आज २५ जानेवारी, आपल्या देशात आजचा दिवस हा “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा केला जातो. हे मला पण परवाच एका टीवी जाहिरातीमधून कळल होत. भारतीय निवडणूक आयोगाच्या सौजन्याने ह्या दिवसाला एक ब्रीदवाक्य सुद्धा मिळालय. “Proud to be a voter — Ready to vote”.
भारत, जगातली सगळ्यांत मोठ्ठी लोकशाही असलेला देश. जगात आजच्या घडीला कुठल्याही देशात इतके जास्त पक्ष झाले नाही. इतके नेते नसतील. आपल्या इथले बरेच राजकारणी लोक जगाच्या शक्तिशाली लोकांच्या यादीत आहेत. जे उत्तम नैत्रुत्व करू शकतात. जे देशाची ओळख बनतात. खरच, एखाद्या देशाला चालवण ही काय साधी गोष्ट नाही. ती लोक महान असावीच लागतात. त्या महान लोकांची निवड करण्याचा हक्क आपल्याला मतदान देत. त्यामुळेच मतदानाचा हक्क बजावणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. वयाची १८ वर्ष पूर्ण झाली की भारतीय घटनेनुसार आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. आपण मग आपल ते अमुल्य मत एका पक्षाच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकून त्याला जिंकून देतो. मग तो आपल्या सत्तेच्या बळावर लोकोपयोगी कामे करतो, देशाला पुढे नेतो इत्यादी इत्यादी…ही लोकशाही. हो.. हे शाळेत असताना सगळ्यांना शिकवल होत.
पण माझा आता खरच विश्वास उडत जातोय ह्या सगळ्या सिस्टमवरुन. आपण निवडून देतो तो नेता हा आपल्यासाठी नाही तर त्या पक्षासाठी जास्त काम करतोय. सध्या आपला देश सद्ध्या कॉंग्रेस नावाची एक ब्रॅण्डेड कंपनी चालवतेय आणि ह्यांचे नेते भस्म्या झाल्यासारखे नुसते पैसे जमवतायत.
आपला क्रमांक एकच शत्रू कोण? दहशतवाद? पाकिस्तान? चीन? वाटत नाही मला अस. ह्या दहशतवादी लोकांच बरय काय ते एकदाच नुकसान करून मोकळे होतात. पण हे भ्रष्टाचारी राजकारणी लोक आपले नंबर १ शत्रू आहेत. ह्या दहशतवादी लोकांपेक्षा आपल्यातीलच काही लोक आपल्या देशाचे एक नंबरचे शत्रू ठरले आहेत. किती तरी पटीने आपलीच लोक पैश्याच्या लोभापायी आपल्याच देशाला लुटत आहेत, देशाला विकत आहेत, देशाशी गद्दारी करत आहेत आणि आपल्याच देशाची अब्रू सगळ्या जगासमोर उधळत आहेत. तेही राजरोस सर्रास. दुर्दैवाने आपल्याला सगळा माहीत आहे, पण आपण सगळे इतके कोडगे झालो आहोत ह्याचच जास्त वाईट वाटत. 😦
गेली सहा महिने आपण काही मोठ्या घोटाळ्यांबद्दल ऐकून आहोत. काय परत परत तेच बोलायच. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आदर्श घोटाळ्याच्या कैवारी बनवून राजीनामा द्यावा लागला आणि त्यात अनेक महारथी लोकांचे बिंग उघडे पडले. सारवासारव करताना कॉंग्रेसच्या नेत्यांना घाम फुटत होता. आधीच त्यांच्या मागे कलमाडी प्रकरणाची चौकशी होतीच, मग काय त्यांना पदावरून काढून नवीन नेत्याची नियुक्ती केली आणि एक चौकशी आयोग नेमुन सामान्य जनतेच्या तोंडाला पान पुसली कारवाईच नाटक करून. आदर्शचा बिल्डर गणितात खूपच कच्चा असावा ७ मजल्याच्या जागी २१ मजले आणि त्यातले ६० टक्के फ्लॅट्स महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या सदस्यांना किवा त्यांच्या नातेवाईकांना. वाह..ह्याला म्हणतात सेट्टिंग !! मुळात कारगिलच्या शहीद सैनिकांना मुंबईत फ्लॅट देण आणि त्यासाठी परवानगी मिळवणे हीच मोठी आश्चर्याची बाब.
