पहिली भेट – एक स्वैरलिखाण


आदल्या दिवशीच्या कांदे पोह्याच्या कार्यक्रमानंतर ठरल्याप्रमाणे “ती” आज पहिल्यांदा “त्याला” एकांतात भेटणार होती. रिक्षा करून ती स्टेशनला आली आणि ट्रेनच्या विण्डो सीटला डोक लावून बसून होती. मोबाइलचे हेडफोन्स कानात होते पण काही गाणी सुरू नव्हती…काल तिला त्या गोष्टीची खूप चीड आली होती, की कोणासमोर असा नटून-थटून आपण बसावं. त्याच्या आणि त्याच्या आई-बाबांच्या प्रश्‍नमंजुषा झेलत मान खाली घालून निमूटपणे उत्तर द्यावी. आपण आपले नेहमीचेच ठरलेले प्रश्‍न विचारावे मुलाला. मग घरच्या एका रूम मध्ये पाच मिनिटे त्याना एकांतात बसून बोलण्याची संधी??. काल सगळा कार्यक्रम कसा व्यवस्थित पार पडला ठरल्याप्रमाणे. “ती” तिच्या आईने सांगितल तसा वागली, बोलली. आईला “तो” खूप आवडला होता. खूप धावपळ करून, तिने ते पोरीसाठी स्थळ आणलं होत. कार्यक्रमानंतर आई पोरीच मन, कल जाणून घ्यायचा सारखा प्रयत्‍न करीत होती. पण ती काही बोलायला तयार नाही.

तिला बघायला आलेला हा पहिला मुलगा, अर्थात पहिलाच कार्यक्रम कांदे पोह्याचा. ती थोडी अस्वस्थ होती आतून. मुलगी सासरी जाण आपल्या आई-बाबांच घर सोडून हे मनाला घोर लावणारा प्रकार मुलींसाठी आणि ती वेळ आता जवळ आली हे पाहून तिच्या मनात खूपच धाकधुक होती. तीने धड त्याच्याकडे बघितलं पण नाही मान वर करून. त्या मुलाला भेटल्यावर तिच्या मनात प्रश्‍न पडू लागले. हाच आपला जीवनसाथी होणार का ह्यापुढे? नक्की? हा मला सुखी ठेवेल? व्यसनी नसेल ना? रागीट स्वभाव नसेल ना? हा मुद्दाम तर चांगला वागत नसेल ना आई-बाबांसमोर? चांगल्या कंपनीत तर आहे, पण ह्याच्या घरचे मला सांभाळून घेतील ना? भांडखोर निघाला तर? ह्याच्या मित्रांची संगत कशी असेल? अती फॉर्वर्ड विचार तर नाही ना? हे सगळा त्याला कसं विचारू? मला उद्धट, तर नाही ना म्हणणार तो? किती किती ते प्रश्‍न पडले होते बिचारीला 😦

एका जगप्रसिद्ध अकाउंट फर्म मध्ये काम करताना तिने मोठ मोठे प्रेज़ेंटेशन्स दिली क्लाइंटला, पण ह्या कां.पो नंतर ती खूपच अस्वस्थ झाली होती. रात्री झोप पण धड झाली नाही. या कुशीवरुन त्या कुशीवर तळमळत होती, त्याला उद्या भेटायचं ह्या मानसिक भीतीने. शेजारीच आई झोपली होती, तिच्या चेहर्‍यावर एक मंद हास्य होत, एक समाधान होत. मग तिला आईने दिवसभर केलीली धावपळ आठवली, ह्या कार्यक्रमासाठी. सगळ घर आवरणे, पडदे बदलणे, लादी स्वछ करणे, कुशन कवर्स बदलणे, सगळया गोष्टी जागच्या जागी ठेवणे. सगळ जेवण बनवणे, गोडधोड पण केलं जे तीच्या पोरीला आवडत ते. तिला अजिबात कामाला हाथ लावू दिला नव्हता त्या दिवशी. तिला जबरदस्तीने ब्युटी पार्लरला धाडला २००० रुपडे हातात कोंबून. पोरीसाठी तिने आधीच एक मस्त ड्रेस आणला होता खास या कार्यक्रमासाठी. खुप खुप खुश होती तिची आई दिवसभर. मुलगा घरी आल्यावर हाताने इशारा करत तिची आई तिला नीट सरळ बस, बोल तू पण,, मुलगा मस्त आहे, मला आवडला असा सांगत होती. सगळ सगळ तिला आठवत होत तिला, आईचा हसरा चेहरा निजलेला बघून. तिने कूस बदलली आणि हळूच डोळ्याच्या कडा पुसल्या. विचार करता करता कधी झोपं लागली कळलंच नाही तिला.

