स्वागत नववर्षाचे…

वर्ष २०१० संपत आलय. काहीच तास उरले आहेत आता. नेहमीसारखच या वर्षी पण म्हणेन वर्ष कस गेल कळलच नाही 🙂

नवीन वर्ष सुरू होताना ह्या वर्षी घडलेल्या गोष्टींचा मागोवा घ्यायच ठरवल, तर खूप छान आणि वाईट अश्या गोष्टी घडल्या आहेत. विशेष उल्लेख करावसा वाटतो ते माझ्या ब्लॉग्गर मित्रांचा. अर्र्र्र्र्र्र आता ते माझे बलॉगर मित्र नाहीत..माझे काका, ताया, मित्र, मैत्रिणी आहेत.  एक माझी नवीन फॅमिली. बरोबर बिन भिंतीच घर. आमचा बलॉगर मेळावा आणि त्यानंतर झालेल्या प्रत्येक भेटीने वृधिंगत झालेल आमच नात. ही ह्या वर्षाची माझी सर्वात मोठी अचिवमेण्ट.

या वर्षाबदद्ल अजुन एक जमेची बाजू म्हणजे नेहमीच्या मानाने खूप ट्रेक्स झाले. रोहनमुळे ओळख झालेले मित्र माझे बेस्ट बडी, मेट कधी झाले कळलच नाही. त्यांच्या सोबत प्रत्येक पावसातल्या वीकएण्डला ट्रेकला गेलोय. जून-ऑगस्ट याच काळात जवळजवळ १३ किल्ले झाले. मग मात्र पुढचे सगळे महिने नुसती खादाडी एके खादाडी (हा प्लस पॉइण्ट की माइनस तुम्ही ठरवा ;))

ऑफीसच म्हणाल तर कंटाळून, वैतागून सोडल. खूपच मानसिक त्रास होत होता. सो दिला ठोकून राम राम. आता नवीन इन्निंग सुरू केली आहे. त्यात थोडावेळ स्टेबल रहायचा प्रयत्‍न करेन. तीनवर्ष मी नवीन वर्षाच स्वागत ऑफीस फ्लोरवरुन केलय काम करता करता. मज्जा यायची, पण आज तसा होणार नाही. आज ट्रेकच जाम मूड होता पण सगळेच आपआपल्या प्लॅनिंगमध्ये बिज़ी आहेत त्यामुळे एक-दोन दिवसांनी जाईन (असा विचार आहे..) आज जमल नाही. मग आज नवीन वर्षाच स्वागत घरूनच आई-बाबा यांच्या सोबत टीवी बघत… 🙂

घरातली जबाबदारी वाढलीय, बाबा दोन वर्षांनी रिटायर होणार त्यांच्या नोकरीतून ह्याची जाणीव व्हायला लागलीय :(. लग्न कर लग्न कर असा मातोश्री बोलत असतात सारख्या (“सुन”वतच असते म्हणा ना :)), पण..पण खूप गोष्टी करायच्या राहिल्या आहेत, त्यानंतरच पुढचा विचार करेन. आयला, खूप सेंटी होतोय काय?  हे हे..

असो, २०१० वर्ष छान होत. खूप खूप खूप मित्र-मैत्रिणी मिळाले, थोडफार ब्लॉगवर लिहतो असा सगळ्यांना वाटायला लागल, स्टार माझाने त्याची दखल ही घेतली. जुनी नाती अजुन बळकट झाली, कोणालाही माझ्यापरीने त्रास होणार नाही याची काळजी घेतली आणि घेणारच पुढे.

काही संकल्प केले आहेत, पण इथे डॉक्युमेंट करत नाही… पूर्ण केले की इथेच हक्काने सांगेन सगळ्यांना. तुम्हीसुद्धा तुमच्या परीने ह्या नवीन वर्षाच स्वागत कराल. नवीन संकल्प धरून, मग कोणी वाईट गोष्टी सोडायाच संकल्प करेल किवा कोणी चांगल्या आत्मसात करायचा. एकच करा “जे कराल ते मनापासून करा”  (हे वाक्य मागच्या वर्षीच्याच पोस्ट मधून कॉपी पेस्ट आहे :)) आणि हो नियमीत ब्लॉगिंग हा गेल्यावर्षीचा संकल्प पूर्ण केलाय बर मी 🙂

काही आठवणी ह्या सरत्या वर्षाच्या …

This slideshow requires JavaScript.

