किल्ले विसापूर..

किल्ले विसापूर..

रोहनच्या आणि आम्हा काही ट्रेक्कर बलॉगरच्या मनात आलेला विचार उचलून धरून रोहणा ने हा ट्रेक प्लान केला होता. हा किल्ला मी दोन वर्षापुर्वी भर उन्हाळ्यात चढलो होतो. किल्ला चढायचा मार्ग हा मागच्या बाजूनेच कारण जो रस्ता समोरून जायला आहे तो पूर्ण खराब झालाय, एका ओढ्याचा किल्ल्यावरून खाली येणार्‍या प्रवाहाला धरून वर चढाव लागत. उन्हाळ्यात गेल्यामुळे तो चढ खूपच घाम काढणारा होता.

रोहन ने गाडीच केल्यामुळे आम्हाला प्रवासच टेन्शन नव्हता. सगळ्याना घेत घेत आम्ही पुढे निघालो. सकाळी सकाळी दत्ता कडे गरम पोहे आणि वडे खाल्ले {जरा निषेध चालेल इथे ;)}. मग पुढचा प्रवास सुरू झाला. प्रसिद्ध पुणे वॉटरफॉल बघत लोणावळ्यात शिरलो, भारत एकटाच पुण्यवरून आला होता तेव्हा त्याला तिथून घेऊन किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. आम्ही जेव्हा किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि हा किल्ला बघितला तेव्हा त्या काळ्या काताळाने हिरवा शालू नेसला होता. तो शालू उन-पावसाच्या खेळात चमकून दिसत होता. आम्ही सगळे गाडीनेच आलो असल्याने थकवा असा नव्हताच. सगळे पटापटा किल्याच्या दिशेने सरकू लागलो. ओढ्याच्या दगडावरून घसरत, धडपडत, गप्पा मारत, एकमेकांना आधार देत. सगळे स्वत:चा गोल होऊ न देता द्या निसरड्या दगडांवरून, पाण्यातून वर पोहोचलो.

This slideshow requires JavaScript.

विसापूरचा तो हिरवा प्लाटू बघून मन एकदम प्रसन्न झाला होता. रोहनने थोडी ऐतिहासिक माहिती सांगितली किल्ल्याबद्दल.  मग आम्ही पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा मारली. आमच्या सोबत शेरू आणि त्याची बायको होतीच 😉 दोघेही मस्त पाणी मिळाले की डुबकी मारुन यायचे आणि गवताच्या टॉवेलला लोळून अंग पुसायचे. त्यानीच आम्हाला गडावरच्या माकड टोळी पासून वाचवला. मग फिरता फिरता किल्ल्याच्या कड्यावर बसून नारळवडी, गुड डे आणि स्निकर्स खाल्ले. एवढी मस्त हवा सुटली होती की तिथे त्या गवतावर डोळे मिटून शांत झोपवसा वाटत होत. समोर गर्द धूक्यात हरवलेला लोहगड आणि प्रचंड असा विंचूकट्टा दिसत होता. एका बाजूला राजमाचीचे डोंगर आम्हाला खुणावत होते. आवाज होता फक्त सो-सो करत वाहणार्‍या वार्‍याचा. मग शेवटी निघाव तर लागणार होतच. तिथल्या मिशीवाल्या मारूतीरायाचा दर्शन घेऊन (नेमका शनिवारच होता ना) आम्ही परत त्या ओढ्याच्या दिशेने फिरलो. परत ते दगड पायाखाली तुडवत त्या विसापूरच्या आठवणी घेऊन उतरत होतो. आमचा विचार होता लोहगडपण करावा पण मला आणि रोहनला आधीच तंबी दिली गेली होतो ज आणि च म्हणजे अजुन एक किल्ला चढणे आणि दुसर्‍या गडावर जाणे उच्चारयचे नाहीत 🙂 मग आम्ही जेवायला थांबलो तेव्हा जरा जोरात पाउस आला, एकदम अंधारून आल. विसापूरला उन-पावसाचा खेळ सुरू होता आणि लोहगडावर पाउस कोसळत होता जेव्हा आम्ही पायथ्याशी आलो. मग आम्ही पण लोहगडाच नाव काढला नाही कारण, जेवून टॅंक फुल्ल झाली होती आणि प्रचंड आळस आला होता सगळ्यांना…   🙂

जेवणात मस्त भाकरी आणि झुणका सोबत मिरचीचा ठेचा आणि कांदा. वर थंडगार लिंबू सरबत…अहाहा काय मस्त वाटला सांगू 🙂 मग परतीच्या वाटेवर लोणावळा इथे थांबून प्रसिद्ध पुरोहित चिक्की उचलली 🙂 ठाण्याला मी पोचलो ५:४५ ला मी तिथून बस ने बोरीवलीला जाणार होतो. सगळ्याना निरोप दिला, आणि रोहणाला परत ट्रेक काढू असा सांगूनच निघालो.