कॉंमनवेल्थमध्ये ७० हजार करोड भारतीय सरकारने मंजूर करून पण कलमाडी यांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून भारताचे स्टॅंडर्डस वेगळे असल्याचे जगाला दाखवले. सार्या जागतिक मीडीया ने भारताची छी थू केली. खूप देशांनी या स्पर्धेवर बहिष्कार पण टाकला. चौकशी अंती कळला की, ह्यात पण घोटाळा आहे आणि त्यात मोठे दिल्लीवाले मंत्री गुंतले आहेत. त्यातच आता बाहेर आला घोटाळा २ जी स्पेक्ट्रमचा. भारतीय इतिहासातील सगळ्यात मोठ्ठा घोटाळा. १२० हजार करोड..किती शून्य असतील ह्याच्या मागे हे त्या घोटाळा करणार्या राजाला माहीत सुद्धा नसाव. मला आधी वाटायाच बोफोर्स हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे पण तो तर फक्त (?) ६४ कोटी रुपयाचा होता. पण ह्यांनी मला खोट पाडल. 😦

पैसा..पैसा..पैसा.. ही अशी भूक लागली आहे ह्या लोकांना की आपल्याच लोकांकडून पैसे लुबाडून आपल्यातलेच असल्याचा दावा करतात आणि आपल्यावर राज्य करतात. स्विस बँकेत अकाउंट लिमिट संपेपर्यंत पैसे भरतात, आपल्याकडून चोरून. हे सगळे घोटाळे उघड होऊन सुद्धा आपली कुबडी न्यायव्यवस्था त्यांची बाहेर निघण्याची बरोबर व्यवस्था करतेय. देशात कायदा आणि सुव्यवस्था ही फक्त दहशतवादी हल्ले, खून, दरोडे, दंगली, बलात्कार याच गोष्टींसाठी. त्याचे निकाल लागता लागता एक पिढी स्वर्गात गेली असते. मग हे घोटाळे किस झाड की पत्ति? कोणाला कशाचीच भीती नाही. सगळे बुडाखाली पैसे दाबून घरी मस्त झोपले आहेत. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याच्या ऐवजी विरोधी पक्ष तू तुझे घोटाळे कर, आमचे घोटाळे उघडे पाडू नकोस अशी आर्जवा करीत आहे.
मग ह्यांना जाब विचारणारा उरल कोण. समजा कोणी सामान्य माणसाने तक्रार करायची ठरवली तर न्यायव्यवस्था आपली इतकी उच्च आहे की काही बोलायलाच नको. इंग्रज गेले, आता हे आपल्यावर राज्य करत आहेत. आपल्यावर वर वर असे जुलुम होत नाहीत त्या काळासारखे, पण जे होत आहेत ते आपल्याच लोकशाहीला आतून पोखरत जात आहेत. पोखरणारे उंदीर पण आपलेच. म्हणूनच लोकशाही या शब्दाबद्दल खूप चीड निर्माण झालीय मनात. जो तो पैशाची पोती भरण्यात व्यग्र..
आता हल्ली महाराष्ट्रात झालेल कांदे भाववाढ प्रकरण आठवा. हे मुद्दाम आणि एकदम विचारपूर्वक केलेल प्लॅनिंग वाटल. लोकांना दाखवायला की आम्ही ९०-१०० रुपये या दराने विक्री सुरू असलेला कांदा ३०-४० रुपयावर आणला. जसे सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधी केलेले स्टॅंटस केले जातात त्यात आणि ह्यात काय फरक आहे. गुजरात, बिहार अश्या राष्ट्रांतून असे प्रकार होताना दिसतात का? नाही…तिथे मतदान पण ७०-७५ टक्के होत. का..? कारण त्यांना नरेंद्र मोदी आणि नितिश कुमार ह्यांना पडू द्यायच नसत. पण आपल्या इथे समोरचा कितीही चांगला नेता असो, आपल्या पक्षांचा नाही ना..तर त्याला पाडायला आपला उमेदवार उभा रहायलाच हवा. गोरगरिबांची मत एका दारूच्या बॉट्टलवर बदलवता येतात. जो सॉफॉस्टिकेटेड मतदार असतो तो फक्त महागाई वाढतेय, तसा माझा पगार पण वाढला पाहिजे ह्याच मनस्थितीत. राबतोय, मरतोय..पण आपल्या पोटापुरता विचार करतोय. काय चुकल त्याच?
काही दिवसांनी कुठला घोटाळा?? विसरून जातो आपण. मग परत काही घोटाळा होईल..मस्त तीन-चार दिवस चर्चा चालेल…नावापुरत त्या पदावरून त्याची हकालपट्टी, शिक्षा नाहीच.. आरामात आपल्या घरी बसून कमवलेले पैसे कुठे गुंतवायचे याचा विचार करण्यात मग्न. निवडणुका होतील…तोच परत निवडून येणार. नवीन आश्वासन देणार. आपण टाळ्या वाजवणार..मग तो परत आपलीच मारणार 😦
आपण आपल मत ह्यांना देतो आणि हे आपल्याला मिड्ल फिंगर दाखवून आपली वेड्यात तर गणती करत आहेत. माझ्या मनात आता विचार येतो, मी आता मतदान का करू? कोणी सांगू शकेल? सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान..हे कोणी तरी किती विचारपूर्वक लिहल असेल नाही??? मी मतदान केल्याने काही फरक पडेल?
– सुझे