सकाळी ती उशिरा उठली कोणी काही बोलल नाही तिला. नाश्ता झाला, जेवणाची तयारी सुरू झाली. तिला आईने काही काम करू नकोस अशी आधीच ताकीद दिल्याने ती नुसती टीवी समोर बसून होती. एवढ्यात फोन वाजला, तिची आई किचन मधून धावतच बाहेर आली, तिने फोन उचलला आणि कानाला लावला. समोर आईचे हातवारे सुरुच होते. कोण आहे? तो आहे का? बोल तू?. तिने मानेनेच आईला हो सांगितला आणि त्याच्याशी बोलू लागली २ मिनिटात फोन संपला. तिची आई “काय झालं? भेटायला जातेस ना? कुठे भेटणार आहात? किती वाजता? अग बोलं की माझे आई 🙂 :)”

ती: दादरला संध्याकाळी ६ ला, प्लॅटफॉर्म नंबर १, इंडिकेटर खाली भेटणार आहे आज. आई तेच कणकेचे हाथ घेऊन बाबाना ही बातमी द्यायला गेली आत. पण ती अजुन त्याच अस्वस्थ मनस्थितीत टिविच रिमोट घेऊन बसली होती काय बोलू काही नाही खूपच विचारसत्र सुरू होते तिच्या डोक्यात आणि निघायची वाट बघू लागली टीवी बघत बघत.

तेवढ्यात ट्रेन मध्ये उद्घोषणा झाली पुढील स्टेशन दादर..अगला स्टेशन दादर. ती काहीशी दचकूनच उठली. एवढा वेळ चाललेलं ते विचारसत्र अचानक थांबल. पावल उचलत नव्हती तिची, पण काहीशी ओढत ती दरवाज्यात आली आणि प्लॅटफॉर्म नंबर ४ ला उतरली. तिला थोडा उशीरच झाला होता आईच्या ड्रेस सेलेक्षनमुळे. ती प्लॅटफॉर्म नंबर १ वर आली..तीची नजर त्याला शोधू लागली, तो काही दिसेना. मग शेवटी तिने त्याला फोन लावला, रिंग जात होती, कपाळावरचा घाम पुसत ती त्याने फोन उचलायची वाट बघत होती…

तेवढ्यात मागून आवाज आला “हाय..सॉरी सॉरी मला उशीर झाला, तुम्हाला खूप वेळ वाट बघावी लागली का?” तिने मानेनेच नकार दिला. मग त्याने कुठेतरी शांत जागी जाउन गप्पा मारू म्हणून सीसीडीकडे न्यायला सांगितला टॅक्सीवाल्याला. दोघांच बोलण एकदम जुजबीच..खूप गरम होतय नाही? ट्रेनमध्ये गर्दी होती का? ऑफीस कस चाललय? वगैरे वगैरे…

ती जास्त बोलत नव्हती. सीसीडीमध्ये मस्त सोफा सीट मध्ये बसले आणि कॉफी सांगितली त्याने. ती कुठून बोलायला सुरूवात करू ह्याचाचं विचार करत होती…तो पण जरा शांत स्वभावाचा त्यामुळे मूळ मुद्द्यला कोणीच हाथ घालायला तयार नव्हते. सगळा कसा प्रोफेशनल ऑफीस एटीकेट्सच चालू होते. तो तिची चलबिचल न्याहळात कॉफी पीत होता…

“कॉफी गार होतेय, नाही आवडली का तुम्हाला? दुसर काही सांगू का तुमच्यासाठी?” तिने नको सांगितलं आणि कॉफीचा कप तोंडाला लावला. शेवटी त्यानेच विषय काढला. “मला माहीत आहे हे असा भेटून एकमेकाना पारखणे खूप कठीण आहे. पण माझ्यावतीने मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. आई-बाबाना तुम्ही आवडलात आणि मला पण (तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले…) मी असा काही मुद्दाम सांगणार नाही माझ्याबद्दल चांगल, पण काही व्यसन नाही मला, लग्न झाल्यावर आई-बाबासोबतच राहणार ही एकच अट, कंपनी नवीन प्रॉजेक्टसाठी काही महिन्यानी यूकेला पाठवणार आहे. त्यामुळेच आईने हा बघण्याचा कार्यक्रम घाईत ठरवला. एका मुलीला एका भेटीत एका मुलाला “हो” बोलणे निव्वळ अशक्य आहे. मी तुम्हाला विचार करायची पूर्ण संधी देतोय..तुम्हाला काही प्रश्‍न विचारायचे असतील तर विचारा.”

