ओढ नव्या जीवाची….


“अगं पिल्लू, उठ बाळा. तुझ्यासाठी दूध आणलं आहे बघ मस्त बोर्नव्हिटा घालून. चल, गं लवकर. मग वॉकला पण जायचं आहे ना!… आणि थोडा हलके हलके व्यायामपण करायचा आहे… आता उठतेयस की देऊ एक धपाटा?

“आऽऽऽऽ…काय रे? थोडं जास्तवेळ झोपले असते तर काय बिघडलं असतं तुझं? एक तर हे बेबी किती लाथा मारतंय आतून..” ती उठता उठता हसत म्हणाली.

“हो, माहीत आहे मला बाळा. पण त्या होणार्‍या बाळासाठीच सांगतोय ना! असं आळशी बसू नये, थोडा व्यायाम कर,घरातल्या घरात चाल… काही हवं असेल, खावंसं वाटलं तर सांग की मला, मी आहेच की तुझ्या चरणाचा सेवक. आधी हे ग्लासभर दूध घे आणि थोडी फ्रेश हो. आपण खाली गार्डनमध्ये जाऊया फेरफटका मारायला…”

“ऊँ! म्हणे चरणाचा सेवक. मी नाही सांगत तुला घरी थांबायला पण तुला वाटतं की आपल्या बाळाची नीट काळजी घेतली जात नाहीये म्हणून तू पण घरी थांबलायस…” ती तोंड फुगवत म्हणाली.

“असं नाही गं पिल्लू. आता इथे आई-बाबा नाहीत ना, मग तुझी काळजी करायला, नको का राहायला हवं मी इथे?” त्याने समजावणीच्या सुरात म्हटलं.

“माहीत आहे रे, मस्करी केली मी… पण मला ते दूध नकोय रे. प्लीऽज!… तू पी ना!”

“पिल्लू, चल खूप झालं हं!, आता हे दूध संपव बरं… आणि हे तुझ्यासाठी नाही हं, माझ्या बाळासाठी आहे… समजलं?!”

ती तोंड पाडत म्हणाली, “छान! आताच ही हालत आहे, मग बाळ आला की माझे लाड होणार नाहीत…”

“हा, हा, हा! ते बघू आपण. तू आधी फ्रेश हो बरं आणि दूध लवकर संपव. मी जरा कामं आवरून घेतो.”

“अरे, मी करते ना. तू नको….” ती पुढे काही म्हणणार त्या आधीच त्याने तिच्या तोंडावर बोट ठेवलं आणि डोळ्यांनीच ’दूध संपव’ असा इशारा केला.

तीही लहान मुलासारखं मानेने ’हो’ म्हणून दूध पिऊ लागली.

तिचे खूपच लाड करायचा तो. अगदी लहान मुलीसारखे! पण आता तिलाच एक छो्टसं पिल्लू होणार, ह्या कल्पनेनेच तो आनंदाने वेडापीसा झालाय. तिला न्याहळात बसायचा, तिला हवं-नको ते बघायचा, तिला न चुकता डॉक्टरकडे घेऊन जाणं,पुस्तक वाचून दाखवणं, तिच्या बरोबर व्यायाम करणं… सगळं सगळांतो करत होता. घरातली कामही तो तिला करू देत नसे. तिच्या डिलीव्हरीच्या दोन महिने आधीपासूनच त्याने सुट्टी टाकून ठेवली होती, आपल्या पिल्लूच्या पिल्लासाठी. घरात सगळी चांगली चांगली पुस्तक आणली होती. तिच्या आईने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळत होता तो. खरं तर पहिलंच मूल असल्याने तिला तिच्या आईकडे जावं लागणार होतं शेवटच्या दोन महीने तरी. पण ह्यानेच मुद्दाम तिला थांबवून ठेवलं होत काही दिवसांसाठी.

तो हॉलमध्ये नेहमीची आवारा आवर करत होता. ती आली आणि म्हणाली, “चल, जाऊया.” तिने टिपिकल फ्रॉक घातला होता आणि खूप गोंडस दिसत होती. तिच्यासाठी पाण्याची एक बाटली घेऊन दोघे निघाले वॉकला. वातावरण प्रसन्न होतं. थंडीचे दिवस असल्याने वातावरणात उष्मा जाणवत नव्हता. ती आणि तो सावकाश पावलं टाकत चालत होती. त्याने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. हळूहळू ते त्या बागेच्या जॉगिंग ट्रॅकवर चालत होते. त्याचे मित्र “गुड मॉर्निंग”, “सुट्टी काय”, “अभिनंदन!” असं धावता धावता बोलत होते त्याच्याशी. तिच्या चेहेर्‍यावर एक प्रसन्न हास्य होतं आणि अशा दिवसांत स्त्रीच्या सौंदर्याला एक वेगळं तेज येतं, हे खरंच!

