आपल्या मुंबई उपनगरात वाढत चालेल्या लोकसंख्येचा मला झालेला एक फायदा म्हणजे एक सो एक अप्रतिम हॉटेल्स सुरू झाली :). तिथे मराठी, थाई, मॅक्सिकन, गुजराती, पंजाबी, चायनीज, मोघलाई प्रकारच जेवण मिळत. मोठे मोठे ब्रँड, लोकांच्या भुका भागवू लागले. जवळपास जिथे जिथे नवीन हॉटेल सुरू होई, तिथे एकदा का होईना चक्कर मारुन त्याच रेटिंग आपणच ठरवायच अशी माझी सवय. मग माझ्या मित्रांना सांगाव की नको रे तिथे जेवण काही खास नाही, अरे त्यापेक्षा इथे जा मस्त जेवण मिळेल, ते पण वाजवी किमतीत वगैरे वगैरे… 🙂
तशी मुंबई उपनगरात मराठी पद्धतीच मासांहारी जेवण मिळणारी हॉटेल्स खूपच कमी, म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच म्हणजे आपल पुरेपूर कोल्हापूर, सायबीण गोमंतक, जय हिंद पण कांदिवली-बोरीवली परिसरात अस एकही हॉटेल नाही, असेल तर अजुन माझ्या माहितीत नाही. हॉटेल्स सुटत नाही तशी माझ्या नजरेतून, हे माझ्या तब्येतीकडे बघून कळल असेलच एव्हाना तुम्हा सगळ्यांना 😉
असो, तर सांगायाच मुद्दा हा की हल्लीच दोन-तीन महिन्यांपुर्वी एक छोटेखानी हॉटेल “रस्सा” आमच्या चारकोपमध्ये सुरू झालय. नावातच रस्सा असल्याने तोंडाला पाणी सुटायला वेळ लागला नाही 🙂 विशेष म्हणजे, तिथे गेल्यावर पहिली आवडलेली गोष्ट म्हणजे आसन व्यवस्था. बाहेर मस्त खाटा आणि त्यावर चादर टाकून एकदम गावाचा फील दिलाय. तिथे जेव्हा दुसर्यांदा गेलो होतो, तेव्हा मला अभिजीत दिसला काउंटरवर. हा माझ्या शाळेत होता, माझ्या वर्ग मैत्रिणीचा भाऊ. त्याने सुद्धा ओळखल मला आणि म्हणाला की तो आणि त्याचे चार मित्र यांनी सगळ्यांनी मिळून हे हॉटेल सुरू केलय. तेव्हाच मला रस्साच्या नावाची रेसीपी मिळाली (RASSA – Ravi – Abhijit – Shree – Swarup – Abhishek) अश्या पाच मराठी तरुण मित्रांनी एकत्र येऊन रस्सा नावाच हे हॉटेल सुरू केलय. ते सगळे स्वत: मोठमोठ्या कंपनीत नोकरी करतात, पण नोकरी सांभाळून हा व्यवसाय त्यांनी सुरू केलाय याच फार कौतुक वाटल मला. (माझ पण असच एक स्वप्न आहे..बघुया) 🙂
येथील जेवणाची चव एकदम घरगुती आहे. इथे जेवण थाळी प्रकारात मिळत. वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी इथे उपलब्ध आहेत. चिकन थाळी, मटण थाळी, पापलेट थाळी एकदम प्रसिद्ध. मला इथे आवडलेला विशेष प्रकार म्हणजे कोंबडी वडे, अफलातून असतात. मला आधी वाटल होत, की नावात रस्सा म्हणून इथे खास कोल्हापुरी पांढरा आणि तांबडा रस्सा मिळेल, पण तस नाही. अभिजीत म्हणाला होता, की आधी ते देत होते, पण नंतर काही कारणास्तव त्यांनी ते बंद केल. आशा आहे परत सुरू होईल. नवीन हॉटेल असल्याने मेन्यु लिमीटेड आहे, पण एक थाळी तुम्हाला उदर तृप्तीचा ढेकर देण्यास पुरेशी आहे 🙂 इथे जेवणावर तुटून पडणारे खूप गुजराती लोक पण आहेत. खिश्याचा विचार कराल तर, एकदम परवडण्यासारख. मी अजुन नवीन नवीन मेन्यु येण्याची आतुरतेने वाट बघतोय. इथे पोचायच असेल तर हा घ्या पत्ता – शॉप नंबर १, गणेश चौकाच्या बाजूला चारकोप, कांदिवली (प.). जवळच लॅंडमार्क म्हणाल तर PF ऑफीस लागूनच आहे. इथला फोन नंबर आहे – 28676833 आणि हो ते एफबीवर सुद्धा आहेत – रस्सा. एकदा इथे खाऊन बघाच आणि सुझेची आठवण नाही आली तर सांगा. 🙂
खूप दिवस खादाडीवर लिहल नव्हत म्हणून ही एक छोटी पोस्ट… तिखट, झणझणीत मानून घ्या 🙂
– सुझे