलाय. म्हणजे आता सगळ्या सामान्य लोकांनी मुंबईच्या बाहेरच रहाव अस गृहीतच धरलय.

मला वाटायच, ह्या राहत्या घरच्या आजूबाजूला फारफार तर दोन-तीन स्टेशन मागे-पुढे घर घेईन. पण मुंबईत घर घेण, हे कर्मकठीण होऊन बसलय निदान माझ्यासारख्या सामान्य मुलाला तरी…

इथे मिळते तशी संधी दुसर्‍या शहरात मिळत नाही, पण आता ती शोधावी म्हणतो…
खरच इथे घर घेण्याची आशा सोडावीच म्हणतो 😦

— सुझे

40 thoughts on “घराला घरघर…

  1. आयला अवघड परिस्थिती आहे राव 😦
    म्हणजे या जन्मात तर माझे घर घेण्याचे स्वप्न पुर्ण होईल की नाही याची चिंता लागून राहिली आहे 🙂
    असो, पुढील जन्म टाटा-बिर्लाच्या खानदानात मिळतो का बघतो जरा देवाला पटवून 😀

  2. मुंबईबद्दल बोलूच नये. परवा माझ्या मित्राने मालाडला 1 BHK ४७ लाखाला घेतला पण तो १० वर्षापूर्वीचा होता हे कळल्यावर मला कांदा हुंगायची पाळी आलेली पण कांदा महाग म्हणून मी स्व:ताला सावरले.

    सगळीकडे हीच परिस्थिती आहे. पुण्याला २०% ब्लॅक मनी द्यावी लागते म्हणे. मी देखील २००८ मध्ये बंगलोरला अपार्टमेंट जवळजवळ बुक केली होती पण त्याच वेळी सगळं मार्केट कोसळलं, जॉबचा गेम होता होता वाचला. तेंव्हा केवळ पगाराचा ७५% गिळणारा EMI नव्हता म्हणून रात्री शांत झोप लागायची. आत्ता सगळी परिस्थिती बदलली तरी घर घ्यावं वाटत नाही. त्यापेक्षा त्या पैशात मज्जा करावी आणि नंतर रत्नागिरीमध्ये जाऊन चोख मासे गरवत बसावं.

  3. फारच वाईट परिस्थिती आहे, मागच वर्षभर मी घरासाठी घरघर करतो आहे मुंबईत, काळा पैसा, फ्लोर राईज यात बजेटची वाट लागते.

  4. मुंबई हे मध्यम वर्गीयांसाठी नाही उरली आता. इथे टिकायचे तर पैसा पाहिजे नाहीतर जे आहे त्यात मोडके-तोडके संसार करायची तयारी पाहिजे.

  5. एकदम शंभर टक्के खरंय रे…च्यामारिकेत राहून पण खरी मुंबई स्वप्नातच..उगाच इथली वर्षे वाढताहेत…
    या अशाच कॅलक्युलेशनमुळे असणार बहुतेक, काही वर्षापुर्वी माझ्या south Mumbai madhlya एका मित्राने वसईत घेतलं…तुला तर माहितच आहे…:)

  6. deepak parulekar

    अरे बाबा मुंबईत आता घर ?? खरचं घरघर लागलीय..
    परवडत नव्हत म्हणुन मुंबई सोडुन पनवेलला आलो.. पण आहे इच्छा आहे मुंबईत घर घ्यायची..
    आशा आणि प्रय्त्न सोडायचे नाहीत..
    घेउ आपण मुंबईत घर ! 🙂

  7. trupti

    छान लेख सुहास…
    आपल्या नेहमिच्याच चर्चेत्ला विषय तू मांडलास आज…
    मी इनवेस्टमेंटसाठी मुंबई मधुन पर कोकणपर्यंत पोचले यावरून तू समजला असशीलच हे लोण कुठपर्यंत आणि कस पसरतय ते…

  8. छोटेसे का होईना स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असतेच. आणि ती नेहमीची घराच्या किमतीची व आपल्याकडच्या पैशाची रस्सीखेच कायमची आहेच. मात्र आता तर परिस्थिती खरेच आवाक्याबाहेर गेली आहे. 😦

  9. घराला घरघर… नव्हे देशाला घर घर… लागली आहे.आपण मुंबई ची गोष्ट करत आहात. येथे माझ्या लहान शहरात सुद्धा आज भाव गगनाला भिडले आहेत शेती चा एकरी दर ७० लाख ते १ कोटी रुपयान पर्यंत गेला आहे. या भावात शेती घेवून शेतकरी काय देवांचा पैश्यान चा देव कुबेर सुद्धा शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या करेल.आज काळा पैसा स्विस बँकेत ठेवला जात नाही तर सेझ च्या नावाखाली भारतीय शेतकऱ्यांच्या जमिनीत दडपला जातो. अर्थतज्ञ मनमोहन यांना हे समजत नाही का? का ते विकासाच्या नावाखाली वेड घेवून पेडगावला जात आहेत. आज आपला प्रवास भू दान पासून भूखंड हडप करणे असा अधोगतीचा झाला आहे. गेल्या आठवड्यात म टा मध्ये बातमी होती मुकेशच्या पार्टीच्या वेळी त्याच्या शेजारयानी त्यांच्या गाड्या रस्त्यावर पार्क न करता दुसरी कडे ठेवाव्यात असे पोलिसी फर्मान निघाले . आता सांगा तुम्ही आम्ही भारत सोडून बाहेर देशातच जावे. मग अनिवासी भारतीय म्हणून सरकार आपले कौतुक करेल.