.

सर्वांनी आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करा. माझ्या तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना हे नवीन वर्ष भरभराटीच, आनंदाच आणि सुखाच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

— सुझे —

एक साफ चुकलेला संदेश…

२५ डिसेंबर, नाताळबाबाची सुट्टी कशी घालवावी हा मोठा प्रश्न होता. आधी १० दिवस हा विचार अजिबात आला नाही. लग्नसराई सुरू आहे ना, अहो माझी नाही, मित्र मंडळी, नातलगांची 🙂 ७ दिवसात किमान ४ लग्नाला हजेरी लावली होती. ट्रेक्सपण बंद आहेत मग काय करावा म्हणून शिनेमा बघायच असा ठरल. आता सुट्टीचा हंगाम म्हणून चिक्कार सिनेमे प्रदर्शित झाले होते. आदल्यादिवशीच सगळ्यांनी ठरवला होत की टीएमके (तीस मार खाँ) बघू, पण सकाळी सगळ्यांनी टांग दिली.

करणार काय, काही तरी वेळ घालवायचा होता म्हणून मी आणि प्रसन्नने तरी जायच ठरवल. टीएमके बघायचा मूड नव्हता, म्हणून पावल वळली आपल्या केदार शिंदेच्या ऑन ड्यूटी २४ तास कडे. याचा ट्रेलर मला अतिशय आवडल्याने मनात ह्या सिनेमाबद्दल खूपच चांगल मत झाला होत. पोलिसांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट, त्यांच ते खडतर जीवन यशस्वीपणे पडद्यावर दर्शवेल याची मला खात्री होती. केदारसारखा दिग्दर्शक आणि तगडी टीम म्हटला बघुयाच.

चित्रपट सुरू होतो ते २६/११ दहशदवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर. मंत्रीमंडळाच्या एका सभेत एक स्पेशल पोलीस दस्ता तयार करायला परवानगी मिळते. ह्या टीमला सैनिकासारख प्रगत प्रशिक्षण देऊन, दहशतवाद मोडून काढणे ही जबाबदारी त्या टीमकडे येते. त्यासाठी राज्यभरातील १४ पोलीस अधिकारी निवडून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी करण बेदी (अमोल कोल्हे) ह्या अधिकार्‍यावर येते. ही निवड काहीशी अपेक्षित नसलेल्या त्याच्या एका वरिष्ठ मद्रासी सहकार्‍याने राजकारण करून एक कमकुवत (अपयशी) लोकांची फौज निवडून ती करणला देण्यात येते. महाराष्टाच्या विविध भागातून आलेली ही अधिकारी मंडळी ही काही कामाची नाहीत आणि राजकारण करून आपल्याला अशी फौज दिली गेली आहे हे कळत, पण सीनियर्सच्या ऑर्डर्स पाळणे हे आपल कर्तव्य मानून ट्रेनिंग सुरू करतो. त्यातच मुंबई शहरात घुसलेले ४ दहशतवादी आणि त्यांची मुंबईत स्फोट करायची योजना सुरू असते.

ह्या टीममध्ये वडिलांच्या जागी लागलेले, पैसा कमावण्यासाठीच पोलीस खात्यात भरती झालेले, दुसरा काही काम न जमत असल्याने अंगवळणी पडून पोलीस म्हणून काम करणारी मंडळी असतात. त्यात एक पती-पत्नीसुद्धा असतात. सगळ्यांना हे प्रशिक्षण एक सरकारी आदेश वाटत असतो आणि कोणी ते इतक्या आत्मीयतेने करत नाही. थोड नाटक करून देतील सोडून असा त्यांना वाटत होत, पण असा होत नाही.

 

ऑन ड्यूटी २४ तास

त्यातच एक खोटा बॉम्ब निकामी करण्याची आणि एका पुतळ्याची विटंबना झाल्यावर झालेली दंगल आटोक्यात आणण्याची जबाबदारी यांना मिळते. ही मंडळी धडपडत का होईना आपली जबाबदारी चोख बजावतात, पण हे सगळा करताना केलेली विनोदाची केविलवाणी निर्मिती प्रसंगाच गांभीर्य नष्ट करते. दंगलीच्या दृष्याला दिलेली वेळ खूपच जास्त वाटली.