चालता चालता तिने त्याचा हात धरत विचारल “कोण हवय रे तुला?… मुलगा की मुलगी?”

त्याने क्षणाचा विलंब न लावता सांगितलं, “मुलगीच हवी.! तुला माहीत असतं उत्तर, तरी का परत परत विचारतेस तू हे ?”

“हो, माहीत असतं पण त्या वेळी तुझ्या चेहर्‍यावर दिसणारा उत्साह बघितला की खूप भरून येतं मला. तुलाच काय, मला पण मुलगीच हवी आहे! तिचे बोबडे बोल, दुडूदुडू चालणं, हट्ट करणं, रडणं, हसणं, आपल्याला हाका मारणं, सगळं कसं छान ना? तू म्हणतोस ना, मी समोर आले की तुझा राग, कंटाळा सगळा निघून जातो. पण आपल्या पिल्लूला पाहिल्यावर तू सगळ्या अडचणी, संकट, चिंता विसरशील. बघ, इतकी क्यूट, बब्ब्ली अँड चार्मिंग असेल ती! थोडी मोठी झाल्यावर मी कधी तिला ओरडले, तर तू घरी आल्यावर ती तुझ्याकडे हळूच माझी तक्रार करेल आणि तिच्या तक्रारीला न्याय मिळावा म्हणून तू पण मला खोटं खोटं ओरडशील आणि नंतर माझी पण समजूत घालशील. हं.. आणि आम्ही कपड्यांच्या दुकानात जर शिरलो तर तुझं काही खरं नाही बघ!” ती खुदूखुदू हसत म्हणाली.

तो खूप भारावून तिच्याकडे बघत होता. तिचे डोळे भरून आले होते आणि चालही मंदावली होती पण ती बोलतच होती..

“पण मला काळजी वाटते, जेव्हा ती थोडी मोठी झाल्यावर मला पुन्हा ऑफिसला जॉईन व्हावं लागेल त्याची. तेव्हा काय होईल? तिची इतकी सवय झाली असेल मला की तिला सोडून ऑफीसला जायला मनच तयार होणार नाही माझं. पाय नाही निघणार घरातून, ती पण माझा पदर नाही सोडणार. दिवसभर ती कशी राहील माझ्याशिवाय? वेळेवर दूध, खाणं, पिणंकरेल की नाही? रडेल का खूप? आजीला त्रास तर नाही ना देणार? तू तर काय बाबा तिचे लाड करत राहणार आणि सगळं निस्तरावं लागेल मला. ए, अरे ऐकतोयस ना?”

इतका वेळ तिच्या बोलण्यात गुंतून पुढचं चित्र पहाण्यात दंग झालेला तो पटकन भानावर आला.

“अग हो, ती छोटी चिमणी डोळ्यासमोर आली बघ. आपण किती किती स्वप्न बघितली ह्या क्षणासाठी. ती आता पूर्ण होत आहेत. खूप श्रीमंत आहे मी आज ह्या जगात! खरंच पिल्लू, मी तिला आणि तुला खूप खूप जपेन. काही त्रास होऊ देणार नाही तुम्हा दोघांना. एक बाप म्हणून सर्व कर्तव्य पार पाडीन. मुलीचा जन्म हा जेवढा आनंद देणारा असतो तेव्हढच मनालाभिती, चिंता करायला लावणारा…”

“का रे, असं का बोलतोस?”

“अग, ती लहान असताना आपण असूच प्रत्येक क्षणी तिच्याबरोबर. पण ती थोडी मोठी झाल्यावर शाळा, कॉलेजला,क्लासला जायला लागल्यावर कसं होणार, त्याचीच भीती वाटते. एकटी ह्या जगात प्रवास करणार पंख पसरून… पण कोणी त्या पंखानाच इजा केली तर…आजकाल खूप अशा खूप बातम्या ऐकायला येतात… काय करणार, बापाच मन आहे गं…”अगदी हळवा होऊन बोलत होता तो.

“शूऽऽऽऽ..! खूप पुढचा विचार करतोयस तू शोना. असे प्रसंग घडले आहेत काही मुलींसोबत. ही भिती असतेच प्रत्येकमुलीच्या आई-वडिलांच्या मनात. त्यात काही गैरही नाही रे, पण तू शांत रहा.”

“हो, पण या चिवचिव करणार्‍या चिमण्या काही वर्षं आपल्या अंगणात राहून मग फुर्कन उडून जातात लग्न करून. एवढी माया लावून कश्या ह्या दूर जाऊ शकतात गं…?”

“ती चकीत होऊन त्याच्याकडे पहात होती. “ए वेड्या, अरे काय झालंय तुला? ती अजून या जगात आलीही नाहीये पण तू बापडा तिचं लग्नसुद्धा लावून मोकळा झालास? कठीण आहे तुझं! बरं, आपण घरी जाऊया का? मला दमल्यासारखं झालंय जरा. प्लीज?”