    1. हो खरय, परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेलीय… आता वाटत नाही यावर नियंत्रण येऊ शकेल 😦

  10. फार वाईट परिस्थिती आहे.. आजच एका मित्राचा फोन आला होता. बोरिवलीत रीसेलचा 1 BHK flat मिळतोय तर पन्नास-एक हजार रुपये देऊ शकशील का? बांधकाम १०-१५ वर्षापूर्वीच आहे. म्हटलं कितीला मिळतोय..? तर म्हणे ४२ लाख!!! मीच गरगरलो! आता पन्नास हजार रुपये त्याच्या दाढेला तरी लागतील कि नाही काय माहित! पण दुखवायला नको म्हणून बोललो नाही!

    हल्लीच आणखी एका मित्राने पुण्यात 2BHK बुक केला. लोन आणि वरचे पैसे जमावतानाच मेटाकुटीला आला होता.. त्यात पुन्हा हप्ता जायला लागल्यावर “नाXडा व्हायची वेळ आलीये रे !” अशा भाषेत भावना व्यक्त केल्या.. म्हणजे घर घेऊनही ‘सुख’ आणि ‘समाधान’ म्हणतात ते नाहीच! वरून क्वालिटी बाबतची तडजोडच दिसते.

    घराच्या बाबतीत positive गोष्टी कुठूनच ऐकू आल्या नाहीयेत अजूनपर्यंत. मुळात construction cost किती आणि फायदा किती याची कोणीतरी शहानिशा करायची वेळ येवून ठेपली आहे. बिल्डर आणि राजकारणी यांची अभद्र युती तुटत नाही तोपर्यंत स्वप्न सत्यात यायची शक्यताच कठीण!

    1. बिल्डर आणि राजकारणी यांची अभद्र युती तुटत नाही तोपर्यंत स्वप्न सत्यात यायची शक्यताच कठीण! >>
      एकदम बरोबर… कारण ही भाववाढ ह्या लोकांनीच वाढवून ठेवली आहे. त्यांचा हिस्सा असतो ना त्यात काय करणार. मी घराची स्वप्न बघायची सोडली आहेत 😦

  11. आनंद पत्रे

    सगळीकडं हिच परिस्थिती आहे.. हैदराबादलाही काही वेगळं नाहीये राव 😦

  12. सुहास, तुझं बजेट काय आहे? मुंबई सोडून बंगलोर मध्ये येण्याची तयारी आहे का? जर तुझं बजेट १३-१५ लाख असेल तर तुला आरामात २ बीएच के बंगलोरच्या बाहेरच्या भागात (मुख्य बंगलोरपासून २०-३० किमी) मिळेल. पण बंगलोरची सध्याची रेडीअस ३० किमी आहे. त्यामुळे २०-३० किमी या अंतराला घाबरून जाऊ नकोस. बंगलोरची वाढ इतकी झपाट्याने होते आहे आणि सगळी आय टी पार्क्स गावाबाहेरच असल्याने एकाच दिशेने गर्दी जाण्याचा प्रश्न नाही. बंगलोरमध्ये प्लॅनींग हा प्रकार खूप चांगला आहे. फक्त कन्नड शिकुन घ्यायला लागेल. आपलं मराठी आहेच की. कित्येक मराठी कुटुंब इथं राहतात. मुंबईचं हे भयाण वास्तव मला घर विकत घेण्यास न निघता सुद्धा आधीच लक्षात आलं होतं. एकूणच मुंबई एकतर श्रीमंत लोकांसाठी नाहीतर गरीब लोकांसाठी आहे. मध्यमवर्गीयांनी आता मुंबईत घर घेणं म्हणजे दिवास्वप्नच आहे.

  13. prakash redgaonkar

    सुहास- आपला ब्लोग वाचतोय . वा. छान आहे.
    लिहित रहा.मस्त…!माझ्याआतर्फे खूप शुभेच्छा.

    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद प्रकाश आणि ब्लॉगवर स्वागत.
      अशीच भेट देत रहा… 🙂

  14. मुंबईत घर घेणं मुश्कील ही नही नामुमकीन है.. त्यासाठी डॉनच व्हावं लागेल..+१११

    टाटाच्या इथल्या घरासाठी इतक्या अप्लिकेशन्स आल्या कि लॉटरी काढावी लागली…आणि तो प्रोजेक्ट बोईसरपासून ५-६ किमी वर आहे.आज इथे बोईसरजवळ जरी तू २ बीएचके घ्यायचं म्हटलास तरी बजेट २० लाखाच्या वर पाहिजे…

  15. Nice blog Suhas !
    you described the ‘reality’ 🙂 I experienced these things while buying home in Pune. There isn’t quality worth of the money we are paying, still we have to buy it. Sooner we buy is better. The rates before 2 years were somewhat in reach, now they are far away !

    1. राहुल,

      सर्वप्रथम आपले ब्लॉगवर स्वागत. घराची दरवाढ आता कमी होणे नाही. हे भव् अजूनही आकाशाला भिडणार आहेत. आता हे स्वप्न बघणं, मी सोडून दिलंय कधीच. 😦

      अशीच भेट देत रहा !!

  16. सुहास तू महावीर नगर (कांदिवली) येथे एक फ्लॅट १ कोटी रुपयाला विकला गेला असे बोलत आहेस आमच्या जोगेश्वरीतील घराची किमत बिल्डरने दीड कोटी घ्या आणि निघुनजा अशी लावली आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.