शेवटी ते दहशतवादी एक कुठल्याश्या गल्लीत एक पोलीस स्टेशन ओलिस धरून गोळीबार करतात आणि लोकांना बंदी बनवून आत अडकवतात. पण मग ही जाबाज टीम येते आणि ते पोलीस स्टेशन ५ मिनिटात आपल्या ताब्यात घेतात. ह्या क्षणी सुद्धा विनोदी वाक्य ऐकायला मिळाल्याने तो दहशदवादी हल्ला हा नाटकच आहे असा जाणवला. असो, ह्या हल्ल्यात त्यांचे दोन अधिकारी गोळी लागून शहीद होतात. शेवट एवढा पटापट केलाय की त्यातल्या विनोदनिर्मितीमध्ये दोन पात्रांचा मृत्यू होतो ते बघून काहीच वाटत नाही.

मग त्या दहशदवादी हल्ल्याचा सूत्रधाराला विचारतात का केलस असा आणि कुठल्या संघटनेसाठी तू काम करतोस. यावर तो शुद्ध मराठीत सांगतो की आम्ही भारतीय आहोत आणि देशाच्या भ्रष्टाचार, बेकारी, राजकारणाविरूध्द आम्हाला लढायच होत, म्हणून आम्ही हे असा केला. (हे वाक्य मी ऐकून एवढा हसायला लागलो म्हणून सांगू..या आधी प्रत्येक सीनमध्ये तो हिंदी आणि शुद्ध हिंदीच बोलायचा :))

खूपच गोंधळ झालाय, दोन दोन दगडांवर एकदम पाय ठेवून उभे राहिल्याने. विजय चव्हाण ह्यांना घेऊन केलेली विनोद निर्मिती छान होती. अमोल कोल्हेला सरदारजी बनवल्याने त्याला काहीस हिंदी-मराठी बोलाव लागत होत आणि त्यात त्याला खूप कष्ट पडले असावेत (तो बोलताना बघितल्यावर जाणवेलच तुम्हाला). गाणी म्हणाल तर फक्त शीर्षक गीत खूप छान झालय, बाकी तीन गाणी चित्रपटामध्ये घुसडल्यासारखीच वाटतात. बाकी सगळ्यांचा अभिनय ठीक झालाय.

विषय खूपच छान निवडला होता, पोलिसांच्या जीवनावर आधारित असे फार कमी चित्रपट आले असतील. पण ऑन ड्यूटी मध्ये तो तितक्या सफाईदारपणे हाताळता नाही आला दिग्दर्शकाला. केदारने निराश केल असच म्हणेन… 😦

असो, मी माझा अनुभव सांगितला. तुमचा कदाचित वेगळा असेल..बघून ठरवा हव तर  🙂

– सुझे

सगळचं बदलत चाललय.. :(

————————————————————————-
“आज तू रुमाल दे, बॉल करायचा आहे कॅच कॅचसाठी”
“नाही..नाही मी नाही देणार आई ओरडते रुमाल खराब होतो”
“मला पण ओरडतात ना, पण मी काल दिला होता, आज तू देणार”
“ठीक आहे, घे..”

————————————————————————-
“सुहास, अरे आज ना पलीकडच्या गल्लीतल्या साई निकेतन सोसायटी बरोबर मॅच आहे. एक रुपया घेऊन ये रे कॉंट्रिब्यूशन आहे ते. २० रुपयाची मॅच आहे”
“घरी ओरडतील रे, किती वेळा पैसे मागू?”
“तुला खेळायच आहे की नाही?”
“खेळायच आहेच, मी आणतो”

————————————————————————-
रविवारी कबड्डीची प्रॅक्टीस आहे.. आपला “अ” वर्ग जिंकलाच पाहिजे..
नक्की येऊ सर..सुट्टीच आहे पूर्ण दिवस मस्त खेळू…

————————————————————————-
(कॉलेज बाहेरील पीसीओवरुन)
अरे मी खेळायला येतोय मला पण घ्या टीममध्ये..मी आता निघतोय कॉलेजमधून. तुम्ही टॉस करून ठेवा मी येतोच…
————————————————————————-

खूप आठवतात हे दिवस. आता काय माझ वय झालाय अश्या आविर्भावात माझ्याबद्दल काही विचार करू नका…:) हे दिवस म्हणजे १०-१२ वर्षापुर्वीचे. शाळेत मधली सुट्टी झाली की डबा पटापटा पोटात ढकलून धावत खाली यायचो खेळायला. रूमालाची कॅच कॅच, डॉजबॉल, सोन-साखळी, कबड्डी, आबादुबी.. मग शाळेला सुट्टी असली किवा शनिवार असला की शाळा सुटल्यावर क्रिकेट खेळायचो.