रोहन, सागर, दिपक , अनुजा आणि भारत खूप धम्माल केली मित्रहो…खूप खूप मज्जा आली

परत भेटूच एखाद्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत…

— सुझे

बदल

गेले तीन-चार आठवडे ब्लॉगवर काहीच पोस्ट नाही करता आला, ऑफीसच्या अंतर्गत राजकारणामुळे मला माझ्या आयुष्यच्या पहिल्या वाहिल्या दिवस पाळीला सामोरे जाव लागला. गेली ३ वर्ष आणि ४ महिने अविरत नाइट शिफ्ट करणारा मी आता ज्या वेळेला घरी यायचो त्या वेळेला ऑफीसला जायला लागलो ह्या सोमवार पासून. आता हा चेंज शरीराला लगेच मानवणारा नाही हे माहीत आहे, पण काय करणार करना पडता है. जिथे मला विचारल्या शिवाय माझे On शिफ्ट ब्रेकपण चेंज नाही व्हायचे तिथे माझी पूर्ण शिफ्टच बदलली गेली, कारण दिला गेला की मी नाइट शिफ्ट करतो म्हणून माझा पर्फॉर्मेन्स छान आहे.

सकाळच्या शिफ्टला उसात रात्र असते, त्यामुळे कस्टमर्स उगाचच काहीच  प्रॉब्लेम नसताना मुद्दामुन आम्हाला कॉंटॅक्ट करतात म्हणजे टाइमपास इश्यूस म्हणा हवा तर..ज्या मुळे सकाळच्या शिफ्ट करणार्‍या एजेंट्सचे स्कोर त्यामानाने थोडे कमीच असतात….हीच बाब लक्षात घेऊन आमच्या प्रतिस्पर्धी टीमच्या मॅनेजरने (हे माझ्या टीम मॅनेजरच्या भाषेत, पण ते सगळे माझे मित्रच) माझी शिफ्ट बदलायला लावली..म्हटला ठीक आहे. मला कामच तर करायाच आहे, म्हटला करू. माझ्या टीम मॅनेजरला हा माझा आटिट्यूड आवडाला नाही, त्याला वाटला मी खूप वाईट केला ती शिफ्ट करायाच मान्य करून. माझ्या स्कोर्सची चिंता सगळ्याना. (आयला एवढी काळजी दाखवतात सांगू :)) म्हटला जाउ दे जे होईल ते बघून घेईन मी, आपल्या टीम स्कोरपेक्षा मला क्लाइंट टार्गेट्स आणि पूर्ण फ्लोरचे स्टॅट्स महत्त्वाचे आहेत..

सकाळी सकाळी माफ करा, पहाटे ३ वाजता ट्रान्सपोर्टवाल्याचा फोन, “सर, पिक अप घेताय ना?” {साल्या एकतर आधीच झोपमोड करायची आणि वर विचारणार येणार की नाही} (त्याच पण बरोबरच हो, पण काय करू सुखाची झोप कोणी मोडली की राग येतो) गाडी येणार असते ४-४:१५ ला मी हो म्हटल्याशिवाय ते लोक गाडी पाठवत नाही. मग कंटाळा करत उठून आंघोळ आवरून गाडीच्या होर्नची किवा फोनची वाट बघायची हा दिनक्रम झाला. मग कधी मी उशिरा तयारी करायचो किवा गाडी उशिरा यायची. रोज-रोज वेगवेगळे ड्राइवर येत असल्याने दिशादर्शकाच काम कराव लागतच फ्रंट सीटवर बसून. ड्राइवरला झोप येऊ नये म्हणून गप्पा मारणे, साइकलवरचा चहा-कॉफी पिणे हा नित्यक्रमच झालाय.  सगळा कस वेगळा वेगळा वाटतय. 😦

बदल घडत जातायत..लोक बदलायत, मी बदलतोय. काही जण नव्याने ह्या बदलात सामील होतायत तर काही नव्याने हरवतायत. काही जण वेड्यात काढत असतील मला माझ्या वागण्याबद्दल तर काहींना दीडशहाणा वाटत असेन. कधी कधी वाटत नको काही बदल आयुष्यात सगळा आहे तस राहू देत पण कधी वाटत होऊ देत, बदलला नाही तर ते आयुष्य कसला?. निदान काही गोष्टी बदलेल्या चांगल्या असतात.

चला भेटू परत…बदललेल्या स्वरुपात 🙂

— सुझे