“हो चल ना, पाणी देऊ का तुला?” त्याने विचारता विचारता एका बाजूला तोंड फिरवून चटकन डोळे पुसून घेतले.”

“पाणी तूच पी आणि हे प्रेम साठवून ठेव रे! आम्हाला तुझी खूप खूप गरज आहे.” तिचेही डोळे नकळत भरून आले होते.

“मी कुठे जातोय तुम्हाला सोडून?”

तिने डोळे वटारून नुसतीच खूण केली की तो जे बोलला ते तिला अजिबात आवडलं नाही. त्यानेही मग डोळे मिटून तिला “सॉरी” म्हटलं.

चालता चालता अचानक तिने त्याचा हात मागे ओढत थांबवलं, “बाकी काही म्हण, तुझं माझ्यावर चं प्रेम कमी होणार हे नक्की! तुझ्या आवडीच्याच नावाने आपण तिला हाक मारू. “सई!” बरोबर ना? चालेल? तिने मान तिरकी करत त्याला विचारलं.

तो कौतुकाने तिच्याकडे पहात होता. “पिल्लू, तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मी तिच्यावरही कायम प्रेमाची बरसात करत राहीन. शेवटी सईसुद्धा तुझाच तर एक भाग आहे. हो की नाही? त्याने तिचं नाक चिमटीत धरून हलवलं.

ती नुसतीच हसली. त्याने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. दोघे आपल्या घराच्या दिशेने चिमुकली पाऊले टाकत चालू लागले…. नव्या जीवाच्या ओढीने!

– ही पोस्ट/कथा कांचनताईच्या मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० ह्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. तुमच्या वाचनासाठी इथे देत आहे. कांचनताई ने केलेल्या मार्गदर्शनासाठी तिचे विशेष आभार 🙂

– मला कळतय जास्तच मारा करतोय मी तुमच्यावर स्वैरलिखाणाच्या नावाखाली… 😉 कथा आवडली की नाही ते नक्की सांगा.

सुझे

25 thoughts on “ओढ नव्या जीवाची….

    1. प्रतिभा वहिनी ब्लॉगवर स्वागत आणि मी जे लिहलय सध्या तुम्ही ते अनुभवत असालच..
      खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 🙂
      अशीच भेट देत रहा…

  1. sarika

    मस्त रे..आम्ही दोघेही आमचं बाळ व्हायच्या आधी असंच सगळं बोलायचो..आम्हांलाही मुलगी हवी होती..पण झाला मुलगा..असो..लिहीलं आहेस मस्त..

    1. सारिका,
      तोच काहीसा संवाद मांडायचा प्रयत्‍न केला मी. आपल्या प्रतिक्रीयेसाठी आभार आणि अभिनंदन पण 🙂

    1. हे हे …थॅंक्स ग अनघा.
      तुला नक्कीच असा अनुभव असेल ना…?
      परत तुझी पोस्ट वाचतोय बघ सुरवंट आणि सुरवंटाच्या आईचा फोटू टाकलेला ती 🙂

    1. धन्स रे..खरच मनापासून…तुम्ही सगळे ह्या बाबतीत अनुभवी (म्हणजे आतापर्यंत कॉम्मेंट देणारे सगळेच 😀 )

  2. मोगरात वाचलेलच आज पुन्हा सकाळी सकाळी वाचतेय, दिवस छान जाईल आता. 🙂 आवडलं.

    1. धन्यवाद श्रीताई…
      तुझा दिवस सत्कारणी लागण्यात माझा सहभाग आहे त्यातच मला आनंद आहे 🙂

  3. Dhundiraj

    काय मस्त लिहिलंय रे….
    असं वाटत होत कि, मी स्वप्नं बघतोय…………….:P

  4. सुहास, तसं मी ब्लॉगवर फार कमी कथा वाचते..पण तुला माहिते की मी ही मोगरा फुलाला मधेच वाचली होती आणि कामेंत्ले पण होते….आणि का?? ते तुला आता कळलं असेलच…:)
    मजा आली होती तेव्हा आणि आताही….:) लिहित राहा….
    आणि हो तुझं SM चा सोहळा पण छान झालं असेल अशी अपेक्षा …..अभिनंदन…

    1. हो तर..आता मला कळला 🙂 खूप आनंद झाला मला ती बातमी ऐकून, कारण त्यावेळीस कदाचित तू हेच अनुभवत असशील नाही? 🙂 🙂
      स्टारचा प्रोग्रॅम छान झाला. टेलीकास्टची तारीख मिळाली की कळवेन. तुझ अभिनंदन आणि काळजी घे ग 🙂

  5. Pingback: सई.. | मन उधाण वार्‍याचे…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.