एव्हाना तीच दडपण थोड कमी झालं होत..”आमच्या घरीपण सगळ्याना तुम्ही आवडलात, मी एक सरळ साधी मुलगी आहे, एकत्र कुटुंबपद्धत मला खूप प्रिय आहे..फॅशनबल कपडे आवडते मला, पण उगाच काही अती नखरे नाही करत, लग्नानंतर माझ्या संसाराच्या सुखी अकाउंट मध्ये मी माझ्या नवर्‍याची यशस्वी साथ देईन असा विश्वास आहे मला, खर तर मला हा कांदे पोहे प्रकार खूप अनकंफर्टबल वाटला काल, कदाचित मी तयार नव्हते एवढ्यात संसारसाठी पण आता माझ वाढत वय आणि घरच्या लोकांची काळजी वाढु नये म्हणून मी ह्या कार्यक्रमासाठी तयार झाले. तुमच्यात काहीच उणीवा मला नाही दिसत, तुम्ही खूप चांगला संसार कराल ह्याची खात्रीपण झालीय मला आणि आपल्या पत्रिकापण जुळल्या आहेत आधीच..तरीही मला थोडा वेळ द्या, प्लीज़”

“हरकत नाही, टेक युवर टाइम. कुठल्याही दडपणाखाली काही निर्णय घेऊ नका. चला मी तुम्हाला स्टेशनला सोडतो”

ती, त्याला बाय करून ट्रेन मध्ये चढली..परत वार्‍यासोबत उडणारे तिचे केस सांभाळत विचार करत होती ती….स्टेशन आलं..रिक्षा केली ती घरी आली..

घरी आईनेच दार उघडलं, आईच्या चेहर्‍यावरची उत्सुकता साफ दिसत होती तिला..ती काही न बोलता आत आली. सरळ बेडरूम मध्ये गेली कपडे बदलायला. आई तिच्या मागे जाणार एवढयात बाबांनी तिला थांबवलं. आता काही नको विचारुस, जेवताना बोलू. ताट घे वाढायला. आईने मग काय हो तुम्ही असा वैतागवाणा स्वर लावून किचनमध्ये गेली. ती फ्रेश होऊन हॉलमध्ये आली, तिला माहीत होत, आता विषय नक्की निघणार आजच्या भेटीचा, काय सांगू त्याना? होकार देऊ? की नकार? की थांबू अजुन विचार करून सांगते, पटेल का आई-बाबाना?

जेवताना मग बाबाच बोलू लागले, “हे बघ बेटा मुलगा आवडला नसेल तर सरळ सांगून टाक [आईने लगेच डोळे मोठे केले :)], कोणी तुला काही नाही बोलणार. शेवटी हे तुझ आयुष्य आहे, तुला संसार करायचा आहे. सगळा तुझ्या मर्जीने होईल. कोणी तुला जबरदस्ती करणार नाही…(आईकडे बघत बाबा म्हणाले)”

ती – “असं काही नाही बाबा, मुलगा खुप छान आहे, त्याच्या घरचे पण खूप छान आहेत….पण..”

आई – पण काय आता?

बाबा – थांब ग !! बोलू देत तिला, ओरडतेस काय माझ्या बाळावर?

ती – मला थोडे दिवस राहू द्यात ना या घरात, तुमच्या सगळ्यांच्या सहवासात, आईच्या कुशीत, बाबांकडून लाड करून घेत. मी अजुन तयार नाही लग्नासाठी. थोडे दिवस, मग आपण परत प्रयत्‍न करू..हा मुलगा खूपच छान होता यात वाद नाही पण थांबा ना. काही महिने थांबा ना, प्लीज़ प्लीज़ बाबा..

आई – अग पण असं स्थळ मिळेल का परत? तुला काही खटकलं का मुलात बोल? परत भेटायचं आहे का तुला त्याला?

बाबा – अग, काय चाललय तुझ? माझ पिल्लु म्हणतय ना थांबा, तर थांबू की. तशी पण मला माझी लेक इथून जाऊचं नये असं वाटत, खुप गुणाची आहे माझी मुलगी, तिला पोरांची काय कमी ग?

आई – करा अजुन करा लाड पोरीचे, आमची तळमळ दिसतचं नाही कोणाला. होऊ दे तुझ्या मनासारखं. मी नाही सांगते त्यांना उद्या फोन करून. आता तो तोंडाचा ड्रॉवर् आत घेशील काय? 🙂 वेडीच आहेस. चल जेव लवकर. नंतर केसात तेल घालून देते मस्त. काल झोपली नाहीस ना नीट आटप लवकर लवकर..