साठेला असताना प्रॅक्टिकल ४:३० ला संपायच आणि मी ४:४७ ची बोरीवली लोकल पकडून घरी पोचायचो ५:१० ला आणि घरी न जाता खालीच क्रिकेट खेळत राहायचो. अगदी अंधार होईपर्यंत खेळायचो. सलग सुट्टी आली की टेस्ट मॅच किवा बाजूच्या सोसायटीच्या टीम बरोबर ग्राउंडमध्ये मॅच ठरवायची आणि मग जिंकल्यावर एक बॉल आणि प्लास्टिकच्या छोट्या पिशवीतली एक पेप्सी घेऊन जीभ लाल लाल होईपर्यंत ती चोखत घरी यायचो.

आता दिवाळीत सुट्टी होती तेव्हा विचारला बिल्डिंगच्या बच्चे मंडळींना चला सगळ्यांना बोलवा आपण मॅच खेळू. आता मी ऑफीसला असताना माझ त्यांच्याशी एवढ बोलण नसायच. ती पोर म्हणाली तुम्ही मोठी मुल खेळा, आम्ही टीवीवर मॅच बघतो. मग अर्पीतने आणलेल्या नवीन एक्सबॉक्सवर गेम खेळायचे आहेत. लगेच मोबाइलने अर्पीतला फोन करून कुठले गेम्स आहेत ते विचारला त्या मुलाने आणि निघून गेला. मी मनातच धन्य म्हटला आणि म्हणालो आपण मोठे झालोय की ही मंडळी? माझ्यापेक्षा बिज़ी ही आजकालची मुल आहेत. त्या बिल्डिंगच्या ओसाड कॉंपाउंडला फेरी मारली आणि आपले जुने दिवस बरे होते असा मनातच म्हटला.

आज घरी येताना राजे शिवाजी मैदानासमोरून परत घरी येताना फक्त काही मोजकीच शाळकरी मुल दिसली मैदानात खेळताना. काही जण खेळ बघत होते तर काही मोबाइलवर गाणी ऐकत होते..तर काही मेसेजेस वाचत होते मोठ्याने शायरी काय, प्रेमाच्या चारोळ्या काय, नॉनवेज काय..मैदानी खेळ हे फक्त टीवीवर बघण्यासारखेच आहेत आणि त्यातल्या त्यात माहीत असलेला मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट बस बाकी अभ्यासपुरते माहीत आहेत…

खेळताना ह्यांचा फक्त सूपरहिरोच पडतो, धडपडतो..पण पेनकिलर घेऊन लगेच ताजतावना होऊन त्याच जोशात खेळतो. मोबाइलवरुन फोन करून डाइरेक्ट स्नॅक्स घरी बोलवायची अक्कल आहे या पिढीला आहे, त्यांना तूप-साखर पोळी काय गोड लागणार? याच वयात यांना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत. त्यांचे जे चालते ते वेगळच, सांगायला पण लाज वाटते. 😦

हाताची बोट जॉयस्टिक आणि कंप्यूटरवर थिरकत आहेत त्यांना काय कळणार बॉल लागून सुजलेल्या हाताने खेळायची मज्जा काय और..थकल्यावर १ रुपयात मिळणार ग्लासभर ताक कस थकवा पळून लावत…सब वे आणि मॅकडीच्या बर्गरला आपल्या घरच्या पोळी-बटाट्याच्या भाजीची सर ती काय येणार…आई-बाबापण मुल डोळ्यासमोर रहाव म्हणून हे फाजील लाड पुरवत आहेत याचच दु:ख जास्त आहे. मोबाइल काय वीडियो गेम्स काय..पॉकेटमनी काय…कसला ऐशोआराम आहे हा?…बालपण हे असा नव्हत कधीच माझ्यावेळी.

खरच आपली नवीन पिढी टेक्नोलॉजीची गुलाम होत जातेय. शिक्षाणापेक्षा ऐशोआराम किवा स्टेटस महत्त्वाच होत जातय. खर सांगायच तर बालपणाची व्याख्या बदलत जातेय दिवसेंदिवस आणि आपली अवस्था लवकरच च्यामारीकेसारखी होणार. 😦

खरच सगळच बदलत चाललय… 😦