तिने डोळे पुसले, आईने पण पदराने डोळे पुसत पुसत बाबांकडे बघितल…बघते तर ते पण पाणावलेल्या डोळ्याने ह्या दोघींकडे बघत हरवून गेले होते…

– सुझे 🙂

42 thoughts on “पहिली भेट – एक स्वैरलिखाण

  1. अप्रतिम.. सुंदर.. कसली ओघवती झाली आहे रे !!! खूप खूप आवडली…

    आणि क्रमशः ची कटकट पण नाही 😉

    1. हेरंब, ठांकू 🙂
      कल्पना करत काही तरी पहिल्यांदाच लिहलय..एक कथा कधी पासून लिहून ठेवलीय. पण धीर नाही होत पोस्ट करायला..बघू करेन कधीतरी…

  2. अरे वेडा की काय तू.. !!!!!! कथा पूर्ण झालीये आणि तरी पोस्ट करत नाहीयेस???

    ए नॉ चोलबे .. लगेच कर पोस्ट…

  3. सचिन

    सुहास एकदम फर्मास डाव बर का…

    आवडली आपल्याला.

    आणि हो ते हेरंब म्हणतोय तस लिहलेली कथा पोस्ट कर पाहु

    1. मैथिली, खूप दिवसानी आलीस..स्वागत 🙂
      नक्की प्रयत्‍न करतो कथा पोस्ट करायचा लवकरात लवकर…

  4. सोनाली केळकर

    सुहास
    एकदम बरोबर लिहिलं आहेस. अनुभवावरुन सांगते.
    खरच मस्त झाल्ये पोस्ट.

    1. धन्यवाद सोनाली, हो एका मुलीलाच ह्या प्रसंगाची अनुभूती असु शकते. मी आपली कल्पना शक्ति लावली 🙂

    1. विद्याधर, थॅंक्स रे.
      फॉर्म वगेरे काही नाही रे, एक छोटासा प्रयत्‍न बस..बघू पुढे कधी जमतय ते 🙂

  5. sahajach

    अरे मस्तच जम्या की 🙂 …..

    आणि तयार कथा न टाकल्याबद्दल मात्र निषेध 😦

    1. अग ताई, रागाऊ नकोस ग. मी प्रयत्‍न करेन पोस्ट करायचा लवकर…

      हे स्वैरलिखाण आवडलं तुला ते आवर्जून सांगितल्या बद्दल धन्यू 🙂

  6. anish

    मी खरंच कल्पनासुद्धा केली नव्हती तू असं काही लिहिशील. पण जमतंय तुला, लिहित जा.

    1. धन्यवाद वैशाली आणि स्वागत ब्लॉगवर..
      लिहायचा प्रयत्‍न करतोय जमेल तसा..अशीच भेट देत रहा… 🙂

    1. उषा, प्रतिक्रियेसाठी आभार आणि ब्लॉगवर स्वागत. असाच एक प्रयत्‍न केला मी. अशीच भेट देत रहा.

  7. छान आहे. सुखान्तिका आहे. लग्न झालं नाही ना दोघांचं, म्हणून… 😉 लग्न झालं असतं तर शोकान्तिका म्हणावं लागलं असतं. 😉

    1. संकेत, काही सुखांतिका असतात लग्न झाला असला तरी..

      अनुभव नाही म्हणा अजुन मला लग्नाचा….अनुभव आला की नक्की सांगेन 😉

  8. Pingback: सुखी रहा – स्वैरलिखाण « मन उधाण वार्‍याचे…

  9. Pingback: सई.. | मन उधाण वार्‍याचे…

  10. अक्षता

    सुहासजी खूप छान लिहिलं आहे.
    ज्या मुलीचा पहिलाच कांदे- पोह्यांचा कार्यक्रम आहे तिचा मनाची होणारी चलबिचल आणि कुणासमोर असं शोकेस मधल्या बहुलीसारखा नटून थाटून बसण्याची तिला वाटणारी चीडचीड, तिचा घराबद्दलची तिची ओढ तुम्ही अगदी योग्य रित्या मांडली आहे.
    जी मुलगी arrange marriage करतेय, तिने हा लेख वाचला तर ती स्वतःला त्या मुलीचा जागी नक्की imagine करेल. 🙂

    1. अक्षता,

      मला अरे-तुरे केलेले आवडेल 🙂 🙂

      बाकी लेखाच म्हणत असशील तर एक प्रयत्न केला. तुम्हा सर्वांना तो आवडला तेच लेखाचे फलित. खूप खूप आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.